साय आणि पुढील प्रवास-१
(घरातील गमती जमती)
साय, लोणी, तुप, बेरी माझे अगदी लहानपणापासुन खुप जिव्हाळ्याचे आणि मनाच्या अगदी जवळचे विषय! सकाळी ताजं दुध आले की अगदी बारीक आचेवर गरम करायचे. बारीक आचेवर गरम करण्याचे दोन फायदे, एक सगळ्यांच्या माहितीचा, तो म्हणजे बारीक आचेवर दुध गरम केले, की ते उतू जात नाही आणि दुसरा फारसा कुणाला माहितीचा नसतो. तो म्हणजे बारीक आचेवर दुध गरम केले म्हणजे त्या दुधावर छान भाकरी सारखी जाड साय येते. मग हे गरम झालेले दुध थंड झाले की शीतकपाटात ठेवायचे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुधाचे भांडं शीतकपाटातुन बाहेर काढायचे, त्यावर मस्त जाड साय आलेली असते, ती बघुनच मन हरखुन जाते माझे. मग एक चमचा घेऊन, भांड्याला चिकटलेली सगळी साय खरडून काढुन, साठवणुकीच्या बरणीत काढायची. रोज हळुहळु करत साधारण आठ-दहा दिवसात बरणी सायीने पुर्ण भरून जाते आणि ते पाहुन माझे मनही अगदी तुडुंब भरून जाते!
मग ती साय मी एका भांड्यात काढुन घेते, झाकण ठेवुन चोवीस तास तशीच बाहेर राहू देते. चोवीस तासांनी एक चमचा घेऊन त्या सायीच्या भांड्यात काही मिनिटं गोल गोल फिरवले की मस्त सोनेरी रंगाचं लोणी तरंगताना दिसू लागतो. थोडे अजुन हलविले की मस्त एक मोठ्ठा गोळा तयार होतो या सोनेरी लोण्याचा! हा लोण्याचा गोळा बघुन जो काही आनंद मिळतो, त्या आनंदाची तुलना कशाबरोबरच होऊ शकत नाही. कधी कधी मात्र कितीही हलविले तरी, तो लोणी काही येता येत नाही. मग थोडा वेळ परत शीत कपाटात ठेव, कुठे त्यात थोडा बर्फचं घाल असे एक ना अनेक उपाय सुरु होतात. पण काही उपयोग होत नाही कशाचाच. जीव अगदी मेटाकुटीला आणि रडकुंडीला येऊन जातो. मग कधी कधी एक दोन दिवसांनी खुप हलविल्यावर, घुसळल्यावर कुठे तो लोणी येतो. हे असे का होते हे मात्र आजतागायत मला न उलगडलेलं कोडं आहे. गेल्या काही वर्षात तर मला चक्क दोनदा तरी ते फेकुन देण्याची वेळ आली, कारण कुठलाही उपाय चालला नाही, घुसळून घुसळून हात सुद्धा दुखून आले होते. फक्त माझ्याच बाबतीत असे झालेय असे नाही. मधुनच कुणीतरी सांगतेच असे झाल्याचे. काय गौडबंगाल आहे काही कळले नाही आजतागायत . तुम्हा कुणाला माहिती असेल तर मला जरूर सांगा, माझ्या सारख्या बऱ्याच बिचाऱ्यांची अशी फजीती होण्यापासुन सुटका होईल.
त्यानंतर तो लोणी चांगला तीन पाण्यानी तरी धुवुन घ्यायचा. मी विरजण लावत नाही सायीला, त्यामुळे ते ताक काही उपयोगाचे नसते माझ्या. पण मला बेरी खूप आवडते, मग मी लोणी धुतांना ते पाणी तसेच न फेकता गाळुन घेते आणि चाळणीत अडकलेला साका परत लोण्यात घालते. असे केल्याने अगदी भरपुर बेरी येते, तुप कढवल्यावर. मग हे लोणी गॅस वर ठेवायचं कढवण्यासाठी. मग त्याच्या छान वासाने आणि आवाजाने घर भरून जाते. छान पांढरी लुसलुशीत बेरी हवी असल्यास, लोणी शिजत असतांना सारखे हलवत रहावे, म्हणजे ती खाली चकटून बसत नाही. लालसर आणि थोडी कुरकुरीत बेरी हवी असल्यास, हे सगळे करण्याची काही गरज नाही. थोड्याच वेळात तुप तयार होते. थोडा वेळाने स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत गाळुन भरून ठेवायचे. जसे जसे ते थंड होत जाते तसे तसे मस्त रवाळ होत जाते. गाळल्यावर मस्त लुसलुशीत बेरी येते, मला छान तशीच गरम गरम खायला आवडते. काही लोक यात साखर घालून खातात, तर काही लोक त्याची धिरडी करून खातात . मला मात्र तशीच ताजी, गरम गरम खायला आवडते . काही कारणाने लगेच खाता आली नाही तर , खाते वेळी मी ती काही सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये ठेवते, मग खाते. गरम गरम, ताजी ताजी बेरी खाणे म्हणजे अगदी स्वर्गीय आनंद, माझ्या मते! खातांना त्याचे पोत आणि चव याचा फारच सुंदर अनुभव येतो... ही सगळी माझी हल्लीची गोष्ट!
