Skip to main content

मोठी एकादशी (घरातील गमती जमती)

 मोठी एकादशी 

(घरातील गमती जमती)


                                      'बाकावरील गमती जमती' लिहिल्यापासून हा विषय डोक्यात होता आणि लिहायची खूप घाई सुद्धा होती. कारण लिहितांना ते क्षण परत नव्याने जगायला मिळतात आणि तो आनंद सुद्धा नव्याने अनुभवता येतो. जे क्षण आपल्या आवडीचे असतात, ते क्षण तर आपल्याला परत परत आठवायला आणि जागायलाही अतिशय आवडतात. कारण त्या त्या काळात, वयात जाता येते, ते ते पदार्थ चाखायला मिळतात आपल्याला. मोठी एकादशी म्हणजे अगदी आवडता विषय. मनापेक्षाही जिभेच्या आणि पोटाच्या जवळचा विषय! आता मोठी एकादशी तोंडावर आलीय, त्या निमित्ताने मला स्वतः ला आणि तुम्हा सगळ्यांना ही खास मेजवानी, एकादशी नी दुप्पट खाशी! 
                             अगदी लहान असल्यापासून मोठी एकादशी खूप आवडती. तेव्हा मोठी एकादशी म्हणजे काय तेही कळत नव्हते. फक्त एव्हढेच कळे, की वर्षभरातील बाकी एकादशीला फक्त आईचाच उपवास असतो आणि मोठ्या एकादशीला सगळ्यांचा उपवास असतो, अगदी आम्हा सगळ्या मुलांचा सुद्धा . सोबतच शाळेला सुट्टी सुद्धा असे. खरंतरं उपवास म्हणजे नको वाटायला हवा. पण पूर्वी आजच्या सारखे नसे. फक्त ज्याचा उपवास असे, त्याच्या साठीच साबुदाण्याची खिचडी बनत असे. त्यातली शिल्लक राहिली तरच कधीतरी मिळत असे, घासभर. तेव्हा साबुदाण्याची खिचडी म्हणजे जीव की प्राण. ती तर या दिवशी मिळतच असे, पण त्या सोबतच बाकी पण खूप छान छान पदार्थांची मेजवानी मिळत असे. सगळेच पदार्थ आवडीचे असत आणि मनसोक्त खायला मिळत . त्यामुळे आम्ही खूपच खुश! खरंच, लहानपणी फक्त आवडीचे आणि मनसोक्त खायला मिळाले की आनंदच आनंद. मोठं झाल्यावर मात्र काही केल्या त्या तोडीचा आनंद मिळणे आणि अनुभवणे अवघड होऊन बसते. असो. 
                             तर आज या सगळ्या पदार्थांची गोष्ट. या सगळ्याची तयारी दोन-तीन दिवस आधी पासून सुरु होत असे. खास करून एक पदार्थाची. या पदार्थासाठी राजगिरा लागत असे. मग तो बाजारातून आणण्यापासून सुरवात होत असे. बाजारातून आणल्यावर तो स्वच्छ धुवून घेऊन कडकडीत वाळवला जात असे. मग या वाळवलेल्या राजगिऱ्याच्या लाह्या फोडल्या जात घरीच. पण संपूर्ण राजगिऱ्याच्या नाही फुटू द्यायच्या, कढईत घातलेल्या राजगिऱ्यापैकी अर्ध्याच राजगिऱ्याच्या लाह्या फुटल्या की तो सगळा राजगिरा काढून घ्यायचा. नंतर ह्याचे  दळून पीठ करायचे असे. त्यासाठी जात्याची काय सोय आहे ते बघावे लागे. घरातील जातं ठीक असेल तर प्रश्नच नाही. पण तसे नसेल तर, आजूबाजूला कुणाचं जातं, केव्हा उपलब्ध आहे ते बघावे लागे. त्याकरता आम्हा मुलींना पिटाळले जात असे. आमची एक ताई राहत असे, अगदी एक इमारत सोडून पलीकडच्या इमारतीत. मी ताई म्हटले खरं पण ही आमच्या आईपेक्षाही वयाने कितीतरी मोठी होती. पण कसे काय माहिती ती आमच्या आईला आजी म्हणे आणि मम्मीला मामी. अशी ती आमची ताई झाली. तिच्या नावापुढे बहीण लावून तिचा उल्लेख करत सगळे, कायमच. आता आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो, तशीच ती सुद्धा तिसऱ्या मजल्यावर राहत होती. आम्हाला जात्याची चौकशी करायची म्हणजे आमचे तीन मजले उतरायचे, तिच्या घराचे तीन मजले चढायचे, जात्याची चौकशी करायची, परत ते जिने उतरायचे