Skip to main content

खजीना -४( घरातील गमती जमती )

 खजीना -४

(घरातील गमती जमती)

                                आज खास खजिन्याची गोष्ट! सगळ्यांच्या मना-हृदयापेक्षाही, पोटाच्या आणि जीभेच्या जीव्हाळ्याच्या खजीन्याची गोष्ट! अर्थातच स्वयंपाक घरातील खास कपाटातील खजीना. 
                                 तर हे आमचे स्वयंपाक घरातील कपाट सुद्धा भिंतीतच होते, होते म्हणण्यापेक्षा अजुनही आहे ते . या कपाटाचे मुख्य तीन भाग. सगळ्यात वरच्या भागाला दोन सरकत्या काचेची दारं, मधल्या भागात उघडणारी तीन दारं, त्यापैकी प्रत्येक दाराला मध्यभागी एक एक छोटी जाळी होती. सगळ्यात खालच्या भागाला दोन सरकती लाकडाची दारं. 
                                 वरच्या भागापासुन सुरुवात करते. आता या भागाला सरकत्या काचा म्हणजे अर्थातच हा भाग म्हणजे शोकेस, घरातील एकमेव आणि छोटीशी! पण खुप छान छान आणि अगदी अमुल्य खजीना होता त्यात. मी तर कायमच रमत असे ह्या भागात, अजुनही रमते! चला तर मग तुम्हालाही दाखवते एक एक करून, हा खजीना. तर यात एक सुंदर सहा कप आणि सहा बशा असा एक संच होता, अगदी छान, आज आपण म्हणतो ना अगदी रॉयल, तसा. पांढऱ्या रंगाचा, पण त्यावर खुप सुंदर नक्षी होती, छान तेजस्वी गुलाबी रंगाची आणि त्यात सोनेरी रंगाचे थोडे काम असलेले. बश्या नेहमीसारख्याच होत्या गोल. पण कप मात्र खुप खास, आणि माझ्या एकदम आवडीचे! आकाराने बऱ्यापैकी मोठ्ठे, नेहमीच्या कपांपेक्षा बरेच पसरट आणि त्या मानाने उंची कमी. मी बऱ्याच वर्षांपासुन तसे कप शोधत होते, पण मला आजतागायत मिळाले नाहीत. आणि आता लिहायला बसले, तेव्हा लक्षात आले, आता ते कप तसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर उभेच राहात नाहीये! तसेच कप मिळवायच्या नादात, आता त्या कपाचे बरेच बारकावे, मी पार विसरूनच गेले आहे. गम्मत म्हणजे त्या कपातुन मी कधीही काहीही प्यायल्याने आठवत नाहीये! कारण हे कप फक्त काही खुप खास पाहुणे येत, तेव्हाच ते वापरले जात. बाकी वेळ ते शोभा वाढविण्याचे काम करत. दुसरा अजुन एक संच होता कप आणि बश्यांचा. हा मात्र संपुर्ण पांढरा, फक्त कप आणि बशीच्या कडेवर एक एक सोनेरी रेषेची किनार होती. आता अर्थातच यातील काहीही शिल्लक नाही आणि केव्हा आणि कसे कसे, काय काय फुटले तेही आठवत नाहीये. 
                                 मला आजही खुप सोस! वेगवेगळ्या आकाराचे, मापाचे, रंगाचे कप, मग जमा करण्याचा! आता माझ्या संग्रहात असे बरेच कप/मग जमा झालेले आहेत. कुठेही प्रदर्शनात, सुपर मार्केट मध्ये गेले की या मातीच्या भांड्यांच्या (crockery) विभागात गेल्याशिवाय मला चैनच पडत नाही. प्रत्येक वेळी काही खरेदी करेनच असे नाही, पण हा विभाग न्याहाळण्यात सुद्धा मला एक परमोच्च कोटीचा आनंद मिळतो! बऱ्याचदा मी विचार करते, किती मजेशीर आहे माझी ही आवड! या गोष्टी जमा करण्याचा नाद आहे. पण त्याचा वापर अगदी शुन्य म्हटला तरी चालण्यासारखे आहे. कारण चहा पिणे तर बाजुलाच, पण मला चहाचा वास सुद्धा सहन होत नाही, लगेचच माझ्या पोटात डचमळायला लागते. कॉफीचे म्हणाल, तर ती लहर फारच कधीतरी येते. त्यामुळे हे सगळे कप-मग फक्त डोळ्याला आणि मनाला आनंद देण्याचे काम करतात! अगदी मन भरून येते माझे या सगळ्या संग्रहाकडे पाहून! 