आम्ही लहान असतांना म्हणजे चौधरी सदनात रहात असतांना यात बरेच बदल होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तेव्हा घरात शीतकपाट नव्हते. पण घरात बरेच सदस्य होते आणि दररोज खुप येणारे जाणारे असत. त्यामुळे दुधही भरपूर लागे. मुख्य म्हणजे दुध फारच चांगल्या प्रतीचे असे तेव्हा. पर्यायी शीत कपटाशिवाय सुद्धा बरीच साय गोळा होत असे. आता यातही दोन महत्वाचे फरक होते. सुरवातीच्या काही वर्षांत घरचे दुध होते, आमच्या मुळगावाहून येत असे. आणि नंतरच्या काळात विकत आणलेले ते ही दुध केंद्रातुन आणलेले. सुरुवातीला बाटल्या आणि नंतर आजच्या सारख्या प्लास्टिकच्या पिशव्यातुन.
बाटल्या/पिशव्यातुन येणाऱ्या दुधाची प्रत जरी आजच्यापेक्षा खुप चांगली होती, तरी अर्थातच त्याला घराच्या दुधाची सर नव्हती त्यामुळे साय सुद्धा घराच्या दुधापेक्षा कमी येत असे . तर आधी या विकतच्या दुधाच्या सायीची गोष्ट, जी बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहितीची. नंतर घरच्या दुधाच्या सोयीची गोष्ट, ही गोष्ट माझ्या खुप आवडीची आणि बहुतेकांसाठी नवीन आणि माहीती नसलेली. तर दुधाच्या बाटल्या/पिशव्या मधुन दुध पहाटेच साडेपाचच्या आसपास आणले जात असे 'विकास' च्या टपरीवरून(किऑस्क). मग हे स्टीलच्या पातेल्यातुन गरम करुन, स्वयंपाकाच्या ओट्यावरच एका बाजुला गोलाकार जाळीने झाकुन ठेवले जात असे. जेणेकरून ते थंड तर होईल पण त्या दुधात इतर काही उडुन पडणार नाही आणि दुध नासणार नाही. मांजरी येण्याचा काही प्रश्नच नव्हता, त्यामुळे त्यासाठी काही खास उपाय करण्याची गरज पडत नसे. मग थंड झाल्यावर ही दुधाची भांडी, स्वयंपाक घरातच असलेल्या जाळीच्या कपाटात ठेवली जात असतं. आता शीतकपाट नसल्याने, सकाळी दुध एकदा गरम केले की झाले असे होत नसे. मौसमाप्रमाणे दिवसातुन दोन-तीन वेळा गरम करावे लागत असे. असे केले नाही तर अर्थातच दुध नासुन जाणार.
मग दुसऱ्या दिवशी त्या पांढऱ्याशुभ्र दुधावर छान पांढरीशुभ्र साय येत असे. ही साय काढुन साठवणुकीच्या भांड्यात काढुन ठेवली जात असे. त्याबरोबरच सायीलगतचे थोडे घट्ट दुध सुद्धा त्या भांड्यात टाकले जात असे. असे केल्याने नंतर तयार झालेले ताक छान घट्ट आणि चवीष्ट होते. आता शीतकपाट नसल्याने, दुधावरची साय काढली आणि साठवणुकीच्या भांड्यात टाकली की झाले असे होत नसे. पहिल्याच दिवशी त्या सायीला अगदी थोडेसे विरजण लावावे लागत असे. तसे नाही केले तर साय खराब होऊन वाया जाणार. दुसरे महत्वाचे म्हणजे अगदी थोडेसे विरजण. कारण पुरेशी साय साठेपर्यंत सहा-सात दिवस तरी जाणार. इतक्या दिवसात ते खुप आंबट होता कामा नये. तसे झाले तर या पासुन तयार होणारे ताक सुद्धा खुप आंबट होणार आणि त्यामुळे त्याचा वापर करणे फार कठीण होऊन बसेल. तसेच दररोज त्यात नवीन साय घातली की ती साय आधीच्या विरजण लावलेल्या सायीसोबत नीट कालवुन घ्यावी लागे . मग हे साय काढलेले दुध पिण्यासाठी, चहा-कॉफी साठी वापरले जात असे. त्यानंतर जे काय थोडेसे दुध शिल्लक राहात असे, ते दुसऱ्या छोट्या भांड्यात काढुन ठेवले जात असे.