आणि आमचे चढायचे. बापरे किती ही दमछाक! मग धाप लागलेल्या अवस्थेतच जो काय निरोप असेल तो घरी सांगायचा. पण मला तिथे जायला आवडे. कारण ही आमची बहीण म्हणजे खूपच प्रेमळ. शिवाय ती इमारत सुद्धा मला खूप आवडे. या जिन्यावर चढता-उतरता एक छान आवाज येत असे पावलांचा, कीतीही हळुवार चढले उतरले तरीही. कारण हा जिना लाकडी. आम्ही शक्यतो धावतच चढणार आणि उतरणार. त्यामुळे इमारतीतील बाकी लोकांची झोपमोड झाली किंवा त्यांना त्या आवाजाचा त्रास झाला, तर त्यांचा ओरडा सुद्धा खावा लागे. मग अगदी शक्य तितक्या हळूहळू चढायचे आणि उतरायचे. 
                                  मग उपलब्ध जात्यावर ह्या राजगिऱ्याच्या लाह्या दळून त्याचे पीठ करून घेतले जात असे. हे सगळे आदल्या दिवशीच करून घ्यावे लागे. तसेच 'बाकावरच्या गमती जमती' मध्ये उल्लेख आल्याप्रमाणे, एकादशीच्या दिवशी सकाळी भुईमुगाच्या शेंगा सुद्धा उकडल्या जात असतं. त्याची सुद्धा तयारी आदल्या दिवशी संध्याकाळीच केली जात असे. वर्षभरासाठी लागणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा घरात भरून ठेवलेल्या असतं. त्यातीलच शेंगा वापरल्या जात असतं. या शेंगा अर्थातच सुक्या असतं. मग या आदल्या दिवशी टिकचुन ठेवल्या जात आणि या टिचवलेल्या शेंगा रात्रभर पाण्यात भिजत घातल्या जात असतं. अशी ही सगळी तयारी आदल्या दिवशी करून  ठेवली जात असे. 
                               एकादशीच्या दिवशी सकाळी आमची अंघोळ वगैरे उरकून होईपर्यंत कुकरच्या जोरजोरात शिट्ट्या झालेल्या असतं.  दोन कुकर गॅसवर ठेवले जात, एका कुकर मधून खारा वास, तर दुसऱ्या कुकर मधून आंबट वास येत असे. अर्थातच खारा वास म्हणजे भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगांचा वास. रात्रभर पाण्यात भिजलेल्या टीचवलेल्या शेंगा कुकर मध्ये मीठ घालून उकडल्या जात. या शेंगा उकडून झाल्या की एका टोपलीत टाकल्या जातं. असे केल्याने त्यातील सगळे पाणी निथळून जात असे. आता या शेंगा खायला तय्यार!  आंबट वास म्हणजे त्या कुकर मध्ये वाळलेले बोरं शिजवलेले असतं, बोरोणी करण्यासाठी. ही बोरं सुद्धा वाळवून वर्षभरासाठी भरून ठेवलेली असतं. ही धुवून घेऊन, कुकर मध्ये चांगली शिजवून घ्यायची. बोरं शिजवून झाली की रवीने छान घोटून घ्यायची. मग त्यात गूळ घालायचा आणि चावी पुरते मीठ घालायचे आणि परत शिजवून घ्यायचे. झाली बोरोणी तयार. पण ही गरम गरम खाण्यापेक्षा, थंड झाली की छान लागते खायला. साधारणपणे सगळेच थंड झाल्यावरच खातात. या दोन्ही पदार्थांच्या खाण्याच्या गमती जमती, 'बाकावरील गमती जमती' मध्ये आल्याचं आहेत सविस्तरपणे.
                             पुढचा पदार्थ म्हणजे राजगिऱ्याच्या दशम्या. यासाठी आधी गुळाचे पाणी करून घ्यायचे, म्हणजे पिठाच्या प्रमाणात गूळ घेऊन तो पाण्यात विरघळून घ्यायचा. पाणी सुद्धा पिठाला लागेल इतकेच घ्यायचे. मग या पाण्यात ते पीठ भिजवायचे आणि लगेचच त्याच्या दशम्या करायच्या. भिजवलेले पीठ तसेच ठेवले तर ते कडक होते. दशम्या करायच्या म्हणजे पोळी सारखाच भिजवलेल्या पिठाचा उंडा घेऊन तो लाटायचा आणि तव्यावर भाजून घ्यायच्या, की झाल्या राजगिऱ्याच्या दशम्या तयार! एक काळजी घ्यायची मात्र. दशम्या भाजून झाल्यावर त्या पसरवून ठेवायच्या कागदावर. गरम गरम दशम्या एकमेकांवर नाही