Skip to main content

आमचा चाट कॉर्नर , घरातला-१ !(घरातील गमती जमती)

 आमचा चाट कॉर्नर, घरातला-१!

(घरातील गमती जमती)


                      घरातील गृहीणी सगळ्याच बाबतीत हौशी असली तर, घरातील सगळ्याच सदस्यांची सगळ्याच बाबतीत एकदम चंगळ असते. त्यापैकी एक महत्वाचे म्हणजे जीभेचे चोचले! आणि चौधरी सदन या बाबतीत खूपच भाग्यवान! यातील एक भाग म्हणजे हा आमचा घरातील चाट कॉर्नर! हल्ली सगळ्या भारतभर चाट माहितीचा आणि आवडीचा सुद्धा. अगदी सगळीकडे मुबलक प्रमाणात चाट ची दुकानं, गाड्या, ठेले असतात. खायची इच्छा झाली की लगेचच खायला मिळते. अर्थातच चव आणि स्वच्छतेचा मात्र मोठ्ठा प्रश्न असतो. पण बऱ्यापैकी घरोघरी सुद्धा यातील काही पदार्थ बनविले आणि खाल्ले जातात. 
                     आम्ही लहान असतांना मात्र तसे नव्हते. अख्ख्या गावात एखाद-दुसरीच गाडी असे चाटची आणि त्यावरील ग्राहकांची संख्या सुद्धा खूप तुरळक. हल्ली तसे नसते, अगदी 'सुलभ' च्या शेजारी जरी चाट ची गाडी, ठेला, दुकान असले, तरी तिथे खाण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. मला तर हे वाक्य लिहितांना सुद्धा पोटात डचमळायला लागले. असो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. बागेच्या लेखात उल्लेख आलेली एक गाडी, दुसरी टॉवर खाली अशा दोनच गाड्या असत तेव्हा माझ्या माहिती प्रमाणे. तिसरी पण असे, पण ही मौसमी, फक्त नवरात्रीच्या जत्रेमध्ये, फक्त ते नऊ दिवस. पण बागेत जेवायला गेल्यावर आणि नवरात्रीत एकदा आम्ही बाहेर खात असू भेळ आणि पाणी पुरी. अगदी शिंग फुटेपर्यंत आम्ही ह्या गाड्यांवर कधी खाल्ले नाही आणि शिंगही आम्हाला फारच उशिरा फुटली होती. अर्थातच शिंग फुटल्यावरही फारच कधी तरी खाल्ले असेल, तेही मला नीटसे आठवत नाही. असो . पण आमच्याकडे घरीच हे सगळे पदार्थ केले जात, वर्षातून ठराविक वेळी. मग आम्ही त्या त्या दिवशी ते ते पदार्थ अगदी पोट भरून आणि मन भरून खात असू. हे सगळे घरात वरचेवर होत नसल्यानेही त्याचे एक खास महत्व असे, त्या दिवसांची ओढ लागून राही आणि आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत असू त्या दिवसाची. कुठलीही गोष्ट असो सारखीच आणि वारंवार मिळू लागली की त्यातील खरी मजा, खरा आनंद निघून जातो. या गोष्टीची तर मला, या लिखाणातून सारखीच जाणीव होत असते. 
