थोडं (खूप सारं?) गोडाचं -५(श्रीखंड)
(घरातील गमती-जमती)
थोडं गोडाचं मालिकेतील आज पाचवा लेख, खास मराठी नूतन वर्षारंभा निमित्त, अर्थातच गुढी पाडवा विशेष! गुढी पाडवा म्हटलं की घराघरात श्रीखंड-पुरीचा बेत असतो. पण बऱ्याच घरात बाजारातून विकत आणलेलं श्रीखंड असतं. बऱ्याच वेळा ते कितीतरी जुनं असतं. विकत आणलेलं म्हणजे ते जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यात काय काय रसायनं घातलेली असतात. ती शरीराला घातकच असतात. तसेच चव सुद्धा कशी असेल याची खात्री नसते. खायला घेतल्यावर कळते. मग जेवणातील सगळी मजा आणि आनंद निघून जातो. बऱ्याचदा ते जास्त टिकावे म्हणून त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे बरीच मंडळी त्यात थोडं दूध घालून ते चांगलं मिसळून घेतात आणि मग खातात. तसेच त्यात रंग सुद्धा घातलेले असतातच. ते सुद्धा हानिकारकच. घरी करायचे म्हटलं तर बऱ्याच जणांना ते किचकट वाटते. म्हणून आज हा "श्रीखंड प्रपंच!" श्रीखंडाची गोष्ट, माझी वैयक्तिक.
मी अगदी समजायला लागल्यापासून, श्रीखंड घरीच केलेलं बघत आणि खात आलेय. अर्थातच, मला समजायला लागण्या आधी किंबहुना माझ्या जन्माआधी सुद्धा श्रीखंड घरीच केले जात होते. श्रीखंड करण्यासाठी, आता चोवीस तास आधीपासून नियोजन करावे लागते. तेव्हा मात्र छत्तीस तास आधीपासून नियोजन करावे लागे. थोडा शॉर्ट कट मारायचा असेल, तर बारा तास आधी नियोजन सुद्धा पुरेसे असते. तसेच यात फार श्रमाचे, कष्टाचे किंवा किचकट काहीही नसते. फसण्याची तर शक्यताच नसते, माझ्या मते.
चला तर मग, आता गोष्टीला प्रत्यक्ष सुरुवात करू या. घरात इतकी मंडळी म्हणजे श्रीखंड सुद्धा काही किलोचे लागत असे . त्यासाठी दूधही भरपूर लागे. तेव्हा पाहिजे तेव्हा, पाहिजे तितके दूध मिळत नसे, दूध केंद्रावर. बारा तास आधी त्याची पूर्व सूचना देऊन ठेवावी लागे. घरात शीत कपात नसल्याने आधी आणून ठेवणे वगैरेही शक्य नसे. सगळं वेळच्यावेळी आणावं, करावं आणि अर्थातच खावं ही लागे. अन्यथा ते नासून जाणार आणि वाया जाणार. मग हे जास्तीचे आणलेले दूध एका भल्या मोठ्या पितळी पातेल्यात तापविले जाई. त्यानंतर ते थोडे कोमट राहिल, इतकेच थंड होईल याकडे लक्ष दयावे लागे. कारण त्यात विरजण घालून त्याचे दही लावायचे असे. इतक्या मोठ्या प्रमाणात दुधाचे दही करायचे तेही छान घट्ट, कवडी दही हवे, त्यासाठी ही सगळी काळजी घेणे आवश्यक. तर त्या दुधाला विरजण लावून झाकून ठेवले जाई.
