Skip to main content

गोष्ट गुढीपाडव्याची ! (काही अनुभवलेलं...)

 गोष्ट गुढीपाडव्याची !

(काही अनुभवलेलं...)


                           
                                      आम्ही शाळेत असतांना, गुढीपाडवा आला की, आम्हा मुलांचं काही वेगळंच चालत असे. सारखं प्रत्येक जण, दुसऱ्याला प्रश्न विचारत असे. "कुठला सणं आला आहे आता?" किंवा "मराठी वर्षाची सुरुवात केव्हा होते?" किंवा "आता आपल्याला कसली सुट्टी आहे?" प्रश्नाचे उत्तर एकच "गुढी पाडवा!" असे, पण समोरच्याला लक्षात येऊ नये म्हणून प्रश्न असा वेगवेगळ्या प्रकारे विचारायचा, एकदा का समोरच्याने उत्तर दिले "गुढी पाडवा!", की काय आनंद होत असे! कारण असे उत्तर कुणी दिले, की त्याला लगेचच उत्तर दिले जात असे, "नीट बोल गाढवा!" यातून काय आनंद मिळत असे. पण सगळेच हुशार आणि सावध असत या बाबतीत. त्यामुळे फारच कधीतरी हा आनंद मिळत असे. आता हे सगळं कुठून आलं?, अगदीच गम्मत म्हणून होता का हा प्रकार? की त्यामागे अजून दुसरे काही आहे? हे मात्र आजही माहिती नाही. खरं म्हणजे शाळा सुटली आणि या गोष्टीचाही विसर पडला. आज या लिखाणाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकारची आठवण झाली आणि वरील सगळे प्रश्न आता पडलेत मला. अर्थातच या सगळ्याचा उलगडा करण्याचा, त्यामागे काही गोष्ट आहे का हे जाणून घेण्याचा मी आता नक्की प्रयत्न करीनच. काही गोष्ट असेल आणि मला जर ती कळेल तर अशाच एखाद्या लेखात तुम्हा सगळ्यांनाही सांगेनच नक्की. असो 
                          तर पाडवा तोंडावर आला, की गृहीणींची वेगवेगळ्या प्रकारची लगबग सुरु होते. मुख्यतः दोन प्रकारची. एक म्हणजे गुढी संबंधित आणि दुसरी म्हणजे त्या दिवशीच्या जेवणाच्या बेतासंबंधित. आजच्या लेखात गुढी संबंधित लगबगीच्या गोष्टी! हल्ली साखरेच्या गाठी आणि त्याचे हार सुद्धा बऱ्याच गृहिणी घरीच बनवतात. खूप कौतुक तर वाटतेच. पण आपल्या सगळ्या परंपरा आणि संस्कृती छान आणि खात्रीने जपली जाऊन, पुढच्या पिढी पर्यंत पोहचवली जाते याचा खूप आनंद आणि समाधान वाटते! चौधरी सदनातच काय, पण आम्ही कुणीही साखरेच्या गाठी घरी करत नाही, एकदाही करून बघितल्या नाहीत. एक तर त्या बाजारात सहजच उपलब्ध असतात आणि दुसरे म्हणजे त्या आपण घरी बनवू शकतो, हा विचार सुद्धा कधी मनात आला नाही. मला मात्र बाजारात सहज उपलब्ध नसतात. पण मी त्याशिवायच काम भागवते. त्यामुळे गुढी उतरवल्यावर त्या साखरेच्या गाठीच्या हाराचे काय करायचे? हा प्रश्नच उभा राहत नाही. खरंतरं मी अगदी पट्टीची गोड खाणारी. म्हणजे माझ्यासाठी गोड पदार्थ अगदी अत्यावश्यक/जीवनाश्यक गोष्टींमध्ये मोडतो. त्याशिवाय मी जगूच शकत नाही वगैरे. पण त्या साखरेच्या गाठी मात्र मी खाऊ शकत नाही. त्या खाण्यासाठी अजून उच्च कोटीची आवड असावी लागते, गोडं खाण्याची! अशी एक व्यक्ती आमच्या घरी असल्याने अशी काही अडचण येत नसे/येत नाही. अगदी लहान पणापासून ते आतापर्यंत अगदी सातत्याने, आवडीने गाठी खाणारी. ती व्यक्ती म्हणजे माझा एकुलता एक धाकटा भाऊ! तो, त्या गाठी खात असतो, तेव्हा मी त्याच्याकडे फक्त अगदी खूप कौतुकाच्या नजरेने बघू शकते आणि मला ते खूप आवडते! 
