Skip to main content

खास कामं आणि व्यक्ती - ४ (घरातील गमती जमती)

खास कामं आणि व्यक्ती-४

(घरातील गमती जमती)

                                   अगदी मागच्या पिढीपर्यंत माणसाचे जीवन, राहणीमान खुपच निरोगी आणि आरोग्यदायी होते. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे माणसाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते, असे मला वाटते. आधुनिकीकरणाच्या नादात माणुस सगळ्या कृत्रिम गोष्टी वापरू लागला आणि निसर्गापासुन दुर दुर जाऊ लागला. पर्यायाने आपले आरोग्य, निरोगी जीवनच गमावुन बसलाय. याचे एक उदाहरण म्हणजे नैसर्गिक कापसाच्या उशा, गाद्या, बैठका, लोड तक्के वापरायचे सोडुन, कुठल्या कुठल्या कृत्रीम गोष्टींपासुन बनवलेल्या उशा, गाद्या वापरायला सुरुवात केलीय आणि याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांचे दुखणे. 
हे सगळे इथेच थांबले नाहीत तर हे काम करणाऱ्यांना, काम मिळेनासे झाले. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न फारच बिकट होऊन बसलाय. पुर्वी म्हणजे माझ्या लहानपणी मात्र सगळे, उशा गाद्या वगैरे गोष्टी नैसर्गिक कापसाच्याच वापरात असत, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी या लोकांना काम मिळत असे. आज चौधरी सदनात होणाऱ्या याच सोहळ्याची गोष्ट सांगणार आहे मी. 
                                   तर तेव्हा आमच्याकडे सुद्धा सगळ्या गाद्या, उशा या नैसर्गिक कापसापासुन बनवलेल्या असतं. कापुस कधी आमच्याच शेतातील, तर कधी विकत आणलेला. गाद्या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या उशा, तक्के, लोड वगैरे म्हणजे त्या त्या आकाराच्या, कापडाच्या शिवलेल्या खोळीत भरलेला कापुस . या खोळी खराब होऊ नये म्हणुन, वरुन परत एक खोळ घातलेली असे . ही खोळ काढता येत असे धुण्यासाठी. त्यामुळे आतली खोळ स्वच्छ राहत असे. या सगळ्या गाद्या, उशा वापरुन वापरुन बारीक होऊन जात असतं. त्यांची आतली खोळ फाटुन जात असे. काहीवेळा कापुसच खुप जुना आणि खराब होऊन जात असे. अशा या वेगवेगळ्या कारणांनी या सगळ्या गाद्या, उशा उकलून परत नव्या बनवाव्या लागत असतं. हे काम ते पिंजारी काका करत असतं. 
                                  तर साधारण सगळ्या गाद्या, उशा खराब होणे म्हणजे कधी त्याच्या खोळी फाटुन जात आणि त्यातुन कापुस बाहेर येत असे. किंवा खुप वापरुन वापरुन त्यातील कापुस इकडे तिकडे सरकुन, काही ठिकाणी गादीला, उशीला खड्डे पडतं आणि तर काही ठिकाणी उंच टेंगुळ आल्यासारखे होत असे. त्यामुळे त्यावर झोपणे, बसणे किंवा लोळणे अवघड होऊन बसत असे. मग अशा वेळी त्या गाद्या आणि उश्यांसाठी सगळ्यात आधी नवीन खोळ शिवल्या जात असतं. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी दुपारी वगैरे नवीन गाद्यांचे काम होत असे. सुट्टी असल्याने रोजची गडबड जरा कमी असे. आणि सगळी पुरुष मंडळी घरात असतं. त्यांना या कामात लक्ष देता येत असे. दुपारी अशा करीता की, घराची भिंत आणि बाथरुमची भिंत या मधील मोकळ्या जागेत हे काम केले जात असे. या कामासाठी ही जागा एकदम कोरडी झालेली हवी असे. नाहीतर सगळं कापुस ओला होऊन खराब होण्याची शक्यता . कारण याच जागेत सकाळपासुन पाण्याची बरीचशी कामं होत असतं. एक म्हणजे बंबातील गरम पाणी बाथरुम मध्ये घेऊन जातांना, बादलीतुन सांडले जात असे काही वेळा. बाथरुममध्ये एकदम खुप पाणी सांडले तर ते सुद्धा बाहेर या जागेत येत असे, दाराच्या खालच्या फटीतुन. नंतर धुणं धुण्याचे काम आणि भांडी घासण्याची काम सुद्धा याच जागेत होत असे. ही सगळी कामं झाल्यावर सगळे पाणी खराट्याने झाडुन, ही जागा स्वच्छ आणि कोरडी केल्याशिवाय हे काम करताच येत नसे. स्वच्छ अशाकरीता की भांडे धुतांना खरगटे तर असेच, पण त्यावेळी भांडी बंबातील राखेने घासली जात असतं. त्यामुळे हे सगळे काळजीपुर्वक साफ करावे लागत असे . 
