माऊली : जीवन घटनाक्रम-२ (पैठण पर्व) (featured ) गुरूंच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारून, रुक्मिणीबाई आणि सिद्धोपंतांसोबत आळंदीस प्रस्थान केले. आळंदीस पोहोचल्यावर विठ्ठलपंतांचा परत प्रपंच सुरु झाला. संन्यासाश्रामातून परत गृहस्थाश्रमात प्रवेश केल्याने समाजाने त्यांना वाळीत टाकल्या कारणाने, त्यांना सिद्धबेटावर जाऊन प्रपंच सुरु करावा लागला.(आता इंद्रायणीचे पात्र अतिशय संकुचित झाल्याने, सिद्धबेट हे बेट राहिलेले नसून नदी किनारच झालाय.) अतिशय खडतर असे आयुष्य कंठावे लागले, या कुटुंबियांना. वाळीत जीवन जगावे लागणे, ही मध्ययुगीन काळातील अत्यंत कठीण अशी शिक्षा होती. नवलाची बाब म्हणजे विठ्ठलपंतांचे वडील आपेगावचे वतनदार, त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या वतनाचे काय झाले? तसेच रुक्मिणीबाईंचे वडील सुद्धा २३ गावांचे वतनदार होते. त्यांनी या उभयतांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी त्यांना तसे करू दिले नाही. माता-पित्याला लेकीचे आणि जावयाचे हाल बघवले नाही, हे दुःख सहन न होऊन त्यांची प्रकृती खालावत गेली, त्यातच आ...