                           आमच्याकडे या गाठीचे हार तर उपलब्ध असतातच, पण त्यासोबत बांगडीच्या किंवा कड्याच्या आकाराच्या लहान मोठ्या मापाच्या सुद्धा गाठी मिळतात. त्याला कंगन म्हणतात, बोलतांना किंवा विचारतांना दोघांचा उल्लेख एकत्रच केला जातो. म्हणजे हार-कंगन आणले का? किंवा हार-कंगन कुठे ठेवलेत? वगैरे. या दोघी प्रकारात, त्यावर वेगवेगळी नक्षी असते. ती नक्षी बघायला मात्र मला खूप आवडे, अजूनही आवडते, पण बऱ्याच वर्षात बघायला नाही मिळाली आता. त्यातही त्या कंगन चा आकार फार आवडतो मला! तसेच दक्षिण भारतात या साखरेच्या गाठी खूप वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या मिळतात. इकडे या गाठी संक्रांतीलाच तिळगुळासोबत दिल्या जातात एकमेकांना! तसेच मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या गाठी लग्नात रुखवतात दिल्या जातात काही वेळा, काही ठिकाणी. याच्या आकारांमध्ये आणि मापांमध्ये खूप विविधता असते. अगदी वेगवेगळ्या प्राण्या-पक्षा पासून ते तुळशी वृंदावन आकाराची विविधता असते. फारच गोड वाटते, हे सगळे बघायला. मला काही वर्षांपूर्वी कुणीतरी संक्रांतीला, साधारण गाय-बैल आकाराची दिलेली. मला ती इतकी आवडली की, ती खायचे तर दूरच, पण मी ती जपून एका झीप-लॉक असलेल्या छोट्याश्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून दिली. पण मुंग्या बरोबर पत्ता काढून आल्या, छिद्रातून आत जाऊन त्याचा फडशा पडला. 
                          दुसरी एक लगबग म्हणजे हल्ली जागेच्या अभावी बऱ्याच गोष्टी करणे शक्य होत नाही. त्यातील एक म्हणजे गुढी उभारणे. त्यामुळे गुढीच्या छान छोट्या छोट्या हुबेहूब प्रतिकृती बाजारात उपलब्ध असतात. मग चांगली मनासारखी मिळावी म्हणून त्या खरेदीची लगबग सुरु होते. पण चौधरी सदनात राहतानाच काय, पण आतापर्यंत तसे नव्हते. गुढीसाठी जागा आणि सगळे साहित्य घरात सहजच उपलब्ध असे. मग त्यातूनच छान गुढी उभारून गॅलरीत, व्हरांड्यात गुढी उभारली जात असे/जाते. पैकी सगळ्यात महत्वाचे साहित्य म्हणजे लाकडी उंच काठी. चौधरी सदनात असल्यापासून ते आजतागायत घरात एक काठी कायमच असते . अगदी खूपच अत्यावश्यक वस्तू म्हणून. कारण हीचा उपयोग रोजच्या रोज केला जातो, कपडे वाळत घालण्यासाठी. कारण कपडे वाळत घालण्यासाठीच्या दांड्या उंचावर असल्याने, हाताने कपडे हाताने वाळत घालणे शक्य नसते. मग या काठीच्या मदतीने वाळत घालण्याचे काम होते. हीच काठी गुढी उभारण्यासाठी वापरली जात असे . काही वेळा आम्हा मुलांची लहर फिरली तर, हीच काठी आमचा घोडा सुद्धा होत असे, अगदी भरधाव पाळणारा! आणि खेळताना कुणाच्या पायात अडकली तर, त्याबद्दल चांगलाच ओरडा किंवा वेळ आली तर एखादा धपाटा सुद्धा खावा लागत असे. 
                             माझे मात्र तसे नाही. लग्नानंतर मी काही काठी वापरात नाही, कपडे वाळत घालायला. पण सुरवातीचे काही वर्ष, लाकूड कामातील एक चौकोनी आकाराचा अडीच-तीन फूट उंचीचा एक लाकडाचा तुकडा होता. तोच मी गुढीची काठी म्हणून वापरत असे. नंतर स्थलांतराच्या गडबडीत तो कुठेतरी गहाळ झाला. केव्हा आणि कुठे ते ही लक्षात आले नाही. आता या लिखाणाच्या निमित्ताने, लिहिता-लिहिताच त्याची आठवण झाली. नंतर लेक तीन-चार वर्षांची झाल्यावर एक भला मोठा तिरंगा घेतला होता. झेंडा कापडी आणि काठी लाकडी होती त्याची. हा कापडी झेंडा काढून ठेवता येत होता. वर्षातील ठराविक दिवशी वापरून झाला की धुवून नीट कपाटात ठेऊन देत असे मी आणि याच्या लाकडी काठीचा उपयोग गुढी उभारण्यासाठी सुद्धा करत असे. परत घर बदलायच्या गडबडीत पुन्हा ही सुद्धा काठी केव्हा आणि कशी गहाळ झाली ते समजलेच नाही. 