                                तसेच त्या पिंजारी काकांकडे, त्यांच्या आवाजाकडे लक्ष ठेवावे लागे. ते खालुन रस्त्यावरुन जातांना दिसले किंवा त्यांचा आवाज आला की त्यांना वर बोलवावे लागे. मग अर्थातच त्यांना सगळ्या कामाची कल्पना दिली जात असणार म्हणजे किती गाद्या, किती उशा, किती लोड, किती तक्के तसेच त्यांची मापं आणि त्यांचे आकार. मग त्यावरुन, त्यांचे किती पैसे होणार ठरत असणार. हे सगळे मात्र मला काही आठवत नाही. घरात पुरुष मंडळी असल्याने, ही मंडळी हे सगळे ठरवत असणार. 
                                 त्यानंतर घरातील गाद्या, उशा, लोड, तक्के वगैरे सगळे, या समोरच्या जागेत आणुन ठेवले जात असतं. त्यांच्या खोळी काढुन, त्यातील कापुस बाहेर काढला जात असे. त्यापैकी जो कापुस पुर्णपणे खराब झालेला असे, तो काढुन टाकला जात असे. ह्या गाद्या म्हणजे साधारण ज्या गादीवर घरातील लहान बाळं झोपत, त्या गाद्या असतं, त्यांच्या सू-सू ने सारख्या-सारख्या ओल्या झालेल्या. त्यांनतर चांगला असेल, तो कापुस स्वच्छ करायचा आणि पिंजायचा. तसेच नवीन भर टाकायचा असेल, तो कापुस सुद्धा स्वच्छ करायचा आणि पिंजायचा. पिंजणे हा शब्द खुप छोटा आणि सोप्पा वाटतो. पण हे काम खुप कष्टाचे आणि अतिशय त्रासदायक. डाव्या हातात धुनकी (कापुस पिंजण्याचे अवजार) धरायची आणि उजव्या हातात लाकडी जाड काठी घेऊन ती त्या धुनकीच्या  (अवजाराच्या) दोरीवर सतत आपटुन आपटुन कापसाचा प्रत्येक तंतु आणि तंतु पिंजुन काढायचा. ही धुनकी म्हणजे एक लांब लाकडाची काठी असते. त्याला एका टोकाला, साधारण लाकडी किंवा लोखंडी त्रिकोण बसवलेला असतो. या त्रिकोणापासुन ते या काठीच्या दुसऱ्या टोकापर्यंत एक चामड्याची दोरी बांधलेली असते. हे काम चालु असतांना त्या धुनकीच्या (अवजाराच्या) दोरीचा एक विशिष्ट आवाज होत असे, साधारण तय्याव तय्याव असा आणि त्या काठीचा, त्या दोरीवर आणि कापसावर ठोकल्यामुळे एक वेगळाच ठक ठक आवाज. तसेच हे काम चालु असले, की घरभर जुन्या आणि नव्या कापसाचा एक मिश्र वास भरुन राहत असे. दोन्ही हात अगदी तासंतास हे काम करत अगदी अखंडपणे. शारीरिक कष्ट तर खुप लागतंच या कामात. पण हे काम चालु असतांना तिथल्या वातावरणात सतत आणि खुप प्रमाणात त्या कापसाचे अगदी बारीक बारीक तंतु उडत असतं. इतके की थोडा वेळातच ते काका सुद्धा पांढरे शुभ्र दिसायला लागत. कारण हे कापसाचे तंतु उडुन त्यांच्या डोक्यावरच्या केसांत, भुवया आणि पापण्यांच्या केसांत आणि सर्वांगावरच चिकटुन बसतं. अगदी त्या चक्कीतील काकांच्या अंगावर पीठ चिकटुन बसत असे तसेच. पण या पांढऱ्या रंगाचे पोत मात्र अगदी वेगळे, छान मऊ मुलायम वाटे बघायला. हे सगळे पाहुन तेव्हा फारच मजा वाटे. पण आता कळतय आणि जाणीव होतेय किती त्यासदायक होते ते सगळे. त्या काकांना श्वास घ्यायला किती त्रास होत असेल ते. कारण ते त्यांचे काम असल्याने ते कायमच अशाच वातावरणात राहत असणार जास्त वेळ. 
                                हा सगळा कापुस पिंजुन झाला की वेळ येते ती, हा कापुस शिवुन तयार असलेल्या वेगवेगळ्या खोळी मध्ये भरण्याची. एकेका खोळी मध्ये कापुस भरुन ती खोळ भिंतीला टेकुन उभी करुन ठेवली जात असे. जेणेकरुन त्यात भरलेला कापुस सांडला जाणार नाही. हा कापूस खोळी मध्ये भरतांना सुद्धा खुप कष्ट पडत. कारण हा कापुस चांगला दाबुन दाबुन भरावा लागत असे. म्हणजे या गाद्या उशा खुप दिवस चांगल्या राहत असतं . सगळा कापुस, या सगळ्या खोळी मध्ये भरुन झाला की ती जागा बऱ्यापैकी मोकळी आणि स्वच्छ होत असे. 