साधारण बारा तासांनी म्हणजे सकाळी लावले तर संध्याकाळी आणि संध्याकाळी लावले तर सकाळी, छान घट्ट कवडी दही तयार झालेले असे. यानंतर वेळ येते ती, ह्या दह्यापासून चक्का तयार करण्याची. यासाठी हे दही एका सुती कापडात घालून, घट्ट बांधून, कुठे तरी टांगून ठेवावे लागते, साधारण बारा तासांसाठी. आमच्याकडे यासाठी कायमचे एक सुती, खादीचे धोतर ठेवलेलं होते. या धोतराच्या एका अर्ध्या भागात हे दही घातले जाई आणि घट्ट गाठ मारून बांधले जात असे. हे बांधतांना थोडी काळजी घ्यावी. या कापडाचा बांधताना एखादाही कोपरा निसटला तर त्यातून दहीच बाहेर येणार. असे होता काम नये. मग हे बांधलेले दही कुठे तरी टांगून ठेवावे लागते. तेव्हा आमच्याकडे गाद्या ठेवायला लोखंडी पलंग होता. या पलंगाच्या रुंदीच्या बाजूला असलेल्या सगळ्यात खालच्या पट्टीला हे बांधलेले दही टांगून ठेवता येत असे. तिथे हे टांगून ठेवल्यावर त्या खाली एक घमेली किंवा मोठी परात ठेवली जात असे. टांगून ठेवल्याने त्या दह्यातील पाणी ठिबकत राहते. अगदी सुरुवातीला या पाण्याची धारच असते, मग हळूहळू कमीकमी होत जाऊन त्याचे क्रमाने मोठ्या आणि छोट्या थेंबात रूपांतर होते. तसेच त्याचा वेग सुद्धा कमी कमी होत जातो. दोन थेंबातील अंतर आणि वेळ दोन्ही हळू हळू वाढत जाते. हे पाणी गोळा करण्यासाठी त्याखाली काहीतरी भांडे ठेवावे लागते.
एकदा का हे दही बांधून, टांगून ठेवले की, त्यातील पाणी खाली ठेवलेल्या भांड्यात पडतांना एक छान लय बध्द आवाज ऐकू येतो. हळूहळू सूक्ष्म पणे बदलत जाणारा. हा आवाज ऐकायला मला फार आवडे, अजूनही आवडतो. एव्हढेच नाही तर, तेव्हाचा तो आवाज अजूनही मला स्पष्ट ऐकू येतो. या सोबतच, एक छान हवाहवासा मुलायम. आंबूस-मधुर वास सुद्धा हळूहळू घरभर दरवळायला लागतो आणि थोडा वेळातच अख्खे घर, त्या वासाने भरून जात असे आणि मग माझ्या तना-मनात एक मऊ, मुलायम, आणि मधुर अशी जाणीव भिनत असे. जवळजवळ निम्मी चवच येत असे जिभेवर, श्रीखंडाची! आमच्याकडे तेव्हा साधारण झोपण्याच्या आधी दही बांधून टांगून ठेवले जात असे. या पलंगाजवळच, जमिनीवर गाद्या टाकल्या जात असतं, आम्हा मुलींना झोपण्यासाठी. त्यामुळे त्या पाण्याचा परातीत पडतांना होणारा लयबद्ध आवाज ऐकत, सोबतच तो छान मऊ, मुलायम, रेशमी, आंबूस, मधुर वासाच्या धुंदीत केव्हा छान झोप लागली ते कळतही नसे. झोपेत बहुतेक त्या मऊ, रेशमी, मुलायम चक्क्यामध्ये बागडायला मिळाल्याची स्वप्नंच पडत असावेत, त्या रात्री!
एका बाजूला हे दही बांधून झाले की, एका बाजूला तेव्हाच काजू, बदाम, अक्रोड वगैरे हवा तो सुका मेवा सुद्धा पाण्यात भिजत घालावा आणि त्यावर झाकण ठेवून द्यावे. म्हणजे साधारण बारा तासांनी चक्का तयार होतो, तेव्हा हा सगळा सुकामेवा सुद्धा पाण्यात छान भिजल्याने मऊ होतो. त्यामुळे त्याचे हवे तसे काप सहजच करता येतात. दुसरे महत्वाचे म्हणजे सुकामेवा कधीही पाण्यात भिजवून ठेवल्याशिवाय खाऊ नये. सुकामेवा खायची हीच योग्य आणि आरोग्यदायी पद्धत आहे, आयुर्वेदाप्रमाणे! असे केल्याने, त्या सुक्यामेव्याचा शरीराला कुठलाही अपाय तर होत नाहीच, पण चांगल्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने मदत होते. कुठल्याही पदार्थात टाकतांना तर असे करावेच. पण नुसते खायचे असले तरी सुद्धा ह्याच पद्धतीने खावा.
