Skip to main content

रेंगनथिट्टू (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)

 रेंगनथिट्टू 

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)


                      हे सुद्धा माझे एक अतिशय लाडके ठिकाण आहे. जेव्हा केव्हा आठवण येईल आणि वेळ असेल किंवा त्या रस्त्याने जाता-येता आम्ही या ठिकाणी जात असतो. पण परत हे ठिकाण बंगळुरू-म्हैसुरू महामार्गावरच असल्याने, तिथल्या रहदारीला तोंड द्यावेच लागते. हे साधारणपणे श्रीरंगपट्टणम पासून तीन कि मी अंतरावर आहे, तर म्हैसुरू पासून सोळा कि मी अंतरावर आहे आणि बंगळुरू पासून एकशे छत्तीस कि मी अंतरावर मंड्या जिल्ह्यात आहे. बंगळुरू कडून जाताना साधारण श्रीरंगपट्टणम सोडल्यावर उजव्या बाजूला एक फाटा आहे. तिथे महामार्ग सोडून त्या रस्त्याला लागावे लागते. तिथे तसा फलक सुद्धा आहे, फक्त थोडे लक्ष ठेवावे लागते म्हणजे रस्ता चुकत नाही. 
                    हे ठिकाण म्हणजे पक्षांचे अभयारण्य आहे. यालाच कर्नाटकची पक्षी काशी सुद्धा म्हटले जाते. मी काही पक्षी प्रेमी किंवा अभ्यासक नाही. पण इथे निसर्गाचा खऱ्या अर्थाने आणि पुरेपूर आनंद लुटता येतो. निसर्ग म्हणजे माझा वीक पॉईंट! हे ठिकाण म्हणजे कावेरी नदीच्या छोट्या छोट्या बेटांचा समूह आहे. बराच इतिहासही आहे या ठिकाणाला. इथे जवळ जवळ सतराशे पक्षांच्या प्रजातीची नोंद झाली आहे. झाड-झाडोराही बराच आणि विविध प्रकारचा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या प्रकारची बरीच घरटी बघायला मिळतात. पक्षांचे घरटी बांधण्याचे हे अतिशय आवडते ठिकाण आहे. हिवाळ्यात म्हणजे साधारण डिसेंबरच्या मध्यापासून, इथे बरेच स्थलांतर करणारे पक्षी येतात, सायबेरिया, लॅटिन अमेरिका आणि उत्तर भारत या भागातून. या काळात जवळ-जवळ चाळीस हजार पक्षी एकत्र येतात. त्यात स्थलांतरित पक्षांच्या एकूण तीस प्रजाती असतात. या स्थलांतरित पक्षांचा इथे फेब्रुवारी पर्यंत मुक्काम असतो. काही पक्षी कायमचे इथेच राहतात. 
                     पक्षांच्या सोबतीने इथे बरेच प्राणी सुद्धा आहेत. मुख्य आकर्षण म्हणजे ताज्या पाण्यातील मगर. इथल्या पाण्यात सगळ्यात जास्त संख्या आहे या मगरींची. या पाण्यात नौका-विहाराची सोय असल्याने, पाण्यात असलेल्या छोट्या-छोट्या बेटांवर असलेल्या मगर आणि इतर पक्षी अगदी जवळून बघायला मिळतात. पावसाळ्यात मात्र सुरक्षेच्या दृष्टीने नौका-विहार बंद असतो. दुसरा आश्चर्य वाटणारा देखावा म्हणजे मोठाल्या हिरव्यागार झाडावर दिसणार असंख्य मोठाले काळे-काळे धब्बे. ते इतक्या असंख्य संख्येने असतात की सुरवातीला कळतच नाही काय आहे ते. नंतर त्यात थोडी हालचाल चालू आहे असे वाटते, पण ही हालचाल वाऱ्यामुळे झाडाच्या हालचाली सारखी नाही हे लक्षात येते. नंतर कुठे समजते ही, की काळे धब्बे म्हणजे झाडाचा भाग नसून, झाडाला लटकलेली वटवाघुळं आहेत. त्यानंतर त्यांचा एक विशिष्ट आवाज सुद्धा ऐकू यायला लागतो. नौका-विहार करतांना अजून थोडे जवळून बघायला मिळते हे दृश्य. मला तर अजिबात आवडत नाही, म्हणण्यापेक्षा किळसच येते त्या सगळ्या प्रकारची. असेच एक झाड मी मुंबईत पाहिले होते, एका प्रकल्पासाठी ग्रॅनाईट, संगमरवर वगैरे घ्यायला गेले होते तेव्हा. त्यादिवशी तर मला इतके कसेतरी होत होते की जेवावेसे सुद्धा वाटेना घरी आल्यावर. 
                    या ठिकाणी छान मोठ्ठी बाग आहे. त्यात खूप प्रकारची झाडं, झुडपं, वेली, त्यांचे मांडव अशी सगळी विविधता बघायला मिळते. एव्हढेच नाही तर एक तळं सुद्धा आहे कमळाचे. फारच सुंदर आहे हे आणि त्याच्या सभोवतालचा परिसर सुद्धा! बांबूचे तर विविध प्रकार बघायला मिळतात येथे. त्यातील माझा सगळ्यात लाडका बांबू म्हणजे सोनेरी बांबू! आज पर्यंत त्याचे आणि त्या शेजारी उभे राहून कितीतरी फोटो काढलेत, पण माझे मन भरतच नाही. प्रत्येक वेळी गेल्यावर त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरतच नाही मला. नैसर्गिक खडक वापरून छान खडक बाग (rock garden)सुद्धा केलेली आहे. हिरवळीचे मोठ्ठाले भूभाग आहेत. यावर तुम्ही बसू शकता. तसेच सर्वत्र विविध रंगाचे आणि प्रकारचे बाक सुद्धा ठेवले आहेत बसायला. अगदी भर उन्हात गेलो तिथे तरी छान शांत आणि थंड वाटते. प्रत्येक झाडाचे नाव आणि माहिती तिथेच लिहिलेली आहे. तसेच सगळ्या पायवाटांच्या दोन्ही बाजूंनी मध्ये मध्ये काही फलक लावलेले आहेत. त्या फलकांवर तिथे आढळणाऱ्या विवीध पक्षांच्या प्रजातींची छायाचित्र आणि सोबत माहिती दिलेली आहे. पक्षी प्रेमी आणि अभ्यासकांसाठी तर हे ठिकाण म्हणजे पंचपक्वांनाच्या मेजवानीसारखेच आहे! 
