Skip to main content

चीकन मधील आंबा (घरातील गमती जमती)

चीकन मधील आंबा 
(घरातील गमती जमती)


                              लेखाचे नाव वाचून चमकलात ना? आता हा कुठला नवीन पदार्थ? नेमका चीकन पासून बनवलेला? की आंब्यापासून? की दोघंही वापरून? सांगते, सगळं सांगते या बद्दल. मला अगदी खात्री आहे, सगळे समजल्यावर तुम्ही सगळे सुद्धा प्रेमात पडाल, आमच्या सारखे, या चीकन मधील आंब्याच्या! खरतर मी सुद्धा अशीच चमकले होते काही वर्षांपूर्वी. माझ्या थोरल्या बहिणीचा संदेश आला होता मला. त्यात तिने लिहिले होते, चीकन मधील आंबा आठवतो का? मी आजच खाल्ला! कित्ती डोकेफोड केली, खूप आठवायचा प्रयत्न केला, ती नक्की काय सांगते आहे यावर. पण काही केल्या काही आठवेना आणि काहीच कळेना. शेवटी तिला फोन केला आणि तिलाच विचारले काय संदेश आहे हा? याचा नेमका अर्थ काय? मग तिने जे काही उत्तर दिले ते ऐकून, त्याक्षणी मी भूतकाळातील स्वर्गीय दिवसांमध्ये पोहोचले. ते दिवस, तो आनंद आठवला आणि आता ते दिवस नाहीत म्हणून खूप वाईटही वाटले... 
                            आता तुमची उत्सुकता फार ताणून ठेवत नाही. चीकन मधील आंबा हा कुठलाही पदार्थ नाही  आणि आपण जे चीकन खातो त्याच्याशी तर या शब्दांचा दूर दूर पर्यंत कुठेही काहीही संबंध नाही. तर ही गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या राजाची, म्हणजे आंब्याची! हल्ली कुणाकुणाच्या काय काय फर्माईश येत असतात, या विषयावर लिही, त्या विषयावर आम्हाला वाचायला आवडेल. तर अशीच माझ्या एका खास मैत्रिणीची फर्माईश आहे ही! ती म्हणाली चटकदार कैरी लोणचं सोहळा झाला, आता आंब्यांचे काय? मग विचार केला चला हीची फर्माईश आहे आणि आंब्यांचा मौसम सुद्धा आहे! मग लगेच या विषयावर घेतले लिहायला, आमचे आंबे पुराण. तर चीकन मधील आंबा. आता गम्मत अशी आहे आमच्या एका शेताचे नाव चीकन आहे. या शेतात दोन गावराणी आंब्यांची झाड आहेत. आमची राजा-राणीची जोडीचं म्हणा ना! मग आम्ही या शेतातील कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करायचा असला की, चीकन मधील अमकी गोष्ट, चिकन मधील टमकी गोष्ट असा उल्लेख करतो. त्यात अगदी काही विचित्र किंवा वेगळे वाटत नाही आम्हाला . पण मधल्या काळात माझा या सगळ्या गोष्टींशी संबंध नसल्या कारणाने मीच हे सगळ विसरून गेले होते. आता या शेताला असे नाव का पडले?, मला अजिबातच माहिती नाही. पण माझ्यापरीने मी काढलेला याचा अर्थ असा-कदाचित या शेतातील माती अगदी चिकण असावी, म्हणून चीकन असे नाव पडले असावे. गावराण भाषेत नेहमी 'ण' चा 'न' होता. जसे चिकण चे चिकन, गावराण चे गावरान वगैरे वगैरे. 
                             तर ह्या आमच्या राजा-राणीच्या जोडीत एक एकदम गोड, मधुर आंबा आणि दुसरी आंबट लोणच्याची कैरी! ही आंबट कैरी फक्त लोणच्याच्या कामाची. म्हणून मी त्यांचा उल्लेख राजा-राणी असा केला. आज या आमच्या राजाची, आंब्याची गोष्ट. आता हे शेत जरा रस्त्याच्या बाजूलाच आहे. त्यामुळे बराच आंबा चोरीला जातोच. तसेही कैऱ्या आणि चोरी असे समीकरणच आहे! थोडा पिकायला लागला की मग हा आंबा 'उतरवून' घेतला जात असे. आंबा कधीच तोडून घेतला जात आणि तो 'उतरवूनच' घेतला जातो. थोडक्यात आमच्याकडे आंबा झाडावरून तोडून घेण्याला 'आंबा उतरवणे' म्हणतात. 
                           मग हा उतरवून घेतलेला आंबा घरी आणला जात असे आणि सोबत खूपसे वाळलेले गवत. घरात इतकी सगळी माणसं, त्यामुळे एकही खोली रिकामी नव्हती. पण तेव्हा घरात बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी मोठाले घडीचे लोखंडी पलंग असत. मग या सगळ्या आंब्यांची, या पलंगाखालीच अढी लागत असे. तर अढी लावणे म्हणजे नैसर्गिकपणे आंबे पिकवायची पद्धत. अढी कशी लावायची? तर जमीनीवर वाळलेल्या गवताचा एक थर लावायचा. त्यावर एक एक आंबा नीट रचून ठेवायचा, शक्यतो जास्त कच्च्या कैऱ्या मागच्या बाजूला ठेवायच्या आणि थोड्या पिकलेल्या कैऱ्या पुढे ठेवायच्या. असे केल्याने तयार झालेला आंबा काढणे सोयीचे होते . मग त्यावर परत एक थर वाळलेल्या गवताचा ठेवायचा. पुरेशी जागा नसेल तर परत यावर एक थर कैऱ्यांचा ठेवायचा आणि परत वरून एक थर वाळलेल्या गवताचा. या सगळ्या रचनेला 'अढी लावणे' म्हणतात. ही अढी लावली की आंबे छान पिकतात आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने. 
