Skip to main content

वज्री, घसडणं आणि मी (काही अनुभवलेलं...)



वज्री, घसडणं आणि मी 
(काही अनुभवलेलं...)



घेऊन तोफा आणि तलवारी 
इतिहास येतो बुधवारी 
इतिहास माझ्या नावडीचा 
रविवार माझ्या आवडीचा...

सगळ्यांच्याच आवडीचं बालगीत, त्यातल्या त्यात हे कडवं तर जास्तच मनाजवळचे. कारण ते प्रत्येकालाच आपल्या मनातील भावना व्यक्त करणारे वाटे/वाटते, अगदी मलाही. पण योग्य गुरु लाभले तर अतिशय नावडता विषय सुद्धा किती आवडीचा होऊ शकतो, हे मी स्वतः अनुभवलेले आहे. अर्थातच त्यामुळे इतिहास विषय माझ्या अतिशय आवडता झाला आहे. ज्ञानेश्वरांनी म्हणूनच ठेवले आहे, "जाणतेने गुरु भजिजे l तेणे कृतकार्या होईजे ll जैसे मूळ सिंचने सहिजे l शाखा पल्लव संतोषिती ll"
तर, मी सातवाहन राजवटीचा अभ्यास करत असतांना माझ्या वाचनात आले की, त्याकाळातील वज्री सुद्धा पुरातत्त्वशास्त्रज्ञाना, उत्खननात सापडली आहे.(संदर्भ : सातवाहन कालीन महाराष्ट्र-डॉ रा.श्री.मोरवंचीकर) हे वाचताच माझ्या मनात कितीतरी विचारांचा कल्लोळ माजला आणि मनात सहजच विचार आला, एक छोटेसे सर्वेक्षण करू या. हल्ली व्हॉटस्ऍप मुळे असले छोटे छोटे सर्वेक्षण करणे फारच सोप्पे आणि सोईचे झाले आहे आणि मी वरचेवर असे वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करतच असते. बऱ्याच जणांना याचा अनुभव आहेच. तर आज या वज्री बद्दलच्या सगळ्या गमती जमती!
तर सगळ्यात आधी वज्री म्हणजे काय ते सांगते. ही वस्तूच लोप पावत असल्याने, हा शब्द सुद्धा बऱ्यापैकी लोप पावला आहे. वज्री म्हणजे अंघोळ करतांना अंग घासून साफ करण्यासाठीची वस्तू. ही वज्री साधारण हातात मावेल अशी म्हणजे साबणाच्या मापाची असते. मोठी असली तर हातात मावणार नाही आणि लहान असली तर सारखी पडेल. विटेच्या साच्यासारख्या छोट्या आकाराच्या साच्यात मातीची तयार करून, ओली असतांनाच एका बाजूने ठपका मारायचा, म्हणजे नक्षी उमटते आणि या नक्षी मधेच सुया घातलेल्या असतात, जेणेकरून त्यात छिद्र तयार होतील. नंतर विटेप्रमाणेच भाजून घेतलेली असते.    
मी सगळ्यांना प्रश्न विचारला, अंघोळ करतांना अंग घासायला काय वापरता? खूप लोकांनी उत्साहाने उत्तरं दिलीत. काही लोकांना जरा अवघडल्यासारखे झाल्याने काहीच उत्तर दिले नाही. पण या सगळ्यातून अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक माहिती समोर आली. बहुतांशी(त्यात मी सुद्धा आहे) लोक वज्री किंवा वज्री तत्सम गोष्टींचा वापरच करत नाही. पण बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वज्री वापरतात. अगदी नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या वज्री पासून ते अगदी अत्याधुनिक प्लास्टिक आणि नायलॉन च्या वज्री पर्यंत! सगळ्यांनी पाठविलेली विविध प्रकारच्या वज्रींचे छायाचित्रं सोबत जोडत आहेच. बघा, गम्मत आणि आश्चर्य वाटेल इतके सगळे प्रकार बघून! 
एकीकडे वाटले पुरातत्वीय दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा पुरावा असलेली ही वज्री लोप पावते आहे का? कारण आजचा मानव, अगदी अख्खे जग दिशाहीन होऊन अगदी वेगाने धावत आहे. आजच्या मानवाला धडपणे जेवायला वेळ नाही, तर सविस्तरपणे अंघोळ वगैरेचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे या वज्रीची गरजच राहिली नाही का? तथापि दुसरीकडे वज्री या वस्तूचे निरनिराळ्या माध्यमातील स्वरूप, विविध आकार, अवतार बघून गम्मतच वाटली. बदल हा निसर्ग नियमच आहे, या विश्वात चिरंतन असे काहीही नसते याची प्रचितीच आली जणू!