                               अजुन एक खास गोष्ट म्हणजे एक खास प्रकारच्या सहा चीनी मातीच्या डीशचा संच होता. या डीश, मधल्या बाजूला छान खोल आणि त्यांची कडा बरीच पसरट होती. त्यात कितीही गरम किंवा उकळता पदार्थ असला तरी, नीट उचलता येत असे, हाताला जराही चटका न बसता! या फक्त खास दिवशीच बाहेर पडत या कपाटाच्या, पण घरातीलच सदस्त्यांसाठी! ज्या दिवशी म्हणण्यापेक्षा, ज्या रविवारी बडा खाना असेल, त्या दिवशी. आम्हा मुलांना फार आवडे त्यात जेवण करायला. पण त्या सुद्धा सगळ्यांना पुरतील इतक्या नव्हत्या. त्यामुळे आईस्क्रीमच्या बाउल प्रमाणेच, या डीशच्या बाबतीत सुद्धा तसेच होत असे. एक लहान भावंडं वाढलं की एका मोठ्या भावंडाला ही डीश मिळत नसे, साध्या स्टीलच्या ताटात जेवावे लागे. नंतर हळुहळु करत एक एक डीश फुटल्या. आता अर्थातच त्यातील एकही डीश शिल्लक नाही. मला मात्र मध्यंतरी या आकाराच्या दोन डीश मिळाल्या, फक्त त्यावर एक छोटीशी नक्षी छापलेली आहे. 
                              या सोबतच एक काचेच्या पेल्यांचा संच होता. हा मात्र खास कारणाने, खास पाहुण्यांसाठी बाहेर निघत असे. बऱ्याच वेळा, चहा-पोह्यांच्या कार्यक्रमासाठीच! चौधरी सदनात राहात असतांना बऱ्याच नातेवाईक मंडळींचे चहा-पोह्यांचे कार्यक्रम होत असतं, अगदी वरचेवर. हे पेले म्हणजे पारदर्शक, त्यावर कुठलीही नक्षी वगैरे नव्हती हे नक्की, पण नक्की आकार नाही आठवत. यासोबतच आईस्क्रीम पार्टी लेखात उल्लेख आलेले, आईस्क्रीम खायचे खास बाउल होते. आमच्या एकदम आवडीचे! हे सुद्धा वर्षातून एकदाचा बाहेर निघत, आईस्क्रीम पार्टीच्या दिवशी!!
                              आणखी एक खास गोष्ट! ही बहुतेक सगळ्यांच्याच घरात असे तेव्हा, पण माझ्या खुप आवडीची! ती म्हणजे संत्री-मोसंबीचे हाताने रस काढण्याचे काचेचे यंत्र. किती छान आणि सोयीचे असे हे! रस काढायला सोप्पे आणि परत रस काढून झाल्यावर पेल्यात ओतायलाही सोप्पे आणि हे करतांना त्यातील बिया मात्र बरोब्बर, त्यात असलेल्या कंगोऱ्यांमध्ये अडकून बसत आणि गरासहीत रस ग्लासमध्ये पडे! आता कितीतरी नवीन नवीन विजेरी यंत्र आलीत, पण त्यात एकतर बिया सुद्धा चिरडल्या जातात, त्यामुळे रस कडू लागतो आणि दुसरे म्हणजे गर जाळीतच अडकुन  पडतो त्यामुळे महत्वाचा भाग आपल्या पोटात जातच नाही. तेव्हा, आजच्यासारखी सगळी फळं मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतं आणि फार महाग सुद्धा असतं. पण घरात कुणी आजारी असले, की मात्र मोसंबी आणि डाळिंबं हमखास आणली जात. तेव्हा ती छान गोडच असतं! हल्ली खुप प्रमाणात उपलब्ध असतात, पण एकतर चवच नसते किंवा एकदम आंबट असतात. 
