काही हजार आनंदी टाके (काही अनुभवलेलं...) थंडी गुलाबी थंडी बोचरी थंडी खूप थंडी थंडी...थंडी...थंडी... आणि थंडी फक्त थंडी! थंडी म्हटली की साऱ्यांनाच आठवते ती म्हणजे गोधडी! त्यातल्या त्यात आई-आजीच्या जुन्या साडी-पातळाची शिवलेली! थंडी तर पळूनच जाते, त्या गोधडी मुळे पण एक प्रेमळ, मायाळू ऊब सुद्धा मिळते... त्यातून मिळणारे सुख, आनंद केवळ अवर्णनीय... त्या गोधडीत पडून आवडते पुस्तकं वाचणे म्हणजे तर बहारच! माझे तर वाचन सतत चालूच असते. एकदा असेच एक पुस्तक आणले होते. त्याचे नाव आठवत नाही की लेखकाचे नाव सुद्धा आठवत नाही. तथापि त्या पुस्तकाचे मुखपृष्ठावर एका हाताने शिवेलेल्या गोधडीचे चित्र होते. ते बघून, मनात असलेली एक इच्छा सारखेच वर डोके काढू लागली. ती म्हणजे अश्या एका गोधडीचे चित्र काढण्याची इच्छा! काही समजण्याच्या आताच एका गोधडीचे चित्र काढून सुद्धा झाले! त्यानंतर काही काळाच्या अंतराने एकेक करत तीन-चार चित्रं काढून झालीत. आणि मी हे विसरूनही गेले. बऱ्याच काळाने माझ्या सख्ख्या मैत्रिणीने एक शिबीर घेतले. गोधडी शिवण-कला या विषयावर. या शिबिरात तिने स्वतः सुद्ध...