ठेवायच्या. तसे केलं तर त्या एकमेकांना चिटकून जातील . पूर्णपणे थंड झाल्यावरच एकमेकांवर ठेवायच्या. या दशम्या सोबत खायला आमच्या कडे शेंगदाण्याची ओली चटणी केली जात असे. हिरव्या मिरच्या, जिरं, भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि कोथिंबीर एकत्र वाटून घ्यायचे की झाली चटणी तयार. हल्ली मिक्सर वर वाटली जाते , पण तेव्हा मिक्सर नव्हते. पाट्या-वरवंट्यावर वाटली जात असे चटणी, त्यामुळे अजूनच चविष्ट लागत असे . या राजगिऱ्याच्या गोड दशम्या आणि सोबत तिखट चटणी, फारच छान लागते. माझ्या तर खूपच आवडीची. शिवाय पचायला एकदम हलकी. मी आता बऱ्याच वर्षात केली नाही, पण आता यावेळी करण्याचा विचार आहे. तसेच सोबत उकडलेल्या बटाट्याची भाजी सुद्धा असेच. ही सगळ्यांच्या अगदी नीट माहितीची, त्यामुळे त्याबद्दल सविस्तर सांगत नाही इथे. 
                             एक अजून छान आणि आम्हा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे उपवासाची कढी. नेहमीच्या कढी पेक्षा आम्हाला ही उपवासाची कढी फारच आवडे अजूनही खूप आवडते. नेहमीसारखीच कढी, पण ताकात  'कढीचं पाठं' किंवा बेसन घालायचे नाही. शेंगदाणे, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सगळ्याचं वाटणं करून ते ताकात घालायचे, त्याला छान उकळी आणायची आणि मीठ घालून, त्याला जिऱ्याची तुपातील फोडणी घालायची. झाली उपवासाची कढी तयार. ही कढी सगळ्याच पदार्थांसोबत छान लागते, राजगिऱ्याची दशमी चटणी, साबुदाणा खिचडी, भगरची खिचडी, उपवासाचे थालीपीठ वगैरे वगैरे. 
                            इथे सकाळचा बेत संपतो. मोठ्ठ ताटच लागे जेवायला. हो, कारण मेजवानीच झाली ना ही एक खास प्रकारची. त्याला फराळ तरी कसे म्हणायचे? ताट अगदी भरून जात असे . राजगिऱ्याची दशमी, चटणी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, एका वाटीत कढी, एका वाटीत बोरोणी, उपासाचं लिंबूचं लोणचं आणि ज्याला जेवणातच आवडे त्यांच्या ताटात थोड्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा सुद्धा! बाजूला आणि एक रिकामी ताटली लागे, बोरोणीतील बोरांच्या बिया आणि भुईमुगाच्या शेंगांची सालं टाकायला. एकदाच वाढलेले खाता खाता दमछाक होणार! परत दुसऱ्यांदा काही घायलाच नको. एवढे झाल्यावर संध्याकाळी काही नाही असे नाही. संध्याकाळचा बेत परत असाच भरगच्चं असे! परत आम्हा मुलांचे दिवसभर येत जाता शेंगा, बोरोणी खाणे चालूच असे ते वेगळे. 
                            संध्याकाळी साबुदाणा खिचडी, भगरची खिचडी  जात असे. या बरोबर कढी हवीच असे सगळ्यांना. सकाळची असेल तर ठीक, नाही तर परत केली जात असे. तसेच या सोबत घरीच केलेले बटाटा वेफर , किस आणि साबुदानाच्या चकल्या आणि पापड सुद्धा तळले जात असतं, अगदी भरपूर! आता साबुदाणा खिचडी हा प्रकार सगळ्यांना माहीतीचा आहे, त्यामुळे त्याबद्दल इथे परत लिहिण्यात फारसा अर्थ नाही. फक्त नावं थोडी वेगवेगळी कुणी फक्त साबुदाणा म्हणतं, कुणी साबुदाण्याची खिचडी तर कुणी साबुदाण्याची उसळ म्हणतात, इतकाच  फरक. मला गरम गरम साबुदाण्याची खिचडी गरम गरम कढीत घालून, थोडा वेळाने ती भिजलेली खिचडी खायला आवडते. मी अजूनही गरम गरम खिचडी आणि कढी तयार झाली की एका वाडग्यात खिचडी  कढीत भिजत घालते आणि मग खाण्याच्या वेळेपर्यंत ती छान मुरते. ही मुरलेली खिचडी मला फारच आवडते!