                            यानंतर मात्र अगदी दररोज हे आंबे 'चाळावे' लागतात. तर 'आंबे  चाळणे' म्हणजे काय तर ही अढी उघडून बघायची आणि त्यातील एक अन एक आंबा बघायचा. पिकलेले आंबे काढून घ्यायचे खाण्यासाठी आणि सडलेले आंबे असतील तर तेही काढून घ्यायचे. सडलेले आंबे काढले नाही, तर बाकीचेही आंबे सडायला सुरवात होते. चांगले आंब्यांचा काही प्रश्नच नसतो पण हे सडलेले आंबे नीट बघावे लागत. थोडा सडलेला भाग काढून बाकी वापरता येण्यासारखा असेल, तर तो वापरून घेतला जात असे, सडका भाग काढून टाकून. काहीही वाया घालावयाचे नाही हा त्याकाळातील मंत्रच होता जणू. आता तसे होत नाही, किती तरी गोष्टी वाया घालवल्या जातात, फेकल्या जातात. घरात एक पाण्याची बादली कायमची पाण्याने भरलेली असे आणि त्यात भिजण्यासाठी आंबे टाकलेले. आंबे असो किंवा कैऱ्या त्या कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यात भिजवून मगच वापरावे, म्हणजे ते बाधत नाही. मी अजूनही असेच करते. पण लेकीची कटकट असते, आई तुझे काहीही असते. पण अगदी परवाच तिने कैरी पाण्यात न भिज़वता खाल्ली आणि आली थोड्यावेळाने सांगत, तोंडात ओढले गेल्यासारखे वाटतेय. कैरीच्या नाक्याशी असलेला चीक सुद्धा पाण्यात भिजवल्याने निघून जातो. तेव्हा तिला पटले, आई का असे करते किंवा करायला सांगते. 
                            अख्ख्या आंब्यांच्या मोसमात हे सगळे अगदी अखंडपणे चालू असे. घरभर अगदी सतत कायमचा या आंब्यांचा छान मधुर वास दरवळत असे. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर, अगदी 'ट्वेंटी फोर बाय सेव्हन'. घरात या मोसमात दिवसातील एक जेवण म्हणजे आंब्याचा रस आणि पोळी हे अगदी ठरलेले. आम्ही मुली तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कित्ती आंबे खात असू याची गणतीच नसे. कारण दिवसभरातील आमचे प्रत्येक खाणे म्हणजे आंबा! बादलीत भिजलेले आंबे काढून खायचे. बादलीतील आंबे संपत आले तर त्यात परत टाकले जात असत. आजकाल हापूस, पायरी आणि कुठल्या कुठल्या आंब्यांचे फारच कौतुक चालते. पण आमचा हा आंबा अजुनी इतका गोड आणि मधुर आहे की त्यापुढे हे सगळे आंबे अगदीच फीक्के. अजुनी आहे हे आंबे. जवळ जवळ चार पिढ्यांनी याचा येथेच्छ उपभोग घेतला आहे. शंभरीच्या आसपास येत असतील असे वाटते. आता थोडा बहार कमी झालाय पण. 
                               दररोजच्या जेवणाला रस पोळी करायची म्हणजे एक मोठ्ठ भांड भरून रस करणे म्हणजे पण आजच्या सारखे नाही. हे भिजलेले आंबे एक एक करून पाण्यातून काढायचे आणि चोळायचे. चोळायचे म्हणजे दोन्ही हातात धरून, दहाही बोटांनी गोल गोल फिरवत, हळू हळू दाब देत पूर्ण अगदी कोयीपर्यंत मऊ करायचा. हे करता करता बऱ्याच वेळा आंब्याचे नाकं उघडते आणि त्यातून रस बाहेर येऊ लागतो. हा रस बाहेर येऊ नये म्हणून त्यावर उजव्या हाताचा अंगठा ठेवायचा आणि चोळण्याचे काम चालू ठेवायचे. बऱ्याचदा चोळतांना जोरात दाब दिला गेला, तर आंबा नाक्याच्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी फुटतो आणि चक्क रसाची पिचकारीच बाहेर उडते. असे होऊ नये म्हणून आंबे चोळतांना खबरदारी  घ्यावी लागते. मग चोळलेले आंबे एक एक करून, त्यांचे नाकं काढून भांड्यात पिळायचे. त्यातील सगळा रस कोयींसहित भांड्यात निपटून काढायचा. सगळे आंबे पिळून काढले की त्यातील कोयी एक एक करून हाताने काढून, त्यांचा सगळा रस निपटून काढायचा. भांड्यातील रसात आवश्यकतेनुसार साखर घालायची, थोडं दूध घालून तो रस मिक्सर मधून काढायचा. आता हा रस खाण्यासाठी एकदम तय्यार. मस्त पैकी ताटलीत वाढायचा, त्यावर सढळ हाताने  मस्त लोणकढ्या तुपाची धार सोडायची. आमच्याकडे तूप म्हणजे चमच्याने वाढलेले चालतच नसे, भांड्याने ओतायचे सरळ. छान एकत्र कालवयाचे आणि हल्ला बोल! 
