उडीद पापड
(घरातील गमती जमती)
आम्हीं अगदी लहानपणी, सगळ्यात आधी कुठला पदार्थ करायला शिकलो असु, तर तो म्हणजे उडीद पापड! तर आज या उडीद पापडाची अथ पासुन इती पर्यंत सगळी गोष्ट आणि सोबत आमच्या गमती जमती.
अर्थातच हे पापड सगळ्यांच्या अगदी ओळखीचे आहेत आणि बरेच लोक अजुनही घरीच करतात हे पापड. आता या टाळेबंदीमुळे तर अजुनच बऱ्याच लोकांनी केलेत हे पापड घरी, यावर्षी. तर या पापडांसाठी पांढरी उडीद डाळ दळुन घ्यावी लागते. तेव्हा आमच्याकडे साधारण आठ किलो तरी डाळ दळली जात असे. साधारणपणे दिवसाला दोन किलोचे पापड लाटले जात. असे साधारण चार ते पाच दिवस चाले हा कार्यक्रम. सकाळी जरा लवकरच याचे पीठ भिजविले जात असे. ह्या पापडांचे पीठ भिजविणे म्हणजे एकदम सोप्पे, जराही कटकटी नाहीत. हे पीठ भिजवायचे म्हणजे, पीठ, हिंग, मीठ, सोडा आणि मसाला घालुन पाण्याने भिजवायचे, कणिक भिजवतो तशी. पण हे मात्र एकदम कडक भिजवावे लागते. कडक भिजवुन त्याचे चार पाच गोळे करून ठेवायचे सारख्या आकाराचे आणि झाकुन ठेवायचे. विसरून जायचे काही वेळ आणि तेव्हढ्या वेळात बाकीची सगळी काम आटोपून घ्यायची. तोपर्यंत छान मुरतात हे गोळे. मसाला सुद्धा घरचाच, बाहेरचे काही नाही . तर या मसाल्यात मिरे, वेलची, अक्कलकरे आणि बडीशोप एकत्र कुटून याची बारीक पुड करायची आणि ती घालायची. नंतर मग वेगवेगळ्या चवीचे हवे म्हणुन, थोडा वेगवेगळा मसाला घालुन केले जात. जसे कधी हिरवी मिरची, कधी लसुण, कधी लाल मिरची.
आता इथे थोडी गंमत आहे. कधीही कुठल्याही कारणाने अक्कलकरे काढले की आम्ही मुली एकदम खुश! अक्कलकरा म्हणजे देठाला अगदी खुप दाटीवाटीने लावलेले परागकण, रंग मध्यभागी एकदम गडद मरुन आणि बाकी भागावर पिवळ्या रंगाची एक विशिष्ट छटा! फारच सुंदर दिसायला, झाडावर खूप लागलेले असले की तर फारच मोहक दिसतात. तर दोन बोटाच्या चिमटीत शक्य तितके हे परागकण धरायचे आणि त्या देठापासुन वेगळे करायचे आणि जीभेवर ठेवायचे. फार मजेशीर जाणीव होते संपुर्ण तोंडात, एकाच वेळी हवीहवीशी आणि नकोनकोशी! आम्ही या जाणीवेला मुंग्या आल्या असे म्हणत असु. समोर दिसला की लगेच खाऊन बघावासा वाटे. पण एकदा का तोंडात टाकला की ज्या काही मुंग्या येत तोंडाला की विचारात सोय नाही. याचे असे नाही की खाऊन झाले आणि मुंग्या गेल्या, त्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ त्या तशाच असतात तोंडात, पाणी प्या काही खा, कुठल्याही उपायाने जात नाही. काही वेळाने आपोआपच जातात. पण तितका वेळ ते सगळं सहन करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. जाम मज्जा येत असे!
