थोडं (खूप सारं ?) गोडाचं-४(जिलेबी)
(घरातील गमती जमती)
आपला सगळ्यात गोड सण तोंडावर आलाय. त्यानिमित्त ही गोडाची मधुर मेजवानी! अर्थातच आमच्या घरातील मकरसंक्रांती निमित्ताची खास मेजवानी. आमच्या घरी अगदी वर्षानुवर्षे प्रत्येक सणाची आणि काही खास दिवसांची एक खास आणि ठरलेली मेजवानी असते. आज मकरसंक्रांतीच्या खास मेजवानीची गोष्ट, जिलेबीच्या मेजवानीची कुरकुरीत मधुर गोष्ट. आम्हा सगळ्यांची अतिशय लाडकी . किती लाडकी , तर त्यादिवशी वरण, भात, भाजी, पोळी कोशिंबीर वगैरे स्वयंपाक केला जात असेच, पण अगदी नावालाच. त्यादिवशीचे दुपारचे जेवणं, रात्रीचे जेवणं, दुसऱ्या दिवशीचे जेवणं म्हणजे जिलेबी, फक्त जिलेबी आणि जिलेबीच! अर्थातच जिलेबी दुकानातून विकत आणलेली नाही तर, पूर्णपणे घरघुती, घरी केलेली, अगदी प्रत्येकवेळी गरमागरम आणि कुरकुरीतच! चला तर मग आता या आमच्या लाडक्या जिलेबीची गोष्ट सांगते, अगदी सविस्तर.
मी आधीच्या काही लेखात उल्लेख केलेलाच आहे, आमच्या घरात कुठल्याही गोष्टीकरीता मैदा वापरला जात नसे, अगदी अजूनही नाही वापरला जात. तर जिलेबी साठी सुद्धा मैदा वापरला जात नाहीच. यासाठीही घरात पोळ्यांसाठी दळून आणलेले गव्हाचे पीठच वापरले जात असे/जाते. साधारण प्रमाण सांगते. दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले तर त्यात एक वाटी ताक किंवा दोन चमचे दही, दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन म्हणजे हरबरा पीठ. ही सगळी सामुग्री एकत्र करायची. तयार झालेले रवण साधारण इडलीच्या रवणाइतके घट्ट/पातळ हवे. गरजेप्रमाणे थोडे पाणी घालू शकता. आमच्याकडे हे रवण सुद्धा त्याच स्टीलच्या गंजात भिजविले जात असे. त्यामुळे त्या गंजाशी एक वेगळेच भावनिक नाते वाटते मला अजूनही! हे रात्रभर झाकून ठेवलेले रवण सकाळी छान फुलून येते. हे छान चमच्याने घोटून घ्यावे आणि चमच्यात उचलून बघावे. या रवणाचे छान तार यायला हवेत. असे झाले म्हणजे हे छान मुरले आहे आणि जिलेबी करण्यास एकदम तयार आहे.
जिलेबी साठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाक. पाक कसा करायचा ते आधी सुद्धा सांगितले आहे, त्यामुळे इथे परत सांगत नाही. पण पाक मात्र घट्ट आणि एकतारी हवा. पाक साखरेपेक्षा गुळाचा पाक केला तर उत्तमच . चवीला तर छान लागतेच जिलेबी साखरेच्या पाकापेक्षा, पण आरोग्यकारकरही! एकदा नक्की करून बघा, कायम गुळाचीच जिलेबी खाल खात्रीने.
पाक तयार झाल्यावर वेळ येते ती जिलेबी तळण्याची. यासाठीही काही खास तयारीची आवश्यकता असते. बाकी सगळ्या गोष्टी तळायला, त्या आधी घडवल्या जातात मग तेलात/तुपात सोडल्या जातात, तळण्यासाठी. जिलेबीचे तसे नसते. ती तापलेल्या तुपा /तेलातच घडवावी लागते आणि तळावी लागते. जिलेबी घडवण्यासाठी सुद्धा काही सोय असावी लागते. त्यासाठी आमच्याकडे एक खास चौकोनी आकाराचे जाड खादीचे कापड शिवून घेतलेले होते. त्याच्या मध्यभागी एक छिद्र होते. हे छिद्र म्हणजे आपल्या कपड्यांना बटन घालण्यासाठी जो काज असतो, तसाच पण अगदी थोड्या मोठ्या आकाराचा काज करून घेतलेला होता. हा काज जितक्या आकाराच्या तितक्या जाडीची जिलेबी होणार. त्याबेतानेच हवा. हल्ली जिलेबीचे रेडीमिक्स मिळते, त्यासोबत एक पिचकारी मिळते हल्ली मी तीच वापरते. किंवा दुधाच्या पिशवीला एका कोपऱ्यावर छोटा काप देऊन एक छिद्र करून ते वापरले तरी चालते.