                      हल्ली चाट कॉर्नर मधील पदार्थांची यादी सुद्धा भली मोठ्ठी असते. तेव्हा तसे नव्हते, काही मोजकेच पदार्थ असत या यादीत. भेळ, पाणीपुरी. कचोरी, समोसा, रगडा पॅटीस. बाहेर जेव्हा केव्हा खात असू तेव्हा फक्त भेळ आणि पाणीपुरी. बागेच्या लेखात उल्लेखात आल्याप्रमाणे बागेत जेवायला गेलो की भेळ खात असू आणि नवरात्रीच्या जत्रेत गेल्यावर तिथे पाणीपुरी, एकदाच. भेळ मात्र वर्षातून दोन तीन वेळा, बागेत जेवायला जाऊ तेव्हा तेव्हा खात असू. रगडा पॅटीस न खाण्याची दोन-तीन कारणं. एक म्हणजे तो बनवायला थोडा जास्त वेळ लागे, दुसरे म्हणजे आम्हाला चटपटीत भेळच जास्त आवडे आणि तिसरे म्हणजे तो थोडा महाग असल्याने आमच्या बजेट मध्ये बसत नसे. पैकी पहिली दोन कारणं मला माहितीची होती पण आज या लेखनाच्या निमित्ताने तिसरे कारण पण कळले, मम्मीकडून. बाकी समोसा प्रकार तर मी बारावी होईपर्यंत घरी किंवा बाहेर कुठेही खाल्ल्याचे आठवत नाही. कचोरी मात्र अगदी नियमित म्हणजे वर्षातुन एकदा खात असू, पण घरात तयार केलेली. 
                      या चाट च्या यादीतील तीन पदार्थ आमच्या घरी नियमित होत, वर्षातून ठरलेल्या वेळेला. आता त्या एकेका पदार्थाच्या बनवायच्या आणि खाण्याच्या धमाल गोष्टी सांगते एक एक करून. सुरवात माझ्या तेव्हाच्या सगळ्यात आवडीच्या पदार्थापासून करते. तो पदार्थ म्हणजे भेळ! भेळ वर्षातून कमीकमी दोन वेळा होत असेच. पण कधीतरी आमच्या सगळ्यांच्या पत्रिकेतील ग्रह एकदम चाट कॉर्नर मध्ये आले तर तिसऱ्यांदा होत असे. सर्व साधारणपणे खान्देश सोडला तर बाकी सगळ्यांकडे दिवाळीलाच फराळ तयार केला जातो. आपण खान्देशात मात्र एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा अक्षय्य तृतीयेला अशा दोन वेळा होतो. अक्षय्य तृतीयेला चकली आणि चिवडा तेव्हढा होत नाही. बाकी शेव, दराबा आणि सांजऱ्या होतातच. कारण हा अक्षय्य तृतीयेच्या नैवेद्याचा एक महत्वाचा भाग असतो. 
                    सगळ्यांच्याच घरी होत असत फराळाचे पदार्थ. पण तरीही सगळेच आपापल्या शेजारी-पाजारी, नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळींच्या घरी फराळाचे ताट पाठवत असत. अजून सुद्धा बऱ्याच अंशी चालू आहे ही परंपरा. मग घरात शेव आणि चिवड्याचे खूप वेगवेगळे प्रकार जमा होत, अगदी वेगवेगळ्या चवीचे. याचा आमच्याकडे फार छान उपयोग करून घेतला जात असे. 
                   तर भेळ वर्षातून दोनदा म्हणजे दिवाळी आणि अक्षय्य तृतीये नंतर होत असे. कारण भेळ करण्यासाठी लागणारी मुख्य सामुग्री घरात तयारच असे. ते म्हणजे शेव, चिवडा, पपडी वगैरे. तेही खूप प्रकारचे आणि वेगवेगळ्या चवीचे. मग फराळ, साधारण संपत आला की भेळ करण्याचा बेत ठरत असे, एखाद्या संध्याकाळी. आम्हा सगळ्यांसाठी पोटभर जेवण हेच असे. फक्त पुरुष मंडळी साठी थोडे खिचडी वगैरे सारखे काही तरी करावे लागे. 