                             ह्या रस पोळीच्या जेवणात काही खास तोंडी लावणं चे प्रकार आहेत खान्देशात. बहुतेक लोकांना तेच आवडतात आणि तेच खाल्लेही जातात. पूर्वी पासून हे सगळे चालत आलेय. एकतर खान्देशात प्रचंड उन्हाळा . उन्हाळ्यात तशाही सगळ्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात. या दोन्ही कारणांमुळे ही तोंडी लावणं सगळ्या घरात केली जातात. आता उन्हाळा भरपूर म्हणजे कांदा भरपूर खाल्ला गेला पाहिजे त्यामुळे ऊन लागत नाही. एव्हढेच नाही तर बाहेर उन्हात जायची वेळ आली, तर सगळे पांढरे रुमाल डोक्यालाच नाही तर डोळे वगळता सगळा चेहराही झाकला जाईल अशा पद्धतीने बांधून जातातच. शिवाय सोबत खिश्यात, टोपी मध्ये, या बांधलेल्या रुमालात किंवा कानात छोटे छोटे कांदे घालून जातात. तर या तोंडी लावण्यात एक म्हणजे कांद्याची भाजी, त्याला खास नाव आहे "कोंबडा कांदा". याचा कोंबड्याशी थेट काहीही संबंध नाही, पण कांद्याचे उभे काप करून ही भाजी केली जाते. ते उभे काप कोंबड्याच्या तुऱ्यासारखे दिसतात म्हणून या भाजीचे नाव "कोंबडा कांदा". दुसरे तोंडी लावणं म्हणजे "कांदा-कऱ्होड". शिवाय एक तोंडी लावणं म्हणजे उडिदाचे पापड भाजून त्याचे विविध प्रकार. (ह्या विविध प्रकारांची माहिती एका खास लेखात वाचायला मिळेल लवकरच). काही वेळा उपलब्ध असतील त्यापैकी कुठलीही सुकी भाजी . 
                             आता ही निपटून काढलेली सालं आणि कोयी कुणीतरी परत चोखून घेत . कधी आम्ही मुलं तर कधी मोठी माणसं. परत मुद्दा एकच काहीही वाया जाऊ नये. आता या चोखलेल्या कोयी गच्चीवर वाळवण्यासाठी टाकल्या जात. त्याचे पुढे काय ते एका वेगळ्या लेखात सविस्तर वाचायला मिळेलच. किंवा एक म्हणजे कैऱ्या फोडून निघालेल्या कोयी खाल्ल्या जात, तशाच या कोयी निखाऱ्यात टाकून भाजून सुद्धा छान लागतात खायला. पण सहसा आम्ही असे करत नसू. राहता राहिली आंब्याची सालं. लक्ष ठेवून खाली गायी-गुरं आली, की खाली नेवून त्यांना खायला घातली जात. आंब्याच्या रसाची मेजवानी पण कचरा शून्य! किती महत्वाचे आहे हे, आजच्या जगात तर. जरा मागे वळून पहिले आणि त्या परंपरा पद्धती आमलात आणल्या आपण, तर आयुष्य खूप प्रमाणात सावरायला होईल, मुख्य करून मोठाल्या शहरात. 
                              या सगळ्यात एक गमतीचा भाग. आंब्याचा मौसम म्हणजे उन्हाळा, प्रचंड गर्मी, शाळेला सुट्टी. मग मम्मी आम्हाला घरात घालण्यासाठी खादीचे पांढरे शुभ्र बीना बाहीचे फ्रॉक शिवत असे. उन्हाळा संपेपर्यंत या पांढऱ्या शुभ्र रंगाचे रूपांतर सोनपिवळ्या रंगात होऊन जात असे. दिवसभर आंबे चोळून खातांना, ते आंबे फुटून रसाच्या पिचकाऱ्या उडत, सोलून खातांना, अख्खा सोललेला आंबाच हातातून सटकून जात असे. असे एक ना अनेक प्रकारे आंब्याचा रस आमच्या या पांढऱ्या शुभ्र फ्रॉक वर उडत असे, पडत असे आणि फ्रॉकच्या पांढऱ्याशुभ्र रंगाचे रूपांतर सोनपिवळ्या रंगात होऊन जात असे. आणि हो कधी कधी आम्ही, आमच्या त्या लाडक्या बाकावर बसून सुद्धा आंब्यांचा येथेच्च आनंद घेत असू. तिथे बसून खाणे म्हणजे मोठ्ठी पर्वणीच असे. आजकाल काही इंचाचे दूरदर्शन संच असतात आणि बऱ्याचदा तेच तेच रटाळ कार्यक्रम दाखवत असतात आणि त्यापुढे बसून आपले जेवण-खाणे होत असते. आमचा हा दूरदर्शन संचच होता कितीतरी फूट मोठ्ठा आणि काय सगळे कार्यक्रम जीवंत(live), कुठलाच कार्यक्रम परत परत नाही, थोडक्यात नो रिपीट टेलिकास्ट!
                             वर्षानुवर्षे सतत आंबे खाऊन आणि पूर्ण मौसमात त्याचे वास नाकात जाऊन जाऊन मी इतकी कंटाळले होते की, माझ्या लग्नाच्या आधी दोन एक वर्ष आणि नंतर दोन एक वर्ष मी आंबाच खाल्ला नव्हता.  बघावेसे सुद्धा वाटेना मला आंब्याकडे. नंतर काही वर्षांनी मात्र परत आवडीने आंबे खाणे सुरु झाले ते अगदी आजतागायत. अगदी रोज नाही पण एक दिवसा आड तरी रस पोळी किंवा आंबा मिल्क शेक(आंब्याचे हलवलेले दूध, हे आमचे हल्लीचे नामकरण ) हवाच असतो मला. कितीही वेळा प्यायले तरी समाधान होत नाही माझे मुळीच! मात्र मला फक्त ताज्या आंब्याचाच रस आणि मिल्क शेक आवडतो. वर्षभर टिकवून ठेवलेल्या  रसापासून बनवलेले काहीही मला मुळीच आवडत नाही. 
                           तेव्हा आंब्याचा रस रोजच्या रोज होत असे. पण बऱ्याच वेळा तो शिल्लक सुद्धा राहत असे. रस शिल्लक राहिला की आम्ही आणिक खुश! मम्मी एका स्टीलच्या ताटाला तुपाचा हात लावून त्यात हा शिल्लक रस ओतून टाकत असे. मग हे ताट गच्चीवर वाळण्यासाठी. मस्त आमरसाची पोळी तयार होत असे, हे वाळले की. ही रसाची पोळी सुद्धा आमच्या एकदम आवडीची, अगदी मिटक्या मारत खात असू आम्ही!!!

