खास कामं आणि व्यक्ती-२
(घरातील गमती जमती)
आमची आई(आजी) वर्षानुवर्षे रात्रीची खाटेवर झोपत असे. बाकी काही काही वाळवणासाठी सुद्धा ही खाट वापरली जात असे. तर ही खाट म्हणजे एक लाकडी आयताकृती चौकट असते, त्याला चार कोपऱ्यात चार पाय असतात आणि ही आयताकृती चौकट सुती दोरीने विणलेली असते. काही लोक नारळाच्या दोरीने किंवा नवार वापरून सुद्धा विणतात. नारळाची दोरी फार टोचते, बसल्यावर. चादर वगैरे टाकल्याशिवाय बसताच येत नाही यावर. पण सुती दोरीचे तसे नाही ती मऊ असल्याने त्यावर काहीही न घालता बसायला किंवा लोळायला मज्जा येते. नवार तर अजूनच छान, ती तर मऊ असतेच पण त्याची वीण सुद्धा टोचत नाही . सुती दोरीची वीण मात्र थोडी टोचते. पण खाटेवर काही वाळत घालायचे असेल तर मात्र दोरीने विणलेलीच खाट जास्त चांगली असे मला वाटते कारण वरून तर हवा लागतच असते, पण दोरीची जाळीची वीण असल्याने खालून सुद्धा हवा लागते, नवारचे तसे नाही. त्यावर फक्त वरच्या बाजूनेच हवा लागते, खालच्या बाजूने हवा लागताच नाही. पण वापरून वापरून ही दोरीची वीण हळू हळू सैल होत जाते. कालांतराने इतकी सैल होते ही या खाटेची एक मोठ्ठी झोळीच होऊन जाते. मग ही सगळी परत वीणावी लागते. आजच्या लेखात खाट विणण्याची गोष्ट!
तर आमच्याकडे साधारण वर्षातून एकदा हे खाट विणण्याचे काम होत असे. खाट विणणे दिसते तितके साधे आणि सोप्पे काम नव्हे, फार कौशल्याचे काम असते हे! दिसायला एकदम वीण साधी वाटते, पण विणायला घेतली किंवा विणतांना पाहिले की कळते, किती कठीण आहे ते. आम्हाला हे काम नेहमीच बघायला मिळे, त्यामुळे हे चांगलेच परिचित आहे आम्हाला. खाट विणतांना बघणे सुद्धा फार छान अनुभव असतो. तर हे खाट विणण्याचे मुख्य काम आमच्याकडे, आमचे गणपत मामा(आईचे म्हणजे आजीचे सगळ्यात धाकटे बंधू) आणि त्यांच्या मदतीला आमचे दादा(वडील) असत. या दोघांची खास मैत्री, जशी आमची आमच्या लाडक्या काकासोबत आहे तशी. या दोघांच्या वयातही फक्त सहा वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे हे दोघे मामा-भाचे कमी आणि मित्र जास्त आहेत अजूनही.
आमच्या या खाटेची झोळी झाली आणि परत विणण्याची वेळ आली की, मग गणपत मामांना निरोप दिला जात असे. हो निरोपच, कारण तेव्हा भ्रमणध्वनीच काय पण साधे दूरध्वनी सुद्धा नसत कुणाकडेही. आमच्याकडेही नव्हता, त्यामुळे सगळी निरोपानिरोपीच चाले सगळ्या बाबतीत, पण कुठे कधी काही गडबड झाल्याचे आठवत नाही. सगळी काम वेळच्यावेळी बरोब्बर होत असत. मग मामा आणि दादांच्या सोयीने दिवस आणि वेळ ठरत असे.
ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी दोघे घरात हजर होत असतं. मग खाट गॅलरीतून, घरात हॉल मध्ये आणली जात असे. गॅलरीतून घरात शिरले की सरळ हॉल मध्ये. तर ही खाट विणायला थोडी मोठी आणि मोकळी जागा लागते. खाट आडवी करून ठेवायला आणि विणण्यासाठी तिच्या भोवती वावरायला. अशी मोठी मोकळी जागा, फक्त हॉल मध्येच होती आमच्या. आत आणल्यावर आधी या खाटेची, आधीची वीण उकलून सोडावी लागते. अगदी व्यवस्थित, दोरी न कापता, जिथून त्या वीणेची सुरवात किंवा शेवट झालेला असे, तिथूनच सोडवायला सुरुवात करायची. कारण ही दोरी अगदी अखंड हवी, मध्ये कुठेही गाठ असून चालत नाही. विणतांना अशी गाठ असून, चालत नाही. या मोकळ्या केलेल्या दोरीचा व्यवस्थित गुंडाळून गुंडा करावा लागतो. एक कारण म्हणजे त्या दोरीचा गुंता होऊ नये आणि परत नव्याने विणतांना, दोरीचा असा गुंडाच केलेला सोयीचा होतो. वीण सोडलेली आधीचीच दोरी चांगल्या अवस्थेत असेल तर, तीच दोरी परत नव्याने विणायला वापरता येते. पण खूप वर्ष वापरून, जर दोरी खराब झालेली असेल तर मात्र नवीन दोरी वापरावी लागते. तसे जर असेल तर, नवीन दोरी आधीच आणून ठेवलेली असे. या नवीन आणलेल्या दोरीच्या लडी मिळतात बाजारात. मग या दोरीचा सुद्धा व्यवस्थित गुंडा करून घ्यावा लागतो, विणतांना सोयीचे व्हावे म्हणून. मग या जुन्या खराब झालेल्या दोरीचे सुद्धा व्यवस्थित गुंडाळून गुंडे करून ठेवले जात. ही दोरी दुसऱ्या काही कामाकरता वापरली जात असे . आम्हाला दोरीच्या उड्या मारायला याच दोरीतून एक तुकडा कापून दिला जात असे आणि त्या दोरीच्या दोन्ही टोकांना गाठ मारून दिली जात असे, जेणे करून त्या दोरीची वीण सुटू नये. दोरीच्या उड्या मारतांना मग ह्याच गाठींचा उपयोग आम्हाला ती दोरी हातात नीट घट्ट पकडायला सुद्धा होत असे.
वरील सगळा गोंधळ आवरला की मग खऱ्या अर्थाने खाट विणायला सुरुवात होत असे. खाट विणायला सुरुवात करतांना आधी पायथ्याची खुण करावी लागते दोरी बांधुन. एका टोकाला, साधारण एक-दीड फूट, रुंदीच्या बाजूला समांतर. हा पायथ्याचा भाग सगळ्यात शेवटी विणला जातो. दोरीचे चांगले सात-आठ फेर घालून, ही खुण केली जाते.
यानंतर, उरलेल्या मोठ्या आयताकृती भागात खाटेची मुख्य वीण सुरुवात केली जाते. सगळ्यात आधी त्या आयताकृती भागाचा एक कर्ण दोरीने विणायला सुरुवात केली जाते . हा कर्ण खूप महत्वाचा, हा जर नीट जमला तरच पुढची वीण सुरळीत होते. खाट विणणारे दोघे या कर्णाच्या दोन टोकांना बसतात आणि विणायचे काम सुरु करतात . मुख्य वीण ज्यांना येते ते, माझ्या माहिती आणि आठवणी प्रमाणे पायथ्याशी बसतात आणि दुसरी व्यक्ती त्याच्या विरुद्ध टोकाला बसते. थोडक्यात मामा पायथ्याशी बसत आणि दादा त्यांच्या विरुद्ध टोकाला. हा जो दोरीचा गुंडा असतो, तो कुणाच्याही हातात नसतो, तर तो जमिनीवरच ठेवलेला असतो खाटेच्या लाकडी चौकटच्या मध्ये. थोडा थोडा वेळाने, गरजेप्रमाणे, थोडी थोडी दोरी त्या गुंड्यापासून मोकळी करून ठेवावी लागते आणि हीच दोरी ओढून-ओढून खाटेची पुढची वीण घालायचे काम केले जाते.
या दोघांचे हॉलच्या मध्यभागी बसून खाट विणण्याचे काम चालू असे. तेव्हा आम्ही सगळे, मुख्य म्हणजे मुलं आणि आई(आजी) आजूबाजूला असलेल्या पलंगावर किंवा इथे-तिथे बसत असू, खाट विणण्याची गम्मत बघायला आणि त्या दोघांच्या गप्पा आणि चेष्टा-मस्करी बघा-ऐकायला. मम्मी लोक येता-जाता, अधून-मधून डोकावत आणि गप्पा मारत असत, त्यांची बाकीची कामं करता करता. कधी थोडा निवांत वेळ असेल तर, त्याही येऊन बसत आणि या सोहळ्यात सामील होत असत.
