गोष्टी बागेतल्या - २
(काही अनुभवलेलं ...)
"बाग शब्द आपला नाही , तर उद्यान , उपवन , पुष्पवाटीका , वाटीका इत्यादी . तथापी बाग शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो असो ! आशय घनता उत्तमच आहे . सुटसुटीत मांडणीमुळे संतुलन छान साधले गेले आहे . अतिशय आवडला . लिहीत राहा . "
'बाग उर्दू शब्द आहे का?'
"पर्शियन"
आदरणीय संस्कृतीपुरुष ऋषीतुल्य डॉ रा श्री मोरवंचीकर सरांनी गोष्टी बागेतल्या-१ वाचल्यानंतर त्यांचा आणि माझा झालेला हा संवाद . गेल्या काही महीन्यांपासून सर आनंदी पाऊस नियमित वाचतात आणि नेहमीच त्याबद्दल माझ्याशी बोलतात , काही कौतुक , काही सूचना . पण आज याचा मला इथे उल्लेख करावासा वाटला , तो बाग शब्दामुळे . माझ्यासाठी फारच नवीन आणि आश्चर्यकारक होती ही माहीती . मग मला वाटले , ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी , म्हणून हा उल्लेख ! एकंदरीच भारतीय जीवनावर , संस्कृतीवर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे पर्शियन प्रभाव आहे , त्यातीलच एक म्हणजे हा आपल्या भाषेवर पडलेला प्रभाव .
आता आजची गोष्ट . खरंतरं माझ्या पहिल्या विचार आणि नियोजनात या भागाचे शीर्षक 'जेवणाची संध्याकाळ - २" असे होते . पण नंतर गोष्टी बागेतल्या लिहावयास सुरुवात केली , तेव्हा वाटले ही गोष्ट याच सदरात लिहावी . यावरून आजची गोष्ट काय आहे , याचा थोडाफार अंदाज आलाच असेल . तर आजची गोष्ट आहे बागेतील संध्याकाळच्या जेवणाची . जेवणाचीच खास संध्याकाळ असली तरी ती आधीच्या जेवणाच्या संध्याकाळ पेक्षा बरीच निराळी आहे .
बागेत जेवायचे म्हणजे ओघाने लवकर स्वयंपाक करणे आलेच , नेहमीपेक्षा खूप लवकर . आता गच्चीवर किंवा गॅलरीत जेवणाचा कार्यक्रम होई तेव्हा घरातील भांड्यातून , वाडग्यातूनच सगळे अन्न नेता येत असे . पण बागेत जायचे म्हणजे सगळे सामान हातात घेऊन बऱ्यापैकी चालावे लागे , साधारण दीड किलोमीटर . मग त्यादृष्टीने तयारी करावी लागे . एकतर पातळ किंवा सांडाउंड होणारे पदार्थ नीट झाकण घट्ट लागणाऱ्या डब्यात भरून , बंद करावे लागे . बाकीही सगळे वेगवेळ्या डब्यातून वगैरे भरून घ्यावे लागे . एव्हढेच नाही तर जेवायला इतकी ताटं घेणे शक्य नसे , मग घरात केळीची पानं असतील तर ती किंवा वर्तमानपत्रं किंवा काही जाड कागद असतील तर ते घेऊन जावे लागे . बागेत पिण्याच्या पाण्याचा नळ होता , तेच पाणी पीत असू आम्ही . पण जेवतांना पाणी लागे , त्यासाठी सोबत स्टीलचा तांब्या आणि पेले न्यावे लागत .
आता हे सगळे सामान एकाच पिशवीत भरून चालत नसे . कारण खूप वजन होणार आणि एकाच व्यक्तीला तेव्हढे हातात घेऊन जाणे अवघड . मग दोन तीन पिशव्यात थोडे थोडे सामान घातले जाई आणि दोन तीन जण एक एक पिशवी धरत असे . किंवा एखाद्याच मोठ्या पिशवीत घातले तर आम्ही दोघीत मिळून एक पिशवी धरत असू म्हणजे पिशवीचा एक बंद एकीच्या हातात आणि दुसरा दुसरीच्या हातात . अशा वेळी मात्र या दोन व्यक्तींना साधारण सारख्याच वेगाने चालावे लागे . फक्त सांडून जाण्याची शक्यता असलेले पदार्थ मम्मीचाच हातात असत . कारण आमच्या हातात दिल्यावर , तो पोटात जायचे तर लांबच , पण बागेपर्यत पोहोचेल की नाही याची सुद्धा खात्री नसे .