                            या सगळ्या झाल्या कामाच्या वस्तु. या व्यतिरिक्त फक्त प्रदर्शन किंवा शोभेसाठी ठेवलेल्या सुद्धा काही वस्तु होत्या . त्यापैकी सगळ्यात खास आणि सगळ्यांचा लाडका, एअर इंडियाचा महाराजा! त्याकाळी बऱ्याच ठीकाणी दिसत असे हा महाराजा. आता मात्र सगळीकडूनच हद्दपार झालाय. पण तरी अजूनही सगळ्यांच्या मनात मात्र त्याचे एक खास स्थान आहे, अगदी माझ्याही! काही प्राणी आणि पक्षी होते चीनी मातीचे. हळदी कुंकवाचे वाण म्हणुन आणलेले, त्यातील शिल्लक राहीलेले . तसेच घराच्या साठी म्हणुन आणलेले. कोंबडा, चिमणी, बदक, हत्ती, हरीण, कुत्रा, कबुतर, कासव, ससा. तसेच त्याकाळी एक वैशिष्ट्यपुर्ण मारवाडी शेठ-शेठाणीच्या दोन बाहुल्या मिळतं, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या असतं, आतुन पुर्ण पोकळ असतं. वजनाला एकदम हलक्या. पण दिसायला एकदम भारदस्त! बऱ्याच जणांच्या घरी असतं. तशा आमच्या घरी सुद्धा होत्या. मारवाडी शेठ म्हणजे एक कोट आणि पायजम्यासारखी थोडी सैल पँट घातलेले, याशिवाय डोक्यावर एक गोलाकार टोपी. शेठाणी म्हणजे उलट्या पदराची साडी नेसुन, पदर डोक्यावर घेतलेला. शिवाय दोघेही एकदम धष्टपुष्ट. पण खुपच गोड दिसत, मला तर फारच आवडतं! 
                           हा सगळा झाला काचेच्या सरकत्या दरवाज्याचा म्हणजे शोभेचा भाग. याच्या खाली लागुनच जो भाग होता, त्याला तीन उघडणारी, जाळी असलेली दार होती. तेव्हा घरात शीतकपाट नसल्याने, हा भाग अतिशय महत्वाचा होता. शीतकपाटाचे काही प्रमाणात काम, ही जाळीची कपाटं करीत असतं. बहुतेक प्रत्येक घरात असतंच अशी जाळीची कपाटं, वेगवेगळ्या मापाची, कधी भिंती मध्येच तर कधी लाकडी कपाट आणि त्याच्या दाराला छोट्या छोट्या जाळ्या किंवा पूर्ण जाळीचे दार. तर यापैकी एका भागात दुधाची भांडी, ताजे आणि शिळे शिल्लक असेल तर तेही. त्यानंतर सायीचे साठवणुकीचे भांडे, अर्थातच त्यात विरजण लावलेले असे. (शीत कपाट नसल्याने विरजण लावणे अगदी गरजेचे अन्यथा साय नासून जाणार.)  ताक केल्यावर, एखाद्या सांजेपुरते ठेवलेले शिल्लक ताक. हे सुद्धा लगेच दुसऱ्या सांजेला वापरावे लागे अन्यथा ते सुद्धा बोसन (खराब) होऊन जाणार. यासोबतच एक तुपाचा मोठा डबा. अशा या सगळ्या गोष्टी साधारण डावीकडील म्हणजे सगळ्यात हवेशीर बाजुला ठेवलेल्या असतं. 
                         आता दुसरा म्हणजे मधला कप्पा, जाळीचे दार असलेला. या भागात रोजच्या वापराची छोटी तूप आणि तेलाची स्टीलची भांडी(शकुंतला भांडी-या भांड्यांचे हे नाव मला अलीकडेच कळले. आम्ही त्याला सरळ तेलाचे आणि तुपाचे भांडे म्हणत असू). तसेच सोबत एक कोरड्या चटणीची अलुमिनिअमची बरणी.(खरं तर त्याला डबा म्हणावं की बरणी, हा प्रश्नच आहे मला. कारण त्याचा आकार आणि त्याचे झाकण. पुर्वी कडी असलेल्या स्टील किंवा अलुमिनिअमच्या बरणीला जसे, तिच्या तोंडाच्या आत घट्ट बसणारे झाकण असे, तसेच याला सुद्धा होते पण कडी मात्र नव्हती.) आता मात्र हा डबा नाही बहुतेक. त्यानंतर या भागात दोन्ही मीठाचे डबे असतं. दोन्ही मीठ म्हणजे एक खडी मीठ, ज्याला आम्ही जाडं मीठ म्हणतं असु आणि दुसरे म्हणजे बारीक मीठ. जाड मीठाचा, एक अर्धपारदर्शक किंवा दुधीपांढरा रंगाचा डबा होता. हे मीठ अन्न शिजवतांना वापरले जात असे. बारीक मिठाचा मात्र लाकडी डबा होता, लाकडाचं झाकण असलेला. हे झाकण घट्ट बसणारे नव्हते, फक्त त्यावर ठेवायचे होते. हवामान कायम उष्ण त्यामुळे मीठ ओले होणे वगैरे शक्यता नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लाकडी असल्याने त्यात जर थोडा ओलावा आला तर ते या लाकडात शोषले जात असे. हल्ली मात्र अशा प्रकारचा डबा मी