                    अजून एक सगळ्यात छान आणि माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मचाण! इथे बऱ्याच ठिकाणी छान लोखंडी, भक्कम आणि उंच मचाण आहेत. प्रत्येक मचाणावर चढण्यासाठी लोखंडी शिडी त्याला कायमची पक्की केलेली आहे, अगदी सुरक्षित! खरंतरं या ठिकाणी कुठेही उभं राहिले किंवा बसले आणि कुठेही नजर फिरविली तरी स्वर्गीय दृश्य दृष्टीस पडतात . पण तरी या मचाणावर, उंचावर उभे राहून चहूकडे न्याहाळण्यात काही औरच आनंद मिळतो मला. मी प्रत्येक वेळी तिथे गेल्यावर प्रत्येक मचाणावर चढून हा आनंद अनुभवल्याशिवाय मला चैनच पडत नाही. 
                      या ठिकणाचा विकास अगदी सतत, अगदी न थांबता चालूच असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी गेल्यावर काही ना काही नवीन बघायला मिळतेच. सोबत जेवण घेऊन गेला असाल तर तिथे हिरवळीवर किंवा बाकावर किंवा विसावा छत्री(पॅगोडा/गझेबो) मध्ये बसून निवांत जेवणाचा आनंद घेऊ शकता. अर्थातच तुमच्या पंगतीला तुम्हाला सोबत करायला बरेच प्राणी आणि पक्षी येतात. त्याचा आनंद मानायचा की त्रास, तुमच्यावर अवलंबून आहे. सोबत नेलेलं नसेल तर, तिथे एक छोटेखानी रेस्टारंट आहे. अगदी झकपक नाही पण छान आणि स्वच्छ. बसायची जागा तर फारच सुंदर आहे, या भागात सुद्धा. तसेच मिळणारे अन्न सुद्धा गरमागरम आणि चविष्ट! मला तर फार आवडते इकडे बसायला आणि इकडेच अन्नपदार्थ खायला. तसेच सर्व परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच हात/तोंड धुण्यासाठी सुविधा आहेत, अगदी स्वच्छ! एव्हढेच नाही तर अगदी स्वच्छ असे शौचालय सुद्धा आहे. सगळा परिसर अगदी स्वच्छ आणि टापटीप. कधी कुठे कचरा, घाण वगैरे दिसणारच नाही. तसेच एक अडचण नेहमीच असते सगळीकडे, ती म्हणजे अपुरा, अस्वच्छ आणि गचाळ वाहनतळ. पण इथे मात्र अगदी प्रशस्त, स्वच्छ आणि फुलझाडांनी सुशोभित असा वाहनतळ आहे. एक दिवसाच्या सहलीसाठी अगदी सर्वतोपरी योग्य ठिकाण, अगदी सर्वच दृष्टीने! महत्वाचे म्हणजे जाणारी व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असो, अगदी प्रत्येक जण तिथे छान असा नैसर्गिक आनंद अनुभवू शकतो! छायाचित्रांचे म्हणाल तर किती आणि कुठे काढू नी कुठे नको असे होऊन जाते. कितीही काढले तरी मन भरत नाहीच, हे अगदी स्वानुभवावरून सांगते! 
                   माझ्या घराजवळच्या बागेत नियमित येणारा एक मोठ्ठा गट होता, मराठी काकूंचा! त्या सगळ्यांना गटाने एक दिवसीय सहलीला जायचे होते. मग त्यांना सगळ्यांना पण, मी एक टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये, इथेच घेऊन गेले होते. खूप आवडले त्यांना सुद्धा. छान नैसर्गिक आनंद लुटला त्यांनी सुद्धा इथे. नौका विहार केला, भरपूर हिंडलो फिरलो. अगदी सगळ्या नाही पण बऱ्याचश्या जणी अगदी मचाणावर पण चढल्या. यादिवशी मात्र या सगळ्यांनी घरून काही ना काही बनवून आणले होते, डब्यात घालून. त्यामुळे माझी फारच चंगळ झाली . अशाच एका विसावा छत्री मध्ये बसून आम्ही जेवण केले. मग आमच्या सोबतीला काही प्राणी आणि पक्षी सुद्धा आले होते! साधारण याच दिवसात गेलेलो. या दिवसात मटार अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. मग एका काकूंनी मटारच्या करंज्या बनवून आणल्या होत्या, अगदी अप्रतिम झाल्या होत्या. मला तर फारच आवडल्या! त्यामुळे त्या चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत माझ्या. बाकीही भरपूर होते काय काय, पण ते मात्र लक्षात नाही आता! घरून डबे करून बाहेर छान वनभोजन करण्यात काही वेगळाच आनंद मिळतो . लहानपणी नेहमीच आम्ही हा आनंद घेत असू. कारण तेव्हा बनवायचे काम मम्मी लोक करत, आम्हाला फक्त खायचे काम. आता स्वतःलाच करावे लागते, त्यामुळे बाहेर गेलो की सहसा बाहेरचेच खाल्ले जाते. पण अलीकडे करोना मुळे मात्र, घरून डबे करून नेत होतो आम्ही सुद्धा, असो. या दिवशी सुद्धा सगळ्यांनी अगदी भरपूर आणि मनसोक्त छायाचित्र काढून घेतली स्वतःची, वेगवेगळ्या ठिकाणी! धम्माल सहल होती ती सुद्धा!
                    मी केलेले हे लिखाण आणि खाली दिलेली छायाचित्र, फारच तोकडी आहेत या ठिकाणांसाठी. प्रत्यक्ष भेट दिली की नक्की कळेलच तुम्हाला. शक्य असेल तेव्हा किंवा शक्य करून किंवा ठरवून नक्की भेट द्या आणि मनमुराद हा नैसर्गिक स्वर्गीय आनंद अनुभवा! पण सध्याच्या काळात बाहेर जाणे सुरक्षित नाही आणि जमावबंदी वगैरे नियम सुद्धा आहेत. तेव्हा तूर्तास ही आभासी सहलीचा, भेटीचा मनसोक्त आनंद घ्या!!

