भ्रमणध्वनी आणि मी
(काही अनुभवलेलं ...)
भ्रमणध्वनी ........ बापरे फारच बोजड वाटतो ना हा शब्द !आणि मना-हृदयाच्या अगदी लांबचा . पण हेच मोबाईल किंवा नुसते फोन म्हटले , तर मात्र आपल्या मना-हृदया जवळ येतो . खरंतर या पुढे जाऊन मी तर म्हणजे आपला अवयवच वाटतो . म्हणजेच खूप अत्यावश्यक ! अगदी क्षणभर जरी दिसला नाही तरी सैरभैर होऊन जातं .
सहजच विचार करता करता मी भूतकाळात शिरले आणि भ्रमणध्वनी नेमका माझ्या आयुष्यात कसा आला आणि केव्हा आला ? त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा कसा होता ? आणि काळानुरूप आणि गरजेनुसार कसा कसा आणि केव्हा केव्हा बदलत गेला ? आणि एक एक रंजक किस्से आठवू लागले आणि डोळ्यासमोर तरळू लागले . मग एक एक किस्सा आठवून माझे मलाच खूप हसू येऊ लागले !
भ्रमणध्वनीचा आयुष्यात शिरकाव होईपर्यंत दूरध्वनीवर कौटुंबिक आणि मैत्रीचे छान संवाद साधता येऊ लागले होते . प्रोफेशनली सुद्धा आत्मविश्वासाने बोलता येऊ लागले होते . एव्हढेच नव्हे तर निरनिराळे कॉर्डलेस , कॉर्ड सहित दूरध्वनी-संच वापरता येऊ लागले होते . एकाच उपकरणा (इन्स्ट्रुमेंट) मध्ये दोन किंवा तीन लाईन्स आणि मग एकत्र कॉन्फरन्स कॉल्स वगैरे वगैरे सहजपणे हाताळता येत होते . हे सगळे सांगायचे कारण म्हणजे मुळात दुरध्वनीच आमच्या घरी , माझी पदवी झाल्या नंतर आला . त्यापूर्वी वसतिगृहात राहत असतांना तिथला दूरध्वनी किंवा टपाल कार्यालयात जाऊन ट्रंक कॉल्स करणे , ते ही अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच . कारण तेव्हा ट्रंक कॉल चे सुद्धा भरपूर पैसे लागत . त्यापेक्षा पत्र-व्यवहार जास्त सोयीचा वाटे .
बऱ्याच वर्षांपूर्वीचा काळ . मी एका कार्यालयामध्ये काम करत होते . काही कामाने बाहेर ही जावे लागे , त्या त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने . तर एका प्रकल्पाच्या कामासाठी मला सकाळ भवन आणि कोकण भवन ला जावे लागणार होते आणि गरजेप्रमाणे कार्यालयमध्ये संपर्क साधून बोलावे लागणार होते . तेव्हा नवीन नवीनच भ्रमणध्वनीचे आगमन झाले होते . आमच्या सरांनी सूध्दा घेतला होता . पण मी त्यावर कधी फोन केल्याचे सुद्धा आठवत नाही , त्या क्षणापर्यंत . तेव्हा आउटगोइंग सोडून द्या , पण इनकमिंग चे चार्ज सुद्धा इतके भयानक होते की ते आकडे ऐकूनच गरगरायला होत असे. तर तेव्हा , मी जिथे जाणार ते परिसर मोठाले . सार्वजनिक दूरध्वनी शोधायचा म्हणजे भरपूर पायपीट करावी लागणार होती आणि काम तर पूर्ण करून यायचे होते . सर म्हणाले तू हा मोबाईल घेऊन जा ! आणि मी भयंकर दचकलेच आणि जोरात नाही नाही म्हणाले !! माझी ही प्रतिक्रिया बघून सर जोरजोरात हसायलाच लागले . कारण ते मला पुरते ओळखून होते , मी घाबरणाऱ्यातली नाही , कशालाच . म्हणाले मी सांगतो कसा वापरायचा . वापरणे सोडून द्या , पण कुणाची इतकी किमती वस्तू बाहेर घेऊन जायची , ते सुद्धा बस आणि रिक्षा च्या प्रवासात आणि नंतर ती वापरायची , फारच मोठी जोखीम वाटली ती मला ! त्या काळात भ्रमणध्वनी वरून फोन करणे आणि एस एम एस करणे एव्हढेच शक्य होते . तरी ते हँडसेट प्रचंड मोठे आणि वजनी असत ! शेवटी मी नेलाच नाही आणि सार्वजनिक दूरध्वनीच्या मदतीने माझे काम पार पाडले .