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
३मे२०२०



आंब्याची झाडं 


झाडावर लागलेल्या कैऱ्या 




आंब्यांची अढी 



आंब्यांची अढी 


चोळून मऊ केलेले आंबे 


रस निपटून काढलेल्या कोयी आणि सालं 


खाण्यासाठी तय्यार रस 



रस पोळी पापड 


रस पोळी आणि कांदा कऱ्होडे 


रस पोळी आणि कोंबडा कांदा 
(कांद्याची भाजी)




मँगो मिल्क शेक 
(आंब्याचं हलवलेलं दूध😉) 


Comments

  1. Mast lihalay tai. Sagla dolyasamor jaschya tasa unhappy rahila. Mala Akshay trutiya aathvli. Tevha Dada aambe cholat hote aani Mala tyanni shikavlela Kasey aambe cholatat te. Ras+Poli+Kanda aahaha
    SWARGSUKH

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वाह, ही तर नवीन माहिती मिळाली मला, छान वाटले तू ही आठवण सांगितल्या मुळे!!! ❤
      Tons of love 😍

      Delete
  2. Replies
    1. भाऊ तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत! खूप आनंद झाला तुम्हाला ईथे बघून!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  3. माधुरी पाटीलMay 08, 2020 12:42 pm

    मस्त लेख आणी ते रसरशीत वर्णन ��आहाहा ! मजा आली..