हे सगळे सामान घेऊन चालत चालत , मजल दरमजल करत बागेपर्यंत पोहोचत असू . एव्हढे सामान , आम्ही मुलं आणि रस्त्यावरची रहदारी , हे सगळे मम्मी कशी सांभाळत असे हा एक मोठ्ठा प्रश्नच आहे ! बागेत पोहोचल्यावर , सगळे सामान एका जागी ठेवत असू . आमची ही जागा ठरलेली होती . तेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरले की समोर कारंजे आणि गांधीजींचा पुतळा दिसत असे . या कारंज्याच्या आणि गांधीजींच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला एक आयताकृती जागा होती . चारही बाजूला छान झाडं होती . या भागात गवत असे कायम . या बाजूला खेळण्याची उपकरणे नव्हती , त्यामुळे या बाजूला फारसे कुणी फिरकत नसे . तसेच पिण्याच्या पाण्याचा नळ सुद्धा जवळच होता . कारंज्याचा समांतर असलेल्या बाजूच्या भिंतीपलीकडे बस स्टॅन्ड होते , खरंतरं अजूनही आहे . त्यामुळे आमची हीच जागा कायमची ठरलेली होती . मग या जागी जाऊन आम्ही आमचे सगळे सामान ठेवत असू आणि चप्पल पण बाजूलाच काढून ठेवत असू .
मग मम्मी म्हणे , जा थोडावेळ जाऊन खेळून या . नेहमी ह्या गोष्टीची खूप घाई असे , म्हणजे घसरगुंडी , झोपाळे , जंगल जीम वगैरे खेळायची . पण आज आम्हाला त्यात अजिबात रस नसे . कारण आज आम्हाला मम्मी मंडळी सोबत खेळायची संधी असे . मग त्या आयताकृती जागेतच आम्ही पळापळी , लंघडी पळकी , मामाचं पत्रं हरवलं , आंधळी कोशिंबीर वगैरे खेळ खेळत असू . जाम धम्माल येत असे ! त्यातच हे सगळे खेळ तिथल्या गवतावर खेळत असू , त्यामुळे फारच छान वाटे , तळ पावलं एकदम सुखावून जात . पण ही सगळी धमाल चालू असतांना वेळेचे पण भान ठेवावे लागे . दोन कारणं याची . एक म्हणजे अंधार पडण्याच्या आधी जेवण करणे आवश्यक असे . कारण बाग , झाडं , गवत असल्याने तिथे निरनिराळे किडे , कीटक आणि डास येण्याची शक्यता असे . दुसरे कारण म्हणजे जेवण करून पुन्हा घरी चालतच जावे लागे . घरी पुरुष मंडळींची जेवणं खोळंबलेली असतं .
खेळून झाले की आमची जेवणाची तयारी चाले . पण या जेवणात मात्र एक अत्यंत आवडीचा भाग असे . या बागेच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या बाहेर , एस टी स्टँडच्या बाजूला एक भेळपुरी वाल्या भैय्याची गाडी असे आणि दुसऱ्याबाजूला एक खारे शेंगदाणे वाला उभा असे . हे इथले खारे शेंगदाणे फारसे कधी मिळत नसतं . पण ज्या दिवशी बागेत जेवायला येत असू त्या दिवशी मात्र थोडी थोडी भेळ मिळत असे ! त्यामुळे हा वनभोजनाचा कार्यक्रम आमच्या जरा जास्तच आवडीचा . खेळून झाले की मम्मी मुख्य प्रवेश द्वाराजवळ जाऊन भेळ आणत असे . भेळ पण दोन प्रकारची आणली जात असे . एक म्हणजे तिखट आणि एक म्हणजे थोडी फिक्की . अर्थातच तिखट भेळ मोठ्या मंडळींसाठी आणि फिक्की आम्हा मुलांसाठी . भेळ येईपर्यंत बाकी मंडळी जेवणाची इतर तयारी करीत असतं . कुणी तांबे पेले , त्या पाण्याच्या नळावरून भरून आणत असतं . कुणी पिशवीतून वर्तमानपत्र काढून सगळ्यांसाठी मांडून ठेवत असे . मग त्यावर एक एक पदार्थ वाढला जात असे आणि सरते शेवटी नुकतीच आणलेली भेळ वाढली जात असे .
मग साग्रसंगीत जेवण सुरु होत असे . बाजूलाच एस टी स्टॅन्ड असल्याने तिथले निवेदन ऐकू येत असे , सोबतच बसेस ची घरघर , माणसांचा कोलाहल पण ऐकू येत असे . शिवाय संध्याकाळची वेळ असल्याने पक्षी झाडावरच्या घरट्यात परतलेले असतं , त्याचा किलबिलाट चाललेला असे . कधीकधी आमच्यापैकी नशिबानं व्यक्तीला डोक्यावर , कपड्यांवर झाडावरच्या पक्षांचा प्रसाद पण मिळतं असे . ;-) अगदी शब्दशः साग्रसंगीत जेवण !