दुसरे म्हणजे ही जिलेबी तळण्यासाठी नेहमीची कढई वापरली जात नाही. तर त्यासाठी 'तळई' वापरली जाते. आमच्याकडे एक लोखंडी बऱ्यापैकी मोठ्या आकाराची होती तेव्हा. तर तळई म्हणजे कढई सारखीच असते फक्त कढई खालून खोलगट आणि निमुळती होत जाणारी असते. तळई मात्र खालच्या बाजूने अगदी सपाट असते आणि फारशी खोल नसते . हल्ली सुद्धा सगळीकडे उपलब्ध आहेत, अगदी ऑनलाईन सुद्धा मिळतात. किंवा घरात एखादे छान जाड बुडाचे फ्रायींग पॅन असेल तर ते वापरले तरी चालते. मी हल्ली हेच वापरते. ही पसरट आणि कमी खोलीची असल्याने कमीत कमी तुपा/तेलात जास्तीत जास्त जिलेबी एकाच वेळी तळता येतात. तसेच कढईत तळली तर ती जमून जाण्याची सुद्धा शक्यता असते.
अशी सगळी सिद्धता झाली की, मग प्रत्यक्ष जिलेबी करायला घ्यावी. तूप/तेल चांगले तापू द्यावे. मगच त्यात असलेल्या साहित्याच्या मदतीने जिलेबीच्या कुरडया घडवाव्या. त्यात जितक्या मावतील तितक्या. पण त्या घडवतांना आच कमी करावी. दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घ्यावी. मग कढईतून काढून, शक्य तितके तूप/तेल निपटून घ्यावे आणि लगेचच पाकात घालावी. इथे पाकचे तापमान फारच महत्वाचे. पाक एकदम गरमही नको किंवा एकदम थंडही नको. पाक एकदम गरम असेल तर जिलेबी कुरकुरीत न राहता, ती मऊ पडून जाते. पाक जर एकदम थंड असेल, तर जिलेबीत पुरेसा पाक शिरताच नाही आणि त्यामुळे तिच्या चवीला अपेक्षित असलेली मधुरता येत नाही. म्हणून पाक कोमट असणे फारच आवश्यक आहे. त्यामुळे जिलेबी कुरकुरीत तर राहतेच पण त्यात योग्य प्रमाणात पाक शिरतो आणि मग जिलेबी छान मधुर होते चवीला! थोड्या वेळाने ही पाकातील जिलेबी बाहेर काढावी. आता ही गरमागरम जिलेबी खायला एकदम तयार आहे.
आमच्याकडे संक्रांतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जिलेबीसाठी रवण भिजविले जात असे. अर्थातच हे सुद्धा त्याचा स्टीलच्या मोठ्या गंजात भिजविले जात असे. या गंजाचा उल्लेख आणि फोटो इडलीच्या म्हणजेच साय आणि पुढील प्रवास या लेखात आलेलाच आहे. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी दुपारी जेवणाच्या वेळेपासून जिलेबी तळायला सुरवात होत असे. घरातील मोठी मंडळी नीट ताटावर बसून जेवण करत असत. अर्थातच त्यांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे जिलबी! बाकीचे पदार्थ नावालाच. आम्ही मुलं मात्र जिलेबी तळायला सुरुवात झाल्यापासून येता-जाता हातात किंवा ताटलीत जिलेबी घेऊन खात असू. किंवा ताटलीत भरपूर जिलेबी घ्यायच्या आणि आमच्या लाडक्या बाकावर बसून, बाहेरची गम्मत बघत बघत जिलेबी खात असू. हे खाणं अगदी जिलेबीचे रवण संपे पर्यंत अव्याहतपणे चालूच असे. आणि मोठी मंडळी सुद्धा रात्रीच्या जेवणाच्या वेळी सुद्धा अशीच नुसतीच जिलेबी खात. इतकी आम्हा सगळ्यांना जिलेबी आवडत असे आणि अजूनही आवडते.