या दोघांची, खाट विणतांना चाललेली चेष्टा-मस्करी, बघा-ऐकायला सुद्धा खूप मज्जा येत असे. एक जण म्हणजे दोरी थोडी सैल सोड, एक जण म्हणे थोडी ताणून घे, असे एक ना अनेक. बाकी अजून काय-काय विषयांवरून एकमेकांची चेष्टा-मस्करी आणि गप्पा चालू असत आणि एकीकडे खाट विणण्याचे काम सुद्धा चालूच असे. खाटेचे वीणकाम चालू झाले की सुरुवातीला दोरीचा विचित्र प्रकारचा सैलसर गुंताच दिसत असे. कारण सुरुवातीच्या वीणकामात दोरी आणि वीण बरीच सैल ठेवावी लागते. कारण पुढचे वीणकाम करतांना दोरी याच सुरुवातीला केलेल्या वीणाकामातून इकडून तिकडे नेली / ओढली जाते. पण तेव्हा बघतांना वाटते अरे ही तर पुन्हा नव्याने एक झोळीच तयार होतेय नव्याने विणून काही उपयोगच होत नाहीये . पण वीणकाम जसजसे पुढे जाऊ लागते तसतशी, वीण हळूहळू घट्ट होत जाते. शेवटी शेवटी तर विणायला पण कठीण होऊन बसते इतकी घट्ट होत जाते ही वीण. सुरुवातीलाच जर घट्ट वीण घातली, तर पुढे वीण घालणे अगदीच अशक्य होऊन जाईल, हे नवीन किंवा पहिल्यांदा बघणाऱ्या व्यक्तीला अगदी शेवटी कळते. पण सरते शेवटी त्या विचित्र सैलसर गुंत्यामधूनच एक छान आणि सुबक खाटेची वीण तयार होते. तयार झालेली ही वीण म्हणजे एका विशिष्ट प्रकारे विणलेल्या आयताकृती, मध्यभागी अगदी सगळ्यात छोटा आयत आणि त्या पुढे हळू हळू आकाराने मोठे मोठे होत जाणारे आयत. फारच भारी दिसते हे पूर्ण झाल्यावर. वीणल्या-वीणल्या ही वीण फारच घट्ट असते, त्यावर बसले तर फारच कडक-कडक, बोचणारी वाटते. मग हळूहळू वापरात आली की हळू-हळू सैल आणि मऊ होत जाते.
आता हा मुख्य आयताकृती भाग वीणुन झाला की मग पायथा वीणायाचा शिल्लक असतो. पण हे फार अवघड नसते. या भागात फक्त एक-दीड फुटाच्या, खाटेच्या लांबीला बाजूला समांतर दोऱ्या विणल्या की झाला पायथा तय्यार. या खाटेवर झोपतांना नेहमीच पाय या पायथ्यावर आले पाहिजेत आणि डोकं त्याच्या विरुद्ध बाजूला. सरते शेवटी हा पायथा वीणून झाला की मग खऱ्या अर्थाने खाट पूर्णपणे वीणून होते. फारच सुंदर दिसते ही नुकतीच वीणलेली खाट! त्यातून दोरी जर नवीन असेल तर अजूनच बहार, छान सुबक पांढरी स्वच्छ नवी कोरी वीणलेली खाट!
या व्यतिरिक्त नवार वापरून सुद्धा खाट वीणली जाते. नवार म्हणजे सुती जाड कापडाची लांबच लांब पट्टी असते, साधारण चार इंच रुंदीची. ह्याची वीण मात्र बऱ्यापैकी सोपी असते. पण यावर बसायला आणि झोपायला जास्तच छान वाटते कारण दोरीच्या मानाने फारच मऊ असते वीण. दोरी थोडी का होईना टोचते त्यावर बसले/झोपले की, याचे तसे नाही. आमच्या आजोळी असे कायमच अशी एक खाट, मला तर भारीच आवडे ती खाट!
अशा प्रकारे जवळ-जवळ तीन-चार तास चालत असे, हे खाट विणण्याचे काम. काम तर होताच असे पण त्यासोबत छान गप्पा, गोष्टी, चेष्टा, मस्करी सुद्धा चालत असे. छान वाटत असे तितका वेळ. वीणकाम बघण्याची मज्जा काही औरच असे, मला तर फारच आवडे हे सगळे बघायला. पण ही दोघं बऱ्यापैकी थकत असत. कारण सारखं वाकून किंवा जनिमीवर उकिडवे बसून, दोरीची खेचा खेची करावी लागे. मग दोघांचे थोडावेळ निवांत बसून चहा आणि खाणं चाले, उरलेल्या गप्पा गोष्टींबरोबर. मग दोघंही आपापल्या कामाला निघून जात.
©आनंदी पाऊस
घरातील गमती जमती
२फेब्रु २०२०
सतीश
ReplyDeleteवा एकदम वेगळा विषय ...
