चार तास , माटुंग्यातील (काही अनुभवलेलं...) माणूस जो पर्यंत काही काळ मुंबईत राहत नाही , तो पर्यंत त्याला मुंबई समजत नाही . फक्त ऐकीव गोष्टींवरूनच तो मुंबई चे चित्र रंगवत असतो . माझ्याबाबतीत तेच झाले होते . मुंबई म्हणजे फक्त खूप धकाधकीचे जीवन . त्यामुळे मुंबई नकोच वाटे . पण मुंबईत काही वर्ष राहिले आणि आज पर्यंत कामानिमित्ताने नियमित मुंबईत जात आहे . दिवसेंदिवस अगदी आकंठ मुंबईच्या प्रेमात बुडून जात आहे मी ! खूप वेगवेगळ्या भागात जात असते मुंबईच्या , कामानिमित्त आणि त्यांच्या प्रेमातही पडत असते . मग हा प्रत्येक भाग मला पायी चालत जाऊन , तिथे काही काळ घालवून अनुभवायचा असतो . अशाच बऱ्याच भागांपैकी एक भाग म्हणजे माटुंगा . प्रत्यक्ष माटुंग्याला मी गेले नसले , तरी माटुंगा ओलांडून इकडे तिकडे बऱ्याच वेळा गेले होते . सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे , अगदी समजायला लागल्यापासून दादांच्या(वडील) तोंडून सारखाच माटुंग्याच्या उल्लेख ऐकलेला . कारण त्यांचे शिक्षण व्ही.जे.टी....