                               थोडे भगरच्या खिचडी बद्दल मात्र सांगते. ही काही फार ठिकाणी मी पाहिल्याचे आठवत नाही. भगर म्हणजे वरीचे तांदूळ किंवा सामा राईस. बरेच लोक काही उपवासाला खात नाहीत. पण आम्ही मात्र सगळ्या उपवासाला खातो . हल्ली तर बरेच डॉक्टर सुद्धा साध्या भाता ऐवजी वरीच्या तांदुळाचा भात खायला सांगतात,  हलका असतो. माझ्या मात्र खूप आवडीची ही भगरची खिचडी. यासाठी भगर आधी छान स्वच्छ धुवून घ्यायची. मग कढईत तुपात जिऱ्याची आणि हिरव्या मिरचीची फोडणी करायची. त्यात भगर च्या प्रमाणात पाणी घालायचे आणि पाण्याला छान उकळी काढायची. मग त्यात भगर आणि मीठ घालायचे. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट करून ते पण घालायचे. हे सगळे सतत ढवळत राहावे लागते नाहीतर लागून जाण्याची शक्यता असते. सगळे पाणी आटले की त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि एक छान वाफ येऊ द्यायची. असे केले की ती छान मोकळी मोकळी होते. मग खाण्यासाठी एकदम तय्यार! त्यावर छान कोथिंबीर घालायची वरून  चिरलेली. साबुदाणा खिचडी प्रमाणे यावर सुद्धा लिंबू घेतले तर खूप छान लागते किंवा उपवासाच्या कढी किंवा लोणच्या सोबत सुद्धा छान लागते. 
                                 आता या सगळ्याला एकादशी नी दुप्पट खाशी तरी कसे म्हणावे, मला कळत नाही. हे किती पट होईल? ते तर मोजण्या पलीकडे आहे! महत्वाचे म्हणजे यात पांडुरंग कुठे आहे? अगदी नकळत्या वयात एकादशीची ओळख झाली . तेव्हा घरात नैवेद्य वगैरे दाखवला जाई पण तेव्हा त्याकडे फारसे लक्ष नसे किंवा एक दैनंदिन गोष्ट वाटे ती. तेव्हा एकादशीचा पांडुरंगाशी काही संबंध आहे हे सुद्धा कळत नसे. देव्हाऱ्यात एकाच पिठावर उभी असलेली विठ्ठल रुख्मिणी ची कंबरेवर हात ठेवलेली मूर्ती होती. रोज सगळ्या आरत्या म्हटल्या जात त्यात विठ्ठलाची पण एक आरती असे. तेव्हढाच काय तो विठ्ठलाचा संबंध. एवढेच काय पण तेव्हा पांडुरंग पंढरपुरात आहे हे सुद्धा माहिती नव्हते. थोडं मोठं झाल्यावर हे कळले. वारी वगैरे तर बरेच मोठं झाल्यावर कळली. पण आता मनात इच्छा आहे, एकदा तरी वारीला जायची. माझी पदवी झाल्यावर मला पंढरपूरला माझ्या सख्ख्या मैत्रिणी बरोबर जायचा योग्य आला . निघालो तेव्हा लक्षात आले आज बुधवार आहे. मी म्हटले आज बुधवार म्हणजे गर्दी नसेल, शांततेत दर्शन घेता येईल. तर ती म्हणाली अगं बुधवार हा तर पांडुरंगाचा वार! काय म्हणावे या योगायोगाला! आणि प्रत्यक्षात मंदिरात गेल्यावर कळले, मुख्य गाभाऱ्यात एकटा पांडुरंच उभा आहे कंबरेवर हात ठेऊन. रुख्मिणी दुसऱ्याच गाभाऱ्यात आहे. एकदम धक्काच बसला. अगदी समजायला लागल्या पासून घरातील एकाच पिठावर दोघे उभे असलेली मूर्ती बघत आले. त्यामुळे मंदिरात सुद्धा अशीच मूर्ती असावी, अशी माझी धारणा होती. बाकी काय काय माहिती सगळीकडून मिळत असते पण अशी महत्वाची माहिती बऱ्याचवेळा सांगितली जात नाही असे मला वाटते. म्हणून या सगळ्याचा इथे उल्लेख केला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझी पहिली पांडुरंगाची भेट ही!
   बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ... 🚩
श्री ज्ञानदेव तुकाराम ... 🚩
बोला पंढरीनाथ महाराज की जय !
माउली... 🚩 माउली... 🚩 माउली ..... 🚩

