उपवासाची वाळवणं-२
(घरातील गमती जमती)
माझ्यासारखे काही लोक नक्कीच असतील, असे मला वाटते. उपवासाचे पदार्थ खायला आवडतात आणि ते उपवास केल्यावर, हक्काने खायला मिळतात, म्हणुन उपवास करायचे. अर्थातच नंतर नियमित उपवास करायला लागल्यावर, तेच पदार्थ सारखे खावे लागत, त्यामुळे त्याचा खुप कंटाळा पण येतो. पण उपवास करायला सुरुवात केलेली असते, त्यामुळे खावे सुद्धा लागत. नंतर काही काही कारणाने उपवास करणे बंद झाले, परत नव्याने सुरु पण झाले. आता मात्र उपवास करणे पूर्णपणे बंद झाले आहे तब्बेतीच्या कारणाने. मग केव्हातरी आठवण आली, लहर लागली, खावेसे वाटले की करते आवडीने आणि खाते सुद्धा. वाळवणं मात्र फक्त एकदाच केले होते, असो.
तर आजचे पहिले वाळवण आहे साबुदाणा पापड. हे पापड तयार करत असतांना बघायला मला फार आवडते. अजूनही आवडते, पण आता शक्य नसते. तसेच तयार झालेले पापड सुद्धा बघायला खुपच आवडतात मला आणि हे शक्यही असते. वाणसामान घ्यायला गेले की दुकानात वेगवेगळ्या मापाचे आणि रंगाचे साबुदाण्याचे पापड बघायला मिळतात सगळीकडे. बर हे पापड करणे तसे सोप्पे, चुकण्याची किंवा फसण्याची अजिबात शक्यता नसते. मात्र खूप चिकाटी आणि संयमाची आवश्यकता असावी लागते. पापड ज्या दिवशी करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत घालावा, गरजे नुसार. अगदी आपण साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी घालतो तसा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, तो उकरून छान मोकळा मोकळा करून एका थोड्या मोठ्या भांड्यात घालावा. त्यात चवीनुसार मीठ घालून छान सगळीकडे लागेल असे मिसळुन घ्यावे. पापड वेगवेगळ्या रंगाचे हवे असतील तर त्याप्रमाणे त्याचे वेगवेगळे भाग करून, प्रत्येक भागात एक रंग घालुन , छान सगळीकडे सारखा लागेल अशा बेताने मिसळुन घ्यावा. पांढरेच हवे असतील तर हे सगळे करायची काही गरजच नाही. मलातर वाटते वेगवेगळे रंग लावलेला साबुदाणा एकत्र करूनही पापड केले तर छान रंगीबेरंगी पापड तयार होतील, एकाच पापडात सगळेच रंग येतील, असो. आपापल्या आवडी आणि लहरीनुसार खेळावे रंगांबरोबर. माझ्या दृष्टीने रंग म्हणजे रंगीत आनंद!
आमच्याकडे तेव्हा छोट्या छोट्या अल्युमिनियमच्या ताटल्या होत्या. साधारण दोन सव्वा दोन इंच व्यासाच्या आणि पाव इंच खोल . तसेच इडली ढोकळे करण्यासाठी एक खास कूकर होता. तर ह्या ताटल्या आणि हा कुकर वापरला जात असे हे पापड करण्यासाठी. आधीच मीठ लावून ठेवलेला साबुदाणा या ताटल्यांमध्ये एक पदरी म्हणजे साबुदाण्याचा एकच थर येईल असा घालायचा. म्हणजे एका साबुदाण्याचा व्यास जितका , तितकीच पापडाची जाडी. मग या ताटल्या, कूकर मध्ये असलेल्या जाळीवर ठेवायच्या. अर्थातच जाळी ठेवण्या आधी कूकर मध्ये पुरेसे पाणी घालायचे. मग करून बंद करून ते पापड त्यात वाफवुन घ्यायचे. वाफवुन झाले की त्या ताटल्या बाहेर काढून ठेवायच्या. वाफेवर तो साबुदाणा शिजतो आणि फुलतो. त्याच्या चिकट गुणधर्मामुळे प्रत्येक साबुदाणा एकमेकांना चिकटतो आणि त्याचा एकसंध पापड तयार होतो. त्यातील वाफ गेली की एका बाजुने थोडा उचकवायचा आणि ताटलीतुन काढून, वाळत घालायच्या प्लास्टिकच्या कागदावर किंवा धोतरावर चिकटवायचा . मग परत रिकम्या ताटल्यात त्याच पद्धतीने साबुदाणा घालुन, वाफवायचे. नंतर ताटलीतील काढून कागदावर चिकटवायचे. ही सगळी क्रिया साबुदाणा संपेपर्यंत परत परत करायची. सगळे पापड झाले की मग हा पापड चिकटवलेला कागद गच्चीवर उन्हात नेवुन ठेवायचा. खुप पापड असतील तर एक एक कागद भरल्यावर, गच्चीवर उन्हात ठेवून यावा.
संध्याकाळपर्यंत छान कडकडीत वाळतात पापड. मग त्या कागदावरून काढायचे आणि डब्यात भरून ठेवायचे.