सकाळी भिजवायला पीठ काढले की तेव्हापासुनच त्याचा छान वास अगदी सगळ्या घरात दरवळत रहात असे . पुरुषांची जेवण, धुणं, बाकी कामं आणि आमची जेवणं उरकली की मग या पापड पुराणाला खरी सुरुवात होत असे, साधारण दहाच्या आसपास. आता हे पापड लाटायचे म्हणजे बरीच पुर्व तयारी करावी लागे. पापड सगळ्याजणी लागणार, आई(आजी), तिन्ही मम्मी आणि आम्ही तिघी मुली. त्यानंतर हळुहळु घरातील एक एक छोटी पिल्लं येत गेली, त्यांनाही लाटायचे असतं. त्यामुळे आधी कमीत कमीत सात पोळीपाट आणि सात लाटणे लागतं. उडीद म्हणजे खुप चिकट, त्यामुळे त्याचे पापड लाटुन मोठे करणे म्हणजे कठीण आणि शक्तीचे काम. हे काम थोडे सोयीचे व्हावे म्हणुन, हे पापड लाटण्यासाठी खास लाटणे असतात. हे लाटणे आमच्या कडे होते आणि बऱ्याच संख्येने. नेहमीच्या पोळी लाटण्याचे लाटणे सगळ्या बाजुंनी समतल असते. पण उडीद पापड लाटायच्या लाटण्याला पुर्ण भागावर खाचा आणि उंचवटे असतात. त्यामुळे पापडांवर समांतर रेषा उमटतात. यामुळे पापड लाटुन पुर्ण करायला थोडे सोप्पे आणि सोयीचे होते. शिवाय पोळीपाट, हे नेहमीच्या वापराचे होतेच, पण त्याव्यतिरिक्त काही जास्तीचे पण होते. ते माळ्यावर ठेवलेले असतं. काही लोखंडी, काही लाकडी, एक संगमरवरी सुद्धा होता. तसेच घरात जेवण करायला टेबल असला तरी खाली बसुन जेवायला लाकडी पाट सुद्धा होते, अजुनी आहे ते. पोळीपाट कमी पडला तर एखादा पाट सुद्धा वापरला जात असे पोळीपाट म्हणुन. शिवाय शेजारी पाजारी कुणाकडे जास्तीचा असला तर एखादा पोळीपाट तर तो सुद्धा आणला जात असे. काही पोळीपाट समतल नव्हते, एक मध्यभागी उंच तर एक मध्यभागी खोल, अशा काय काय तऱ्हेचे. मध्यभागी खोल असेल तर पापड मध्यभागी जाड राहतो, मध्यभागी उंच असेल तर पापड मध्यभागी खुप बारीक होतो आणि फाटण्याची शक्यता असते. पण पट्टीच्या लाटणाऱ्याला नक्की अडचण माहिती असली तर, त्यांचा पापड मात्र छानच होतो, सगळीकडे सारख्या जाडीचा! याची उदाहरणं आम्ही अगदी लहानपणापासुन बघत आलोय, त्या म्हणजे आमच्या मम्म्या!
हे पापड लाटतांना, पोळीपाट आणि लाटण्याला चिकटु नये म्हणुन, पापडाला अधुन मधुन पीठ लावावे लागते. मग या पीठासाठी साधारण दोघीत एक याप्रमाणे, तीन-चार वाडगे लागत. तसेच भिजवलेला प्रत्येक गोळा सगळ्यात आधी पाट्यावर ठेवुन लोखंडी बत्त्याने कुटून घ्यावा लागतो. म्हणून बाहेर ठेवलेल्या दोन पाट्यांपैकी एक छोटा पाटा हॉल मध्ये आणुन ठेवला जात असे. त्यासोबत स्वयंपाकघरातील लोखंडी बत्ता (ज्याला आम्ही मुसयली म्हणत असु) सुद्धा हॉल मध्ये आणुन ठेवावा लागे. गोळा कुटण्यापासुन ते त्याच्या लाट्या पाडेपर्यंत, ते हाताला चिकटु नये म्हणुन तेल लावावे लागे. मग तेलाचे भांडे सुद्धा स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये आणावे लागे. तयार झालेले पापड वाळत घालण्यापुर्वी ठेवण्यासाठी सुपं लागतं, मोठ्या आणि छोट्या आकाराची होती घरात. पापड वाळत घालायला खाट आणि जमिनीवर अंथरायला धोतर किवा पातळ, गॅलरीत किंवा घरात अंथरुन ठेवावे लागे.