कुठे पाहिल्याचे आठवत नाही. सगळ्यांच्या स्वयंपाक घरातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा! मसाल्याचा स्टील चा डबा सुद्धा या भागात ठेवलेला असे. आणि आमच्या दृष्टीने सगळ्यात चित्तवेधक आणि आकर्षुन घेणारी गोष्ट म्हणजे लोणच्याचे सट. कैरी आणि लिंबु लोणच्याचे दोन काचेचे सट असतं. पैकी आम्हाला लिंबु लोणच्यात जराही रस नसे तेव्हा. आता मात्र मला लिंबूचच लोणचं  जास्त आवडते. पण कैरीचं  लोणचं म्हणजे अगदी जीव की प्राण, त्याची कायम चोरी करत असु. तेव्हढेच नाही तर चोरून चोरून बाथरूम मध्ये जाऊन ती लोणच्याची फोड नळाखाली धुऊन टाकुन मग खात असु. त्यानंतर लोणचं धुतल्याची चोरी उघडकीस आली की मम्मीचा प्रचंड ओरडा सुद्धा खात असु, अगदी प्रत्येक वेळी. कारण लोणचं धुऊन पटकन खायची घाई. दोन कारण, कुणाचे लक्ष जाऊ नये आणि दुसरे म्हणजे खायची घाई! या सगळ्या गडबडीत बाथरूम मध्ये पाणी टाकुन, बाथरूम साफ करण्याचे भानच राहात नसे. त्यामुळे चोरी हमखास पकडली जात असे. तसेच कोरडी चटणी म्हणजे सुद्धा जीव की प्राण, पण ही सुद्धा नेहमी मिळत नसे . खरंतर तेव्हा आम्ही कोरडी चटणी हा शब्द कधीच वापरत नसु. आम्ही त्याला 'तिखट' म्हणत असू. आमच्या दृष्टीने, चटणी म्हणजे ओली किंवा पातळ म्हणजे पाणी घालून केलेली!
                        राहता राहीला तिसरा भाग हा भाग म्हणजे आमचा कधी खुप खुप आवडता असे, तर कधी कधी एकदम नावडता असे! त्यात त्यावेळी काय आहे, यावरून हे ठरत असे . कारण या भागात जेवण झाल्यावर शिल्लक राहीलेले पदार्थ ठेवले जात असतं. म्हणजे भाजी, चटणी, कढी वगैरे वगैरे वेगवेगळ्या मापाच्या स्टीलच्या भांड्यात किंवा वाटीत. तसेच डुल्ली/दुल्ली(दुरडी)  सुद्धा या भागात ठेवलेली असे.  डुल्ली/दुल्ली म्हणजे एक प्रकारची टोपली असते, पण वीण थोडी वेगळी. हीचा वापर पोळ्या, भाकरी ठेवण्यासाठी केला जात असे. मग यात शिल्लक राहिलेल्या पोळ्या, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, कळण्याच्या भाकरी, मेथीची भाकरी/पोळी, भोपळ्याचे(दुधीचे) धपाटे, गोड दशम्या, तिखट दशम्या असे काय काय ठेवलेले असे. या पैकी पोळ्या आणि ज्वारीच्या भाकरी सोडुन बाकी सगळे आमच्या खुप आवडीचे, इतके, की ते शिळे असले तरी त्यासाठी आमची भांडणं होत. या व्यतिरीक्त खिचडी, चुकून माकुन शिल्लक राहिलेली इडली, ढोकळे, भेंडके, दाथर वडे, बट्ट्या, येढण्या, असा काय काय खजिना असे. आणि हे सगळे असले की हा भाग एकदम आवडता. पण त्यात नावडते पदार्थ असले आणि ते सक्तीने खावे लागणार असेल, तर मात्र हा भाग एकदम नावडता होऊन जात असे. 
                      सगळ्यात खालचा भाग म्हणजे लाकडी सरकते दरवाजे असलेला भाग. उघडल्यावर यात उंचीत दोन भाग केलेले होते. पैकी खालचा भाग उंचीला बराच जास्त म्हणजे साधारण पूर्ण उंचीच्या दोन तृतीयांश  आणि वरचा भाग मात्र कमी उंचीचा म्हणजे उरलेला एक तृतीयांश. तर या खालच्या भागात डबे असत, रोजच्या रोज लागणारे जिन्नसांचे, म्हणजे तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, गुळ, साखर वगैरे वगैरे. या सगळ्यात मला जराही रस नसे. पण वरचा छोटा भाग मात्र एकदम मनोवेधक आणि चित्तवेधक, माझ्या खूपच आवडीचा. कारण त्यात