गावी गेलं की या अशा खाटा असायच्या.. अंगनात.. गोठ्यात ..शेतात... बाज म्हणायचो आम्ही..
मस्त..
हो गावी गेले की बघायला मिळते, पण आता या शक्यता पण खूप कमी झाल्यात.
Deleteबाज शब्द माहिती आहे, पण आमच्याकडे खाट हाच शब्द वापरला जातो.
खुप सारे धन्यवाद 😇🙏
खूप छान मला सुध्दा खाट vinatana बघायला आवडायचे
ReplyDeleteवावा छानच! खूप आनंद झाला, माझ्यासारखी आवड असणारे कुणीतरी आहे हे पाहून!!!! 😊😍😇
DeleteChhan tya velchi majach kahi aur hoti
ReplyDeleteखरंय ग, प्रत्येक प्रसंग आठवला की हेच वाटत असते !! 😊😇😍
DeleteWa mastach varnan
ReplyDeleteMala pahilandch mahit padale khat kashi vintat
Adhunik khat 👌
अरे शाळेत असताना सांगायचे ना, म्हणजे मी तुला सांगितले असते कुठल्या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे, त्या दिवशी तुला सांगितलं असतं घरी यायला 😉😍😇
DeleteWa छान.. मी अजूनपर्यंत खाट विणतांना पाहिलेले नाहीये..तू ते सांगितलेस..छान..फोटो पण मस्त..
ReplyDeleteवावा छानच, या निमित्ताने बर्याच लोकांना खाट विणणे, या बद्दल माहिती मिळेल 😊
Deleteसौ लता सावळे वा खुप छान विषय घेतला बाज म्हनजे खेड्या गावातच पाहायला मिऴते मी तर बंगलोर ला छोटी बाज घेउन आले नंतर ची पिढी बाज विनु च शकत नाही मस्त आवडला मला हा लेख छान आठवनी हे
ReplyDeleteछान आहे तुमची छोटी खाट, आम्ही छोट्या खाटेला खटली म्हणतो. आमच्याकडे पण होती एक खटली, तुमची बघून मला आमच्या खटलीची आठवण झाली, मनःपूर्वक धन्यवाद त्याबद्दल 😇🙏
Deleteपूर्वी खाटेवर कोण झोपणार या वरून भावंडात भांडणे व्हायची....आता खेड्या मध्ये सुद्धा खाट खूप कमी दिसते.
ReplyDeleteखूप सुंदर वर्णन केले आहेस.
हो हे पण खरे आहे, आपल्या पिढीतील भावंडांचे कशावरूनही भांडण होत सगळीच कारण मजेशीर वाटतील नवीन पिढीतील मुलांना 😇😊 धन्यवाद 🙏
DeleteMast
ReplyDeleteवॉव खूप आनंद झाला तुला इथे बघून आज, खूप सारे धन्यवाद 😍!
DeleteKhatechi vinani v tyachi sarv barik sarik mahiti sunder lihili aahes good
ReplyDeleteVachun lahan pani aamhi pan khatevar zopaycho te pan aathavile navar v pttyachi khat asaychi
नवार ची खाट म्हणजे माझ्या पण एकदम आवडीची 😍😇
Deleteअतिशय हुबेहूब वर्णन, जस काही लेखिकाच खाट विणते आहे....सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि त्यानंतर हुबेहुब प्रकटन. सिध्द हस्त लेखणीचा अद्वितीय आविष्कार.... Keep it up.
ReplyDeleteमला नाही येत रे खाट विणायला अजून सुद्धा 😉😐 असो
Deleteखुप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏!!
आता खाट, खटली विसरले लोक व खाट विणायची कला पण लुप्त होत आहे परवाच मावसभावाचा फोन आला तो आता खाट विणायला शिकला व मी सुद्धा जळगावला जाऊन शिकून येणार आहे त्याच्या कडून जमल्यास डॉक्युमेंटेशन करून ठेऊ That was kind of tacit knowledge we never documented. तुला सापाचे विष उतरवणारे माहीत आहेत का ? त्यावर पण कधीतरी लिही
ReplyDeleteआपल्या गावात साप चावलेल्या माणसाला मारुतीच्या देवळात आणून बसवायचे मग ते कडूनिंबाच्या डहाळ्या सोबत मंत्र म्हणत ग्लास भर तंबाखूचे पाणी पाजत व रात्रभर झोपू देत नसत, आम्ही चिल्लि पिल्ली मग रात्रभर धुडगूस करायचो एक छान लेख होइल मी देतो तुला माहिती
मला सुद्धा सांग, खाट विणणे शिकायला जाशील तेव्हा
Deleteचौधरी सदन चे दस्तावेजीकरण पूर्ण झाले की मग पुढचे काम हाती घेवू, तेव्हा हे सगळे लिहून काढू या नक्कीच!