हे पापड करायला थोडा उशीर झाला तरी काहीच अडचण येत नाही. कारण पापड घरातच करायचे असतात. फक्त वाळत घालण्यासाठी गच्चीवर जावे लागते. ते सुद्धा फक्त एकदाच, सगळे पापड तयार झाले की. त्यामुळे ऊन कितीही तापले तरी त्याच्या त्रास होण्याची काहीच शक्यता नसते. कृती तर अतिशय सोप्पी आहे, फसण्यासारखे त्यात काहीच नाही. पण तो साबुदाणा त्या छोट्या छोट्या ताटल्यांमध्ये लावण्याचे काम मात्र फार संयमाने आणि चिकाटीने करावे लागते. पण मला फार आवडे ते बघायला, फारच सुंदर दिसतो तो साबुदाणा, अगदी एक एक दाणा रचून ठेवल्यासारखा! वाळल्यावर आणि तळल्यावर पण फारच सुंदर दिसतो हा पापड, पांढरा असला तरी. रंगीत असेल तर बहारच! पण खायला मात्र मला अजिबातच आवडत नाही. एकतर त्याला काही चव अशी नसतेच आणि तळलेले फारच तेलकट वाटतात मला. थोडक्यात यात मला खाण्यासारखे काहीच नसते. पदार्थ खाण्याचा, पण माझ्या फक्त डोळ्यांची चंगळ!
------------------------------ -------------------------
आजचे दुसरे वाळवण म्हणजे साबुदाणा चकली, बहुतेक सगळ्यांच्या आवडीची, अर्थातच माझ्या सुद्धा! तर यासाठी सुद्धा आदल्या रात्रीच साबुदाणा भिजत घालावा लागतो. पण नेहमीसारखा थंड पाण्यात नाही. पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची. त्याची वाफ गेल्यावर मग या पाण्याने साबुदाणा भिजवायचा. साधारण जेव्हढा साबुदाणा तेव्हढेच पाणी घ्यावे. सकाळपर्यंत छान भिजतो आणि फुलतो. शिवाय सकाळी बटाटे सुद्धा उकडून घ्यावे अगदी मऊ होईपर्यंत. साधारण एक किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटे असे प्रमाण घ्यावे.
मग हा उकडलेला बटाटा सोलून छान कुस्करून घ्यायचा. मला अगदी आजतागायत, उकडलेला बटाटा सोलायला आणि नुसताच खायला खूप आवडतो. त्यामुळे अगदी लहानपणापासून, माझ्यासमोर बटाटे उकडले गेले की तो वास माझ्या नाकात न जाता, जिभेवरून थेट पोटात जातो. कधी एकदा कुकरची वाफ जाते आणि कधी एकदा तो बटाटा मला सोलायला आणि खायला मिळतो असे होऊन जाते. तेव्हा आमच्याकडे कुकरची वाफ गेली की बटाटे एका पितळी चाळणीत टाकले जात असतं, जेणेकरून त्यातील पाणी निथळून जाईल आणि वाफही निघून जाऊन बटाटे थोडे लवकर थंड होत. चाळणी स्वयंपाकाच्या ओट्यावरील सिंक जवळ ठेवली जात असे. जोपर्यंत हे बटाटे थोडे गार होऊन सोलायला मिळत नाही, तोपर्यंत मी त्या सिंक जवळच घुटमळत असे. मग आधी बटाटे सोलायचा आनंद आणि मग शक्य तितकी मोठ्ठी बटाट्याची फोड पळवयाची, शक्य असेल तर ती खाऊन झाल्यावर दुसरीही! अजूनही बटाटे उकडले की माझे असेच होते. एक छान शिजलेली मोठ्ठी फोड तोंडात जाते मगच पुढचे काम. आता पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे फार खाता येत नाही, अन्यथा मी एक मोठ्ठा उकडलेला बटाटा नुसताच खाऊ शकते!
तर मऊ कुस्करलेला बटाटा, भिजलेला साबुदाणा, तिखट, मीठ, जिरे पुड हे सगळे जीन्नस चवीप्रमाणे घालुन, चांगले मिसळुन एकजीव करायचे. तिखट म्हणजे मिरची पुड, लाल पेक्षा पिवळ्या मिरचीची घातली तर फारच उत्तम. चकल्या दिसायला तर छान पांढऱ्या होतातच पण छान चविष्ट सुद्धा होतात. हे एकजीव झालेले मिश्रण म्हणजेच चकली तयार करण्यासाठीचे रवण तय्यार! हे असेच खायला फारच छान लागते. मस्त वाटीत घेऊन चमच्याने खायचे किंवा मस्त बोटाने चोकून चोकून खायचे. मग ते तयार रवण, चकली करायचा साचा, वाळत घालायला प्लास्टिकचा कागद किंवा धोतर आणि हाताला लावायला पाणी घेऊन गच्चीवर जायचे. आमच्याकडे दोन साचे होते एक पितळी आणि एक लाकडी. पितळी सगळ्यांच्या आवडीचा, अजूनही आहे तो, तशाच छान अवस्थेत, अगदी जरा सुद्धा खराब झाला नाहीये, इतके वर्ष सतत वापरून सुद्धा. मग एक जण या साच्यात रवण भरून देण्याचे काम करणार आणि दोन जणी साच्याने चकल्या करणार आणि आम्ही मुली तिथेच आजुबाजुला बसुन ते रवण खात असु. सगळ्या चकल्या करून झाल्या की सगळी भांडी घेऊन खाली यायचे. ह्या चकल्या मात्र सकाळी लवकरच करायला पाहिजे कारण वर गच्चीवर जाऊन, उन्हात बसून कराव्या लागतात. उशीर झाला की ऊन मी म्हणालयाला लागते मग.