या नंतर लगेचच थोड्या दिवसांनी म्हणजे दिवाळीच्या आधीची गोष्ट . दिवाळी साजरी करण्याचा भाग म्हणून , आम्हा कार्यालयात काम करणाऱ्या सगळ्यांना जेवायला बाहेर घेऊन जात असतं . या वर्षी मात्र दिवसभराचा लोणावळा खंडाळ्याचा बेत ठरलेला . साईट-भेट आणि दिवाळी एकत्र . त्यादिवशी सरांनी त्यांची बॅग घेतली नव्हती आणि तो बोजड भ्रमणध्वनी खिशात मावण्यासारखा नव्हताच ! मग परत ती भ्रमणध्वनीची जोखीम माझ्या बॅगेत . मोठ्ठी जबाबदारी आणि जड सुद्धा ! पण त्यादिवशी आम्ही एक मोठ्ठी गाडी केलेली आणि सगळे सोबत होतो , त्यामुळे थोडी चिंता कमी . पण अख्खा दिवस मला ते वजन माझ्या बॅगेत वागवावे लागले . बरं तेव्हा भ्रमणध्वनीचा वापर जवळ जवळ शून्य , त्यामुळे त्याचे दिवसभर कामच लागले नाही ! रात्री घरी पोहोचल्यावर गाडीतून उतरतांना त्यांच्याच लक्षात आले . मग मी तो परत केला . पण चेष्टा केली, म्हटलं , घेऊन जाते आणि भरपूर वापरून , मग परत करते . मग मात्र ते जोरात हसायला लागले . म्हणाले अनलॉक तरी करता येतो का वापरण्यासाठी ?!?! आणि मग मीही खोखो हसत सुटले आणि हसत हसतच त्यांचा निरोप घेतला !!
ही नोकरी करता करता बाहेर छोटे छोटे प्रकल्प सुद्धा घ्यायला सुरुवात केलेली , मी आणि माझ्या मैत्रिणीनं . तिच्याच ओळखीच्यांसोबतही काम करत असू . साईट लांब असतं . त्यामुळे आमचे कार्यालय सुटले की , ते आम्हाला त्यांच्या गाडीने साईट-भेट आणि क्लायंट-मिटींग्स ला घेऊन जात असतं . तर एके दिवशी असेच साईट व्हिजिट करून परतायला फारच उशीर झालेला . त्यांनाही काळजी वाटली . मग त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी माझ्या कडे दिला आणि म्हणाले घरी कळवा , दोघीही फोन करून आणि त्याक्षणी मी खोखो हसायला लागले . ते एकदम काय झाले म्हणून माझ्याकडे पाहून विचारू लागले , काय झालं? मी म्हटलं कसा करणार फोन ? भ्रमणध्वनी वापरताच येत नाही . साधा नंबर सुद्धा डायल करता येत नाही . मग त्यांनी नंबर विचारून डायल करून दिले . मग आम्ही घाईनेच एखादेच वाक्य बोलून पटकन त्यांना फोन परत केला . कारण पर सेकंद चार्जेस चे मोठं मोठे आकडे डोळ्यासमोर नाचत होते आमच्या !
मग दोन-तीन वर्षात बदली होऊन , दुसऱ्या शहरात स्थलांतरीत झाल्यावर मात्र काही पर्याय नसल्याने स्वतःचा भ्रमणध्वनी घ्यावाच लागला . कारण कम्युनिकेशन साठी काहीतरी साधन आवश्यकच होते . तोपर्यंत इनकमिंग चे चार्जेस बरेच कमी झालेले होते . तरी ज्या कुणा मोजक्या लोकांना नंबर कळविला त्यांना सांगितले शक्यतो रात्री दहा नंतर फोन करा . कारण तसा काहीतरी प्लॅन मिळालेला होता तेव्हा . रात्री १० नंतर इनकमिंग चे अर्धेच पैसे पडतील किंवा असेच काहीतरी . बरं रेंजचे तेव्हा इतके प्रॉब्लेम की कुणाचा फोन येणे मुश्कीलच . कारण घरभर सगळीकडे छान रेंज येत नसे . काही ठराविक ठिकाणीच थोडीफार रेंज येत असे . पण तोपर्यंत मोबाईल हँडसेट थोडे छोटे आणि थोडे हलके सुद्धा झालेले वजनाला . त्यात फक्त फोन करणे , आलेला घेणे आणि मेसेज करणे इतक्याच सोयी होत्या .