अर्थातच तेव्हा श्रीखंडात काय, कशातच सुकामेवा घातला जात नसे, याचा सखोल उल्लेख मागील एका लेखात आलेलाच आहे. हे माझे अलीकडले चोचले. पण ते छान रेशमी मुलायम पोताचे श्रीखंड खातांना, तितकाच मऊ, सुक्या-मेव्याचा तुकडा दाताखाली आला की खूप छान वाटते. तसेच कडक सुक्यामेव्या पेक्षा या पाण्यात भिजवून मऊ झालेल्या सुक्यामेव्याला एक वेगळीच मधुर चव आलेली असते. त्यामुळे मूळ श्रीखंडाची मधुर-गोडं चव अजूनच स्वर्गीय मधुर होऊन जाते. याचा अनुभवच घ्यायला हवा, त्याशिवाय मी काय म्हणते ते कळणारच नाही.
आता मात्र मी या सगळ्या आवाजच्या आणि त्या वासाच्या आनंदाला पारखी झाले आहे. कारण आता झोपायच्या खोल्या वेगळ्या झाल्यात आणि हे श्रीखंडाचे बांधून टांगायचे काम स्वयंपाक घरातच होते. त्यातही मी हे बांधलेले दही, सिंक मधील नळालाच टांगून ठेवते आणि त्यावर एक प्लास्टिकची पिशवी बांधून त्याला एक छोटं छिद्र पाडते. जेणेकरून त्या कापडावर चिलटं किंवा तत्सम बारीक जीव बसणार नाही आणि दह्यातून गळणारे पाणी त्या छिद्रातून वाहून जाईल. या सगळ्या प्रकारामुळे पाण्याचा आवाज, तसेच त्या दह्याचा रेशमी, मुलायम, आंबूस वास येण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असते. त्यामुळे आयुष्यातील तो आनंद केव्हाच विरून गेलाय माझ्या आयुष्यातील. पण या लिखाणाच्या निमित्ताने त्या सगळ्या क्षणांची आठवण होते, आभासी का होईना पण पुन्हा ते क्षण अनुभवता येतात, जगता येतात!
तर दुसऱ्या दिवशी उठून पाहिले की त्यातून पाणी पडायचे जवळ-जवळ थांबलेले असते. कारण रात्रभरात त्या दह्यातील सगळे पाणी गळून गेलेले असते. म्हणजेच चक्का, श्रीखंड करण्यासाठी पूर्णपणे तयार असतो. सकाळी अंघोळ, बाकी काम आणि स्वयंपाक मार्गी लावून, मम्मी हा टांगलेला तयार चक्का बांधलेल्याच स्थितीत एका मोठ्या ताटात ठेऊन स्वयंपाक घरात घेऊन जात असे. तोपर्यंत आम्हा मुलींच्या सुद्धा अंघोळी वगैरे उरकून, आम्ही तयार झालेल्या असू. हा दिवस साधारण सुट्टीचाच असे. कारण श्रीखंड म्हणजे सणा-वारालाच होणार आणि बहुतेक सगळ्या सणा-वाराला आम्हाला शाळेला सुट्टीच असे. मग माझी अशा काही खास कामात लुडबुड ठरलेली.
हा बांधलेला तयार चक्का, सोडला की जे काय दिसते, त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य! दही कापडात बांधलेले असते आणि त्यातून हळूहळू पाण्याचा अंश कमी होत जातो. त्यामुळे त्या कापडाला चुण्या पडत जातात आणि आतील दही सुद्धा त्याचा आकार घेऊ लागते. त्यातील पाणी संपूर्णपणे गळून गेले की त्या बांधलेल्या दह्याच्या कापडाचा आकार एका अगदी मुलायम गाठोडी सारखा होतो. नंतर ते कापड सोडले की, त्या चक्क्याला सुद्धा छान गाठोडी सारखा आकार आलेला असतो. दिसायला एकदम पांढरा शुभ्र आणि अगदी रेशमी मुलायम! बघतच राहावेसे वाटते त्याकडे. हात शिवशिवायला लागतात, त्याला स्पर्श करून ते मुलायम पोत अनुभवण्यासाठी! हल्ली शरीरात कॅल्शिअमची कमतरता झाली की डॉक्टर योगर्ट खायला सांगतात, मग बाजारातील आयते उपलब्ध असलेले योगर्ट घेऊन खाल्ले जाते. ते ही तसेच बरेच जुने, कसली कसली रसायनं मिसळली, अगदी कुठल्या कुठल्या लांबच्या देशातून आलेली. लोक अगदी कौतुकाने खातात. त्याचा नक्की उपयोग होतो की अपाय होतो देवच जाणे . पण हा आपला चक्का म्हणजेच योगर्ट. असे छान घरी बनवावे आणि बिनधास्त खावे, नक्कीच चांगलाच फायदा होईल! असो