संक्रांतीच्या दिवशी उशिरा तिळगुळ द्यायला येणाऱ्यांना सुद्धा हीच जिलेबी अगदी खूप आग्रहाने खायला घातली जात असे. संक्रांत, उशिरा तिळगुळ द्यायला येणारे पाहुणे, त्यांना जिलेबी आणि काही खास गोडाचे पदार्थ खूप आग्रहाने खायला घालण्याच्या खूप गमतीदार आठवणी, किस्से आहेत. पण ते पुढच्या लेखात बाकी संक्रांत विशेष गोडाच्या पदार्थांसोबत सांगेन. आज फक्त जिलेबीची गोष्ट पूर्ण करते.
आता संक्रांतीच्या दिवशी दिवसभर जिलेबी खाल्ली म्हणजे झाले, असे नसे. कारण आमचे पुरते समाधानच झालेले नसे. दुसऱ्या दिवशीही आम्हाला जिलेबी हवीच असे. मुलांनाच नव्हे तर सगळ्या मोठ्या मंडळींना सुद्धा! तेव्हा घरात शीत कपात नव्हते. त्यामुळे जास्तीचे पदार्थ ठेवता येत नसे. मग जिलेबीचे रवण त्यादिवशी संपत आलेलं असे. मग त्यातच परत अजून कणिक घालून ते वाढविले जाई. दुसऱ्या दिवशी परत ते छान फुलून येत असे . हा दिवसही आमच्या घरात खूप खास! आमच्या दादांचा वाढदिवस! मग यादिवसाचे खास म्हणून रबडी बनवली जात असे, अजूनही बनवली जाते. मग काय सगळे मस्त रबडी-जिलेबीवर ताव मारत! तेव्हा कुठे सगळ्यांचे मन आणि आत्मे तृप्त होत असतं. आणि जिलेबीचा समारोप होत असे. यानंतर मात्र अशी पोटभर जिलेबी खायला आम्हा सगळ्यांना तब्बल एक वर्ष वाट बघावी लागे!
मी जवळ जवळ बारावी झाल्यापासून शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर पडले ते आजतागायत. आणि मकरसंक्रांत हा सण अशा वेळी असतो की त्यावेळी सुट्टीही नसते, त्यामुळे कित्तेक वर्ष मला या मजवानीची मजा लुटता आली नाही. पण काही वर्षांपूर्वी आमचे शेंडेफळ म्हणजे माझी सगळ्यात धाकटी बहीण माझ्याच गावात राहायला आली. मग मम्मी नंबर दोन अधून मधून येत असे, भेटायला म्हणून. मग काय फक्त जिलेबीचीच नव्हे, तर सगळ्याच आवडत्या पदार्थांच्या मेजवान्या झडत होत्या आमच्या. आता सध्या ती इथे नाही, त्यामुळे मी तिची परत माझ्या गावात यायची वाट बघत आहे. म्हणजे मला परत या सगळ्या मेजवान्यांनाचा आनंद घेता येईल!
हल्ली काही वर्षांपासून सगळ्याच कार्यालयात कुटुंब दिवस साजरा केला जातो, अगदी शाही थाटात. म्हणजे अगदी तारांकित हॉटेल्स मध्ये! असेच अगदी अलीकडे नेमकं संक्रांतीच्या काळातच अशा एका कुटुंब दिवसाला एका तारांकित हॉटेल मध्ये जायचा योग आला. साधारणपणे तारांकित हॉटेल्स मधील जेवण म्हणजे अगदी मिळमिळीत आणि सप्पक असते. त्यामुळे मी जरा नाखुषच होते. पण जेव्हा प्रत्यक्ष पाहिले, तेव्हा एका टेबलवर छान गरमगरम जिलेबी तळल्या जात होत्या. महत्वाचे म्हणजे त्यात अजिबात रंग वगैरे टाकलेला तर नव्हताच आणि सजावट म्हणून त्यावर सुक्यामेव्याचे काप किंवा गुलाबाच्या पाकळ्या वगैरेही टाकलेल्या नव्हत्या. छान छोट्या छोट्या, नैसर्गिकच सोनेरी रंग आलेल्या. अगदी घरघुती वाटाव्या अशा किंवा त्याही पुढे जाऊन मी तर म्हणेन आमच्या मम्मीनेच केलेल्या वाटाव्या इतक्या छान! आणि बाजूलाच चाट चा टेबल होता. खरतर मोठ्ठी गच्ची होती आणि या गच्चीच्या तिन्ही बाजूने म्हणजे इंग्रजी अक्षर सी आकाराने टेबलांची रचना केलेली होती. त्यावर जगभरातल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची सोय केलेली होती. पण मी मात्र त्यादिवशी पोटभर अगदी आडवा हात मारून फक्त जिलेबी आणि अधून मधून पाणीपुरी खात होते, अगदी दिवसभर! पाणीपुरी सुद्धा एकदम चटपटीत होती अगदी घरी करतो तशी. आणि मला वाटून गेले, आता दरवेळी यांनी इथेच कुटुंब दिवस साजरा करावा आणि दर वेळी जिलेबी आणि पाणीपुरी हाच बेत करावा! त्यादिवशी मी तर इतकी खुश आणि आनंदात होते की मला वाटत होते, मी घरीच मस्त मम्मीच्या हातच्या गरमागरम कुरकुरीत जिलेबीचा आनंद लुटते आहे!