इथे एक महत्वाचा भाग, अगदी दररोजचा. हे रिकामं केलेलं दुधाचं भांडं. ह्या भांड्याच्या गोलाकार भिंतीवर थोडीफार साय शिल्लक असे. एव्हढेच नाही तर या भांड्याच्या तळाशी सुद्धा एक थर येत असे, एक प्रकारचा साका. अगदी भरपुर प्रमाणात असे. अगदी चमच्याने खरडुन काढावा लागत असे. आम्ही याला खालची साय किंवा खालची मलई म्हणत होतो. पण आम्हाला ही साय अजिबात आवडत नसे, फक्त वरची साय आवडत असे. ही साय अगदी थोड्या प्रमाणात भांड्याच्या गोलाकार भिंतीवर असे. दुधाचे भांडं रिकामं झालं की मम्मी म्हणे, अंग हे भांड पुसून घ्या ग कुणीतरी. मग आम्ही बघत असु वरची साय बरीच आहे का भांड्याला? तरच जी कुणी समोर असेल ती पटकन भांडं खरडुन खाऊन घेत असे. पण जर का तसे नसेल तर, आम्ही मुली त्या भांड्याला हात लावत नसु. मग हे काम आईचे(आजी). ती एक चमचा घेऊन सगळी साय खरडुन ठेवत असे आणि आम्हाला सांगत असे, साय खरडुन ठेवली आहे, खाऊन घ्या. पण आमच्या लहरीनुसार चाले. कधी आयती खरडुन मिळाली आहे म्हणुन पटकन खाऊन घेत असु, तर कधी नाही. आम्ही नाही खाल्ली तर आई किंवा इतर कुणी मोठी मंडळी खाऊन घेत असे आणि भांडे घासायला जात असे. एव्हढे खरडुन पुसून घेतलेले असले तरी भांड्याला प्रचंड चिकटपणा असे. त्यात पाणी घालून ठेवावे लागे. अन्यथा कामाची बाई ओरडणार. हे भांडे घासुन स्वच्छ करणे म्हणजे खूप मेहनतीचे काम असे. आता तर दुधाचे भांडे नुसत्या पाण्याने विसळले तरी लगेच स्वच्छ होते .
दुसरा भाग वरच्या जाड पांढऱ्याशुभ्र सायीचा. ही साय माझ्या अत्यंत आवडीची. पण ही रोज मिळत नसे, अधुन मधुनच मिळत असे मला थोडी. पण ही साय घेतली आणि खाल्ली असे होत नसे. ही साय खाण्याची माझी एक खास पद्धत आहे, अगदी आजतागायत. तर तेव्हा मी ही साय एका वाटीत घेऊन त्यात थोडी साखर घालुन छान फेटुन घेत असे. त्यामुळे साखर तर पुर्ण विरघळत असेच, शिवाय पोत छान मऊशार होत असे , डोळ्यांना दिसायला आणि खातांना जीभेलाही. मग चमच्यावर थोडी थोडी घेऊन, जीभेने थोडी थोडी चाटून चाटून खायची, स्वर्गीय सुख! खाण्याच्या पद्धतीत थोडे थोडे बदल होत गेले. जसे काही दिवसांनी घरात शीतकपाट आले, मग ही फेटलेली सायीची वाटी थोडावेळ शीतकपाटात ठेवत असे. मग ती थंडगार साय त्याच पद्धतीने खायची. काही काळाने सायीची नैसर्गिक मधुर चव आवडायला लागली, मग त्यात साखर घालणे बंद झाले. अलीकडे काही वर्षात शीतकपाटातील थंडगार खाल्ले की मला त्रास होतो . मग आता मी साय वाटीत घेऊन चमच्याने छान फेटून घेऊन खाते, पण त्याच पद्धतीने. गम्मत आणि योगायोग म्हणजे आता काही वर्षापासुन, घरी गेले की तिथे पूर्वीसारखी घराच्या दुधाची साय खायला मिळते. छान घराच्या पांढऱ्याशुभ्र दुधाची छान पांढरीशुभ्र जाड जाड साय! आणि हवी तितकी घेता येते, अगदी भरपूर! मग तीन-चार दिवसातुन एकदा या प्रमाणे माझा साय खाण्याचा कार्यक्रम चालु असतो घरी गेले की!