तर चक्का तयार झाला की एका मोठ्या भांड्यात, त्याप्रमाणात साखर घातली जात असे. एखाद्या भांड्यात म्हणण्यापेक्षा, त्या आमच्या लाडक्या गंजात(इडली, जिलेबीचा लेखात उल्लेख आलेल्या) साखर घातली जात, मग या गंजाचे तोंड, त्याच धोतराच्या दुसऱ्या टोकाने बांधले जात असे (लोणच्याच्या बरणीचे बांधतो तसे). याच्या पुढची पायरी माझ्या खूप आवडती असे. ती म्हणजे एका मोठ्या चमच्याने तो तयार चक्का थोडा थोडा करून, त्या बांधलेल्या कापडावर घालायचा आणि हाताने हलवून-हलवून वस्त्र-गाळ करून घ्यायचा. असे केल्याने त्यातील अगदी सूक्ष्म गाठी सुद्धा मोडल्या जातात. तो हलवतांना बोटांची किती मज्जा! छान त्या मऊशार चक्क्यात बागडायला मिळते! मला हे काम नेहमीच करावेसे वाटे. पण लहान असल्याने हे काम करण्याची मुभाच नव्हती. फारतर भांड्याला बांधलेले कापड सुटू नये म्हणून ते धरून ठेवण्याचे काम मिळे. बाकी तो जो काय रेशमी मुलायम अनुभव असे, तो फक्त डोळ्यांनीच घ्यावा लागे.
मी, हे काम करण्या एव्हढी मोठी झाली तोपर्यंत बाजारात आणि पर्यायाने घरात सुद्धा स्टीलचे पुरणयंत्र आलेले होते. मग काय त्याचाच वापर होऊ लागला आणि चक्का वस्त्रगाळ करायची पद्धतच लोप पावली. त्यामुळे मला मोठं झाल्यावर हे काम करायला मिळेल, ही इच्छा कायमची अपूर्णच राहिली. लग्नानंतर तर घरकाम, नौकरी, बाहेरची काम अशी सगळी धावपळ असे. त्यात या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडला. त्यामुळे माझ्या हातात राज्य येऊन सुद्धा, मला ही इच्छा पूर्ण करायचे भान राहिले नाही. सरळ फूड प्रोसेसर मध्ये फिरवून, मी हे काम करत असे. आता काही वर्षांपासून तर गायीचे दूध आणि थंड हवा यामुळे मोठ्या प्रमाणात दही करणे शक्यच नसते. मग आयते दही आणूनच, चक्का बनवावा लागतो. पण हा चक्का मी कशातही न फिरवता, तसाच वापरते. वस्त्र-गाळ वगैरे शब्दाशी तर दूर दूर पर्यंत काहीही संबंध सुद्धा नसतो. एका वाडग्यात साखर, काप केलेला सुका मेवा आणि किसलेले जायफळ घालते. त्यावर हा चक्का घालते . एका चमच्याने हे सगळे नीट मिसळून घेते. बाकी कामं करता करता, अधून मधून ते सारखं हलवत असते. त्यामुळे त्यातील साखर तर विरघळतेच पण काही गाठी असल्याचं तर त्याही मोडल्या जातात आणि श्रीखंड छान तसेच रेशमी मुलायम होते.
मागे उल्लेख केल्याप्रमाणे आम्हा मुलांना वेलची, जायफळ अजिबात आवडत नसल्याने, आमच्याकडे श्रीखंडात सुद्धा वेलची, जायफळ कधीच घातले जात नसे. चक्का वस्त्र गाळ केला आणि त्यात साखर कालवली की झालं श्रीखंड तयार! सुकामेवा वापरला जात नसे आणि केशर वगैरे तर फारच लांबची गोष्ट. आता मात्र मला जायफळ खूप आवडते. शिवाय ते श्रीखंडात घातले म्हणजे श्रीखंड बाधत नाही ते वेगळेच. त्यामुळे मी अगदी सढळ हाताने घालते. फक्त मी ते छोट्या किसणीवर किसून घालते. पण ते छान सहाण वर उगाळून घातले पाहिजे. माझा आळस, दुसरं काय?