    ReplyDelete
    Replies
    1. तुला मज्जा आली मग मला तर डबल मज्जा आली😍😇
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  4. Sanjita ShrikantMay 08, 2020 1:20 pm

    Rasrashit Tangy Ras
    आंबे तुझवाचुन....... (Upto lockdown)

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा हा 😁😁
      भारी
      Always waiting for ur unique comments...
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  5. You are a time machine that transports your readers to the past .. You should charge for these time machine rides..��

    ReplyDelete
    Replies
    1. बापरे, आज मैं उपर आसमा निचे असच काहीस वाटुन गेले तुझा अभिप्राय वाचून
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  6. काय बहार दार वर्णन केले आहे खुप छान आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  7. सुंदर आणि रसरशीत लेख. ते चिकनचे शेत तिथली आंब्याची झाडे. रविवार ची शेतात जाण्याची पर्वणी. उन्हाळ्यात चोळुन चाखुन आंबा खाण्याची मजा काही औरच!!!! सर्व अगदी डोळ्यासमोर आले आणि त्या दुनियेत हरवुन गेले.
    अप्रतिम लेख.असेच लिहीत राहा आणि आम्हाला जादुई बालपणात रममाण होऊन दे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरच या सगळ्या आनंदा बद्दल चंद्रमोहन सरांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत

      Delete
  8. जनार्दन चौधरीMay 08, 2020 2:35 pm

    अप्रतिम चविष्ट सविस्तर सचित्र ःःःःःः

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम..... 😍 ❤️

      Delete
  9. Kharach Tu tya bhurkalatil athavani taja kelas mazhalahanpani mi aamacha gavi unhalatil suttit jat hoto tevha aamach gharipan ashich aambachi yadhi lagat ase
    Divasbhar badalitil aambe khanachi maja kahi aur tyachi chav ajun sudha tondat😋 Ti chav attacha hapus, kesharla pan nahi

    ReplyDelete
    Replies
    1. खर तर त्या दिवसांनाच कशाचीच सर नाही आज
      🙏😇😍

      Delete
  10. चिकनमधील आंबा म्हणताच मी भादली स्टेशन पर्यंत मनाने फिरून आलो व लगेच कांदा आणी करहोडे ची भाजी आठवली ती पुढे तुझ्या लेखात आलीच ऊडदाचे पापड भाजून कोरडी चटणी टाकलेला खुडा पण आठवला
    मामाकडे बरडातील आंबे असत त्या शेताचे नावच आमराई होते ☺️ व स्वतंत्र खोली होती अढी लावण्यासाठी एक नशिराबाद ची virtual tour करून आलो बालपणीची

    ReplyDelete
    Replies
    1. Yessssss बरड, आमराई, मस्त वाटले हे शब्द वाचून, तुला चीकन शेत या बद्दल पण माहिती आहे की काय?
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  11. स्वाती प्रभुणेMay 08, 2020 2:57 pm

    चिकन वाचल्या वर पहिले मला वाटले की चुकून किचन लिहताना चिकन लिहले असेल किंवा लहान मूल बोबडे बोलत किंवा काही शब्द म्हणता येत नाही तेव्हा ची गंमत असेल असा मी मनात अंदाज बांधले मग वाचल्यावर उलगडा झाला. कैऱ्या किंवा आंबे न आवडणारी व्यक्ती विरळी .कैऱ्या किंवा आंबे लहान च नाही मोठी झाले तरी चोरून खाण्याची मजा वेगळीच आणि ते गावरान आंबे चोखून खायची मजा वेगळीच हापूस आंबे आवडतात. पण गावरान चव अहाहा आमच्याकडे आंबे माचवण)म्हणजे मऊ करून रस काढतात लहान पण देगा देवा ---/कधीच मोठे होऊ नये वाटते पण ते कसे शक्य आहे . तोंडाला पाणी सुटले. व आवळी भोजन आठवले मस्त लिहल आहेस .