नंतर पुढचा भाग म्हणजे पांढऱ्याशुभ्र सायीचे भांडे भरले की, ती साय मोठ्या भांड्यात काढायची आणि लाकडी रवीने घुसळायची. तेव्हा हा एकच पर्याय होता. घुसळत असतांना भांड्यातील सायीची एका विशिष्ट लयीत हालचाल बघायला मजा यायची. मग थोडाच वेळात पांढऱ्याशुभ्र लोण्याचे गोळे तरंगतांना दिसायला लागतं. अगदी जादु झाल्यासारखे वाटे! थोडे अजुन घुसळले की त्या सगळ्या लोण्याचा एक मोठा गोळा होत असे. त्या लोण्याचे पोत इतके मऊशार असते की आपल्या डोळ्यांनाच ते जाणवते. मला तर मोह अनावर होत असे, लोण्याला हात लावण्यासाठी. पण तेव्हा या सगळ्याची परवानगी नव्हती. थोडं मोठं झाल्यावर मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळाली , तेव्हा तेव्हा ही इच्छा पूर्ण करून घेतली. खरंतर मला कशानेही हात बरबटून घ्यायला आवडत नाही. त्याला लोणी आणि शाडूची माती हे दोन अपवाद. आता मात्र मला लोणी काढायला रवी सुद्धा लागत नाही. एका स्टीलच्या चमच्यानेच गोल गोल फिरवुन मी लोणी काढते, तो धुतांना सुद्धा त्याच चमच्याचा वापर करते. जरा सुद्धा हात न भरवता माझे लोणी तय्यार होते!
मग लोणी तीन पाण्याने धुतले जात असे. हे असे चालू असताना वेध लागत, ते कधी एकदा लोण्याचा गोळा हातावर मिळतो. लोणी धुवून की तळ हातावर लोण्याचा एक गोळा मिळत असे . मग तो छान हळुवार जिभेने चाटुन चाटुन खायचा, त्याचे मऊशार पोत अनुभवत! माझे एक प्रामाणिक मत आहे, देवाने लहान मुलांना मोठ्ठा तळहात द्यावा. तळहात फारच लहान असल्याने लहान मुलांचे अतोनात नुकसान होते. हे मला लहान असताना दोन वेळा जाणवे. एक म्हणजे गणपतीत खिरापतीचा प्रसाद वाटला जात असे तेव्हा आणि दुसरे म्हणजे घरात लोणी तयार झाले की! आजतागायत मला लोणी प्रचंड आवडते, इतके की मी आज सुद्धा फक्त लोणी पोळीचे जेवण करू शकते पोट भर, बाकी सोबत काहीही नको! मग हे लोणी तुप करण्यासाठी एकदम तय्यार. पण जर दुसऱ्या दिवशी पाव येणार असेल तर थोडे लोणी काढुन ठेवले जात असे. हो कारण शीतकपाट घरात नाही, त्यामुळे लोणी टिकणे शक्य नाही आणि पाव म्हणजे फार कधीतरीच येत असे घरात, महिन्यातुन एकदा किंवा त्यापेक्षाही कमी वेळा.
मग ते लोणी गॅस वर ठेवुन त्याचे तुप केले जात असे. मग हे तयार झालेले तुप गाळुन एका स्टीलच्या डब्यात ठेवले जात असे . हळुहळु गार झाले की छान रवाळ होत असे. मला तर फार आवडे ते पांढरेशुभ्र तुप तेव्हा! पण आता बऱ्याच वर्षापासुन सोनेरी लोणी आणि सोनेरी तुपाची सवय झालीय. आणि तेच फार आवडते, ते पांढरेशुभ्र तुप पाहीले की ते अगदी पाणचट/सप्पक वाटते. फारसे आवडत सुद्धा नाही. भरपूर बेरी निघत असे तेव्हा. पण त्या बेरीची वाटणी होत असे आम्हा सगळ्या भावंडात. आत तसे नाही, मी एकटीच बेरी खाणारी घरात. त्यामुळे सगळीच्या सगळी बेरी मी एकटीच खाते. तेव्हा वाटणी होत असलेली आवडत नसे, आता एकटीने खायला बरे वाटतं नाही. असो. या लोण्या व्यतिरिक्त भरपूर ताक तयार होत असे या सगळ्या क्रियेत. ते वेगवेगळ्या कामासाठी वापरले जात असे.
