झळाळता रंगीत आनंद-१
(काही अनुभवलेलं...)
रंग!
झळाळते रंग!
झळाळता आनंद!
झळाळत्या रंगांचा झळाळता रंगीत आनंद!
अस म्हणतात मानव सोडला तर पृथ्वीतलावर बाकी कुठल्याही सजीवाला रंग दिसत नाहीत. सगळे रंग-आंधळे(colour-blind) असतात. त्यांना सगळे जग काळ्या रंगाच्या छटांचे दिसते. काय गम्मत आहे बघा, मानवाचा रंग पाहिला तर एकाच रंगाच्या विविध छटा आहेत. तथापि मानव वगळता सगळ्या सजीवांच्या रंगांत किती विविधता दिसते! एका प्रजातीच्या पक्षाचा रंग दुसऱ्या प्रजातीच्या पक्षापेक्षा फार भिन्न असतो. तसेच प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक, मासे आणि इतर लक्षावधी जलचर प्राण्यांच्या बाबतीत तसेच. कुठल्याही दोन प्रजातीचा रंग एकसारखा नसतो. परंतु किती विरोधाभास, ज्यांना हे निरनिराळे रंग या ब्राह्मडाच्या निर्मात्याने दिले आहेत, त्यांनाच हे रंग दिसत नाहीत.
आणि दुसरी बाजू, मानवाला एकच रंग दिला आहे, पण त्याला मात्र सगळे रंग, त्याच्या विविध छटा बघता येण्याची दृष्टी निर्मात्याने दिली आहे. म्हणजेच त्या निर्मात्याने मानवाला निर्माण केले तथापि त्याला आनंद मिळावा म्हणून हे संपूर्ण जग निरनिराळे रंग आणि त्यांच्या करोडो छटांनी भरून दिले! किती महत्वाचे स्थान दिले मानवाला, त्याला आनंदाची अनंत करणे दिली. अगणित रंगांचे प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी इतकेच नाही तर मोजता येणार नाही इतक्या प्रकारची झाडं, फळं, फुलं, बीज सुद्धा निर्माण केली.
क्षणभर थांबून विचार करा. पृथ्वीवरील सगळे जीव, वनस्पती, फुलं, फळ एकाच रंगाचे किंवा एकाच रंगाच्या छटा असलेले असते तर? कसे वाटले असते हे विश्व? अतिशय रंगहीन, उदास... तथापि तसे नाही, या निर्मात्याने ह्या रंगीत आनंदाची भरभरून उधळण केलेली आहे. कुणासाठी तर फक्त मानवासाठी! एव्हढे कारण पुरेसे नाही का, मानवाला आनंदी राहण्यासाठी?
बाकीच्यांचे मला माहिती नाही. मात्र मला तर हे एक कारण खूप आनंद देते. सगळ्या प्रकारचे रंग मला फार आवडतात. कुठल्याही माध्यमातील रंग माझे लक्ष वेधून घेतात. माझे चित्त संपूर्णार्थाने आनंदी करतात! माझे रंगांवर इतके प्रेम आहे की मला अगदी आतून जाणवते त्या सर्व रंगांचे सुद्धा माझ्यावर तितकेच प्रेम आहे! हे रंग मला फक्त आनंदच देत नाही तर, ते मला सोबत करतात, माझ्याशी गुजगोष्टीही करतात. अगदी मला सादही घालतात आणि मला ती साद ऐकूही येते.
माझे रंग-प्रेम आजपर्यंत आपण सर्वांना माझ्या लेखनातून आणि विविध रेखाटन-चित्रांमधून जाणवले असेलच! तथापि या रंग-प्रेमातून मी मुख-पुस्तिकेवर(face-book) एक मालिका सुरु केली होती, काही वर्षांपूर्वी. ती म्हणजे एक प्रकाशचित्र-मालिका, यातून माझे रंग-प्रेम अगदी खळाळून वाहतांना दिसते, जाणवते. तथापि तिथे त्या-त्या प्रकाशचित्राला शीर्षक देण्या पलीकडे शब्दांतून काहीही मांडणी केली नव्हती. अलीकडेच विचार आला ही मालिका इथेही प्रकाशित करावी, टप्प्याटप्प्याने. पण त्यासोबत लेखनही करावे. म्हणून हा प्रपंच!
मालिकेचे नाव आहे "झळाळत्या रंगांचा झळाळता रंगीत आनंद!" खूप रंग किंवा रंगांच्या छटा एकत्र आल्या की, त्याचा उल्लेख करण्या करिता साधारणपणे 'रंगीबेरंगी' हा शब्द वापरला जातो. तथापि मला तो शब्द आवडतं नाही आणि माझ्या मेंदू, मन, हृदयाला पटतही नाही. मुख्य करून त्यातील बेरंगी हा भाग. सगळ्या रंगांचा बेरंग झाल्या सारखा वाटतो मला. एक प्रकारची उदासी जाणवते मला या शब्दांतून. मग मी बराच शोध घेतला, त्यातून मला "झळाळते रंग" हा शब्द सापडला, आवडला आणि माझ्या मेंदू, मन, हृदयाला भावला सुद्धा! मग हा शब्द वापरूनच ह्या मालिकेला शीर्षक दिले, "झळाळत्या रंगांचा, झळाळता रंगीत आनंद" मन अगदी झळाळून निघाले. चला तर मग माझ्या या झळाळत्या रंगीत आनंदाच्या सफरीवर, रंगीत आनंद लुटायला.