    ReplyDelete
    Replies
    1. चीकन शब्दाची गम्मत मस्तच
      अर्थातच गावराण आंब्यांची सर कशालाच नाही हेच खरे 😇
      मनापासून धन्यवाद 🙏

      Delete
  12. स्वाती प्रभुणेMay 08, 2020 3:03 pm

    मला जळगावचे ते ज्वारी चे पापड काय म्हणता ?बिबळे काते व सांडगे आवडतात रसा बरोबर

    ReplyDelete
  13. युवराज्ञीMay 08, 2020 3:06 pm

    खूप छान

    ReplyDelete
  14. उषा चौधरीMay 08, 2020 5:59 pm

    Chan mala pan lahan Pancho athavan zali mazya mama made pan ambhan cha dhig rahaycha kiti pan ambe kha the pan dhogi hatani cholun zaycho

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुमचे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात
      आणि मनापासून धन्यवाद या छान अभिप्राय बद्दल 🙏😇

      Delete
  15. जितेंद्र महाजनMay 08, 2020 6:01 pm

    ताई खूपच छान लिहिते डोळ्यासमोर उभे राहिले हे वर्णन भाषा शैली खूपच छान

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान अभिप्राय
      मनापासून आभार 🙏 😇

      Delete
  16. निलिमा झोपेMay 08, 2020 9:42 pm

    Aambyachi sunder mahiti v lahanpanichya aathavani pan khup chan lihile aahes aambyachi aadhi v eatar photos pan mast ����

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे सप्रेम धन्यावाद 🙏

      Delete
  17. सौ सावऴे आंब्याची आढी आम्ही आमच्या शेतात तच घालायचो खुप आठवनी हे लेख वाचुन खप मस्त वाटल

    ReplyDelete
    Replies
    1. अरे व्वा
      हे नवीनच माझ्या साठी
      मला माहीत नव्हते की शेतात पण अढी लावतात
      धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  18. प्रियंवदाMay 08, 2020 11:53 pm

    तु असे वर्णन केले आहेस की अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले����
    Khupach chhan lekh ahe

    ReplyDelete
    Replies
    1. या खुप छान अभिप्राय बद्दल खुप छान धन्यवाद 🙏 😊

      Delete
  19. छान लेख आहे वर्षा ताई रस बघुन पाणी सुटले . अशीच लेखन करत रहा👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच
      तुमच्या सारख्याचे आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या की खुपच बळ मिळते पुढचे लिखाण करण्यासाठी
      मामा खुप सारे धन्यवाद 😍

      Delete
  20. हो गावाकडे शेतांना असेच नावे असतात.. त्याकडे ईतके कधी लक्ष्य च गेले नाही..पण आज तू लेख लिहिण्याच्या निमित्ताने आम्हाला जनवून दिले..फार मजेशीर वाटले चिकन मधील आंबा..👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. 😊😁😇खरच या सगळ्या नावांची एक वेगळीच मजा असते
      सप्रेम धन्यवाद 😍

      Delete
  21. सुभाष पाटीलMay 11, 2020 5:42 pm

    खूप सुंदर
    अप्रतिम वर्णन

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे सगळ्यात आधी या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत आहे 😊
      Ani मनापासुन आभार 🙏 😇

      Delete
  22. प्रतिभा अमृतेMay 15, 2020 11:01 am

    आंब्याच्या दिवसातआमरसाचे वर्णन! तोंडाला पाणी सुटले. लेख सुरेख जमलाय. ��

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  23. एकदम timely लेख. तुझा लेख म्हणजे आम्हाला गत आयुष्यात फेरफटका मारायची एक संधी मिळते, त्यामुळे प्रत्येक नव्या लेखा बद्दल उत्सुकता असते. शीर्षक ऐकून जरा चमकायलाच झालं. नंतर खुलासा झाल्यावर गम्मत वाटली. त्याकाळी शेतांची नावं अशीच गमतीशीर असायची. आमच्या शेताचं नाव पण पिंपळपट्टी होतं. आंबे पिकवायचा process तू अगदी detailed सादर केला आहेस. मुंबईत साधारणपणे असाच प्रोसेस, अर्थात खूप लहान प्रमाणावर, मी ह्या season मध्ये करत असतो. मला रसात मस्त खवड्या खवड्या आवडतात. रस mixure मध्ये पातळ करणे म्हणजे त्याच्यावर अन्याय होतो असा माझा pakka समज आहे. आश्चर्य म्हणजे इतका tempting फळांचा राजा तू दोन वर्ष खाल्ला नाहीस ह्या baddal आश्चर्य वाटते. ह्या दिवसात rasa शिवाय जेवण ही कल्पनाच करवत नाही. मँगो milkshake मला पण बेफाम आवडतो. Anyway तुझा हा लेख अगदी timely आला आणी आम्हाला एक मधुर रसाची मेजवानी देऊन गेला. थँक्स फॉर The मेजवानी..... 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