माझ्या पानात भेळ वाढली की मला त्यावरच ताव मारावासा वाटे . पण ती संपून जाऊ नये असेही वाटे . कारण बाकी पदार्थ पानातील संपले , तर परत मिळत असतं . पण भेळेचे तसे नव्हते , ती एकदाच मिळे तीही अगदी ठराविक प्रमाणात . साधारण विकत आणलेली भेळ सगळ्यांना थोडी थोडी मिळेल या बेताने वाढली जात असे प्रत्येकाच्या पानात . मग मी अगदी मनावर ताबा ठेऊन , पानातील बाकी सगळे पदार्थ आधी संपवून टाकत असे . सगळ्यात शेवटी भेळ ! सगळ्यात शेवटी भेळ खाल्ल्याने , त्या भेळेची चव जिभेवर खूप वेळ रेंगाळत राही .
असे साग्रसंगीत जेवण आटोपले की मग भराभर आवराआवरी चाले . शक्य असल्यास डबे , चमचे थोडे विसळून घेणे . नसेल तर तसेच व्यवस्थित पिशवीत भरून ठेवणे . वर्तमानपत्र आणि बाकी अजून काही कचरा झाला असेल तर मात्र तो नीट सगळा उचलून कचराकुंडीत टाकला जात असे . मम्मी याही बाबतीत खूपच दक्ष होती . कुठल्याही प्रकारचा कचरा बागेत राहता काम नये याची पुरेपूर काळजी घेत असे .
बागेत येतांना आम्ही अगदी आनंदात असू , त्यामुळे चालत चालत कधी बागेत पोहोचत असू ते सुद्धा कळत नसे . पण घरी परत जाते वेळी मात्र , एकतर पोट तुडुंब भरलेले असे आनंदाने आणि वनभोजन केल्या मुळे दोन घास जास्तच खाल्ल्यामुळे . आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ओव्हर इटिंग ! त्यामुळे चालणे खूपच जीवावर येत असे . दुसरे महत्वाचे म्हणजे एक छान संध्याकाळ संपून गेल्याचे वाईट सुद्धा वाटत असे . पण मम्मी मंडळींना मात्र घरी जायची घाई असे . कारण पुरुष मंडळी घरी पोहोचलेली असतील , त्यांना भूक लागली असेल वगैरे चिंता असत त्यांच्या डोक्यात . घरी पोहोचून गरम गरम भाकरी करून त्यांना वाढल्यावरच त्यांच्या जीवाला शांती मिळत असे !
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
१७ जून २०२१
मुख्यप्रवेश द्वारातून आत शिरताच
दिसणारे दृश्य
बागेतील हिरवळ आणि झाडं
अशाच प्रकारे टोपलीत खारे शेंगदाणे ठेवलेले असतं
आणि त्यावर असेच मातीचे छोटे भांडे ज्यात मंद निखारे
असतं . त्याला एक लोखंडी हॅन्डल असे , ते धरून थोडा
थोडा वेळाने त्याची जागा बदलली जात असे . असे केल्याने
सर्व भागातील शेंगदाणे गरम आणि कुरकुरीत राहत . असे
नाही केले तर
एकाच ठिकाणचे शेंगदाणे जळून जातील
भेळपुरीची गाडी , पण ही आधुनिक आहे
भेळ
स्टील चे तांबे आणि ग्लास
Khup chan lihile..
ReplyDeleteLahanpanichya athwani tajya zalya
Kharya shegdanya baddal bolayche zale tar aplya jalgaon la jase khare shengdane miltat na tase ikde punyala nahi milat
जळगाव सारखे काहीच कुठेच मिळत नाही 😁
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
👌👌 Lahan pan aathvle😔
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteखुप छान लहानपणीच्या आठवणीत गेल्यासारखे वाटते.👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!
DeleteKhoopach chan varnan👌
ReplyDeleteLahanpanicha aathwani parat taza zhala😊
खूप सारे धन्यवाद 😍
DeleteBagetil jevan v tyachi tayari karne khup chan ����
ReplyDeleteBhel pan ��
Tumhi sarv jani janu samorach basun jevan karat aahat ase vatale��
अरे वावा, मस्तच!!!
Deleteखूप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇!!!
Bag sahal lekh sundar zalay
ReplyDeleteAshach bagechya lahanpanichya athvani jage zalya
Pics chan
Sahaj sopi bhasha wachayla kadhi suru kele ani kadhi sample kalat nahi
Asech likhan chalu rahu de shubhecha
Bangalorechi bag ani amache nightana divshi tu ghetlela selfi athawala
आपली बाग, अणि तेथील आठवणी सारेच खूप रम्य आणि सुंदर!!!
Deleteकधीही न विसरता येणारे!!
खुप सारे धन्यवाद 😍 😇