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
८ जुलै २०२१


मी साकारलेले विठ्ठल-रखूमाई चे रूप! 



हीच ती आमच्या देव्हाऱ्यातील 
विठ्ठल रखुमाई ची मूर्ती !



साबुदाणा खिचडी , उपवासाची कढी 
आणि उपवासाचे लिंबूचे लोणचं 



राजगिऱ्याची दशमी , चटणी , कढी आणि लिंबू लोणचे 
(खास आज ब्लॉग वर हे छायाचित्र प्रकशित करता यावे 
म्हणून आमच्या मम्मी नं २ नी काल हा बेत केला !)


बोरोणी 



बटाट्याचा कीस 



बटाट्याचे वेफर 


वरून तिखट-मीठ भुरकावलेला कीस 


वरून तिखट-मीठ भुरकावलेले वेफर आणि कीस 


साबुदाणा चकली 



साबुदाणा बटाटा पापड 



साबुदाणा 


केळ्याचे घरी केलेले वेफर 
(कच्ची केळी उपलब्ध असतील तेव्हा 
केळ्याचे वेफर सुद्धा केले जात घरी )



या चौकटीत दिसणारी डावीकडची 
इमारत म्हणजे आमच्या बहिणीची ,
माझ्या आवडती 






















Comments

  1. Khanyacha lekha uttam. And kharokhar jalgaonchi ekadashi pahileli aahe.achuk varnan kele aahe.

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंय तू नक्की अनुभवलेली असशील एकादशी! मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete
  2. स्नेहलJuly 17, 2021 11:43 am

    काय भारी मेजवानी आहे, आणी त्या वर उत्कृष्ट लिखाण

    ReplyDelete
  3. जितेंद्रJuly 18, 2021 10:38 am

    ताई छान डोळयासमोर उपवासच ताट आल तोंडाला पाणी सुटले राजगिर च्या पिठ जात्यावर दळत व्वा खूपच छान����

    ReplyDelete
    Replies
    1. 😊😇 खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  4. ��upwasachi gost ��
    Upwasache padarth pics khoop sunder
    He sagle banawnari aai kiti kastalu aani sugean ��

    ReplyDelete
    Replies
    1. आई बद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे!
      मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  5. विकास पाटीलJuly 18, 2021 1:07 pm

    मस्त!

    यातील राजगीरा दशमी नविन ज्ञान मिळाले.

    बाकी पदार्थ पाहून आपोआपच तोंडाला पाणी सुटले.