माझी रोज फिरायला जायची सवय आहे. सोयी प्रमाणे, बदलत्या दैनंदिनी प्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी मी फिरायला जातेच जाते. पूर्वी अति पाउस असेल तर फिरणे होत नसे. तथापि करोनाने एक मंत्रच दिलाय संपूर्ण विश्वाला, "घरातल्या घरात". त्यामुळे त्या काळापासून अति पाऊस असेल तर हे फिरणे घरातल्या घरात करते. तर फिरायला किंवा इतर कारणांनी बाहेर जाते तेव्हा बरेच काय काय दृष्टीस पडते. हल्ली भ्रमणध्वनी मुळे खूप छान सोय झालीये. दिसलेले आवडले की ते लगेच प्रकाशचित्रांच्या माध्यमांतून टिपून घेता येते. असे मी नेहमीच करत असते. माझ्यसोबत बऱ्याचदा आमच्या भागात राहणाऱ्या एक आंटी असतात. त्या तर म्हणतात, "you have third eye!" खूप अतिशयोक्ती आहे ही... असो.
एकदा अशीच संध्याकाळच्या वेळी एकटीच फिरायला चाललेली असताना, भेळ-चाट विकणारे दादा त्यांच्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी एका रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर त्यांची गाडी लावत होते. बाकीची तयारी करत होते. संपूर्ण पदपथ रिकामा होता आणि त्यावर त्यांनी त्यांच्या गिऱ्हाईकांना बसण्यासाठी म्हणून आणलेले प्लास्टिकचे स्टूल ठेवलेले होते. बाकीची तयारी चालू असल्याने आजून त्यांनी त्यांची मांडणी केलेली नव्हती. त्यामुळे हे स्टूल एकावर एक ठेवून रचलेले होते. प्रत्येक स्टूल वेगळ्या रंगाचा होता. रिकामा पदपथ आणि त्यावर हे विविध रंगांचे रचलेले स्टूल. अतिशय सुंदर दिसले ते दृश्य! इथेच "झळाळत्या रंगांचा झळाळता रंगीत आनंद" मालिकेचा जन्म झाला. पुढे ती छान बहरत गेली, हे बहरणे अविरत चालूच आहे...!
©️आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
६ डिसेंबर २०२४
हेच ते स्टूल!
आमच्या परीसरात साधारण आठवड्याच्या शेवटी
हे विक्रेते येतात, भरपूर विक्री होईल या आशेने.
त्यातील एक छोटेसे फिरते दुकानं.
एका हॉटेल मधील ठाणे किंवा मुंबई
अंबरनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी
मेळूकोटे येथे एका टेकडीवर लक्ष्मी-नृसिंह मंदिर आहे.
बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते.
त्या पायऱ्यांवर एके ठिकाणी काही महिला या बास्केट
विकत होत्या, सोबतच विणकाम सुद्धा चालू होते.
येलहंका भागात एक कार संग्रहालय आहे.
त्यातील एक विशेष प्रदर्शित केलेला भाग.
नंदी बेट्टा रस्त्यावर या विक्रेत्याने हे पपनस अशा
विशिष्ट पद्धतीने कापून त्यांची केलेली ही रचना.
विद्यापीठात माझे लघु शोध प्रबंधाचे सादरीकरण झाले.
मनासारखे. सभागृहातील प्रत्येक व्यक्तीने येऊन अभिनंदन केले.
तथापि या सगळ्याचा एक प्रकारचा आनंदी ताण आल्याने डोकं प्रचंड
दुखू लागले. काय करावे कळेना. कॉफी प्यावीशी वाटली. विद्यापीठ परिसरात
कॉफी उपलब्ध नव्हती. तथापि आमच्या दिनेशदा ने कुठून तरी आणली माझ्यासाठी,
तेही दोन कप! ती घेतली आणि क्षणभरात डोकं शांत झाल.
समोर दिसलेच मग झळाळते रंग!
एका रुगणालयात माझ्यासमोर तिथल्या परिचारिकांनी
तिथले कपाट उघडले त्यात मला हे झळाळते रंग
दिसले, तेही पेस्टल छटा!
त्यांची परवानगी घेतली आणि हे प्रकाशचित्र टिपले.
येलहंका भागातील ब्राह्मण खानावळ.
माझी अतिशय आवडती.
आणि त्यातील हा
झळाळता रंगीत आनंद!