                    आता  मोठ्ठ एकत्र कुटुंब, त्यात सगळे पोट भरून भेळच खाणार म्हणजे भेळ खूप मोठ्या प्रमाणात करावी लागणार. तेव्हा आजच्या सारखे एक एक प्लेट वेगवेगळी भेळ बनवली जात नसे आमच्याकडे. सगळी भेळ एकदमच बनवायची, मी तर अजूनही सगळी भेळ एकदमच बनवते. फक्त घरातील काही मोठ्या मंडळींना जास्त तिखट भेळ हवी असे. मग त्यांच्या ताटलीतच थोडे जास्त तिखट टाकून कालविले जात असे किंवा थोडी भेळ बाजूला काढून त्यात जास्त तिखट घालून कालविले जात असे. पण हा नंतरचा भाग, म्हणजे सगळी भेळ तयार झाल्या नंतरचा. 
                     एव्हढी भेळ बनवायची म्हणजे ती भेळ कालविण्यासाठी एक भली मोठ्ठी परातच घ्यावी लागे मम्मीला. किंवा काही वेळा तर मम्मी सरळ एक बऱ्यापैकी मोठ्ठी घमेलीच घेत असे. एव्हढ्या भेळेसाठी कांदा, टमाटे, कोथिंबीर सुद्धा भरपूर लागणार. पैकी कांदा घरात कायमच वर्षभराचा भरून ठेवलेला असे, अजूनही असतो. पण टमाटे आणि कोथिंबीर मात्र नसे. घरात शीत कपाट नसल्याने साठवून ठेवणे सुद्धा शक्य नसे. मग भेळ करण्याचा कार्यक्रम ठरला की एखादा दिवस आधी भरपूर टमाटे आणि कोथिंबीर आणून घेतली जात असे. चिंच चांगली भिजवी म्हणून सकाळीच पाण्यात टाकून ठेवली जात असे. चिंच सुद्धा वर्षभरासाठी भरून ठेवलेली असे घरात आणि गुळ सुद्धा.  गुळ फोडून ठेवलेला असे त्यामुळे हा दुपारी पाण्यात भिजवला तरी चालण्यासारखे असे. 
                      मग संध्याकाळी आधी पूर्व तयारीला सुरुवात होत असे. कांदा, टमाटे तर अगदी किलोने लागत आणि कोथिंबीर सुद्धा अगदी भरपूर लागे आणि आवडे सुद्धा सगळ्यांना. ही सगळी चिराचिरी करायची म्हणजे त्याला भरपूर वेळ लागे, परत ही सगळी चिराचिरी पावशीवर (विळीवर) चाले. कारण तेव्हा घरात सगळी चिराचिरी करायला सर्रास पावशीच वापरली जात असे. एकच सूरी होती घरात, ती म्हणजे लिंबू कापायला किंवा जेवतांना कांदा चिरायला अशा किरकोळ कामांसाठी वापरली जात असे. एकीकडे भिजविलेली चिंच हाताने कुस्करून त्याचा छान कोळ तयार केला जात असे, पाण्यात भिजविलेल्या गुळात सुद्धा काही खडे तसेच राहिले असतील तर, ते सुद्धा हाताने कुस्करून टाकले जात असत. हल्ली मी चिंच सरळ दोन मिनिटं पाण्यात घालून शिजवून घेते, झटपट काम आणि बाधायची शक्यता कमी. तब्बेतीच्या तक्रारीमुळे केलेला उपाय. 