                               त्यानंतर ते, त्या खोळीची उघडी बाजु शिवुन टाकत असतं. त्यांच्याकडे एक खास मोठ्ठी सुई असे. तसेच शिवण्यासाठी एक खास जाड आणि एकदम मजबुत दोरा. या सगळ्या खोळी शिवुन बंद केल्या की मग एक एक गादी किंवा उशी खाली जमिनीवर आडवी करुन ठेवतं आणि मग त्यावर त्यांच्या जवळ असलेल्या लाकडी जाड काठीने, सगळ्या बाजुने ठोकत असतं. हा गादी ठोकणे सोहळा सुद्धा पाहण्यासारखा असे. बघायला जरी मजा वाटतं असली तरी फार कष्टाचे काम असे हे सुद्धा. असे ठोकल्याने सगळा कापुस, कापुस सगळीकडे समसमान पसरतो आणि थोड्या प्रमाणात दाबलाही जातो. 
                                यापुढचे काम मात्र खुप शारीरिक कष्टाचे नसले तरी त्याला फार कौशल्य असावे लागते. ते काम म्हणजे टाके घालण्याचे.  हे काम फार काळजीपुर्वक करावे लागते. एक म्हणजे सगळे नीट समसमान अंतरावर हवेत आणि सगळे मापाला सारखे हवेत. तरच ते छान सुबक दिसतात. साध्या कापडाला टाके घालणे वेगळे आणि या खोळी मध्ये कापुस भरलेल्या सहा ते आठ इंच जाड गादीमध्ये टाके घालणे वेगळे. पण त्यांना छान जमत असे हे काम सुद्धा. हे टाके घातल्याने कापुस जागच्या जागी राहण्यास मदत होते. त्यामुळे तो हालत नाही इकडे तिकडे आणि गादीची जाडी सगळीकडे सारखीच राहते. झोपायला एकदम आरामदायक. सगळ्या गाद्यांना हे टाके घालावे लागतात. काही खास गोल किंवा चौकोनी छोट्या आकाराच्या उश्यांना मध्यभागी एक एक टाका घातला जातो. पण ह्या टाक्याचा उपयोग, कापुस एका जागी राहण्यापेक्षा, सौंदर्य दृष्टीने म्हणजे ती उशी छान दिसावी म्हणुन उपयोग होतो. लोड असतील तर त्याला टाके घालावे लागत नाही. पण या लोडची खोळ बाकी खोळी सारखी नसते . याला वर आणि खाली एक गोल आकाराचे कापड लावुन शिवलेले असते. एका बाजुचे आधीच मशीनवर शिवलेले असते आणि दुसऱ्या बाजुचे कापुस भरुन झाल्यावर हाताने शिवले जाते. अतिशय कौशल्याचे काम. पण ते अगदी सहजपणे आणि अतिशय सुबकपणे करत. 
                           मग त्या काकांचे सगळे काम झाले की हिशोब वगैरे होऊन ठरलेले पैसे दिले जात असतं. मग  ते सगळी आवरा आवर करीत. त्यांचे सगळे सामान नीट तपासुन घेऊन निघून जात. परत रस्त्याने त्यांच्या त्या धुनकीचा तय्याव तय्याव आवाज करीत, पुढचे काम मिळण्यासाठी. किंवा उशीर झाला तर घराच्या वाटेला लागत. आता हा व्यवसाय जवळजवळ पुर्णपणे नष्ट झाल्यातच जमा आहे . मोठमोठ्या कंपन्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गाद्या आणि उश्या तयार करुन विकतात. त्यामुळे या लोकांवर फारच वाईट दिवस आलेत. फार कमी लोक कापसाच्या गाद्या वापरतात. मी मात्र अजुनही कापसाचीच गादी वापरते. आता विजेरी यंत्र आलीत आणि ती बघायलाही मिळत नाहीत. दुकानात गेले की फक्त तयार गाद्या, उश्या बघायला मिळतात. 
                         इकडे ते काका गेले की आमची थोडी लुडबुड आणि मदत चालु होत असे. उश्या, लोड वगैरे आम्हाला जे उचलता येईल, ते उचलुन घरात घेऊन जात असु. पण आम्हाला जास्त स्वारस्य गाद्यांमध्ये असे. पण त्या काही आम्हाला उचलुन आणता येत नसतं. कुणी तरी मोठ्या मंडळी पैकी त्या घरात आणेपर्यंत आम्हाला वाट बघावी लागे. एकदा का त्या घरात आल्या की आम्हाला त्यावर उडया मारायच्या असतं. कारण नुकत्याच भरलेल्या गाद्या छान जाड जाड आणि गुबगुबीत असतं. त्यावर उड्या मारायला फारच मजा येत असे. एव्हढेच नाही तर रात्री त्या गुबगुबीत गाद्यांवर झोपतांनाही वाटे की आपण मस्त मऊशार ढगावरच तरंगतो आहे. अगदी क्लाऊड नाईन फीलिंग! त्या आनंदातच मस्त गाढ झोप लागे, त्या तरंगत्या ढगांवरच!!