तऱ्हेतऱ्हेचा खजिना भरलेला असे . छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या बरण्या आणि डब्यांमध्ये. हा खजिना म्हणजे सगळ्या प्रकारचा खडा मसाला आणि काळं खडी मीठ. हे काळं मीठ आम्हाला फारच आवडे खायला नुसतेच. तो डबा काढला की एक एक छोटा छोटा खडा आम्हाला हवाच असे आणि तो मिळे सुद्धा! मात्र खडा मसाला शब्द तेव्हा माहिती नव्हता. यापैकी काही मसाल्याच्या पदार्थांना आम्ही, आमची अशी काही खास नावं दिली होती. खरी नावं माहिती नव्हती आणि सांगितली तर ती लक्षात सुद्धा राहात नसतं. अजुनही मला ह्यापैकी बऱ्याच पदार्थांची नाव नीट माहिती नाही, पण आम्ही दिलेलीच नावं मात्र लगेच जीभेवर येतात. 
                           हा खडा मसाला दररोज लागत नसे. काही खास कारणानेच बाहेर काढला जात असे. उदा. बडा खाना असेल त्यादिवशी, शेवाची, पातोड्यांची, शेवग्याच्या शेंगांची, कच्च्या मसाल्याची किंवा अशाच काही खास भाज्या होणार असतील, तरच हा खडा मसाला लागत असे. जेव्हा जेव्हा खडा मसाला काढला जात असे तेव्हा तो बघायला तर मला खुप आवडेच, पण त्यातील काही पदार्थ आम्हाला खायला सुद्धा आवडतं. त्यातल्या त्यात 'झाडाची साल' खायला आम्हाला फार आवडे. हे खास आम्ही दिलेले नाव. अर्थातच ती असतेच झाडाची साल, पण त्याच खरं नाव दालचिनी. तसेच झुरळ म्हणजे जायपत्री, पानं म्हणजे तेजपान किंवा तेजपत्ता, फुल म्हणजे   चक्रीफुल. यापैकी आम्हाला झाडाची साल तर आवडेच खायला. तसेच या कप्प्यात काळ्या मिठाची सुद्धा बरणी असे. याचे सुद्धा आमचे असे एक खास नाव होते, 'पाद्र मीठ!' 
                         पण त्यापेक्षा आवडीचे आणि अतिशय गंमतशीर आणि रोमांचकारी म्हणजे "अक्कलकरे". हे जाम आवडत खायला. एकदा का ते दिसले की कधी खातो आणि कधी नाही असे होई. पण हातात घेतले की खावे की नाही, असा गोंधळ उडे! कारण खाऊन झाल्यावर तोंडात जी काय जाणीव होते, ती अनुभवावीशी पण वाटे आणि नकोशी सुद्धा! अक्कलकरे खाल्ले की तोंडात एक वेगळीच जाणीव आणि संवेदना अनुभवास येते. आम्ही याला "तोंडाला मुंग्या आल्या" असे म्हणत असू . आणि एकदा का ही जाणीव तोंडात आली की ती कशानेही जाता जात नाही. तुम्ही पाणी प्या, साखर खा, लोणचं खा, पोळी, भाकरी, भात, मुखशुद्धी खा, कशा कशानेही ती जाणीव जात नाही. थोडा वेळ जावा लागतो, मग थोडी थोडी कमी होत, नाहीशी होते, आपोआप! मजेशीर आहे हा सगळा प्रकार. ज्यांनी खाल्ले आहे त्यांना, वाचतांना सुद्धा तोंडात मुंग्या आल्या असतील. ज्यांनी खाऊन पाहीले नाही, त्यांनी मात्र नक्की एकदा खाऊन पहाच, म्हणजे तोंडात मुंग्या कशा येतात ते नीट कळेल आणि अनुभव घेता येईल. झाडावरचा ओला खा किंवा  वाळवलेला खा. पण एकदा नक्की अनुभव घ्या आणि मुंग्या आल्या की लगेचच मला कळवा आणि सविस्तर सांगा तुम्हाला कसे वाटले. उडीद पापड आणि साय आणि पुढील प्रवास या लेखात अक्कलकऱ्याचा   उल्लेख आलेला आहे . त्या त्या वेळी मला बऱ्याच लोकांनी विचारले त्याबद्दल! म्हणून आज त्याची ही सविस्तर माहीती. खाली फोटो सुद्धा दिले आहेत. मी आता बऱ्याच वर्षात हे तोंडात "मुंग्या येणे" अनुभवले नाहीये. पण आता मलाही घाई झालीय, कधी एकदा माझ्या "तोंडाला मुंग्या येतात" याची!