खूप सारे धन्यवाद 😇
लेखाचा काय विषय आणि त्यावर एवढा लाब लचक लिखाण त्यात एवढे फोटो कुठून मिळविले सर्वच अकल्पित
ReplyDeleteआपण जगलेले क्षण आहेत हे..... आठवून लिहिले तसेच्या तसे... बाकी काही नाही 😍😇!
Deleteवा ग खाटचे फोटो होते होते तुझ्या कडे
ReplyDeleteकिती सुंदर वर्णन गेले ग
लय भारी
सगळ्या गोष्टींत आवड
ते मात्र आहे, सगळ्याचीच आवड आहे .. एक आयुष्य कमी पडेल त्यासाठी 😍😇
Deletekhatecha suti Tana Bana awadla mast apratim rekhtlay.
ReplyDeleteवावा मस्तच, धन्यवाद 🙏
DeleteAmchya aai kadepn 2 khata hotya
ReplyDeleteMe pahilyat kse wintat te?
It's a skill
Junya athawni jagya zalya��
वावा छानच!!
Deleteसारख्याच आठवण आपल्या !! 😊👍😍
आज वाचले मी मला खाट माहीत होती नागपूर कडे खाटेला बाज म्हणताय पण आमच्या कडे बाहेरून विणून घेत त्यामुळे मला तो सोहळा खूप मस्त वाटलं व रंगीबेरंगी खाटा तर खूपच आवडल्या व डिझायनर खाट खूपच आवडली मी कधीच बघीतली नव्हती विणणे ही खरेच एक कला आहे व वेळ खाऊ
ReplyDeleteआमच्या कडे बाळंतीण बाईला शेक द्यायला खाटेचा वापर करत
बाज, बर्याच ठिकाणी वापरतात हा शब्द...
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
अरे वाह , एकदमच नवा विषय. खाट बघतांना किंवा वापरताना त्यामागे एवढी मेहेनत असते याची खरच कल्पनाच नसते. तुमच्याकडे एकंदरीत सगळ्याच गोष्टी समारंभपूर्वक आणी मोठ्या प्रमाणावर केल्या जात, शिवाय तुझ्या लेखन कौशल्यामुळे त्या अत्यंत उत्साहपूर्ण आणी धम्माल वाटतात. असो, बाज विणण्याचाअगदी तंतोतंत आणी तपशिलवार प्रोसेस तू तुझ्या नेहेमीच्या ओघवत्या भाषेत मांडला आहेस. मी स्वतः कधी बाज वापरली नाही पण कित्येक घरातील बघितली आहे. पांढर्या पट्यांची बाज मला उलट छान वाटायची पण तिला हे नवार नाव आहे हे नवीनच कळलं. एकूण बाज विणणे हे एकदम कष्टाचे आणि कलाकुसरीचे काम असल्यामुळे तुम्हा मुलांची लुडबुड अजिबात चालत नसेल. तुला हे बाज विणण्याचे photoes कसे काय हमखास मिळाले? पण तू म्हणल्याप्रमाणे खरच ती दोराने विणलेली बाजच मस्त दिसते. अणि हो, तुमचे मामा खरतर तुमचे आजोबा होते मामा नव्हे 🤓🤓🤓
ReplyDeleteअजून एकदा वेगळ्याच विषयाबद्दल तुझे observation बघायला मिळाले. इतक detailing, तो प्रोसेस स्वतः बघितल्या शिवाय अणि त्यात involve झाल्याशिवाय आठवणे शक्यच नाही. तुझ्या स्मरणबुद्धीचं पुन्हा कौतुक. पुढील लेखासाठी पण शुभेछा 👍👍👍👍
बापरे, दुसरा छोटा लेख आहे असे वाटते, अभिप्राय वाटण्या पेक्षा 😜
DeleteSorry just kidding...
मस्त वाटले पण तुमचा अभिप्राय वाचून
नवार शब्द आम्ही वापरतो, बाकी फार माहिती नाही त्याबद्दल...
हो पण हे काम खूप मेहनतीचे अणि स्किलचे आहे, वाटते अणि दिसते तितके सोपे नसते...
खुप सारे धन्यवाद, या मिनी लेखाबद्दल 😜🙏!!!