आता या आधीची गोष्ट, म्हणजे घरचे दुध असे तेव्हाची. चौधरी सदनातील आणि त्याच वेळी मुळगावातील घराची. किंवा त्याकाळातील. मुळगावी घरी म्हशी असल्याने, तिथुन ते घरचे, ताजे, निर्भेळ दुध येत असे . त्यामुळे त्यावर भरपुर साय येत असे. आणि भरपुर साय गोळा होत असे. घरातील मोठ्या भांड्यात सुद्धा घुसळणे शक्य नसे. मग ही साय घुसळायला एक खास मातीचे भांडे होते आमच्याकडे, 'राजोनी'(रांजण). राजोनी खास आमचा शब्द! उभट आकाराचे, उंचीत मध्यभागी जास्त व्यासाचे. तोंडाशी आणि तळाशी निमुळते होत जाणारे. याचे तळ मात्र एकदम सपाट, सरळ. हे भांडे नाही, तर एक खास रवी सुद्धा होती. मोठ्ठी. साडे सहा-सात फूट उंचीची. घुसळण्यासाठी रवीला असलेले लाकडी फुल सुद्धा बरेच मोठे. या फुलाला जोडलेली काठी मात्र बांबुची. फुलाला साधारण चार किंवा सहा पाकळ्या. त्याप्रमाणे त्या बांबुच्या एका टोकाला सहा ते आठ इंचापर्यंत गरजेप्रमाणे चार किंवा सहा चीर पडलेल्या असत आणि त्यातील प्रत्येक भाग त्या लाकडी फुलाच्या एका पाकळीला जोडलेला असे. अशी ही त्या रवीची रचना.
ही रवी इतकी मोठ्ठी की, आपण जसे ही छोटी रवी दोन्ही तळ हातावर फिरवुन गोल गोल घुसळतो तसे काही शक्य नसे. मग याकरीता एक खास रचना असे. ही रचना आणि त्या रचनेतील दोन लाकडी भाग, माझ्या खुप आवडीचे. अगदी लहान असताना बघीतलेले खर तर, पण माझ्या नीट लक्षात सुद्धा आहे आणि आवडत सुद्धा, तेव्हापासून ते आजतागायत. पुर्वी साधारणपणे घरात लाकडी खांब असत. या खांबाजवळ हे घुसळण्याचे काम चाले. या खांबाला, या रचनेसाठी लागणारे, दोन लाकडी भाग जाड सुती दोराने बांधलेले असत किंवा घर बांधतांना हव्या त्या लाकडी खांबात अडकविलेले असतं . ह्या दोन भागांचा आकार साधारण आयताकृती . खांबाच्या बाजुला निमुळता आणि रवीच्या बाजुला थोडा पसरट साधारण दोन ते अडीच इंच जाडीचे . त्यापैकी वरच्या बाजुला असलेल्या भागाला, पसरत टोकाला एक गोलाकार भोक असे, आकाराला, रवीच्या काठीच्या व्यासापेक्षा थोडे मोठे. दुसऱ्या भागाला मात्र त्याच ठिकाणी भोक न ठेवता एक गोलाकार खाच केलेली असे.
सगळ्यात आधी ही रवी, लाकडी फुल जमिनीवर येईल या बेताने उभी करून त्याचे वरचे टोक त्या वरच्या भागातील भोकात घातले जात असे. मग खाली जमीनीवर राजोनी ठेवुन, त्यात ही रवी ठेवली जात असे . त्यानंतर खांबाला बांधलेल्या, दुसऱ्या लाकडी भागाला असलेल्या खाचेत ही रवी अडकविली जात असे. आता रवी स्वतंत्रपणे त्या राजोनी मध्ये उभी राहू शकत असे, धरून ठेवण्याची गरज नसे. या रवीच्या काठीला साधारण अडीच-तीन फुटावर एक सुती दोरी चक्राकार(spiral) गुंडाळलेली असते, आणि दोन्ही टोकांना थोडी दोरी मोकळी असते . आता ही रचना घुसळण्यासाठी तय्यार आहे. राजोनी मध्ये साय घालायची सगळी. दोन्ही हातात एक टोक धरायचे दोरीचे आणि आलटुन पालटुन एक टोक ओढायचे. असे केल्याने घुसळण्याची क्रिया चालू होते. मग लोणी येईपर्यंत असेच घुसळत राहायचे. हे काम उभे राहुन करावे लागते. पण एकंदरीतच माझ्या खुप आवडीची ही रचना खुप. तेव्हा हे सगळे बघतांना, घुसळावेसे पण वाटे. पण ते अगदीच अशक्य होते.