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
९ऑक्टो २०२०


सध्या माझ्याकडे असलेली डीश 



तेव्हा आमच्याकडे साधारण अशी डीश होती 




आता माझ्याकडे हा पिल्लु मग आणि हा जायंट मग मधील 
वेगवेगळ्या मापाचे आणि आकाराचे बरेच मग कप आहे 😀😆



सध्या माझ्याकडे असलेले आईस्क्रीमचे बाउल 
 तेव्हा सुद्धा आमच्याकडे साधारण असेच बाउल होते 
फक्त मापाला थोडे छोटे . 



संत्री मोसंबीचे रस काढण्याचे यंत्र 



संत्री मोसंबीचे रस काढण्याचे यंत्र 



हा लाडका एअर इंडियाचा महाराजा !



कृत्रिम झाडं 





कासव 



ससा 


हत्ती 



लिंबू आणि कैरीच्या लोणच्याचे सट 



हल्लीचे वेगवेगळे आकाराचे लोणच्याचे सट 



हल्लीचे वेगवेगळे आकाराचे लोणच्याचे सट 



मसाल्याचे डबे 



मसाल्याचे डबे 



मसाल्याचे डबे 



मसाल्याचे डबे 



पोळ्या भाकरीची दुल्ली/डुल्ली (दुरडी)



पोळ्या भाकरीची दुल्ली/डुल्ली (दुरडी)




काळं मीठ 
आमच्या भाषेत पाद्र मीठ 



दालचीनी 
आमच्या भाषेत झाडाची साल 



तेजपान 
आमच्या भाषेत पानं 



चक्रीफुल 
आमच्या भाषेत फुलं 



जायपत्री 
आमच्या भाषेत झुरळ 😆



झाडावरील अक्कलकरे 



झाडावरील अक्कलकरे 



वाळलेले अक्कलकरे 




वाळलेले अक्कलकरे 
अक्कलकऱ्याचा एक उपयोग उडीद पापड या लेखात सांगितलाच आहे .
त्याबरोबरच गरम मसाला तयार करतांना त्यात सुद्धा घाले जातात . 
एक फारच महत्वाचा उपयोग म्हणजे मूल लहान असतांना बोबडे बोलत असेल 
तर त्याला खायला देतात , त्यामुळे त्याच्या बोलण्यात सुधारणा होते . 
यात बरेच औषधी गुण आहेत , त्यामुळे आयुर्वेदीक औषधात याचा 
वापर केला जातो . 


































Comments

  1. Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!!

      Delete
  2. खुप छान. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लोणचं धुवून खाण्याची मजा. अक्कलकरा खाण्यासाठी भांडण

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच लोणचं चोरून धुवून खाण्यात  मज्जा आहे ती बाकी कशातच नाही !😆😉😋🤤
      आणि अक्कलकऱ्याबद्दल काय बोलावे ! मी अलीकडेच घरी आले होते तेव्हा बऱ्याचवेळा खाल्ले आणि परत तो आनंद अनुभवला ! भारी वाटले एकदम , सोबत सगळेच होते अगदी मामा-मामीसकट , जाम धम्माल आली त्यामुळे !😇🤩💃💃

      Delete
  3. Kiti sunder sarv aathavani lihilya aahet tu v chan varnan pan kele aahe janu samor sarv pahat aahot ase vatate
    Sarv mahiti khup chan������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद !!!😍🥰