ll इति जिलेबी प्रेमकथा ll
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१जानेवारी २०२२
एका तीन तारांकीत हॉटेल मधील
जिलेबी आणि कुल्फी 🤤😋
जिलेबीचे रवण
पाक
जिलेबी घडवण्याची पिचकारी
तळई मध्ये तळतांना
तयार जिलेबी
तयार जिलेबी
मी येते तुझ्याकडे तुझ्या हातची जिलेबी खायला आणि आनंदात न्हाऊन निघायला.तुझा लेख एवढा छान आहे की मधुर जिलेबी पेक्षा जास्त गोड वाटतोय.
ReplyDeleteलगेचच ये!! सांगायची सुद्धा गरज नाही. खूप आनंद झाला ज्योती तुला ईथे बघून अणि भेटून! खूप सारे प्रेम!
DeleteWow
ReplyDeleteखूपच मस्त����
आता करून बघीन
नक्की करून बघा.
Deleteधन्यवाद!
Wah ekdum goad hoti Jilebi chi goshta ����
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद!
Deleteमस्त !!!मला पण ते दिवस आठवले����
ReplyDeleteकाहीही म्हणा, ते दिवस फारच भारीच होते!
Deleteसप्रेम धन्यवाद!
Wow
ReplyDeleteVachata vachata tondala pani sutale😋
Mi kadhich ghari jalebi banavali nahi atta nakki bamaun baghel chan varnan 👌
नक्कीच!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!
वाह, गोड आणी कुरकुरीत जिलेबीची कथा तू छानच रंगवली आहेस. जसा जसा लेख वाचतांना पुढे पुढे जात गेलो, तसा तसा तोंडात मुखरस जमा व्यायला लागला. हा तुझ्या शाब्दिक कौशल्याचा परिपाक (🤤🤤). जिलेबी बनायची कृती पण जरी पाक कौशल्यावर केंद्रित केलेली असली तरी फारच रुचकर वाटते आणी आमच्या सारख्या फक्त खाणं- कामगारांना पण कृती बद्दल उत्सुकता पैदा करते. जिलेबी हे पक्वान्न म्हणुन अधून मधून लग्नात किंवा सणावारी खात असलो, तरी एक अख्खा, किंवा पुढचा पण दिवस नुसत्या जिलबी वर ताव मारून काढायचा ही कल्पना जरा वेगळीच वाटली. तुमच्या घरच्या समस्त महिला वर्गाचं कौशल्य, मेहेनत आणि अमाप उत्साह, हे सगळं कल्पनाही करवणार नाही इतक्या कमाल उंचीचं आहे. जिलेबी बनवण्याची प्रक्रिया तू लिहिल्याप्रमाणे नक्कीच सोपी नाही, पण अंततः ती जिभेवर विराजमान होऊन जे जिव्हासौख्य देते, ते लाजवाब. Ekdum गोड गोड आणि mouth watering लेख. 👌👌👌👌
ReplyDeleteखाणं कामगार..... आवडलयं तुमचा शब्द!!
Deleteगोड गोड, रसरशीत आनंदी धन्यवाद!! 😇😇🙏
Wa khupch sweet sunder mejavani aahe tuzi
ReplyDeleteVaranan vachunch samor jilebi banat aahe v ti khayla milel ase vatate
Khup mast
Photos pan zakas
खूप सारे सप्रेम धन्यवाद मामी!!!
DeleteKhup chan����mouth waterin
ReplyDeletegMai bhi bnati hu bt maida n rava n besan kiAb aate ki n gud ki bnaungi receipy k liye thanks��❤
Yessss! नक्कीच करून बघ!!
