गोष्टी अनुभवलेल्या - ३ (काही अनुभवलेलं...) लहान असल्यापासून घरात सगळ्या मोठ्या लोकांचे या ना त्या प्रकारचे व्यायाम बघत आलेय . त्यामुळे अगदी लहानपणापासून मनावर व्यायामाचे संस्कार होत होते . त्यापैकी मुख्य म्हणजे चालणे . बाबा (माझे आजोबा ) भल्या पहाटे ५ वाजता उठून फिरायला जात नव्या पेठेतल्या घरापासून ते थेट ओंकारश्वराच्या मंदिरापर्यंत ! तेव्हा फारशी वस्ती नसल्याने मुख्य रस्त्यावरूनच मंदिर दिसत असे . मग मुख्य रस्त्यावरूनच नमस्कार करायचा आणि तेथूनच परतायचे . असा त्यांचा नेम . मग शाळेला सुट्टी लागली की आम्ही बहिणी सुद्धा जात असू त्यांच्या सोबत . मग मोठी होत गेले तशी माझ्या बदलत्या वेळापत्रकानुसार आणि घरातल्यांच्या वेळापत्रकानुसार मी काही काळ माझ्या नानांसोबत (माझे सगळ्यात लहान काका) , दादांसोबत (माझे वडील) सुद्धा सकाळी फिरायला जात असे . तेव्हा फिरायला जाणे असाच शब्द प्रचलित होता . अजून मॉर्निंग वॉक चा प्रवेश झालेला नव्हता ....