      Delete
  4. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏

      Delete
  5. Wawa chanch varnan .
    lekh vachatavachata khoop sara lonachi, vegvegala dashma, dathar vade ase anek padharth dolasamor aale tondat 😋tyachi chav sudha taralali.
    Varnan etake chan ki mi tey akelkarcha munga yenahi anubhavale😊

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम आणि स्नेहाळ धन्यवाद ! 🤩🥰😇

      Delete
  6. रंजना राणेJanuary 30, 2021 6:59 pm

    खुप खुप खुपच छान लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान मसाल्यांची नावे पण खूप छान दिली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खरचं ही मसाल्यांची नावं म्हणजे आमच्या बालपणातील आठवणींचा एक अमूल्य ठेवा आहे !🤩💃😇

      Delete
  7. खुपचं मस्त वर्णन आणि अप्रुप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम !!!खूप सारे धन्यवाद !🤩😍

      Delete
  8. अतिशय मार्मिक आणि गमतीदार विषय घेतला अक्कलकारा तर बहुतेक कोणालाच माहितीच नाही लहान मुलांना खाऊ घातले की त्यांचे उच्चार स्पष्ट निघण्यास मदत होते हे मी बर्‍याच जणांना लहान मुलांकरता सांगितला आहे पूर्ण किचन डोळ्यापुढे फिरू लागले

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय अक्कलकरा फारसा कुणाला माहीती नाही , बऱ्याच जणांची त्याबद्दल विचारणा केली  होती , त्यामुळे आता त्याबद्दल फोटो सहीत सविस्तर माहीती दिली . मनःपूर्वक धन्यवाद!🙏😊

      Delete
  9. असाच जिव्हाळ्याचा भिंतीतला कोनाडा म्हणजेच गोखला...
    लहान मुलांना खजिनाच सापडे तिथे...
    खालची माती वा चूना वस्तूंना लागू नये म्हणून चिंचोके, गोट्या, मुलींच्या खेळातील बिब्बे,झेले..
    व इतरही खुप काही..त्यावर कंगवे वा इतर उपयुक्त सामान..

    दुळ्ळी हा दुरडीचा वापरला जाणारा शब्द ..

    अक्कलकरं खाल्ली की अक्कल येते की नाही माहीत नाही पण जीभ मात्र चरचरते....पिवळी होते..

    सर्वच उल्लेख आठवणीत रमवणारे...

    धन्यवाद

    संजय कोल्हे
    चेंबूर मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. गोखला /कोनाडा म्हणजे माझ्या अगदी मनाच्या आवडीचा  जवळचा विषय !  आमच्या या घरात कोनाडे नव्हते , त्यामुळे त्याबद्दल लिहायला  संधी मिळाली नाही . पण पुढे केव्हातरी नक्की संधी मिळेल तेव्हा मात्र नक्कीच त्यावर भरभरून लिहेन ! मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  10. Khup chhan..varshali..tuzi prstyek vastuchi varnan karnyachi pafhat agadi mast..hubehub dolyasamor ubhe rahate..👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद !!🙏🤩

      Delete
  11. विकास पाटीलMay 25, 2021 7:07 pm

    ���� हं आठवलं आत्ता!

    बाकी आपलं लहानपण जवळपास सारखंच होतं.....

    ते जाळीचं कपाट!

    आमच्याकडे ३-३||फुटाचं जमीनीवरच ठेवलेलं होतं.
    ऊन्हाळ्यात
    दुपारच्यावेळी मी बऱ्याच दा शेजारच्या देव घरातली ऊदबत्तीची काडी घेऊ कपटाशेजारी गार फरशीवर आडवा पडून टाईमपास म्हणून ती अर्धवट बुजलेली छिद्रे साफ करत बसायचो������ हे पण आठवलं��

    काही पण टाईमपास शोधायचो आपण त्या काळी!



    मस्त लेख!

    खूप साठले की पुस्तक घ्या काढायला !

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे अनुभव एक एक भारी असतात , मला तर नेहमीच मज्जा येते ऐकायला , तुमच्याकडून ! पुस्तक छापायचे आपण नक्कीच मनावर घेऊया , आपली छान सॉलिड टीम कायमच सज्ज असते , नेहमीच आणि कायमच ! खूप सारे धन्यवाद !! feeling blessed !!😇😇😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...