©आनंदी पाऊस 
रेंगनथिट्टू (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१२ जानेवारी २०२२





नौका विहार करतांना एका छोट्या बेटावर 
दिसलेले पक्षी 



झाडावर बसलेले पेलिकन 


एक छानशी पायवाट 


एक कीटक 



पाण्याचा प्रवाह पार करून जाण्यासाठीचा पूल 


कमळ तळं 


बांबूचे बन 


झाडावर बसलेली पक्षांची एक प्रजाती 



मगर शिल्प 


झाडावर उलटे लटकलेली वटवाघुळं 










Comments

  1. जनार्दन चौधरीJanuary 21, 2022 8:26 am

    बारिक सारिक निरिक्षण शक्तिला दाद देण्यासाठी शब्दच सापडत नाहीत फोटोयुक्त सविस्तर वर्णन अप्रतिम झाले आहे लिखाणाला चांगलिच धार आलि आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद!! 😇😇😇

      Delete
  2. लीला गाजरेJanuary 21, 2022 9:06 am

    काय आवडलं? खूपच गहन प्रश्न आहे हा .काय सुंदर ठिकाण सांगितलं तु .आणि वर्णन सुंदर केलाय की हुबेहूब चित्र उभे राहाते डोळ्यासमोर ,फोटोत बघून आणि वर्णन वाचून इतके छान वाटतेय ,तर प्रत्यक्ष बघायला किती मोहक ,नयनरम्य दिसत असेल याची तर कल्पनाच करवत नाही खूप छान आनंदी पाऊस .शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. काकु खूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद! 🙏😇