चौधरी सदनात मात्र लाकडी किंवा इतर कसलेही खांब नव्हते, कुठल्याच मजल्यावर. पण ही रवी होती. दोन राजोनी सुद्धा होत्या एक मोठी आणि एक छोटी. आई(आजी) ह्या मोठ्या राजोनी मध्ये घुसळत असे. कसे करत असे खांबाशिवाय आणि त्या दोन लाकडी भागांशिवाय ते काही आता आठवत नाही. ती नाही या जगात आता त्यामुळे ते माहीती करून घेणे सुद्धा अगदी अशक्य आहे. दुसरी छोटी राजोनी मात्र खूपच गोड होती. त्यात बहुतेक पिण्याचे पाणीच भरून ठेवले जात असे. ती लवकरच फुटून गेली. मोठी मात्र खूप वर्ष होती, चौधरी सदन सोडल्यावर सुद्धा. पण तीचा काही उपयोग नव्हता . मग त्यात माती भरून, गच्चीवर ठेवली आणि त्यात एक निवडुंग लावला आम्ही. पहिला निवडुंग आमच्या गच्चीवरील बागेतील. खुप मोठ्ठा झाला तो. आणि एके दिवशी गडद नारिंगी, लालसर रंगाची काली आली आणि त्याचे फुल सुद्धा झाले. तेव्हा आम्हाला फारच आश्चर्य वाटले . कारण तेव्हा माहितीच नव्हते की निवडुंगाला सुद्धा फुल येते! ते निवडुंग खूप मोठे झाले आणि त्याची मुळं सुद्धा खूप मोठी झाली. त्यामुळे ती राजोनी हळुहळु तडकु लागली आणि कालांतराने फुटून गेली.
रवी सुद्धा फार छान होती, अगदी जशीच्या तशी दिसते मला डोळ्यासमोर अजुनही. नंतर घुसळायला वापरली जात नसे. पण तुपाच्या वाढी प्रमाणे ही सुद्धा लग्न कार्यात जात असे कुणाकुणाकडे. वरण लोणायला तसेच खास खान्देशी वांग्याची भाजी आणि गंगाफळाची भाजी लोणायला. या भाज्यांची गोष्ट नंतर परत कधीतरी एका खास लेखात. आणि अशीच ही रवी एकदा कुणाकडे तरी गेलेली, लग्नकार्यात. ती कधी परत आलीच नाही. आम्ही कायमचे तीला गमावुन बसलो. आता फार कुठे बघायला मिळत नाही अशा रवी. पण काही पंच तारांकीत, सप्त तारांकीत हॉटेल्स मध्ये सजावटीचा भाग म्हणुन बघायला मिळतात.
या सगळ्यात तयार झालेल्या लोण्याचे तुप होत असे. उरता उरले ताक. तर या ताकाचे तीन भाग केले जात असत. एक भाग म्हणजे एक चमचाभर, दुसरा भाग म्हणजे वाटीभर आणि तिसरा भाग म्हणजे उरलेले सगळे ताक. फार कधीतरी चौथा भाग सुद्धा होत असे . आता याच्या पुढची गोष्ट पुढच्या भागात!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१५ सप्टें २०२०
सोनेरी साय
सोनेरी साय
सोनेरी लोण्याचा गोळा
सोनेरी तुप
सोनेरी रवाळ तुप
पांढऱ्याशुभ्र सायीने
भरलेले भांडे
पांढरे शुभ्र लोण्याचा गोळा
लोणी अहाहा .......!
पांढरे शुभ्र रवाळ तुप
दुधाचे भांडे झाकण्याची जाळी
वेगवेगळ्या आकाराच्या आणि
मापाच्या लाकडी रवी
स्टीलच्या रवी
विजेरी रवी
हीच ती मोठ्ठी रवी
जवळ जवळ ७' उंच
मोठ्या रवीचे फुल आणि
त्याची जोडणी
थोडी कमी उंचीची रवी
हेच ते लाकडी भाग
ह्याच्या साहाय्याने रवी उभी करून
घुसळता येत असे .
मातीचे रांजण
हे साधारण पाणपोईत
पाणी भरायला वापरले जाते
याची उंची खूप जास्त असते
अगदी तीन साडे तीन फुट
या अशा होत्या आमच्या राजोनी
मोठी साधारण दोन सव्वा दोन फुट
आणि छोटी एक सव्वा फुट उंचीची
पुर्वी साय साठवायला साधारणपणे असे
भांडे वापरले जात असे , याला सट म्हणतात
एका पंच तारांकीत हॉटेल मधील सजावटीचा भाग
Khup chhan varnan..soneri Gola pahun tondala Pani sutale agadi..mastach
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteमाऊच्या आवडिचा विषय असल्यामुळे अगदि लहान सहान कार्य क्रुति सविस्तर वर्णन करताना घेतलेलि काळजी कुठलिही क्रुति न वगळता मुद्देसुद शब्दांकन फारच छान तसेच माऊचि चाखून चाखून खाण्याचि प्रक्रिया पण
ReplyDeleteखरंच , खुपच आवडीचा विषय , लहानपणापासुन ! आणि अगदी नीट माहीती आहे . पर्यायी सगळे वर्णन एकदम परिपुर्ण . वाचकाला सगळं अनुभवता आले पाहीजे , वाचता वाचता ! सप्रेम धन्यवाद !