मग काही काळाने दूरध्वनी मिळाला आणि परत थोडा काळ भ्रमणध्वनीचा वापर बंद झाला . कारण अजूनही भ्रमणध्वनीला इनकमिंग चार्जेस होतेच आणि आऊटगोईंगही बऱ्या पैकी महागच होते .
काही काळाने माझे कामानिमित्त बरेच प्रवास चालू झाले आणि मग बाहेर गावी गेल्यावर कम्युनिकेशन करता यावे म्हणून पुन्हा भ्रमणध्वनीची गरज भासू लागली आणि एव्हाना इनकमिंग कॉल्स मोफत झालेले होते . मग थोडे नवीन हँडसेट आलेले होते बाजारात . मग एक छानसा पांढऱ्या शुभ्र रंगाचा फ्लिप फोन होता माझ्याकडे ! उघडला की त्याच्या पडद्यावर छानशी फुलपाखरं भिरभिरत ! खूप आवडीचा अनेक कारणांनी .....सगळी सांगता येण्यासारखी नाहीत इथे . आजही जपून ठेवलाय मी ! काही दिवसांनी हा पांढरा क्युटी चालेना झाला . मग बटनाचाच पण कॅमेरा असणारा आणि गाणी ऐकता येणारा एक फोन घेतला . हा वजनाने अजून जास्त हलका .
मग हा फोन खराब होण्यापूर्वीच मला काही कारणाने हुशार/चलाख(स्मार्ट) फोन घेणे भाग पडले . मग एका वेगळ्याच पण थोड्याफार कल्पना असलेल्या जगाची ओळख झाली ! आणि या जगात खूप महत्वाची आणि खूप वर्षांपासून हवी असलेली गोष्ट मिळाली ...कॅमेरा ! पण तरी तो मनासारखा वापरता येईना , कारण कुठेही गेले तरी लेक सोबत आणि तेव्हा तिच्याकडे भ्रमणध्वनी नव्हता . त्यामुळे माझा भ्रमणध्वनी माझ्यापेक्षा तीच जास्त वापरत असे आणि दुसरे म्हणजे व्हाट्सअँप ! खूप मदत आणि फायदा झाला याचा माझ्या कामासाठी आणि अजूनही होताच आहे . पण त्याबरोबर नको ती बरीचशी कामं सुद्धा मागे लागली . नको ते सगळे डिलिट करण्याची .
कॅमेरा फार छान असल्याने साईट वर तर याचा फारच छान उपयोग होई . पण बाकी फोन मनासारखा आणि पूर्ण वापरता येईना . त्यामुळे त्यातील सगळ्या फंकशन्स ची ओळख सुद्धा झाली नव्हती . कारणच आईच फोन वर दिवसभर दिसली तर बाकी काही विचारायलाच नको . ही मुख्य भीती . भ्रमणध्वनीमध्ये तेव्हा डेटा पॅक सुद्धा नव्हते . त्यामुळं बाहेर गेल्यावर फारसा वापर करता येत नव्हता . आणि वापर फार नसल्याने छान सवयीचा आणि फ्रेंडली झाला नव्हता तो फोन ! सेल्फी मोड सुद्धा होता त्यात पण कधी वापरला नाही . ते वापरायला जमेना की आणखी काही , नेमके कारण देता येत नाही . पण सेल्फी कधी काढले नाही मी. काढले ते लेकीनेच !
पीदड पीदड पिदडला हा फोन . पहिले काही वर्ष दोघी मायलेकी मिळून आणि नंतर काही वर्ष मी एकटीने . खूपदा पडझड झाली . कधी या भागाची अडचण तर कधी त्या भागाची . मग गाठा सर्व्हिस सेंटर . एकदा तर प्रवासाच्या वेळी बिघडला आणि चक्क माझे विमान चुकले , वेळेवर एअरपोर्ट वर हजर होऊन आणि चेक इन करून सुद्धा ! असा किती वेळा दुरुस्त केला , एक देव जाणे की तो फोनच जाणे ! शेवटी त्याचा कॅमेरा सुद्धा खराब झाला . पण गम्मत म्हणजे स्क्रीन शॉट काढता येत होते . मग तसा वापरला थोडे दिवस ! फारच गमतीशीर !