ही सगळी तयारी झाली की मग सगळ्यात आधी भिजवुन ठेवलेला एक गोळा पाट्यावर तेल लावुन, बत्त्याच्या साहाय्याने कुटायला घेतला जाई. पाट्याला आणि बत्त्याला सुद्धा भरपुर तेल लावावे लागे, चिकटू नये म्हणुन . तो गोळा सगळ्या बाजुने चांगला कुटून कुटून मऊ केला जात असे. हे काम खुप काळजीपुर्वक करावे लागे . कारण हा गोळा कुटतांना सारखा उलटा पालटा करावा लागतो. हे करत असतांना एखादे बोट किंवा हातही अतिशय वाईट पद्धतीने कुटले जाऊ शकतो. त्यामुळे हे काम करण्याची लहानपणी अजिबात मुभा नव्हती. पण मोठेपणी, याचा चांगलाच अनुभव आहे मला स्वतःला.
हा गोळा कुटून कुटून चांगला मऊ झाला की, याच्या लांबच्या लांब दोन तीन दोर बनवले जात साधारण तीन ते चार सेंटीमीटर व्यास आणि एक ते दीड फुट लांबीचे. आम्ही याला साप म्हणत असु. त्यानंतर एका जाड दोऱ्याला तेल लावुन याचे एक टोक पुढच्या दातात आणि एक टोक उजव्या हातात धरले जात असे. तो गोळ्या पासुन बनवलेला दोर डाव्या हातात धरुन, लाट्या पाडल्या जात, उजव्या हातात धरलेल्या दोऱ्याने साधारण एक ते दीड सेंटीमीटर जाडीच्या. मला फार आवडते ही लाट्या पडायची पद्धत, अगदी लहानपणापासूनच. आणि तेव्हा लहान असल्याने हे काम करु दिले जात नसे. मात्र मी तेव्हाच माझ्या मनाशी पक्की खुण गाठ बांधली होती, मी मोठी झाल्यावर जेव्हा पापड करीन तेव्हा, हे लाट्या पडायचे काम मीच करेन, दुसऱ्या कुणालाही करु देणार नाही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मी आजतागायत एकदाही हे पापड केले नाही. त्यामुळे मला अजुनही हे काम करण्याची एकही संधी मिळालेली नाही.
मग या प्रत्येक लाटीला सगळ्या बाजुंनी तेल लावुन एका वाडग्यात टाकल्या जातं. मग सगळ्यांची एकच धांदल उडे विशेषः आम्हा मुलींची. फारच घाई असे आम्हा मुलींना पापड लाटण्याची, अगदी कधी एकदा लाटी मिळते आणि कधी एकदा पापड लाटतो असे होऊन जाई. अर्थातच लाटी खायची सुद्धा घाई असेच! इतक्या सगळ्याजणी पापड लाटणार, मग या लाट्या सुद्धा दोन तीन वाडग्यात किंवा ताटलीत ठेवाव्या लागत म्हणजे प्रत्येकीचा हात सहज पणे पुरत असे, लाटी घ्यायला. पण या लाट्या सुद्धा झाकुन ठेवाव्या लागतात, नाही तर या कडक होऊन जातात. या कडक झालेल्या लाट्यांचे पापड लाटणे अवघड होऊन जाते मग . आता या लाट्यांची पण थोडी गम्मत असे. या लाट्या पडतांना, पहिली आणि शेवटची लाटी आकाराला छान नसायची बाकी लाट्यांसारखी. त्यामुळे ती आम्हाला अजिबात आवडत नसे, पापड लाटण्यासाठी. काही वेळेला मोठ्ठी मंडळी ती लाटी घेऊन, त्याचा छान पापड लाटुन टाकत तर कधी आम्ही मुली गट्टम करुन टाकत असु.
अगदी लहान होतो तेव्हा आम्ही जेमतेम 'लाट्या फोडत' असू, मग मोठ्या मंडळींपैकी कुणीतरी ही फोडलेली लाटी घेऊन त्याचा मोठ्ठा, पुर्ण पापड लाटत असे. लाटी अगदी थोडीशी लाटुन, थोडी मोठी करणे म्हणजे 'लाटी फोडणे'. पण लाटी फोडण्याचे काम पटकन होत असे आणि बऱ्याच फोडलेल्या लाट्या जमा होतं. जास्त वेळ त्या तशाच राहिल्या तर कडक होऊन जात आणि त्याचा मोठा पापड करणे फार कठीण जात असे. मग आम्हाला सांगितले जाई, जरा हळुहळु करा. लाटी फोडली की ती आकाराला साधारण गोलच असते. त्याचे वेडेवाकडे नकाशे होण्याची शक्यता फारच कमी असते. आता तुम्ही पट्टीचे कलाकार असाल तर मात्र वेगवेगळ्या देशाचे नकाशे तयार होऊ शकतात, इतक्या लहान आकारातही!