Delete�� वर्णन एकदम मस्त पण लहानपणी कळे प्रयत्न बेरी खात होती पण मग बेरी ने जाड होत असे कळल्यावर जरा तिच्या पासून लांबच राहिले साधारण बेरी आवडत नाही असा माणूस विरळाच दही तूप काही पदार्थ न वर तर तूप हवंच पूर्वी दूध दुपत्याच कपात असायचं त्याला जाळी असायची मांजर नी पळवू नये म्हणून पण व उन्हाळ्यात आई मठात ठेवायची खाली थोडे पाणी घालून थंड राहण्या साठी
ReplyDeleteदुध नासू नये म्हणुन माठात थोडे पाणी ठेवुन , त्यात दुध ठेवण्याची कल्पना फारच छान आहे , मला फारच आवडली ! धन्यवाद ही माहीती सांगितल्या बद्दल !
Deleteखुप छान लिहीले आहे. लोणी बघून तर तोंडाला पाणी सूटतय....
ReplyDeleteखुप सारे धन्यवाद 😍
DeleteSoneri sai, soneri loni, soneri tup ahaha 😋
ReplyDeleteChan varnan
सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
Deleteलेख म्हणजे खरंय दूधावरली साय
ReplyDeleteसायी सारखे मऊशार धन्यवाद 🙏 😇
DeleteChchan lihiles
ReplyDeleteKhup divas corona mule velach milala nahi vachayla
Ganpati bappa GR8
Tyakali bhetvastu cha khupach aanand hot hota.
Bharit bhakri tar yummi,sobat koshambir tar farach chchan.
Tupachya berit poli takun thevaycho me n ti poli khayla pan far aavdte mala garam garam.
Chchan agadi.
Chchan lihiles.
����������
First of all एक कडक salute to u डॉ!!
Deleteसगळ्या गोंधळातून वेळ काढुन वाचन केल्या बद्दल.... अणि खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
खूप छान तूपाचा सुगंध दरवळला
ReplyDeleteदुधापासून ते तूपापर्यंत बनत जाणाऱ्या प्रक्रिये वरून एक गाणं आठवल दत्त दत्ताची गाय गायीचे दूध ,दुधाची साय,साईचे दही, दह्याचे ताक च लोणी, लोण्याच तूप, तुपाची बेरी, बेरी चा गणपती गणपतीच्या गळ्यात साखळी गण गण गण������
वाव फारच सुंदर गाणे ! मी पहिल्यानेच ऐकले . खुप सारे धन्यवाद त्याबद्दल !
DeleteAgadi savistar mahiti, navya vyaktila pan Jamel ase Chaan ����
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद 🙏 😇😍
Deleteमातिच्या राजोण मधे मि बेलाचे झाड लावले होते मि पुण्याला आलो तेव्हा फोडला
ReplyDeleteछान आपल्या राजोन्या , फुटून गेल्या सगळ्या ........
Deleteखुपच छान आहे लेख तुला अगदी बारीकसारीक सगळे आठवणीत आहे माझ्या बर्याच गोष्टी विस्मृतीत गेल्या आहेत वाचून सगळे आठवलं. साय सगळ्यानी वाटून खाणयात मजा होती ना
ReplyDeleteसायच नाही , तर सगळ्याच गोष्टी वाटुन खाण्यात मजा होती , पण हे आता समजतेय .......
Deleteखुप छान वर्णन. अगदी बारकाईने आठवुन लिहीले आहे. सायं आणि लोणी खाण्याची मजा काही औरच होती. मी आताही करते लोणी, तुप बेरी. फेरीत गुळ घालून गरम करून खुप छान लागते.
ReplyDeleteबेरीत गुळ घालुन खाण्याची पद्धत नवीनच , कुठून शिकलीस तु ? मी पण करते हे सगळं , पण बेरी तशीच खाते . काहीही न घालता , गरम गरम !
DeleteKay sunder varanan bai sai, tup, dudhache. Mazya aai kade pan same jad sai khanyachi majja yaychi��
ReplyDeleteMothi rajoni v ravi aahe ajun bhaukade adagdit aahe aata pan aamhi pan ghusalyacho khambala jodlelya doryani mast divas hote te
Aata jad say pan nahi v ghatta dudh pan nahi chalat n aawdanare cow che pito��
khup chan lihile aahes tup v tyachi sarv mahiti ����
रवी आणि राजोनी , फारच सुंदर प्रकार अगदी ! मला आता जावेच लागेल मामाकडे , सगळ्या गोष्टी पाहायला आणि छायाचित्रित करून घ्यायला ! छान होते ते आयुष्य सगळ्याच दृष्टीने ! गमावून बसलो आपण .......