                      अशी ही सगळी पूर्व तयारी झाली की खऱ्या अर्थाने भेळ तयार करण्याला सुरुवात होत असे. सगळ्यात आधी त्या मोठ्ठ्या परातीत किंवा घमेलीत, सगळ्यांकडून आलेले निरनिराळ्या प्रकारचे शेव आणि चिवडा घातले जात असतं. त्याचे प्रमाण बघून घरातील शेव, चिवडा, पपडी वगैरे हवे त्या प्रमाणात घातले जात. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेव आणि चिवड्यामुळे भेळेला एक वेगळीच स्वादिष्ट चव येत असे. खूपच छान! मंदिरातील गोपाळकाल्या सारखी! या गोपाळकाल्याची गोष्ट, नंतर एखाद्या खास लेखात सांगेन. हल्ली मला अशी भेळेची चव अनुभवायला मिळत नाही, कारण माझ्या कडे असे विविध प्रकारचे शेव आणि चिवडा नसतात. यानंतर वेळ येते ती यात मुरमुरे टाकायची. घरातील बाकी धान्य जसे वर्षभरासाठी कोठ्यातून भरून ठेवलेली असतं तसेच एका कोठीत वर्षभरासाठी मुरमुरे सुद्धा भरून ठेवलेले असतं. मग या कोठीतून एक मोठ्ठ भांड भरून मुरमुरे काढून आणले जात, भेळेत घालण्यासाठी. त्यानंतर त्यावर आधीच चिरून ठेवलेला कांदा, टमाटे घालून वर चिंच आणि गुळाचे पाणी, तिखट, काळे मीठ, साधे मीठ आणि वर भरपूर कोथिंबीर घातली जाई. 
                        हे सगळं चालू असतांनाच भेळेची चव जिभेवर तराळयाला लागलेली असे. कधी एकदा खायला मिळते असे होऊन जाई. आता लिहिता लिहिताही जिभेवर चव आली भेळेची आणि लगेचच खायला मिळावी असे वाटू लागले. तर हे सगळे एकत्र छान कालविणे म्हणजे सुद्धा एक मोठ्ठे काम असे, कारण प्रमाण. काही मिनिटं नक्कीच लागत कालवायला. मात्र कालवून झाले की भेळ पूर्णपणे तय्यार, खाण्यासाठी! आजच्या भाषेत ready to eat! मग आधीच काढून ठेवलेल्या स्टीलच्या ताटल्यांमध्ये वाढली जाई सगळ्यांसाठी आणि त्यात चमचे घालून दिली जाई. आम्ही हातात ताटली मिळाली तरी तिथेच बसत असू, ताटलीतील भेळ संपली की लगेच घेता यावी म्हणून. बाकी मोठ्या मंडळी पैकी ज्यांना जास्त तिखट हवी असे त्यांच्यासाठी थोडे जास्त तिखट टाकले जाई वरून . कधीकधी तर आम्ही त्या पराती भोवतीच गोल करून बसत असू आणि सगळे मस्त एकत्रच खात असू, अगदी हल्ला बोल, एकदम धम्माल! अगदी पोट फुटेपर्यंत खात असू.  
                         हल्ली अगदी साग्रसंगीत भेळ केली जाते. पुदिना चटणी, चाट मसाला आणि काय काय घातले जाते. चव छान व्हावी, पौष्टिक व्हावी म्हणून.  पण ती चव येत नाही भेळेला, ती धम्माल आणि तो आनंदही अनुभवता येत नाही. कारण ती फक्त भेळेची चव नसे, त्या वातावरणाची, त्या माणसांची, त्या सहवासाची सुद्धा चव त्या भेळेत मिसळली जात असे. आता सगळेच लांब लांब राहतात, त्यामुळे भेटणे, सहवास फारच दुर्मिळ झालाय. या लिखाणाच्या निमित्ताने मला नीट कळलंय भेळेचीच नाही तर सगळ्याच पदार्थांची चव कुठे हरवलीय ते. असो. 
                     भेळेचीच गोष्ट इतकी लांबलचक झाली की बाकी पदार्थांच्या गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या. तर मग भेटू अशाच पुढच्या चटपटीत भागात, बाकी पदार्थांच्या छान चमचमीत गोष्टींसोबत!