                             मधले एक-दोन वर्ष या ना त्या कारणाने गुढी उभारता येत नव्हती. या वर्षी मात्र म्हटलं, अगदी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारायचा अट्टाहास सोडून द्यावा. मग लगेचच पुण्याहून एक छोटीशी तयार गुढी ऑनलाईन मागवुनच घेतली. आता यंदा हीच गुढी! फारच छान, छोटीशी आणि गोड आहे! एक वेगळ्याच प्रकारे परंपरा चालू ठेवल्याचा गोडुला आनंद! 
                              साखरेच्या गाठी बरोबरच, तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे कडुनिंबाची डहाळी. साखरेच्या गाठीच्या अगदी नेमकी विरुद्ध. म्हणजे साखरेच्या गाठी एकदम गोड, तर कडुनिंबाची पानं अतिशय कडू! चौधरी सदनात राहात असतांना काही प्रश्नच नव्हता. मोठ्ठ झाडंच गॅलरीपाशी होतं. त्यामुळे हवी ती छान कोवळी पानं असलेली डहाळी तोडून घेता येत होती. या कोवळ्या पानांचा रंग फारच सुंदर असतो, काळपट गुलाबी वगैरे. मला फारच आवडते ती छटा! आम्ही मुलं तरी मनातल्या मनात म्हणतं असू, सगळी पानं कोवळी असू दे, त्या डहाळीची. कारण त्यादिवशी आम्हाला प्रत्येकाला कमीत कमी आठ-दहा पानं खावीच लागतं होती, मम्मीचा तसा कडक नियमच होता. 
                              पुढे चौधरी सदन सोडल्यावर गल्लीतील धोबी, कडुनिंबाची एक-दोन मोठ्ठी डहाळी तोडून आणत असे आणि सगळ्यांना त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्या तोडून देत असे. किंवा घरातील कुणीही, कुठून शक्य असेल तिथून घेऊन येत असे, एखादी डहाळी. लग्नानंतर मात्र मला कायमच बाजारातून विकत आणावी लागते. मी, मम्मीचा वारसा घरात चालवते आहे पुढे, प्रत्येकाला दोन-दोन पानं तरी खायलाच लावते! 
                             यात माझ्या सगळ्यात आवडता एक भाग असे. तो म्हणजे काळ्या पाटीवर पांढऱ्या पेन्सिलने एकाचे पाच किंवा सात आकडे वापरून सरस्वती काढणे. मला अजूनही खूप आवडते. खूप आनंद मिळतो मला यातून. आता या आनंदाला खूप लांबवर धुमारे फुटलेत! किती लांबवर तर पार सिंधू-सरस्वती संस्कृती पर्यंत! आपण काढतो त्या सरस्वतीचे उगम आणि मूळ रूप सिंधू-सरस्वती संस्कृती मध्ये आहे. तो मला समजला, माझ्या अभ्यासातून. तर ही सरस्वती काढण्याची परंपरा पार सिंधू-सरस्वती संस्कृती पासूनची आहे. म्हणजे जवळ-जवळ साडे चार हजार वर्ष जुनी! तिचे मूळ रूप तर फारच सुंदर आणि मन खिळवून ठेवणारे आहे. आता आपण जी सरस्वती काढतो, त्यात आपण जितके एक या अंकाचे आकडे घेतो, तितक्या अखंड रेषा असतात. म्हणजे पाच आकडे वापरून काढली तर पाच अखंड रेषा, सात आकडे वापरून काढली तर सात अखंड रेषा, वगैरे. पण मूळ सरस्वतीच्या आकृतीमध्ये एकच अखंड रेषा असते ही सरस्वती, एकदाही हात न उचलता काढता येते. मी तर अगदी लहानपणापासून सरस्वतीच्या सगळ्याच रूपाच्या प्रेमात आहे. पण सरस्वतीच्या या मूळ रूपाच्या मात्र अगदी आकंठ प्रेमात बुडून गेलेय, अगदी कायमची...!
या कुन्देन्दुतुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावर दण्डमंडित करा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥
 ©आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
२८फेब्रुवारी २०२२   