हळुहळु थोडं मोठं झाल्यावर आम्ही 'चाक्या' करायला शिकलो. चाकी म्हणजे साधारण लाटी फोडण्यापासून ते अर्ध्या आकाराच्या मापाच्या पापडा पर्यंत कुठल्याही मापाचा पापड. लाटी फोडल्यावर त्याची चाकी करतांना त्याच्या आकाराकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. अर्थातच आधी छोट्या आकाराच्या चाक्या करत असु आम्ही . याचे सुद्धा सुरवातीला आमचे वेगवेगळ्या, अगदी अस्तित्वात नसलेल्या देशांचे नकाशे तयार होत. कधी कधी आमच्या पापडाला अशी नकाशाची उपमा दिली कुणी की आम्ही काही वेळा हसत असू स्वतःच्या पापडावर, कधीकधी मात्र जाम चीडचीड होत असे, कधी कधी अगदी रडकुंडीला पण येत असु. मग आमची तरबेज मोठी मंडळी त्याचे सुद्धा छान गोल गरगरीत पापड करुन दाखवीत आणि म्हणत हे बघ तुझा पापड किती छान झाला, की आम्ही पण लगेच खुश. लगेच पुन्हा नव्या जोमाने, एका नवीन देशाचा शोध लावुन त्याचा नकाशा तयार करण्याच्या कामाला लागत असु!
कालांतराने मोठ्या गोल गरगरीत चाक्या करायलाही शिकलो. सुरवातीला मोठी चाकी करताना पापड अगदी हमखास मध्ये 'मारला जात' असे. मग आम्ही कारण देत असु, हा पोळीपाट मध्ये उंच आहे, मला दुसरा चांगला पोळीपाट हवा. तर कधी हे लाटणं नीट नाही. पापड मारला जाणे म्हणजे लाटतांना तो मध्यभागी खुप बारीक होऊन जाणे आणि त्याचे काठ खुप जाड. एकदा नीट समजले की पापड छान लाटुन गोल गरगरीत करायचा की मग काही कठीण नसते. छान पुरेसे पीठ लावायचे आणि गोलगोल फिरवत लाटत राहायचे आणि काठांवर थोडा जास्त जोर द्यायचा आणि मध्ये थोडा कमी, की पापड हमखास सगळीकडे सारख्या जाडीचा आणि गोल गरगरीतच होणार! अगदी शंभर टक्के खात्री! फक्त थोड्या सरावाची गरज असते. नंतर तर अगदी पूर्ण मोठ्ठा पापड सुद्धा करायला शिकलो लवकरच.
आता हे पापड लाटण्याचे काम सकाळी साधारण दहा वाजेच्या आसपास सुरु होत असे, ते जवळ जवळ संध्याकाळी पाच साडे पाच पर्यंत चाले. इतकावेळ एकाच ठिकाणी बसायचे म्हणजे फार कठीण काम. मग आमचे एक एक चाळे चालु होत. कधी जमिनीवर बस, तर कधी पाटावर बस. मध्येच डावा पाय पसरून बस, तर कधी उजवा असे एक ना अनेक चाळे . कधी गालाला खाजावे कधी कपाळाला, तर कधी डोक्यात. हातात पीठ लागलेले असेच कायम आणि तशाच हातानी हे सगळे चाले. या सगळ्या चाळ्यांनी आम्ही संध्याकाळ पर्यंत अगदी पांढऱ्या भुतासारख्या दिसायला लागत असु. संध्याकाळी अंघोळ करण्याशिवाय पर्यायच नाही . तसेही उन्हाळ्यात आम्ही संध्याकाळी अंघोळ करताच असु दररोज, तेही थंड पाण्याने. पापड करण्याच्या दिवशी मात्र जरा जास्तच चोळुन चोळुन अंघोळ करावी लागे, कारण हे उडीदाचे पीठ फारच चिकट.