    ReplyDelete
    Replies
    1. पिंपळ पट्टी.... छान आहे नाव 😊 I know ur love for mangoes....
      अणि मला माहीत होते u will have objection with mixter.... शेवटी आवड आपली आपली.... व्यक्ति तितक्या प्रकृती 😁
      खवड्या काय प्रकार आहे, आज पहिल्यांदाच ऐकते आहे. Enjoy this n every mango season to the fullest! !!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  24. लीला ताई वानखेडेSeptember 04, 2020 1:22 pm

    खरच खुपच सुंदर लेख लिहिला आंबा झाडावर उतरल्यापासून तर त्याचा रस निघेपर्यंत ची प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप छान लिहिली आहे वाचल्यानंतर रस पोळी पोटभर खाल्ली तृप्तीचा ढेकर द्यावा असे वाटले

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा अभिप्राय वाचुन माझे पोट अणि मन दोन्ही तृप्तीने भरून गेले!
      खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  25. विकास पाटीलApril 14, 2021 9:42 am

    खूपच छान!!

    आजोळीची लहानपणची ऊन्हाळी सुट्टीतली सुमारे आठ नऊ वर्षे एकदमच आठवली.

    शिर्षक खूपच खुबीदार��

    मला चिकन आवडत नाही....पण त्यात आंबा???
    दहा फूट मेंदूच ऊडाला असेल.

    आमरसात चिकन कंरून खाणारेही काही महाभाग असतील बुवा ! ते थोर पुरूष कोण या विचाराने लेखं वाचायला घेतला...अन गुंतत गेलो.


    शिर्षक कसे असावे? याचे ऊत्कृष्ट ऊदाहरण म्हणजे हेच!

    ReplyDelete
    Replies
    1. 😆😄😁😂 शीर्षकाबद्दल बोललात , आनंद वाटला . भारी आहे ना पण आमचा चिकन मधील आंबा . मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  26. Nilima ChaudharyApril 14, 2021 2:08 pm

    Wa mast...
    Tu kiti lahanpana cha goshti nchi athvan karun dete ani khup chhan varnan pan krte

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद निलू ताई , छान वाटले तुला इथे भेटून !🤩😇

      Delete
  27. Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  28. छान वर्णन...

    आमरस आणि तोंडी लावायला उडीद पापड चुरा,कोरडी लाल चटणी व तेल यांचा खुडा..

    धन्यवाद.

    संजय वसंत कोल्हे
    टिळकनगर चेंबूर मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  29. गेले ते दिवस ..
    पण रस काढल्या वर कैऱ्या चोक न्याची व पोतर
    चोकण्याची मजा वेगळीच असायची.
    Am l right ????

    ReplyDelete
    Replies
    1. हो, गेले ते दिवस...
      बदल हा निसर्ग नियम आहे.
      तो सकारात्मक दृष्टीने स्विकार करू या नेहमीच!
      आनंदी धन्यवाद! 🙏

      Delete
  30. Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!!! 🙏

      Delete
  31. खुप छान उन्हाळ्यातील रसरसीत आंब्याची मेजवानी अप्रतिम👌👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!! 🙏

      Delete
  32. प्रा वैशाली चौधरीApril 15, 2022 10:07 am

    चिकन��वाचल्यावर मी ही थोडी चक्रावली, मला वाटले किचन चे चिकन केले की काय �� पण विचार केला की आधी वाचून तर पाहू ��कारण एवढी घोडचूक तुमच्याकडून होणार नाही .
    पण आंबा बालपणात घेऊन गेला...
    आमच्याकडे शेती नव्हती तरी कैऱ्या आणून पलंगाखाली त्याचप्रमाणे ठेवले जायचे. मुलांना मनसोक्त मिळावे हाच उद्देश����
    शेवटी भावनाच महत्वाची न��
    पण तोंडाला पाणी सुटले आणि गळायलाही लागले ��

    ReplyDelete
    Replies
    1. चिकन 😜😉
      हो कुठलीही गोष्ट मनसोक्त मिळाली तरच त्याचा आनंद असतो हेच खरे!!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 🙏🤩😍

      Delete
  33. Khup god ahe chikan madhil aanba
    Mast ahe

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!!

      Delete
  34. काय मस्त आठवणी आहेत न .परत परत आठवायला गंमत वाटली ना .खुपच छान.भूतकाली सफर झाली. आता फक्त आठवणी राहिल्या.पण लेख ववाचून खुपच आनंद मिळाला. सौ. मंदा चौथरी.