हे सगळे चालू असताना 'तो' अधून मधून म्हणे हा फोन घेऊन देतो , तो फोन घेऊन देतो . लेक पण तू अमका फोन घे , ढमका फोन घे . असे सगळे नुसतेच तोंडी चालू होते . पण कृती काही घडेना . आणि एके दिवशी 'तो' बाहेर गावी होता आणि त्याला कसल्या तरी डॉक्युमेंटचे फोटो काढून हवे होते . मग काय तडका फडकी दुकानात जावे लागले . मग गेले आणि दुकानदाराला माझी रेंज आणि अपेक्षा सांगितल्या . मग या सगळ्याचा सुवर्ण मध्य गाठून एक फोन घेतला . मला फार महाग वस्तू खरेदी करायला आणि वापरायला आवडत नाही . कारण त्या वस्तूंमुळे आपली सोय होणे बाजूलाच राहते आणि वरून आपल्यावरच जास्त जबाबदारी येते , नीट जपून वापरायची आणि सांभाळायची . त्यामुळे मला नकोच वाटते . मग लेकीची कटकट हा का घेतला वगैरे वगैरे . आल्यावर त्याने फक्त पाहिले , पण बोलला काही नाही , स्वस्तात परस्पर काम झालेलं , त्यामुळे त्याला बरेच झालेले .
पण मग हा फोन मात्र माझा एक खूपच छानसा जीवाभावाचा मित्र झालाय . महाग नसल्याने वापरताना दडपण येत नाही आणि मुख्य म्हणजे माझ्या एकटीच्या मालकीचा ! त्यामुळे वापरायचे पूर्ण स्वातंत्र ! कॅमेरा सुद्धा छान आहे . त्यामुळे फार छान वापर चालूय . काही माझ्या इंटरेस्ट चे अँप डाउनलोड करून घेतलेत , सोबतीला व्हाट्सअँप , फेसबुक आहेच . त्यातही माझ्या इंटरेस्ट चे सगळे ग्रुप्स आहेत . काही चित्र काढले , काही नवीन छान किंवा आवडीचा पदार्थ केला , नवीन झाड , फुल पाहिली की लगेच शेअर करता येतात हव्या त्या व्यक्ती बरोबर , त्याबद्दल बोलता सुद्धा येत . आता हे लिखाण सुरु झाल्यापासून , ते सुद्धा लगेच शेअर करता येतात आणि त्याबद्दल चे अभिप्राय ही मिळतात लगेचच . छान कौतुकाचा वर्षाव होतो मग वर्षावर !!! आणि मग त्या वर्षावाने एकदम खुश होऊन जाते ! असे एक ना अनेक प्रकारचे आनंद मिळतात मला या फोन मुळे ! कधी फारच कंटाळा आला तर त्यातील गेम्स लगेच धावून येतात आणि माझा कंटाळा कुठल्या कुठे पळवून लावतात . मॉर्निंग वॉक छान छान गाण्यांच्या सोबतीने अजूनच सुंदर होऊन जातो ! आणि हवे ते प्रत्येक क्षण कायमचे आठवणीत ठेवायला आणि ते क्षण परत परत जगात यावे म्हणून कॅमेरा सतत मदत करत असतो !
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा फोन मला युझर फ्रेंडली वाटतो , विषेशतः सेल्फी कॅमेरा ! त्यामुळे हल्ली मी सुद्धा सारखेच सेल्फी काढत असते . अगदी हल्लीच्या जनरेशनच्या मुलींसारखे गाल आणि ओठांचा चंबू करून नाही , पण एक छानसे स्मित देऊन किंवा फारच विचारात असल्यासारखे भासवून किंवा कुठे तरी तंद्री लागल्याचे भासवून !!!
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं ...)