      Delete
  3. व पु होले सरJanuary 21, 2022 11:23 am

    नमस्कार ,अप्रतिम फोटोग्राफी ,आपल्या सहलीचा खरोखर मनमुराद आनंद लुटला.आपल्या निरिक्षणातून एक गोष्ट नक्की कळली .ती म्हणजे या जागेला कर्नाटकची पक्षी काशी का म्हणतात ते. धन्यवाद सहल घडविल्या बद्दल

    ReplyDelete
    Replies
    1. सर, खूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद! 🙏😇

      Delete
  4. सुंदर लेख आणि सहली साठी निवड लेले ठिकाणही! प्रत्यक्ष भेट द्यायला ही आवडेल. वटवाघूळ लटकलेली वाचुन कण्वाश्रम भ्रमंती आठवली.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद! 🙏😊

      Delete
    2. त्या वटवाघूळ चा उल्लेख मुद्दाम केला नाही. त्याची खास गोष्ट त्या खास लेखात सांगेन!😀😀

      Delete
  5. अगदी हुबेहूब..चित्र उभे करते हल्ली तू..छान ..लेख आवडला आणि..ठिकाण पण आवडले.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद!! 🙏🙏🙏

      Delete
  6. सहलीचा आनंद तू जेवढ्या उत्साहाने लुटलास तो आनंद तुझ्या लेखणीतून ओसंडून वाहत आहे. Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरय!
      कितीही वेळा गेले तरी असाच आनंद अगदी ओसंडून वाहात असतो!!
      निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक आनंद!! 😇😇😇

      Delete
  7. तुझ्या लेखनातून वाहणारा तुझा आनंद षघून मलाही त्या ठिकाणाला भेट द्यावीशी वाटत आहे .तुझेत्या ठिकाणाचे वर्णन फारंच सुंदर आणि बहुतेक हुबेहुब झालेले आहे त्यामुळे वाचूनखुप आनंद मिळाला.
    सौ. मंदा चौथरी.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप खूप सारे प्रेम!! 🤩😍😇💃

      Delete
  8. Do not delay .to see ..it is beautiful world .. with different nature ..
    Wish you all the best..

    ReplyDelete
  9. रेवती डींगरेJanuary 21, 2022 5:26 pm

    या ठिकाणांबद्दल ऐकले होते आज तू केलेले वर्णन वाचून छान वाटले.धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम धन्यवाद आई! 😇😇😇

      Delete
  10. अप्रतिम फोटोग्राफी 👌👌 खुप छान लेख लिहिला आहेस.वर्णन ऐकून त्याठिकाणी जावेसे वाटते.👌👌🥰🥰

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच भेट द्या एकदा तरी!
      मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  11. Khoop chan varnan
    Kharach vachun tithe bhet dyavishi vattey
    👌photo pan sunder

    ReplyDelete
  12. खूप छान लिहिलं आहे, दगडावर ओळीत उभ्या असणाऱ्या पक्ष्यांचा फोटो छान आला आहे.

    ReplyDelete
  13. हे तर प्रवास वर्णन वाचताना अगदी तिकडेच गेल्यासारखं वाटतं..😍सर्वच प्र.चि.भारीच..गवतातील ठिपक्यांची दगडी पाऊलवाट,पक्षी व बेटाचा दगडी रंग नैसर्गीक एकरुप झालय...गोल्डन बांबू व त्याची तुरे आणी चमकणारा किटक 👌1च नंबर...असाच नैसर्गीक प्रवासातील नैसर्गीक आनंद कायमचा मिळावा हिच सदिच्छा....

    ReplyDelete

  14. सर्वार्थाने या आभासी सहलीचा आनंद लुटला.. निव्वळ अप्रतिम!यातली हरएक बाब मनोहारी वाटली.. भावली..!
    एकंदरीत सारे वर्णन डोळ्यांसमोरून तरळून जात होते.

    एक आगळावेगळा नैसर्गिक आनंद आपण या इथे प्राप्त करून दिलात, मन:पूर्वक धन्यवाद! आपल्या या सुंदर लिखाणामुळे कधी शक्य झाल्यास या इथे नक्कीच भेट द्यावेसे वाटेल..

    फोटोग्राफीही अप्रतिम!!👌👍

    -- दीपक पाटील

    ReplyDelete
  15. ��karnatakachi pakshi kashi renganthetu che Varnan khoop sunder sagle doliyasamor ubhe rahate ��

    ReplyDelete
  16. भारती फेगडेFebruary 04, 2022 1:16 pm

    स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना ही आनंद देतो आनंदी पाऊस

    ReplyDelete
    Replies
    1. वाह! माझा हाच मूळ हेतू आहे, या सगळ्या लिखाणाचा! खूप आनंदी धन्यवाद!

      Delete
  17. प्रा वैशाली चौधरीFebruary 18, 2022 12:08 pm

    प्रत्यक्ष सहलीचा आनंद...
    उत्तम निरीक्षणशक्ती...
    सुंदर आकलन...
    अप्रतिम फोटोग्राफी��������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...