संध्याकाळपर्यंत छान कडकडीत वाळतात. मग त्या कागदावरून अलगद काढुन काढुन डब्यात भरून ठेवायच्या. छान कडकडीत वाळल्या नाहीत असे वाटले तर त्या सगळ्या चकल्या मोठ्या टोपलीत किंवा घमेलीतच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी ती टोपली किंवा घमेली उन्हात ठेवायची दिवसभर मग अगदी खात्रीने कडकडीत वाळणार. मग खाली आणुन डब्यात भरून ठेवायच्या. उपवासाच्या दिवशी किंवा लहर लागली की काढायच्या आणि तळुन खायच्या. मला या तळलेल्या तर आवडतातच पण कधी तेल नको असेल किंवा तळण्याचा कंटाळा आला किंवा खायची खूप घाई झाली की सरळ काही सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्या की मस्त फुलतात या चकल्या. आणि मग त्यापेक्षाही कमी सेकंदात गट्टम होतात!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती )
२७ जुलै २०२०
ही पण एक पद्धत , बांगडी वापरून
इडली पात्रात करायची पद्धत
पण यात पापड सरळ न होता
थोडे गोलाकार होतात
प्लॅस्टिकच्या कागदावर वाळत घातलेले
प्लॅस्टिकच्या कागदावर वाळत घातलेले
कडकडीत वाळलेले पांढरे स्वच्छ पापड
कडकडीत वाळलेले तिरंगा रंगाचे पापड
वेगवेगळ्या रंगाचे पापड
पांढऱ्या साबुदाण्यात मोजकेच
रंगीत साबुदाण्याचे दाणे घालून
केलेले पापड .
माझ्या मते रंग म्हणजे रंगीत आनंद !
रंगांशी जितके वेगवेगळ्या पद्धतीने
खेळाल तितका जास्त आनंद !
तळलेले पांढरे स्वच्छ पापड
तळलेले रंगीत पापड
इडली पात्रात केलेले पापड असे
गोलाकार होतात
पितळी साचा (सोऱ्या)
लाकडी साचा (सोऱ्या)
लाकडी साचा (सोऱ्या)
स्टीलचा साचा (सोऱ्या)
पितळी साच्याने साबुदाण्याच्या
चकल्या करतांना
वाळत घातलेल्या साबुदाण्याच्या चकल्या
वाळत घातलेल्या साबुदाण्याच्या चकल्या
वाळलेल्या साबुदाणा चकल्या
तळलेल्या खमंग साबुदाणा चकल्या









Khupàch chhan lihila aahe lekh. Agdi detail procedure sahit.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deletechakalya aani sabudanyache papad chhan banvile aahet
ReplyDeleteTasech tayanche Rang khup chan vatatat
खुप आनंद झाला तुम्हाला ईथे बघून सगळ्यात आधी तुमचे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!!
Deleteअणि सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
रंग birangi खुसखुशीत लेख.. Vilas Kinge
ReplyDeleteरंगीबेरंगी सप्रेम धन्यवाद 😍
DeleteChan varnan��
ReplyDeleteKharach lahanpani aapan sabudanachi chakali, wafers,... Khanasathich upwas karaicho ani tech atta nako vattatey
Pics ��
हाहाहा 😁, अगदी बरोबर आहे, त्यासाठीच मी उपास करायला सुरुवात केली 😍😇😉
Deleteआज सर्व लेख वाचले खरं तर वाचायला उशीर झाला खूप छान छान आहे हे वाचताना मी माझ्या भुतकाळात गेलो आणि त्या आठवणी जाग्या झाल्या त्या मी विसरून गेलो होतो खरंच खूप छान आहे सगळं , धन्यवाद ताई
ReplyDeleteउशीर वगैरे नाही काही, वाचन आणि त्यातील आनंद महत्वाचा! तो दिसतोय मला तुझ्या शब्दात..... सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteSabudana papad v ragnbirangi papad pahun yekadam chan vatale chaklya pan zakas
ReplyDeleteKhup chan photos v likhan pan
खरच मला पण रंग खुप आवडतात. ... रांगा सारखं आनंद नाही या जगात! सप्रेम धन्यवाद 😍
DeleteSagale lekh khup surekh
ReplyDeleteSabudana papad khup sundar zalet specially colour ghatlele
😍 खुप खुप सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
Delete