माझी यावर्षीची 
गोडुली गुढी !
गोडुला आनंद !






गुढी 
आता आपण काढतो ती 
सरस्वती १ वापरून काढलेली 



धाकट्या भावाकडे जोडगोळी आहे 
त्यामुळे सगळं दोन दोन असतं !
गुढीला साखरेच्या गाठींचा हार घातलेला आहे . 
काठीच्या खालच्या टोकाजवळ साखरेच्या गाठीचे 
कंगन ठेवलेलं आहे . 



बाजारात विक्रीसाठी असलेले हार !



बाजारात विक्री साठी असलेले कंगन !
माझे अतिशय आवडीचे . 
कितीही वेळा आणि कितीही वेळ बघितले तरी 
माझे समाधान होतंच नाही . 





घरी आणलेले कंगन आणि हार !



त्या काठीचा असा घोडा करून 
आम्ही भरधाव धावत असू !


कडू निंबाची कोवळी पानं 
(फोटो -गूगल च्या सौजन्याने )



मूळ सरस्वती !
सिंधू-सरस्वती कालीन सरस्वती 
४५०० वर्षांपूर्वीची !



सुरवात आणि शेवट एकच बिंदू . 
वर दिलेल्या आकृतीत दिलेले बाण बघत त्या पद्धतीने 
काढत गेले तर पेन न उचलता ही सरस्वतीची आकृती काढता येते 











Comments

  1. I didn't know yonger brother fond of har n kangan..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान वाटलं तो प्रसंग आठवला...😊

      Delete
  2. खूपच छान माहिती आहे

    ReplyDelete
  3. अरे waa mastach. त्या गाठी खाण्यासाठी गुढी उतरायची वाट पाहायचो आम्ही ����. तेव्हा एवढ गोड khanyatahi majja असायची. आता tr दात दुखतात ����. खूप छान वाटले वाचून

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा!
      होता है....
      आनंदी धन्यवाद!

      Delete
  4. Manjusha ChaudhariMarch 11, 2022 12:23 pm

    Sindhukalin saraswti Mast ani mugyani patta shodun kadhla chanch

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!

      Delete
  5. अनिता पाठकMarch 11, 2022 3:25 pm

    खूप सुंदर!����
    छान लिहिलंय तुम्ही.
    काही माहिती नवीन मिळाली.
    तुमच्या मोठ्या गुढ्या पण मस्त.
    मुळ सरस्वतीची रांगोळी पहिल्यांदाच पाहीली..
    खूप छान !

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!
      मराठी नूतन वर्षाच्या आनंदी शुभेच्छा! 🤩😍

      Delete
  6. प्रतिभा अमृतेMarch 11, 2022 3:31 pm

    गुढीपाडव्याची गोष्ट आवडली. गुढीची काठी, रेशमी खण किंवा कापड, कढीलिंबाची पान आणि विशेषतः साखरेच्या गाठ्या यांची उजळणी झाली. खूप गोड आवडणाराच त्या गाठ्या खाऊ शकतो. त्यांचे कंकण हे नामाभिधान आवडले. आमच्या कडे गँलरीच्या जाळीला काठी बांधून गुढी उभारली जाते त्यामुळे उभारणे शब्द सार्थ होतो. सरस्वती काढण्याचा सण मात्र दसरा. तुझ्या लेखामुळे चैत्रातला गुढीपाडवा फाल्गुनमध्येच साजरा झाला. शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या गुढी चा फोटो पाठवा मला! आवडेल बघायला!
      आनंदी धन्यवाद अणि मराठी नूतन वर्षाच्या आनंदी शुभेच्छा! 😍🤩❤️

      Delete
  7. गुढीपाडव्याची गोष्ट आवडली.खुप छान माहिती आहे👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!! 😍

      Delete
  8. Saraswati rangoli n mahiti chanch prathamach baghitali
    Gudhipadwa varnan 👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!!