बर दिवसभर एका जागी बसून कंटाळा पण येत असे, परिणामी चीडचीड. त्यातल्या त्यात माझी जास्त , कारण माझे म्हणजे कायम धावपळ, उड्या मारणे, बागडणे चाललेले असे. यावर पण आमच्याकडे छान तोडगा शोधुन काढला होता, आमच्या मोठ्या मंडळींनी. त्यांचे लक्ष असे आमच्यावर, जीची जास्त चीडचीड झालेली असे, जी कोणी जास्त कंटाळलेली असे, तिला म्हणत, आम्हा सगळ्यांना की नाही खुप तहान लागलीय. तुझ्या हातचं पाणी खुपच गोड लागते त्यामुळे आम्हाला आज तुझ्याच हातचं पाणी हवंय, मठातून थंडगार पाणी तांब्या पेला भरून आण आणि दे बरं आम्हा सगळ्यांना. खरोखरच इतका वेळ बसुन सगळ्यांना तहान लागलेलीच असे. इतके सगळे कौतुक ऐकल्यावर कोण उठणार नाही पाणी आणायला? शिवाय इतका वेळ बसुन खरंच कंटाळा आलेला असेच, पण सगळ्यांसमोर कशी हार मानायची? मग सगळ्यांना मस्तपैकी माठातले छान थंडगार पाणी मिळत असे. सगळे पाणी पिऊन मस्त ताजे तवाने होत. पण प्रत्येकाला पाणी देतांना खुप काळजी घावी लागे. चुकून पिठात, लाट्यांमध्ये, लाटुन ठेवलेल्या पापडांवर, कुणाच्या पोळीपाट किंवा लाटण्यावर पाणी पडता कामा नये. पाणी देणारीचे छान पाय मोकळे होत, हालचाल केल्याने, वरुन पाणी गोड लागल्याची पावती सुद्धा! मग परत नव्याने जोमाने पापड लाटायला सुरुवात होत असे सगळ्यांची. पण थोडे मोठे झाल्यावर मात्र हा उपाय चालत नसे, कारण तोपर्यंत नीट लक्षात आलेले होते, पाणी गोड वगैरे काही नसते. मग आम्ही मुली हे काम एकमेकींवर ढकलत असु. आता तु आण, नंतर मी आणेन किंवा काल मीच दिले होते, आज तू दे, वगैरे वगैरे.
अजुन एक उपाय होता, तो म्हणजे लाटलेले बरेच पापड सुपात जमा झालेले असतं. ते वाळत घालणे आवश्यक असे. मग असेच काही तरी गोड बोलून, हे काम पण करुन घेतले जात असे. काम चे काम होत असे आणि ते करणारीचे पाय मोकळे होते आणि चीडचीड कमी होऊन, ताजे वाटतं असे. बरं, हे पापड वाळत घालणे फारच सोप्पे, काही गडबड व्हायची शक्यताच नाही. ह्यापैकी कुठलाच उपाय चालला नाही तर मग मम्मी सरळ सांगे, जा बरं, गॅलरीतून दोन तीन चक्कर मारुन ये, थोड्या उड्या मारून ये. आणि खरंच एव्हढे केले तरी एकदम मोकळे आणि ताजे तवाने वाटे. सगळी चीडचीड, कंटाळा कुठल्या कुठे पळुन जात असे. परत नव्या जोमाने पापड लाटायला सुरुवात!
या कंटाळ्यावर अजुन चवीष्ट उपाय. या उपायाने जीभेची आणि पोटाची चंगळ होत असे. तो म्हणजे मध्येच बसल्याजागी थोडा वेळ कामातुन सुट्टी घ्यायची आणि पापडाच्या लाटीला छान तेल लावायचे आणि खायचे. थोडी भुक पण भागयाची आणि त्या छोट्याश्या सुट्टीने सुद्धा ताजेतवाने वाटायचे . दुसरा अजुन एक चमचमीत उपाय होता, माझ्या आठवींत आमच्या मम्मी नंबर तीन ने सुचवलेला . तीन चार लाट्या एकावर एक लाटायच्या आणि एक जाडसर पापड लाटायचा तेल लावून. मग त्यावर छान बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर , कोरडी चटणी, हवा असेल तर लोणच्याचा खार घालायचा. मग त्या पापडाची सुरळी करायची आणि त्याचे काप करायचे, बाकर वडी किंवा सुरळी वडी साठी करतो तसे. आणि गट्टम करायचे, आहाहा..! तोंडाला पाणी ...