१८ एप्रिल २०१९
https://www.google.co.in/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.gsmarena.com%2Fthe_rise_dominance_and_epic_fall__a_brief_look_at_nokias_history-blog-13460.php&psig=AOvVaw1IOiQm3aHw83HF3rOttbaw&ust=1630727621972000&source=images&cd=vfe&ved=0CAsQjRxqFwoTCOCf-_fz4fICFQAAAAAdAAAAABAE
इमेज गूगल वरून साभार
मी आयुष्यात सर्वप्रथम हाताळलेला
भ्रमणध्वनी साधारण असा होता
नक्की कुठले मॉडेल ते आठवत नाही
https://www.google.co.in/url?sa=i&url=https%3A%2F%2Fericssoners.wordpress.com%2F2016%2F09%2F05%2Fericsson-mobile-phones-1987-2001%2F&psig=AOvVaw2uzNFPIA39vV73XG0jdtc8&ust=1630727441068000&source=images&cd=vfe&ved=0CAsQjRxqFwoTCPDWuq7z4fICFQAAAAAdAAAAABAD
इमेज गूगल वरून साभार
मी आयुष्यात सर्वप्रथम साधारण अशा
भ्रमणध्वनी वरून बोलले
माझा स्वतःचा भ्रमणध्वनी घेण्या आधी
मी वापरलेले काही भ्रमणध्वनी ,
अर्थातच माझ्या सहकारी मित्रांचे
हा माझा सगळ्यात लाडका
"व्हाईट क्युटी"
माझाच एक भ्रमणध्वनी
माझा सगळ्यात पहिला हुशार/चालाख
भ्रमणध्वनी अर्थातच स्मार्ट फोन
Remember how we used to be in queue for STD calls once or start 1/4 rate while in university.
ReplyDeleteWhen we were studying, if someone would have told on future you will be able to connect with anyone in world with small device in hand, which will also help in clicking photo, doing banking operations, and today even office work, we would have pushed book or her to mental hospital
खरंय मोबाईल पुर्वीच्या काळातstd callकरणे किंवा पत्र लिहीले या सर्व गोष्टी अगदी अंग वळती होत्या पण आता ते सर्व आठवले की गंमत वाटते आपण हे करायचो! पण त्यातही एक वेगळीच मजा होती.कुणाचं पत्र आले की कोण आनंद व्हायचा असो. पण मोबाइल आता जोवाभावाचा मित्र झाला आहे आणि अन्न वस्त्र निवारा सारखी मुलभूत गरज झाली आहे
ReplyDeleteहा एक वेगळ्या विषयावरचा लेक वाचुन गंमत वाटली आणि मौज वाटली.तुझे भ्रमणध्वनीचे अनुभव. लेख छान ओघवत्या शैलीतील आहे त्यामुळे पटकन वाचुन होतो. सौ. मंदा चौथरी.
ReplyDeleteखरंय गंमतीशीरच विषय आहे हा . प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतील पण जास्त भाग मजेशीरच असणार असे मला वाटते . खूप सारे प्रेम !🤩
Deleteमी विचारच करत होतो की हिने ह्या महत्त्वाच्या विषयाला अजून स्पर्श कसा नाही केला ते. कारण सध्या भ्रमणध्वनी हा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होऊन बसला आहे आणी त्याच्याशिवाय आयुष्य काढणे मुश्किल बनवले आहे. भ्रमणध्वनीच्या पूर्वी पासून ते आत्ता पर्यंत वेगवेगळी स्थित्यंतर तू नेमकी वर्णन केली आहेस. आमच्या पिढीने या communication क्रांतीचा juggernaut अनुभवला आहे. त्याची मजा तुझ्या लेखात प्रतिबिंबित आहेच. भ्रमणध्वनी मुळे जग आणि माणसे एकमेकांच्या जवळ आली आहेत ते मात्र नक्की आणि तुझ्या सारख्या आर्टिस्टनां आपापले छंद आणि आवडी जोपासायला आणि त्या बद्दल माहीतीची देवाणघेवाण सहज उपलब्ध व्हायला त्याची अतिशय मदत होतेच. त्याला बर्याच लोकांनी खलनायक पण ठरवला आहे कारण सगळे त्यात गुंतून पडल्यामुळे माणसा माणसांतला संवाद पण कमी झाला आहे. असो, नव्याची नवलाई असेपर्यंत हे चालणारच. तुझा हा भ्रमणध्वनींच्या वाटचालीचा आणी त्या अनुषंगाने तुझ्या अनुभवांचा लेखाजोगा आवडला.