      Delete
  9. रेखा अत्तरदेMarch 11, 2022 10:13 pm

    खूप छान लेख!

    ReplyDelete
  10. खूपच गोड लेख.आपल्या ब्रम्हध्वजाला वंदन...साखरेचे कंगन पहिल्यांदाच पाहिलें,गुढीचे प्रकार मस्तच.माला बाल्कनीतील उभारलेल्या रंगबिरंगी गुढ्या मोजायला फार‌आवडते....सारे प्रचि ही भारीच..सिंधु संस्कृतीतील रेखटलेली सरस्वती अप्रुपच आणी काठीचा घोडा करत होता लहानपणी हे आवडलं...असा हा "पाडवा स्पेशल" लेख नववर्षाच्या सुरुवातीलाच वाचताना आनंद होतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद अणि मराठी नूतन वर्षाच्या आनंदी शुभेच्छा! 😍💕❤️

      Delete
  11. येणार्या शणावरुन विषय लिहायला घेतल्यामुळे सगळे आठवले. त्यामुळे वाचायलाच मजा आली लेख मस्त च लिहला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😇😇🥰😍

      Delete
  12. सरस्वती रंगोली,गुढीपाडवा गोष्ट खुप छान लेख आहे.👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद! 🙏

      Delete
  13. ����gudhi padwa lekh chan
    Marathi warshi Suruwat gudhi padwabe hote
    Bajaratil gathinche har bagayla chan watte
    Gathi aawdli so zip lock bag made thewli pan mungiyani phadsha padla��
    Padwa yetoy mhatle ki kai karayche jevnacha bet gruhinichi lagbag suru hoteKadulimb pic ��
    Online punehun gudhi magwalis ��
    Mi pan choti gudhi devgharat pujte
    Chan prasanna wate

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छानच असतात तुमचे अनुभव!
      आवडते मला वाचायला.
      आनंदी धन्यवाद अणि मराठी नूतन वर्षाच्या आनंदी शुभेच्छा! 🤩😍

      Delete
  14. Replies
    1. सर चौधरी सदनात आपले मनापासून स्वागत!
      आनंदी धन्यवाद!

      Delete
  15. डॉ सुभाष ओरसकरMarch 15, 2022 12:15 pm

    छान लिहिलयस वर्षाली. आठवणी ताज्या केल्यास �� सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आनंदी धन्यवाद!

      Delete
  16. जमल्यास व्हिडिओ टाकता येईल का हात न उचलता सरस्वती काढण्याचा.

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्की! थोडा वेळ द्या...

      Delete
    2. वर मुख्य भागात एक आकृती दिली आहे, त्यात दिशा दर्शक बाण आहेत.
      ते बघून काढू शकता
      काही अडचण आली तर नक्की सांगा, मदत करीन

      Delete
  17. Prajkta DongareMarch 18, 2022 3:27 pm

    Wa wa mast zalay lekh �� ani agadi welewar pathawalas

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी धन्यवाद अणि मराठी नूतन वर्षाच्या आनंदी शुभेच्छा! 🤩😍

      Delete
  18. वर मुख्य भागात एक आकृती दिली आहे, त्यात दिशा दर्शक बाण आहेत
    ते बघून काढू शकता
    काही अडचण आल्यास नक्की सांगा, मदत करीन

    ReplyDelete
  19. प्रफुल्ल पाटीलMarch 28, 2025 7:14 am

    फारच सुंदर लिहिलय आहेस. मी काही गोष्टी अनुभवलय आहे.
    चैत्री पाडवाच्या अनेक मंगलमय शुभेच्छा.
    सुखी आनंदीत हिंदू नववर्ष 🌹🌹🎻🎤🎨🦚🌞🎷

    ReplyDelete
  20. मंदा चौधरीApril 16, 2025 6:44 am

    खुपच छान लेख लिहिला आहे.सिंधु संस्कृतितील सरस्वती आज प्रथमच बघितली.अगदी बरोबर एका बिंदू पासून ती तयार होते मस्त.आठवण .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...