आमच्याकडे पापड म्हणजे आकाराला एकदम मोठ्ठे पण एकदम बारीक. इतके की तुकडा तोडायला दातांची सुद्धा गरज लागत नसे. हा पापड जर वर्तमानपत्रावर ठेवला तर खालचे अक्षर नी अक्षर अगदी नीट वाचता येत असे. त्यामुळे सहसा कुणाला मदतीला बोलावले जात नसे. एका गोळ्याचे पापड लाटुन व्हायच्या आतच दुसरा गोळा कुटायला घेतला जात असे. असे करत करत एका दिवसाला चार पाच गोळे संपत. बरं एक दिवस लाटले की झाले असे होत नसे. पहिल्या दिवशी सगळ्यांचाच उत्साह भरपुर , त्यामुळे पहिल्या दिवशी थोडे जास्तच पीठ भिजविले जात असे. लाटुनही भराभर होऊन जात पहिल्या दिवशी.
खरी मज्जा यायची, ती दुसऱ्या दिवशी! पहिल्या दिवशी पापड लाटुन लाटुन हात चांगलेच दुखायला लागलेले असतं. पण हे सगळे समजत असे, दुसऱ्या दिवशी, पहिला पापड लाटायला घेतल्यावर. लाटी घेतली पोळीपाटावर आणि लाटणे घेऊन लाटायला सुरुवात केली, की तळवे जे काय दुखत की विचारता सोय नाही. अगदी पापड लाटणे अशक्यच वाटे, नकोच वाटे. मग सुरुवातीला अगदी हळुहळु किंवा आरडा ओरडा करत लाटायचे. हळुहळु तीन चार पापड लाटुन झाले की मग हाताला सवय होऊन जात असे आणि पुढचे पापड सहजतेने लाटले जात. मग तिसऱ्या चौथ्या, पाचव्या दिवशी सुद्धा सुरुवातीला तसेच होत असे. कधी कधी रात्री तळवे खुपच दुखले तर मम्मी तळ हाताला तेल लावुन देत असे. एक एक दिवस जात असे तसा सगळ्यांचाच थकवा वाढत जात असे. त्यामुळे पापड लाटण्याचा वेग बराच मंदावत असे. वाळवायचे घरातच किंवा गॅलरीत, त्यामुळे जीने चढणे, उतरणे करावे लागत नसतं. रोजच्या रोज पापड वाळले की हे, अल्युमिनिअमच्या मोठाल्या डब्यात भरुन ठेवले जात आणि सगळे डबे माळ्यावर जागच्या जागी ठेवले जात. फक्त पापड भाजण्याच्या दिवशी यातील एक एक डबा खाली उतरवला जात असे, कच्चे पापड काढण्यासाठी.
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
२४ जुन २०२०
पीठाचे भिजवुन ठेवलेले गोळे
कुटलेला गोळ्याचा केलेला
लांब दोर आमच्या शब्दात
साप
अशा दोऱ्याला तेल लावुन
त्याच्या लाट्या पडतात
लाट्या पडतांना
लाट्या , पापड लाटतांना लावावे
लागणारे पीठ , तेल
लाटायला तय्यार असलेल्या लाट्या
छोटी चाकी
पुर्ण लाटलेला पापड
एकदम पातळ
३-४ लाट्या लाटुन जाडसर पापड लाटुन
त्यावर कांदा , कोथिंबीर आणि कोरडी
चटणी घालुन त्याची सुरळी करायची
लाट्यांच्या केलेल्या
सुरळी वड्या
उडीद पापड लाटण्यासाठीचे
खास लाटणे
लोखंडी पोळीपाट
आम्ही यांना पत्र्याचे पाळीपाट
म्हणत असु .
तेव्हा रोजच्या पोळ्या , भाकरी
धपाटे वगैरे यावरच केले जात असे
यांचे वय पन्नास पेक्षा जास्त
लाकडी पोळीपाट
अल्युमिनियम चा पोळीपाट
ग्रॅनाइट चा पोळीपाट
स्टील चा पोळीपाट
संगमरवरी पोळीपाट
हा आम्हा बहिणींचा एकदम
आवडता पोळीपाट होता
या साठी आमची कायम भांडणं
होत असतं
हाच तो आमचा लाकडी पाट
बसायचा , खूप जुना झालाय
जवळ जवळ पन्नास वर्ष ,
त्यामुळे रंग लावलेला आहे
पुर्वी याला रंग नव्हता
असे बरेच पाट होते
सुपं
मोठे आणि लहान सुपं
केशव उवाचं....