Deleteगूळाचे गोड धन्यवाद!!!
��khoop sunder lekh vershali sagle kutumbch jilebi priy diste pics ��
ReplyDeleteAashi hi rasbhari jilebi mazi sare goad padhathat aawdti aahe ��
मनःपूर्वक धन्यवाद काकु!!!
Deleteखरच तेव्हां खुप छान वाटायचे .संपुर्ण कुटुंब एकत्र असल्यामुळे आणि भरपूर माणसे असल्यामुळे खाणाराची खुप मजा वाटायची. सौ मंदा चौधरी.
ReplyDeleteखरय सगळे एकत्र होतो अणि सगळ्या गोष्टी छान मिळून साजऱ्या करत होतो, त्यामुळे खुपच धम्माल येत असे!
Deleteमाला जिलेबी आवडतच नव्हती..नंतर आर्किटेक्चर झाल्यावर ही अगदी आगीतून काढलेल्या गरम काचेच्या वेटोळ्यासारख्या भासे..आता आता जिलेबी-रबडी काँम्बीनेशन थोड़ं आवडतं..परंतू..आपण वर्णिलेल्या 'जिलेबीप्रेमकथा'तील राँ मटेरीअलस पासून,पाकक्रुती च्या डिटेलिंग त्याला लागणारे किचन टूल्स च स्पेसिफिकेशन्स..तळईतून तळलेल्या गरम गरम गोल्डन रसरशीत जिलेबी-काँईल्स आहाहा...आपल्या हातच्यापण जिलेब्या खायचि खूप मनिषा आहे...😍 - Sanjita
ReplyDeleteहा हा हा हा...
Deleteआगीतून काढलेल्या गरम काचेचे वेटोळे!
भारीच!
U always think out of the box!!
आपण भेटू या अणि नक्कीच करू या, एकदा जिलेबी!!
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!
रुचकर झाली आहे जिलेबी. आता राहवणार नाही, या संक्रांती ला जिलेबी रबडी करणं आलं ��. मी एकदा आवडते म्हणून गुळाची जिलेबी पोटभर खाल्ली होती, गाढ झोप आली मग ��
ReplyDeleteअरे व्वा! केली होती का मग? मला तर नाही मिळाली...
Deleteगुळाच्या जिलेबी ची मजा काही औरच असते!
मनःपूर्वक धन्यवाद!
मधुर कुरकुरीत जिलेबी छान.वाचून तोंडाला पाणी सुटले.
ReplyDeleteआई खूप सारे सप्रेम धन्यवाद!!!
Deleteआता नक्कीच तिळगुळ द्यायला तुझ्या कडे यावे लागेल जेव्हा तू जिलेबी करशील संक्रांतीला ...
ReplyDeleteम्हणजे रुचकर जिलेबी सोबत पाणीपुरी आणि इतर व्यंजनाचा आम्हला पण आनंद घेता येईल न..
*रुचकर आणि चविष्ट मेजवानीचा आनंदी पाऊस....*
*आमच्या ताई वर्षचा...*
जिलेबी करून नाही बघितली कधी...
ReplyDeleteसगळ्या सुग्रास आठवणी👌🏻👌🏻
Jilebi sarkhach swadisht lekh🥰🥰
ReplyDeleteवा वर्षा जिलबी चा फोटो पाहून तोंडाला अगदी पाणी सुटले, तुझी आई माझी वहिनी लागते, वहिनीच्या हातच्या जिलब्या खाव्याशा वाटत आहे, रेसिपी एकदम छान, पुढे आनंदी खानाखजाना काढला तरी चालेल, वर्णन एकदम छान खूप खूप आवडलं, जिलबीचा रंग खूपच छान दिसत आहे, त्यामुळे हवीशी वाटत आहे, असो, चालू ठेवा,
ReplyDeleteएक आठवण-
ReplyDeleteनारळाच्या करवंटी मधून जिलेबी कढईत सोडताना मजेशीर वाटायचे त्यावेळी....
बाकी जिलेबी पुराण(पूर्ण)उत्तम 😄👍
मी पण केली आहे घरी खुप छान लागते घरची जिलेबी.मी एका आजीकडून विचारुन केली होती. खुप छान झाली होती की, आजीही कौतुक करीत होत्या.
ReplyDeleteतुमचा लेख वाचून कोणीही जिलेबीघरी करु शकेल ताई😊