ReplyDeleteछान…. सुरूवातीला इनकमिंग पण १६ रू पर मिनीट होते. �������� मला चांगले आठवते, कारण माझ्या एका मित्राजवळ एरिकसन चा तो हातोड्याएव्हढा मोठा मोबाईल होता व त्यावरून त्याच्या आग्रहाखातर मी पहिल्यांदाच अजून एका मित्राला फोन केला होता. त्यावेळी मी सहजच रेट विचारला होता व त्याने जे सांगितले ते ऐकून एक मस्त धक्का अनुभवला होता.
ReplyDeleteखुप कौतुक..भ्रमणध्वनींचा उत्क्रांतीमय संग्रह फारच आवडलाय😘.आपली ह्या भ्रमणध्वनींभोवतालच्या आठवणींची भ्रमंती ही अलौकीक वर्णिले आहे.🙏
ReplyDeleteखरोखरच Mobile ही काळाची गरज असुन हातातील बाह्यमेंदू झालाय...असो..पण दोन सजीवांना जोडणारा हा Machineच एक दूवा आहे.
खरंतर याची मालिकाच होईल असे वाटते. हा लेख लिहून झाल्याला सुद्धा बराच काळ लोटला. त्यामुळे माझा तो भ्रमण ध्वनी पण खराब झाला अणि नवीन आलेला जास्तच लाडका झालाय. त्याच्या कितीतरी नवीन गोष्टी आहेत. असो!
Deleteमला वाटते प्रत्येक नवीन गोष्टी चा नीट वापर केल्यास, त्या नक्किच उपयुक्तच ठरतात.
मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏😊🤩
आपला भ्रमणध्वनी आणि मी लेख वाचला . नेहमीप्रमाणेच सूक्ष्म निरीक्षणातून आपण अनुभवलेले प्रसंग सविस्तर मांडलेले आहेत . काही गोष्टी फारच प्रबोधनात्मक वाटल्या . उदा. १ मला फार महाग वस्तू खरेदी करायला आणि वापरायला आवडत नाहीत . कारण त्या वस्तूमुळे आपली सोय होणे बाजूलाच राहते वरून आपल्यावरच जास्त जबाबदारी येते . २ मोबाईल मधील गाणी ऐकता ऐकता मॉर्निंग वॉक सुंदर होतो . मोबाईल मुळे आपले लेख लवकरात लवकर शेअर झाल्यामुळे चांगले अभिप्राय येतात व त्यामुळे छान कौतुकाचा वर्षाव होतो वर्षावर . खूप छान मांडणी . पण त्याचबरोबर काही गोष्टी खटकल्या सुद्धा . उदा. १ हल्ली मी सुद्धा सारखेच सेल्फी काढत असते . सेल्फी काढल्यामुळे आपण त्या फोटोत असण्याच्या आनंदापेक्षा दुसरा फायदा नसतोच . पण सेल्फी काढतांना जीव गमावलेल्यांची संख्या पाहता सेल्फी काढणे ही प्रबोधनासाठी चांगली गोष्ट होऊच शकत नाही . २ फारच कंटाळा आला तर गेम्स धावून येतात . गेम्स खेळणे (मोबाईल वरील) ही पण गोष्ट चांगली गोष्ट नाही . (कोणते गेम्स खेळतात याला महत्व नसते . त्यामुळे मेंदूवर होणाऱ्या वाईट परिणामांची गोष्ट असते .) काही देशांनी असे गेम्स खेळण्यावर बंदी घातलेली आहे. आपले लिखाण १००% सत्य असल्यामुळे अभिनंदनीयच . पण सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यातून चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून माझं परखड मत मी मांडलं . धन्यवाद !
ReplyDeleteमजा आली लेख वाचतांना. माझा पाहिला मोबाईल CDMA टेक्नोलॉजी चा मोटोरोला कंपनी चा होता. खुपच जड आणि बोलतांना कान तापायचा��. पण आवाज क्वालिटी खुपच छान. जपून वापरायची सवय असल्याने सगळे मोबाईल पुरेपूर टिकले.
ReplyDeleteCDMA म्हणजे मज्जाच होती . माझा पण तोच होता पहिला फोन . आवाज इतका स्वच्छ आणि मोठ्ठा असे की , आपल्यालाच नाही तर आजूबाजूच्या दहा बारा लोकांना सुद्धा स्वच्छ ऐकूयेत असे फोन वरील बोलणे . 😆😅
Deleteआणि जपून वापराने ही तर आपल्या पिढीची खासियतच आहे !
मनःपूर्वक धन्यवाद !🙏