DeleteChan , tu pn shitkapat bolalis ������
ReplyDeleteU r lucky 2 have organic milk ��, I never tasted ��
No farm no cows at home
U r lucky����
अंग , या आधी सुद्धा शीतकपाट शब्द बऱ्याच वेळा वापरला आहे मी . तुला फारच गम्मत आलेली दिसते तुला , वाचुन . थोडे वर्ष होती खार मजा घराच्या दुधाची !
Deleteअहाहा अगदी खमंग खुसखुशीत रवाळ सुगंध दरवळीत लेख.. soft साय,after churning created मस्तलोणी,लोण़्याच तुप,मग खमंग brownish बेरी ही सर्व प्रक्रिया अन् आठवणी माला गोकुळात गेल्यासम भासते. Love the doccumentation of instrument and traditional vessels used in processing of butter which is very new to me.
ReplyDeleteखमंग खुसखुशीत रवाळ सुगंध दरवळीत आणि लुसलुशीत धन्यवाद!!
DeleteAha ha gharache tup mhanaje lai bhari���� ani tu jyapramane sangitale aahe te tar bharich❤️������ mast zalay lekh ani photos pan apratim
ReplyDeleteतुझ्या भारी अभिप्रायाबद्दल एकदम भारीच धन्यवाद !!!
DeleteKhup chan. Mazya maheri pn me lahan astana lakdachaya mothya ravine ranjanat say ghuslayche. Ajunhi ahe ti ravi. Kharach khup athvan yete ya sarv goshtinchi.
ReplyDeleteही रवी माझ्या खुप आवडीची ! या सगळ्या गोष्टी कायम आठवण यावी अशाच आहेत ! मी तर म्हणेल कधी विसरूच नये ! खुप सारे धन्यवाद !
ReplyDeleteज्या खांबाला ती रवी लावायची सोय असेल त्याला घुसळ खांब म्हणत त्याचा दुसरा उपयोग वांड मुलांना बांधून ठेवण्यासाठी पण व्हायचा लहानपणी मामी मला रोज सायीचे पातेले पुसून चाटायला द्यायची मी मस्त फतकल मारून मांडीवर घेऊन ते स्वच्छ करायचो पण या गडबडीत रोज चड्डी काळी व्हायची कारण चुलीचे काळे डाग अंगाला पण लागायचे
ReplyDeleteपुढे मोठे झाल्यावर ताई बेरीचे चॉकलेट करून द्यायची रेसिपी तिलाच माहीत पण खूप छान लागायची
वावा छान माहिती सांगितली , घुसळ खांबाची . किती आठवणी आहेत ! ती रेसिपी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल , वाट बघत आहे ! खूप धन्यवाद !😄😇🤩
ReplyDeleteअसे घूसळून ताक करताना पाहताना
ReplyDeleteएक वेगळाच आनंद मिळायचा 👍
👌👌👌छान लेख..
ReplyDeleteछान विषय, मी जळगावला होते तेव्हा आमच्याकडे गवळी दूध द्यायचा, त्याला खूप साय यायची, तूप पण भरपूर व्हायचे, इथे मुंबई पुण्यात पेशव्यांच्या दुधाला साय येत नाही म्हणजे जाड साय येत नाही असो तो लिहिले आहेस की, लोणी निघत नाही, त्याला एक उपाय आहे, साय घुसळताना प्रथम गरम पाणी टाकावे, मग साधे नॉर्मल टाकावे, थंड, लोणी नक्की येते, हा माझा अनुभव आहे, ट्राय कर, मी हे बऱ्याच जणांना घरी जाऊन दाखवले आहे, असो बाकी लेख खूप छान, आमच्या अर्चनाला पण साय खूप आवडते, ते पण साय पोळीवर राहू शकते गावाकडे आली की साय ठेवतच नाही🥰 मस्त साय प्रकरण,
ReplyDeleteफार सुन्दर लेखन, माझंच बालपण वाचतेय असं वाटलं,चित्र डोळ्यासमोर उभारलं सगळं😊
ReplyDeleteआपला लेख खरंच खूप छान....वास्तविक असतात ... शितकपाट वरून आठवलं...आमच्या आजीकड...घरी भिंतीत कपाट असायचे...लई भारी वाटायचं तेव्हा ...आताच्या फ्रीज ची पण सर नाही येणार ...👌👌
ReplyDeleteअगदी बारकाईने लिहिले आहे, किती बारीक निरीक्षण ते!👌👌
ReplyDeleteमला स्वतःला साय भात फार आवडतो. आंबेमोहोर तांदुळाचा गरमागरम भात आणि त्यावर ताज्या दुधाची घट्टसर साय... स्वर्गच!😊