    उपवासाची चकली भयंकर आवडीची����

    ReplyDelete
    Replies
    1. नवीन माहिती म्हणा, फार तर.
      उपवासाची चकली माझ्या पण खूप आवडीची!!
      धन्यवाद 🙏 😇😇

      Delete
  6. I remembered my childhood.
    Very nicely explained
    Keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  7. Dipali WaghuldeJuly 21, 2021 9:55 am

    मस्तच एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण आठवते मला tr. काय काय पदार्थ असतात नाही. नुसती खाण्याची चंगळ. एकादशी निमित्त भजन कीर्तन पन ऐकायला मिळायचे. खूप छान वाटायच तेव्हा. आता खाण तेवढे शाबूत आहे. भजन कीर्तनात कुणी रमत नाही हे मात्र खर.

    ReplyDelete
    Replies
    1. भजन कीर्तन तेव्हा काही मी ऐकले नाही. पण दिवसभर खाणे मात्र चालू असे अखंडपणे! मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  8. मस्त 🌹👌🏻👌🏻खूप छान लिखाण, सर्व डोळ्यासमोर घडत आहे असे वाटते . माझ्या आठवणी जागृत झाल्या... घराघरांतून फक्त उपवासाच्या फराळाचा वास दरवळत राहायचा आणि संध्याकाळी भजन साठी जमलो की तिथे प्रसाद म्हणून पण हेच मिळायचे...

    ReplyDelete
  9. सारे काही अप्रतिम 👌👌👌

    ReplyDelete
  10. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ... 🚩
    श्री ज्ञानदेव तुकाराम ... 🚩
    बोला पंढरीनाथ महाराज की जय !
    माउली... 🚩 माउली... 🚩 माउली ..... 🚩

    माझ्या माहेरी महानुभावपंथीय असल्याने फराळाच्या या गंमतीजमती अनुभवल्याच नाही पण तुमच्या लेखावरून “ एकादशी नि दुप्पट खाशी” ही म्हण सार्थ वाटते.

    ReplyDelete
  11. गुलाबराव पाथरकरJune 28, 2023 12:28 pm

    फराळाचे पदार्थ बघून उद्याच्या ऐवजी आजच उपवास करावा असे वाटले ,छान फराळ आहे .धन्यवाद मॕडमजी

    ReplyDelete
  12. मेधा राजोपाध्येJune 29, 2023 6:27 am

    छान लेख. माहेरच्या एकादशी ची आठवण झाली.

    ReplyDelete
  13. डॉ प्रा राम नेमाडे सरJune 29, 2023 10:49 am

    आषाढीच्या निमित्ताने आपण पाठविलेल्या लेखाचा मनसोक्त आस्वाद घेतला. आपल्या बहुआयामी लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा. शुभंभवतु.

    ReplyDelete
  14. आनंदी लिखाण. एक उत्तम अनुभवलेले लेखन आपण नोंदवले आहे .या आठवणी प्रत्येकाने जपलेल्या असतात पण प्रत्येक जण नमूद करून ठेवत नाही .नमूद करण्याची इच्छा असेल तरीही नमूद केलेले नसते. लिखाण सर्वांनाच जमते असे नाही .आनंदी लिखाणाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  15. डॉ सुनील पुरीDecember 01, 2023 9:47 am

    सुरेख इतक्या गमती जमती असूनही त्याची जाणीव नव्हती आता ती झाली 🙏

    ReplyDelete
  16. उषा पाटीलNovember 13, 2024 6:22 am

    वा! साबुदाण्याची खिचडी; भगर ची गोड दशमी, उकडलेल्या शेंगा गोडबोर् त्याला बोरवणी म्हणतात बटाट्याची भाजी कढी अगदी पूर्ण फराळ झाला पोट तुडुंब भरले असा फराळ मिळाल्यावर कोण म्हणणार नाही एकादशी दुप्पट खाशी, वर्षा तू तुमच्या घराचं वर्णन इतकं छान करतेस की मला इतक्या दिवसांनी पण हे घर जसच्या तसं आठवतं, तुझं लेखन खरंच लय भारी,! लय भारी!

    ReplyDelete
  17. खूप छान लेख आणि लहानपणीच्या आठवणीला उजाळा आणणारी. बोरोणी हा शब्द पहिल्यांदा ऐकला.आम्ही बोराचे उपवासाचे लोणचे असेच करतो.खूप छान उपवासाच्या पदार्थाची एकादशीला असलेली रेलचेल अप्रतिम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...