डोळसपणे पाहिल्यास लक्षात येते पूर्वी निरनिराळ्या जत्रा भरत असत. अजूनही बऱ्याचशा जत्रा भरतात. तसेच नव्याने अनेक मोहोत्सव असतात, जसे आंबा मोहोत्सव, शेंगा मोहोत्सव, विविध सणाच्या निमित्ताने मोहोत्सव, तसेच वेगवेगळी हस्तकलेची प्रदर्शन भरत असतात. तसेच हल्ली वाण्याची दुकानं सुद्धा लोप पावत आहेत मोठ्या शहरातून, त्याची जागा मोठाल्या सुपर मार्केट नी घेतलीय. या सगळ्या ठिकाणी आधुनिक वस्तू तर दृष्टीस पडतातच, पण खूपशा पारंपारिक वस्तू सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि बऱ्याचशा लोकांना या पारंपारिक वस्तू खरेदी करून वापरण्यात रस असतो. ही खूपच आशादायक बाब आहे! या सगळ्या ठिकाणी पारंपारिक वस्तू मध्ये आढळणारी एक गोष्ट म्हणजे वज्री. 
मी सुद्धा अशा आधुनिक वज्री आणल्यात, अशाच कुठल्यातरी मोहोत्सव किंवा हस्तकला प्रदर्शनातून. नक्की कुठून ते आता नीटसे आठवत नाही. एका म्हणजे वाळ्या पासून बनवलेली साबणाच्या मापाची आणि आकाराची. तसेच दुसरी सुद्धा याच आकाराची आहे, फक्त ती वाळलेल्या गीलक्याच्या(घोसाळ्याच्या) तंतू पासून बनवलेली आहे. सोबत त्यांचेही छायाचित्र जोडत आहे. ते बघूनच समजेल एकदाही वापरलेली नाही. तसेच एक प्लास्टिकचा ब्रश सुद्धा आणलाय, इंग्रजी अक्षर एस आकाराचा, पण हा एस एकदम उथळ आहे. त्यामुळे वापरायला फारच सोपा आणि आरामदायक आहे. थोडक्यात user-friendly! हा मात्र बरीच वर्ष अगदी नियमित वापरला आहे.   
हल्ली, मी वज्री किंवा वज्री तत्सम काहीही वापरत नसले तरी माझी सुद्धा वैयक्तिक आठवण आणि अनुभव आहे याविषयीचा. आम्ही लहान असतांना घरातील सगळेच, अगदी नियमित घसडणं वापरत असू. घसडणं हा शब्द खास आमच्या खानदेशात वापरला जाणारा शब्द. घसडणं, हा एक नैसर्गिक दगड, ज्याचा उपयोग अंग घासून स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच वज्री प्रमाणे केला जात होता, अजूनही बरेच लोक वापरतात. तर हे घसडणं म्हणजे नैसर्गिक दगड, आकाराने हातात मावेल असा, अंगाला टोचून इजा होणार नाही पण अंग घासून स्वच्छ करता येईल इतपत खरबुडा. हा कुठेही विकत वगैरे मिळत नसे. नदीकिनारी शोधावा लागे. किंवा कुणा नातेवाईक, ओळखीचे नदी जवळ राहात असतील तर त्यांना सांगून ठेवले जाई, एखादं चांगल घसडणं शोधून ठेवा आमच्यासाठी. मग ते येतील किंवा आमच्यापैकी कुणी त्यांच्याकडे गेले की ते घसडणं मिळत असे. 
आमच्या आजोळी तापी नदी आहे. अगदी लहानपणा पासून आम्ही दरवर्षी शेवटची परीक्षा संपली की त्याच दिवशी आजोळी जात असू ते थेट शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परत येत असू. तिथे घरापासून तापी नदी जवळच होती. मग आम्ही कधी सकाळी तर कधी संध्याकाळी नदीवर फिरायला जात असू, तर कधी अंघोळीला, कधी संध्याकाळी डबे वगैरे घेऊन नदीवर जेवायला जात असू. तसेच ग्रहणादि सारख्या खास निमित्ताने सुद्धा नदीवर जात असू. आम्हाला नदीकाठी फिरायला, नदीत डुंबायला, नदीकाठी जेवायला खूप आवडत असेच तथापि एक वेगळेच मुख्य आकर्षण असे. ते म्हणजे नदीकाठी एकतरी छानसं घसडणं शोधून काढणे. आम्हा मुलांचं तेच मुख्य काम असे जणू. नदीवर पोहोचताच क्षणी आमचे शोधकार्य सुरु होत असे. आपापसात स्पर्धाच सुरु झालेली असे जणू, कुणाला सगळ्यात छान घसडणं सापडतं? मग ज्याला कुणाला घसडणं सापडत असे, ती सगळ्यांना दाखवत असे आणि किती छान आहे पटवून देत असे. एव्हढेच नाही तर सोबत ज्या कुणी मोठ्या व्यक्ती आलेल्या असतील त्यांना सुद्धा दाखवून कौतुक करून घेत असू. एव्हढेच नाही तर घरी आल्यावर आपापल्या घसडण्याचा वापर करत असू. तेव्हा सुद्धा माझं किती छान आहे, तुझ्या घसडण्याने तर नीट घासले जात नाही किंवा तुझं घसडणं किती टोचते. आपले स्वतःचे घसडणे कितीही वाईट असले तरी त्याचे कौतुकच करत वापरायचे. दुसरीचे छान दिसले किंवा वाटले तरी ते कबुल करायचे नाही. बघू बरं तुझं म्हणून घ्यायचे, वापरायचे आणि परत देतांना म्हणायचे, नको ग बाई, त्यापेक्षा माझेच छान आहे, ते घसडणे कितीही छान असले तरी... वगैरे...वगैरे...