साखरे ऐवजी गूळ सुद्धा वापरता येतो. त्यामुळे त्याची चव तर अजून बहारदार होतेच, पण ते पौष्टीक सुद्धा होते. ज्यांना साखरेचा त्रास आहे त्यांनी सरळ पाम जागरी (ताडाच्या झाडापासून तयार केलेला गूळ ) वापरावा . त्यामुळे त्रास तर होत नाहीच, पण त्या गुळाच्या गडद रंगामुळे श्रीखंडाला छान चॉकलेटी रंग येतो. या रंगामुळे ते श्रीखंड अजूनच छान दिसते ! व्यक्तीशः मला चाॅकोलेट फार आवडते. पण चॉकोलेट चवीचे किंवा स्वादाचे दुसरे पदार्थ अजिबात आवडत नाही. पण ज्यांना आवडतात, त्यांच्या साठी ही एक छान पर्वणीच! तो रंग आणि पोत बघूनच मन भरून जाईल आणि बघताच क्षणी त्यावर ताव मारण्याची इच्छा होईल. अलीकडे मी माझ्यासाठी म्हणून हा गूळ वापरते. हे श्रीखंड बघून माझी लेक म्हणाली, सगळं श्रीखंड असच करत जा, दोन दोन करायची काहीच गरज नाही!
लग्न झाल्यापासून आम्ही दोघे, नंतर तिघेच असतो, पण श्रीखंड मात्र पूर्वीसारखेच भरपूर करावे लागते. एक म्हणजे घरात सगळ्यांनाच खूप आवडते. शीत कपाट असल्याने बऱ्याच दिवस टिकून सुद्धा राहते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी केलेले श्रीखंड माझ्या आजूबाजूला सगळ्यांनाच इतके आवडते की, ते सगळेही नेहमीच वाट बघत असतात, मी श्रीखंड केव्हा करते याची . त्यामुळे श्रीखंड तयार झाले की, बरेच डबे भरले जातात. ते डबे भरत असतांना, घरातील मंडळी लक्ष ठेवून असतात. "आमच्यासाठी पण ठेव थोडे, सगळे वाटून टाकू नको!" असा आवाज देतात. मग डबे घरोघरी पोहोचते होतात. घरातले, बाहेरचे सगळेच जण ते श्रीखंड खाऊन अगदी तृप्त होतात आणि म्हणतात,
"अन्नदाता सुखी भव!"
आणि मी अगदी भरून पावते...
©आनंदी पाऊस
(थोडं (खूप सारं ?) गोडाचं -५ )
१ मार्च २०२२
रात्रभर बांधून ठेवल्यावर
पूर्णपणे पाणी गळून गेल्यावर
चक्क्याची गाठोडी !
माझ्याकडे गेले कित्त्येक वर्ष ही सुती ओढणी
ठेवलेली आहे मी चक्का करण्यासाठी !
गाठोडी सॊडल्यावर आतील
दिसणारा रेशमी मुलायम चक्का !
पुरण यंत्र
असं कापड बांधून त्यातून चक्का
वस्त्र गाळ केला जात असे
वाडग्यात रात्रभर भिजलेल्या सुक्यामेव्याचे
काप , साखर आणि किसलेले जायफळ
वाडग्यात रात्रभर भिजलेल्या सुक्यामेव्याचे
काप , पाम जागरी आणि किसलेले जायफळ
त्यावर तयार चक्का घालावा
असे अधून मधून ते मिश्रण चमच्याने हलवत राहावे
पांढरे शुभ्र आणि चॉकलेटी श्रीखंड तय्यार !
अप्रतिम शब्दांकन!
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍🤩
Deleteनेहमी प्रमाणे छान लिहिले आहे.
ReplyDeleteमनःपूर्वक आनंदी धन्यवाद! 🙏☺️
DeleteI salute you .
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!
Deleteवा वा मस्त अगदी कधी खायला मिळेल असे झाले आहे. लहानपणच्या श्रीखंडाच्या आठवणी तर खुप आहेत. आताशा मी पण घरीच करते. नाही तर महालक्ष्मीचे आम्रखंड आणुन खातो. कारण ते अगदी फ्रेश असते आणि रोज नविन बनवतात
ReplyDeleteसांग की काही आठवणी.
Deleteघरीच करतेस हे ऐकून आनंद झाला!
आनंदी धन्यवाद! 😍❤️
वाह अप्रतिम लेखन आणि छान रेसिपी, आता मात्र खुप इच्छा होते आहे श्रीखंड खाण्याची����
ReplyDeleteएकदा श्रीखंड खाण्याचा योग नक्की घडवून आणू या!