ReplyDeleteउडदाच्या पापड लाट्या.. पापड खायचे... खाल्लेले आठवतात....,��
त्या मागे एवढा खटाटोप असतो....व तो लिखाणाचा विषय होऊ शकतो ...हे कौतुकास्पद...
नेहमी प्रमाणे ..खुप छान ...पापडाचे असल्याने चटपटीत वर्णन....
खुद्द केशवाची उपस्थिती अणि वाखाणणी... यातच सगळे आले, अगदी भरून पावले. 😇😇😇
DeleteArey waa...agadi kharay gg..majjach asaychi to urad papad latwychi..latya khaychi..pn tyawar sudhha kuni lekh lihel ase watlech Nahi kadhi..khup chhan varshali
ReplyDeleteखुप सारे प्रेम अणि खुप सारे धन्यवाद 😍 😇
DeleteWawa nusta udid papad ya vishaivar etake vistrut varnan👌👍
ReplyDeleteTi akalkarachi chav tondavar taralali
Khoopach chan varnan latta padaichi padhat...
Sarvach pic 👌👌👌
😍😇 मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊 😍
DeleteWa wa khup chan varnan. Tondala pani sutàle aattach khayla milayala pahijee ase vatun gele.
ReplyDeleteहाहाहा 😁
Deleteलगेचच भिजवुन टाक थोडे पीठ अणि खा लाट्या 😀😍
चटपटीत वर्णन... Vilas Kinge
ReplyDeleteखुप धन्यवाद अणि प्रेम!! 😍
Deleteपापड बनविण्याची क्रिया खूपच सुंदर वर्णन केलेलीआहे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteवा मस्त! अक्कलकरे काय असते? लाटी फोडणे व चाकी पापड मारला जाणे नवे शब्द कळले मला तर उडदाचे डांगर म्हणजे भिजवलेले पीठ खूपच आवडते मस्त लागते टाळूला चिकटते पण आवडते कच्चे खूप खाऊन चालत नाही पोह्याच्या डांगर सारखे
ReplyDeleteआजकाल सर्व जण विकतच घेतात पापड व पुण्यात लाट्या देखील मिळतात विकत
अक्कलकरे चा फोटो मुद्दाम टाकला नाहिये ईथे, एका खास लेखात बघायला मिळतील... पण त्या बद्दल लिहिण्याचा मोह मात्र मी टाळू शकले नाही 😝
Deleteहो मी पुण्यात प्रथम आले अणि मला कळले पुण्यात बारा महिने लाट्या मिळवतात, फारच गम्मत अणि आश्चर्य वाटले तेव्हा. पाहिल्या सुद्धा होत्या पाटणकर खाऊवाले यांच्या कडे, आता आहे की नाही हे दुकान माहीत नाही.
पण हे असे पदार्थ वर्षभर सगळीकडे मिळायला लागल्या मुळे त्यातील सगळे गम्मत निघुन गेलीय....
हे डांगर प्रकार मात्र आम्हाला फारच नवीन आहे, अलीकडे काही वर्षापासून माहीत झालाय, पण कधीच खावून पहिला नाहीये
खरंय ते टाळू ला चिकटते लहानपणी गम्मत वाटे याची पण आता मात्र नको वाटते ☺️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Udid papad che lekhan v tyachi purn varnan khup sunder latyanchi bakarvadi khup aawdli mahit navhati mala aashu pan khup aawdatat latya aata parlyala milatat tya aanun khat aste aali ki
ReplyDeleteAata mi nahi karat vikatch aanto pan gharchya papdachi chavch nyari photos pan mast
लाट्या घेवून ये अणि करून बघ ही वडी! 😊
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇
Varshali , udid papad vachal. Chan aahe saral, soppi bhasha.
ReplyDeleteJas kahi aapan gappa marat basloy ani tu lahanpanichya gappa, tappa sangtes.
सगळ्यात आधी तुमचे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात काकु!
