खानदेशी खाण्यासाठीचा घाटा घाटा प्रत्येक खान्देशी व्यक्तीचा वीकपॉईंट ! घाटा म्हणजे बिबडे (एक प्रकारचे पापड ) करण्यासाठी लागणारे रवण . पण पापड करण्या आधी हे रवण म्हणजे घाटा खूप आवडीने खाल्ला जातो घरोघरी ! एकदा केला की अगदी सगळ्या जवळच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडे डबे भरून पाठविले जातात किंवा घाटा खाण्यासाठी या असे आमंत्रण केले जाते . मग भल्या पहाटेच आमंत्रीत मंडळी उत्साहाने आणि आवडीने जातात घाटा खायला! माझ्याकडे हे पापड करणे फारच अवघड होऊन जाते, जागा आणि ऊन या कारणांनी. पण घाटा खायला आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो. खान्देश माझे मूळ आहे, म्हणजे जन्मापासून बारावी पर्यन्त मी तिथेच होते. पण नंतर शिक्षण आणि लग्न या कारणांनी बाहेर पडले. त्यामुळे माझ्याकडे डबा येण्याची किंवा आमंत्रण येणे शक्यच नसते. मग मीच अधून मधून करते. खरंतरं घाटा उन्हाळ्यात केला जातो, पापड करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने, तसेच शेतीच्या कामातून तेव्हाच मोकळीक असल्याने. पण लेकीला थंडी आणि पावसाळ्यात खायला जास्त आवडतो. मग मी करत असते असेच अधून मधून, फक्त खाण्यासाठी म्हणून. तो गरम गरमच...