Deleteआनंदी धन्यवाद! 🙏😊
�������� ho mi tu bnwlel srikhand khall ahe
ReplyDeleteNetane tu he shabdat mandtes tyach kautuk
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 🤩🤩
Deleteवा मस्त आठवणी .आधीच्या आणि आताच्या श्रखंडाच्या रेषिपीचे वर्णन छान केले.आता गुढीपाडवा आलाच आहे श्रीखंड खायला.आता मस्त ताव मारायचा. सौ.मंदा चौथरी.
ReplyDeleteसगळी तुझीच शिकवण!
Deleteखूप सारे प्रेम!! 😍❤️🤩
Wa khup rasbharit v sunder varan keles g. Aatach shrikhand khavese vatat aahe! mast!
ReplyDeleteआनंदी धन्यवाद! 🤩😍
Deleteव्वा,!! छान लेखन, श्रीखंड बनविण्याची पद्धत क्रमशः वाचकांना भावेल अशीच आहे मग आता गुढिपाडव्याला आमच्यासाठी बनवून पाठव बरं का����������
ReplyDeleteनक्की पाठवते!!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 🙏☺️
Bai kase tula such te
ReplyDeleteMastch
Shrikhand khayachi eccha zali aata
सप्रेम आनंदी धन्यवाद! ❤️🤩
DeleteChan varnan tondala panich sutale😋
ReplyDeleteKahi juna athwani jagi zhala
Mudesud mandali shrikhand banavanachi padhat👌
आठवणी सांगायच्या म्हणजे अजून आनंद द्विगुणित होतो!
Deleteआनंदी धन्यवाद! ☺️
घरगुती श्रीखंडाची पाककृतींचे detailing खूप आवडले.पहिल्यादाच पाहलय..आजतागायत हे खंड चितळे वा वारणाच खाल्लय....
ReplyDeleteसारेच रचलेले कृतीनुसार प्र.चि.1 नंबर....घट्ट बांधलेलं..टांगलेलं दही..व त्याचा बनणारा चकचकीत चक्का...सटात काढलेल्या चक्कयात मालातर लोळावसवाटतय...
पूर्ण लेखाला सुमधुर गोड चव वास येतोय.व पारंपरीकमय वाटतय..😍Lipsmackingच..आहाहा..
सगळे मान्यच!
Deleteपण त्याबरोबरच तुझा अभिप्राय सुद्धा फारच सुंदर!
शक्य होईल तेव्हा आपण नक्कीच श्रीखंड पार्टी करू या!
धमाल येईल!
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍🤩
खूप छान लेख आहे मी नक्की ट्राय करेल 😋😋
ReplyDeleteखूप मस्त ����तोंडाला पाणी सुटले. लहानपणची आठवण ताजी झाली कारण त्यावेळेस गुढीपाडव्याला सगळ्यांच्या घरी हीच श्रीखंडाची तयारी असे , अजून आताही मी घरीच श्रीखंड करते . आणि मलाही असेच वाटते की माझ्या श्रीखंडासारखकोणीच कोणीच करु शकत नाही ��
ReplyDeleteखूप छान लेख लिहिला आहे👌..खूप मस्त श्रीखंड👌👌..!तोंडाला पाणी सुटले...😋
ReplyDeleteखुप छान लेख आहे.या गुढीपाडव्याला मी नक्की हा प्रयत्न करेन बनवण्याचा.खुप विस्तृत वर्णन आहे.ड्रायफ्रूट भिजवण्याचा मुख्य फायदा खुप उपयुक्त आहे.सगळ्या प्रकियेचे वर्णन उत्कृष्ट आहे.👌👌🥰
ReplyDeleteमस्त!!
ReplyDeleteतुमच्या लेखमालेचा फायदा म्हणजे.... जून्या पाककृती पद्धतींचा कायमस्वरूपी ईतिहासच जणू!
नव्या पिढीच्या
जिज्ञासूंना मार्गदर्शक
Khupch Chan Shrikhand Aathavan aali Bengalorchi����❤️❤️��
ReplyDeleteश्रीखंड खूप भारी.. सुगरणच झालीस तू.. व्वा वा ..
ReplyDeleteआता मीही सुकामेवा भिजवून घालत जाइन.. चांगली टिप दिलीस..
सुगरण वगैरे काही नाही.... जे आवडते ते आवडीने करते इतकेच 😄
Deleteसप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