Deleteअणि खूप खूप सप्रेम धन्यवाद 🙏 😊 😍
अरे वाह, छान. तुमच्या घरातल्या असंख्य खाद्य उद्योगातला अजून एक उद्योग. उडीदाचे पापड हा विषय, आणी त्या अनुषंगाने तु केलेले रसभरित विवेचन, त्यामुळे हे पापड पुराण फारच चविष्ट झालं आहे. तुमच्या घरी एवढ्या मोठ्ठया प्रमाणावर पदार्थ बनायचे, त्याला केवढी मेहेनत आणि तयारी लागत असणार, पण तुम्ही अगदी लहान थोर त्यात हिरीरीने भाग घ्यायचे, त्यामुळे कुठलीही मोठी task पण तुम्ही हसत खेळत पार पाडत होतात. मला लहानपणी माझी आई ते पापड करताना आठवते. आमच्याकडे जॉइन्ट फॅमिली नसल्यामुळे तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी पापड लाटायला यायच्या आणि तू वर्णन केल्याप्रमाणे आम्हा मुलांना ते दिवस अगदी उत्सव एन्जॉय केल्यासारखे वाटायचे. आई दोराने लाट्या पडायची ते पण आठवलं आणि त्या लाट्या खाल्लेल्या पण आठवल्या(😄😄😄) अक्कलकरे ही गम्मत ह्या लेखामुळे कळली. मला लहानपणी खाल्ल्याची आठवत नाही. पापड बनवण्यामागे इतकी कठोर मेहेनत आणि प्लॅनिंग करावी लागते याची पापड खाताना बिलकुल कल्पना येत नाही (😆😆). पण हे सगळं करताना तुमच्या कुटुंबियांना जी सहजता वाटत होती ते खरच कौतुकास्पद आहे. या तुझ्या लेखन प्रपंचामुळे हा जगन्नाथाच्या रथ तुम्ही सगळे कसे लीलया ढकलत होता ते कळलं. एकदम कुरकुरीत लेख....... 👍👍👍👍
ReplyDeleteहो पूर्वी पद्धतच होती, शेजारी एकमेकांना पापड करायला मदत करत. खेडोपाडी तर अजूनही जातात मदतीला. लाट्या सगळ्यांच्याच आवडीच्या! खरय तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठलेही काम हे काम वाटतच नसे, ईतका उत्साह असे घरात मोठ्या लोकांचा. मेहनत फार महत्वाची त्याबरोबरच त्या कामाची आखणी सुद्धा!
ReplyDeleteखुप सारे धन्यवाद अगदी मनःपूर्वक 😍😇🙏
लेख अगदी कुर्रम कुरम झालाय. 1mmthick पेक्षा पातळ पापड बनवताना लागणारी मेहनत यास hats off. Thanks for sharing candid Moments.
ReplyDeleteतुझेही मनःपूर्वक धन्यवाद अशा छान छान अभिप्राय साठी ☺️😍
Deleteछान पापड लाटन्याची मजा घरीच पण आता बायका मशिनवर पापड करतात मला खुप आवडते घरी करायला बरीच माहिती आहे गछान लीहील
ReplyDeleteखरच पूर्वी प्रत्येक काम म्हणजे घरातील एक सोहळाच असे लहान थोर सगळ्यांसाठीच !!
ReplyDeleteकाम चे काम होत असे आणि धमाल ची धमाल !
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😍🎉
खूपच सुंदर लेख आहे. तो ही उडीत पापड वर, ब्रिलियंट आयडिया ����
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 स्नेहल!! ❤
Delete����
ReplyDeleteअक्कलकरा .....खूप जून्या काळात घेऊन गेला. आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही. मला पण नीट आठवत नाही पण ३ री चौथीत ४-५ वेळा खाल्ला होता! कसलं फुल असतं ते?
लाट्या हा शब्द पण गेल्या २५ -३० वर्षांनी वाचला.
लहानपणी लाट्या खाणे आणि आजीचे धपाटे खाणे हा ऊन्हाळ्यातला एक प्रोग्रामच होता����लाट्या का खाऊ द्यायचे नाहीत हे अजूनही न ऊलगडलेले कोडे��
😁😁😁अशी बरीच कोडी आहेत न सुटलेली मोठ्ठी यादीच तयार होईल, केली तर...
Deleteकधी करायची बोला...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान आठवणी आहेत या. अक्कलकर आज बरेच वर्षानंतर आठवला
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteखुप छान वर्णन पापडाचे👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteहे मात्र खर की दुसर्या दिवशी हात दुखायचे पन पापड लाटायला ही majja यायची तेवढीच. गप्पा गोष्टी करत कधी पापड लाटून व्हायचे कळायचे नाही. खूप छान lihilay
ReplyDeleteहो ना वाईट दुखायचे हात, काय करावे कळेना अगदी, सोडून पण देता येत नव्हते सगळे अणि केल्याशिवाय चैन पण पडत नसे
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