ll इति वज्री पुराणम् ll 

आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
३जाने२०२३






वाळलेल्या गीलक्याच्या(घोसाळ्याच्या) तंतू पासून बनवलेली




वाळ्या पासून बनवलेली


माझा एस आकाराचा ब्रश 




पारंपारिक वज्रीचे आधुनिक रुपात 




वाळलेल्या गीलक्याच्या(घोसाळ्याच्या) तंतू पासून बनवलेली



घसडणं, नैसर्गिक दगड






आधुनिक वज्री 



आधुनिक वज्री 


 



आधुनिक वज्री 



आधुनिक वज्री 







घसडणं, नैसर्गिक दगड



आधुनिक वज्री 



आधुनिक वज्री 




घसडणं, नैसर्गिक दगड



हा एक नवीनच प्रकार कळला, या सर्वेक्षणातून! 

खुप जळालेला कौलाचा किंवा खंगराचा तुकडा

बांधकामासाठी लागणा-या विटा जेंव्हा जास्त भाजल्या जातात 
तेंव्हा त्या जशा बनतात तेंव्हा त्यांना खंगरी विट 
व २,३ अशा विटा एकत्र चिकटलेल्या असतात त्याला खंगर म्हणतात.
(माहिती अणि छायाचित्र सौजन्य आदरणीय व पु होले सर) 




घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड



आधुनिक वज्री 



आधुनिक वज्री 



आधुनिक वज्री 



आधुनिक वज्री 





घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड




घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड



घसडणं, नैसर्गिक दगड आणि 
आधुनिक वज्री 



घसडणं, नैसर्गिक दगड




आधुनिक वज्री तत्सम वस्तू 
वेगवेगळ्या आकाराच्या आणि 
वेगवेगळ्या माध्यमातील 
बघा किती प्रकार!
सरळ एका सुपर मार्केट मध्ये गेले 
आणि सगळ्या प्रकारांचे छायाचित्रं
काढून आणली आहेत.
 











 














 

Comments

  1. अरेवा! एवढ्या वज्रींचा/ घसडण्यांचा संग्रह आहे तुमचा! मी गिलक्याच्या तंतुंची वज्री प्रथमच पाहिली. मलापण घसडणं वापरायलाच आवडते. प्लॅस्टिकची रेडीमेड असली तरी ती फक्त बॅाडी वॅाश लावून फेस करण्यासाठीच वापरते , बाकी वज्री असतेच. मी पण कुठेही चांगला छोटासा दगड दिसला की घसडणं म्हणून घेऊन येतेच . माझ्या मुलांना तसे केलेले अजिबात आवडत नाही 😛
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  2. अरे वाह ! खूप प्रकार बघायला मिळाले.. आमच्याकडे मिश्रित प्रकार आहे...