नावच वर्षा आणि वर्षाव आनंदाचा मग काय कमी! शिवाय आपल्या आतही रंग असतातच..चक्राचे रंग वेगवेगळे असतात व ते बाहेरचे रंग शोषायला तयार असतात...तू म्हणजे रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा अशी वाटली मला
ReplyDeleteताई खूप सुंदर लेख अगदी रंगीत रंगांप्रमाणे च झळकळत आहे
ReplyDeleteखरंच तुमची दृष्टी थर्ड आय प्रमाणेच आहे कारण जे रंगीत स्टूल किती लोक बघत असतील पण कोणालाही त्या रंगा बदल कधी लिहावे वाटले का? हाही एक प्रश्न आहे आणि दुसरे म्हणजे तुमच्या आतच कलाकारीचे निरनिराळे रंग भरलेले आहे त्याप्रमाणे बाहेरील प्रत्येक सौंदर्य तुम्ही त्याच नजरेने रंगीत मनाच्या नजरेने प्रत्येक विषयाची उधळण करतात
अ प्रत्येकाला आनंदी पावसात भिजवतात👌👌👏🏻👏🏻🙋♀️💐
फार छान लिहिले आहेस. विषय वेगळा आहे
ReplyDeleteखुप सुंदर🌹🌹
ReplyDeleteसकाळपासून लेखाची वाट बघत होते आणि इतका सुंदर लेख वाचायला मिळाला. काहीही विषय असो सुंदर आणि ओघवती भाषा मनाला भावते
ReplyDeleteखुपच मनोवेधक लेख आणि रंगीत छायाचित्रे. लेखांची भाषा पण वाचुन लक्षात येण्या जोगी त्यामुळे कोणालाही पटकन वाचावीशी वाटते . सुंदर.
ReplyDeleteNormally you can't write unless n until you are aware of surroundings...
ReplyDelete*That's third eye*
👍
वावा सुंदर रंगीत लेख👌 चित्रे सुद्धा खूपच छान
ReplyDeleteReally, You have third eye
ReplyDeleteझळाळते रंग नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असतात, पण प्रत्येकालाच त्यातील झळाळता आनंद घेता येत नाही, तुम्हाला त्यातही तो दिसला. या छोट्या छोट्या दुर्लक्षित गोष्टींमध्येही तुमचे रसिक मन रमते. पूर्ण मालिकाच गंमत देऊन गेली. मानवी स्वभावाचे विविध पैलू रंगांमधून आपल्याला व्यक्त करता येतात फक्त त्याला करड्या रंगाची किनार यायला नको .
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
आज निवांतपणे आनंदी पाऊस मधील काटेरी हलवा,झळाळते रंग व मनोहारी हे स्फुट लेख वाचले.सर्वच आवडले.पण विशेष भिडला मनोहारी.नाव वाचून उत्सुकता वाढली.पण वाचल्यावर युरेका च झाले.छान नाव दिल्याने पदार्थाचे मूल्य नक्कीच वाढले.अशीच छान छान लिहीत रहा👍
ReplyDeleteतीन एक आठवड्यांपूर्वी तुझा "झळाळत्या रंगांचा झळाळता रंगीत आनंद" वाचून आनंद झाला. मानव आणि इतर प्रजातींमध्ये असलेला रंगांच्या बाबतीतील फरक खूप सूक्ष्म रीतीने आणि बिनचूकपणे मांडलेला आहे. इतर प्रजातींना विविध रंग बघता येण्याची क्षमता नाही, तर मानव प्रजातीमध्ये ती ओळखता येण्याची क्षमता आहे. तसेच फूटपाथ वरील विक्रेत्याकडे निरनिराळ्या रंगांचे स्टूल्स पाहून तुझ्यासारख्या कलाकाराला त्यांविषयी लिहावेसे वाटले नाही तरच नवल! इतर प्रजातींमध्ये त्यांच्या शरीरांच्या रंगांचे वैविध्य आणि मानवांमध्ये एकाच रंगाच्या विविध छटा आहेत, हे जितके खरे आहे तितकेच इतर प्रजातींमध्ये रंगांमध्ये जरी विविधता असली तरी फक्त भूक, भय, आणि मैथुन या व्यतिरिक्त त्यांच्याकडे वेगळ्या अशा भावना नाहीत. परंतु मानव या "प्राण्या"मध्ये रंगांच्या बाबतीत विविधता नसली तरी त्याच्याकडे अनंत अशा बऱ्या वाईट भावनांचे रंग आहेत, बुद्धी आहे, विचार व्यक्त करण्याची किंवा त्यांना दाबून ठेवण्याची क्षमता आहे. ही एक मोठी त्याला निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. त्या देणगीचा उपयोग तो नाना तऱ्हेने आणि इतक्या चांगल्या अथवा वाईट प्रकारे करतो की हे पाहून भगवंताची लीला किती अगाध आणि थक्क करणारी आहे याचा प्रत्यय येतो.
ReplyDeleteकोणत्याही, अगदी लहान गोष्टींमध्येही रंगांची उधळण तुमच्या दृष्टीला पडते, भावते व शब्दांमध्ये त्याची उधळण करावी ती तुम्हीच👏🏻😊🎊
ReplyDelete