    ReplyDelete
    Replies
    1. सगळे आनंद अणि आठवणी तुझ्यामुळेच आहेत आयुष्यात!
      खूप सारे प्रेम! ❤️❤️❤️😍😍

      Delete
  35. लीला गाजरेApril 29, 2022 3:23 pm

    खूपच सुंदर रूचकर गोड
    आहे तुझ्या चिकन मधील आंबा .आधी नाव वाचल्यावर मला वाटलं चुकून किंवा गमतीने किचनच्या ऐवजी चिकन लिहलं गेलं असेल .पण लेख वाचलं तेव्हा कुठे कळलं !खूपच .मजा आली वाचतांना .धन्यवाद 👌👌👍💐🤝

    ReplyDelete
    Replies
    1. चिकन बद्दल बर्‍याच लोकांची अशीच प्रतिक्रिया होतेय 😁
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 🙏🙏🤩🤩

      Delete
  36. सूर्यकांत कुमावतApril 19, 2024 10:46 am

    एकदम सुंदर शब्दचित्रण ...
    तुम्ही ज्या काही विषयांवर लिहिताय ना त्यामुळे परत भूतकाळातील स्मृती जाग्या होतात ....
    खुप मस्त ...

    आणि आंबा आणि त्यावरील लेखन ...1no

    ReplyDelete
  37. डॉ दीपक शिरसाठApril 19, 2024 12:02 pm

    अतिशय सुंदर लेख
    बालपणाची आठवण झाली🙏🌹

    ReplyDelete
  38. गुलाबराव पाथरकरApril 19, 2024 2:56 pm

    पूर्वी खेड्यातल्या आम्ब्यान्ची खूप गमतीदार नावे असत जसे की नाकाड्या , भदाड्या , गोट्या , शेन्दरा , आमट्या गाडग्या , गवळ्या , हळद्या , खारा , तेल्या ईत्यादी. आता मात्र एकाच चवीचे आम्बे असतात .

    ReplyDelete
  39. भाग्यश्री पाटसकरApril 19, 2024 6:53 pm

    छानच!
    आणि 'शून्य कचरा' ही तर जुनी जीवनशैली होतीच. ओलाच काय सुका कचराही होत नसे. मुळात प्लास्टिकच नाही म्हंटल्यावर काय!? कापडी पिशव्या, डबे किंवा बरण्याच घेऊन लोक दुकानात जायचे.

    ReplyDelete
  40. डॉ सुनील पुरीApril 20, 2024 9:17 am

    खूपच छान लेख आहे माझ्या लहानपणी आजोळी आमरसाची मेजवानी होत असे त्याची आठवण या लेखाच्या निमित्ताने झाली 🙏

    ReplyDelete
  41. एक दम रसाळ आंब्याचे वर्णन.लहानपणीचे दिवस आठवले.खूप छान लेख लिहिला आहेस वर्षा.अशीच लिहीत रहा.रस पोळी पापड,रस पोळी कांदा karhode भन्नाट आयडिया .खूप छान वर्णन केले आहेस.

    ReplyDelete
  42. भारती फेगडेMay 20, 2024 5:34 pm

    मी असा गोटी आंबा,शौप्या आंबा,काळा आंबा असे प्रकार खाल्लेले आहेत.आता पुढील पिढीला गावरान आंबे पाहायलाही मिळणार नाहीत.आंबे कापून खाणा-यांना चोखुन खाण्याची मजा काय समजणार!!आपण नशीबवान

    ReplyDelete
  43. सीमा बोंडेMay 09, 2025 7:05 am

    वा छानच लेख आहे. लहानपणी मी माझ्या पणजोबा आंकडे गेली की तिथे 1 रूम भरून गवतात ठेवलेले असायचे आंबे, मग आजोबा द्यायच्या पिकलेले आंबे खायला😍

    ReplyDelete
  44. ऊषा पाटीलMay 09, 2025 9:17 am

    लेख वाचून मजा आली, चिकन मधले आंबे वाचल्यावर पहिल्यांदा धक्काच बसला, मग समजलं चिकन हे शेत आहे, कोंबडा कांदा तर खूपच छान, आंबे चाळत होतो हे आताच्या मुलांना समजणार नाही, छान वाक्यरचना होती ती, मस्त लेख आहे,. आंबे तर आवडतातच पण तुझे लेखन पण खूप आवडले,

    ReplyDelete
  45. रुपाली पाटीलMay 09, 2025 9:18 am

    खुपच छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...