    ReplyDelete
  3. मनीष चिरमाडेJanuary 06, 2023 9:18 am

    क्या बात ताई....👌
    इतके प्रकार असता ... तुझे लिखाण अभ्यास पुर्ण असते... जरी काही गोष्टी आपल्याला माहिती असता पण तुझे लेख वाचून पूर्ण पणे त्या गोष्टीची खोलात माहिती मिळते...
    🙏🏻👍👌

    ReplyDelete
  4. खूप छान वर्णन केले आहे आणि खूप प्रकार बघायचा मिळाले

    ReplyDelete
  5. भारीय..वज्रीवरही दस्ताऐवज आपण कराल कधी वाटल नव्हत.
    वर्णन +प्र.चि.सारे कलेक्शन मस्तय की!
    माला मोहेंजोदारोमधील ग्रेट बाथ आठवला.
    माझ्याही 'कोमल' वज्रीला ब्लॉगवर add केल्याबद्दल धन्यवाद।
    वज्रीने स्नान केल्याचे एक "fresh n up " समाधान मिळतं जसे सारे आनंदी पाऊसाचे सारे लेख वाचल्यावर मिळतं.-.
    स.न.वि.वि.-संजिता

    ReplyDelete
  6. विकास पाटीलJanuary 06, 2023 7:41 pm

    👍🏻

    मी कधी वापरले नाही. ....पण विदर्भात बरेच जणं कौलाचा तुकडा वापरतांना बघितले....

    ReplyDelete
  7. Vajri navin ch shabdh shabdhsangrahat bhar mala ter ghasadane hech mahit hote
    Vajriche vegvegale prakarche photo baghaila bhetale 👌👍

    ReplyDelete
  8. रंजना राणेJanuary 08, 2023 7:13 pm

    WOW.. वज्री, घसडणं.. अनेक प्रकार बघायला मिळाले.. चांगली आठवण करून दिली.. नक्की वापरु👌🏻👌🏻😊😊👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    ReplyDelete
  9. नेहेमीप्रमाणे परत एकदा एक आगळा वेगळा विषय घेऊन आली आहेस. अंगाच्या घासणीचे एवढे प्रकार असतील आणि त्यामागे एव्हढा ऐतिहासिक धांडोळा असेल याची कल्पना नव्हती. तुझा स्वभाव चौकस आणि अभ्यासू असल्यामुळे तुझ्याकडून असे वेगळ्या पायवाटेचे विषय आपसूक धुंडाळले जातात.लहानपणी नदीवर किंवा विहिरीत पोहायला गेल्यावर दगडाच्या तुकड्यांनी अंग घसल्याचे आठवते आणि तारुण्यात प्लास्टिक च्या घासणी ने अंघोळीच्या वेळी अंग घासल्याचे अस्पष्ट आठवते, कारण वज्री हा काही विशेष लक्षात ठेवण्याचा प्रकार नव्हता.आता तुझ्या ह्या लेखा मुले सातवाहन काळा पासून ही प्रथा चालू आहे हे ऐकून नवल वाटले. वज्रीचे पण एवढे प्रकार तू अभ्यासले आहेस आणि फोटो सकट मांडले आहेस ते सगळंच तुझ्या अभ्यासू वृत्तीचे परिमाण आहेत . सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तू नेमके बोट ठेवले आहेस त्या प्रमाणे मुद्दाम अंघोळीलाच जास्त वेळ देणं जिथे जमत नाही, तिथे घासणीचे एवढे लाड कोण करणार.😀😀😀 अंतिमतः अजून एक अभासू आणि नेटका लेख संग्रहित केल्याबद्दल अभिनंदन.

    ReplyDelete
  10. You are simply Great, कधी विचारही केला नव्हता की घसडणा या विषयावर सुद्धा कधी लिखाण होऊ शकतं आणि एवढा विचार होऊ शकतो. वजरी हा शब्द तर मला पहिल्यांदाच समजला🙆🙈😁, घसडण्याला वजरी सुद्धा म्हणतात. खूप प्रकार बघायला मिळाले वजरीचे तुमच्यामुळे. विषय पण छान निवडला, कसे सुचते तुम्हाला असे वेगळे आणि छान विषय, खूप छान लिखाण अभिनंदन🙏💐

    ReplyDelete
  11. अरेच्चा, मला तर "दगडा" शिवाय काही माहितीच नव्हतं.

    ReplyDelete
  12. वाह, केवढा अभ्यास! पण मजा आली पाहायला! बाकी इतरांच्या टिपण्याला माझा होकार.

    ReplyDelete
  13. उदय बोरगावेOctober 30, 2024 9:01 am

    वज्री हा शब्दच मुळात मी पहिल्यांदाच ऐकला...
    अंग घासण्याचा दगड इतका मोठा शब्द मोठा होता लहानपणी... 😀
    आणि आजकाल scrubber म्हणतो आम्ही याला.
    असो अजून एक अभ्यासपूर्ण लेख 👍

    ReplyDelete
  14. डॉ सुनील पुरीOctober 30, 2024 9:48 pm

    अभ्यासपूर्ण लेख🙏💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...