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
१जुलै २०२१

आमची शान! 
आमचे शास्त्री टॉवर!! 
जय जवान, जय किसान!!! 


चिरलेले तमाटे 







हीच ती आमची मोठ्ठी परात


मूरमूरे

तयार भेळ!!! 


Comments

  1. :) खूप छान..
    कुठलीही गोष्ट असो सारखीच आणि वारंवार मिळू लागली की त्यातील खरी मजा , खरा आनंद निघून जातो..हे अगदी खरं.. या पिढीला तर औत्सुक्य काय हेच माहीत नाही..

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय! त्यांना त्यातील मजा कधीच कळणार नाही, असो
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  2. खूप छान वर्णन केलेस ग, विशेषतः भेळ बनवण्याची क्रिया .. अगदी तोंडात भेळची चव अली बघ.🤤

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे चटपटीत धन्यवाद 🙏 😉😉

      Delete
  3. फारच सुंदर लेख. मी अजूनही दिवाळी नंतर भेळ चा आनंद घेत असते. तु म्हटल्याप्रमाणे खुप आपल्या लोकांचा सहवास नसतो.बाहेर ठेल्यावर जाऊन खायची इच्छा होत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. मी मात्र दिवाळी नंतरच्या भेळेची चव खूप वर्षात चाखली नाहीये..
      N m missing it very badly..

      Delete
  4. पुर्ण मेळची सर्व रेसिपी सागितली आहेस .त्यावेळीची चव आणि आनंद मिळणार नाही. खुपच छानच वर्णन केले आहेस. . ... सौ.मंदा चौधरी.

    ReplyDelete
    Replies
    1. काहीही झाले तरी ती तुझ्या हातची भेळ आहे! जशी तीची चव छान असे, तसेच तीचे वर्णन सुद्धा छान होणारच!
      So all credit goes to u only! Tons of love 😍

      Delete
  5. जनार्दन चौधरीJuly 30, 2021 12:23 pm

    अजूनही दिवाळी नंतर भेळ चा कारयक्रम दोन तिन वेळा होत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. पण हल्ली बर्‍याच वर्षापासुन मला त्यात सहभागी होता येत नाही ना 😭

      Delete
  6. Agadi bhela kart asun khat asalyace vatale
    Khup mast ahe

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर वाचून खर तर तोंडाला पाणी सुटले राव खूप सुंदर वर्णन सगळे पदार्थ समोर आले आणि आणखीन भूक वाढली दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आता जेवण सोडून भेळ खावीशी वाटत आहे. मस्त ताई एकदम खुसखुशीत कथा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. पुढच्या शुक्रवार पासून नियम कर डबा खाऊन झाल्यावर लेख वाचायचा.
      म्हणजे डब्यातील जेवणाचा आस्वाद घेता येईल अणि नंतर लेखाचाही छान आस्वाद घेता येईल 😂 😁😜धन्यवाद 🙏

      Delete
  8. खुपच‌‌ मस्त चाट कोपरा..लेखही चटपटीत झालाय..पापु(पाणीपुरी) ,भेळ,रगडा‌पैटीस इ मालाही आवडतात..पुणेरी सारसबागेची भेळ,3 बागेतील सोलापुरी भेळीचीचव खुपवेळा चाखलीय.पण खानदेशातील भेळकृती ही पहिल्यांदाच पाहिली.Bhel Besties Momentsचे वर्णनही मस्तच.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान! खर तर हा अजून एक वेगळा विषय आहे, यावर पण लिहिण्याचा मानस आहे, बघू या कसे जमते ते
      खूप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  9. Tondala panich sutale 😋chan varnan
    Tyavelala Ji chav bhella yaichi ti atta yet nahi tyat kuthalehi masala taka
    Lekhhi chatpatit👌

    ReplyDelete
  10. Prajkta DongareJuly 31, 2021 4:09 pm

    Sundar tondala pani sutale�� kharay tya weli bhel agadich kadhitari hot asayachi pan majja yayachi... Aata kahihi ghatale tari bhel tashi hotach nahi... Mi ajunahi diwali ani gaurichya nantar bhej awarjun karat asate

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छानच! सगळे जण अजूनही त्या परंपरा पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात!
      खूपच छान वाटते, आनंद वाटतो!
      ही भेळ चिरायू होवो हीच मनोमन इच्छा!! ❤

      Delete
  11. खुप छान वर्णन केले आहे भेळेचे .तोंडाला पाणी सुटलेले आहे.👌👌

    ReplyDelete
  12. Khupch Chan 👌👌 chatpatit lekh mast

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...