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
७ डिसें २०२०


वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या उश्या 





वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या उश्या 
आणि लोड 



वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या उश्या



वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या उश्या



लोड 



कापुस पिंजण्याचे विजेरी मशीन 



कापुस पिंजण्याचे विजेरी मशीन 




कापुस पिंजण्याचे विजेरी मशीन 


https://youtu.be/zb7njA9QQ9k












Comments

  1. अगदी क्लाऊड नाईन फीलिंग !... Super....मलाही आमच्या लहानपणीचे ते दिवस आठवले, माझ्या मुळ गावी उदगीर जि. लातूर ला पण आणि अगदी 12 - 13 वर्षापूर्वी जळगावला पण ही मजा आम्ही घेतली आहे. फारच सुंदर... आपले मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. सर तुमचे खूप खूप प्रेम पूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला , अगदी खूप भाग्यवान असल्याचे वाटले !खुप सारे धन्यवाद!🙏😇

      Delete
  2. Khup chhan..dhunki ha shbda aata aeikayla pn milat Nahi ..aani aata sarw machinwar Ch hote..chhan watale June atthwun..👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. धूनकी , शब्द ऐकायचे सोडून दे .लिहायला बसले तेव्हा मला तर आठवेच ना सरांना विचारले , तेव्हा आठवला ! खूप धन्यवाद ! 😊😄

      Delete
  3. You are having all sweet memories.. गेले ते दिवस... फक्त अटवणी राहिल्या..how ever when we remember we get good pleasure.. आनंद वाटतो..R S Rade watching

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक स्वागत तुमचे या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद वाटला तुम्हाला इथे भेटून !🙏😇

      Delete
  4. Dhunki madhe tantu kase pinjun nightat yache varnan 👌
    Dhunki ha shabadh pan tasa navinch atta
    Gubgubit gada janu kahi mau tarangate dhag wa wa chan kalpana

    ReplyDelete
    Replies
    1. आभाळभर प्रेम ... .... .... कायमच !!😍😇

      Delete
  5. खूप छान ����मला या ushyana cover शिवायला आवडायचे. त्यामुळे मला मशीन चालवायला शिकले

    ReplyDelete
    Replies
    1. किती गोड आठवण ! धन्यवाद आम्हाला सांगितल्या बद्दल !😍🤩

      Delete
  6. खूपच सुंदर गाद्या बनवण्याचा उपक्रम पूर्वी घरोघरी असेच व्हायचे त्या गाद्या खूप मऊ असतात.आणि टिकाऊ असतात नवीन प्रकारच्या गाद्या निघाल्या त्या शारीरिक दृष्ट्या त्रासदायक आहे
    जुन्या आठवणींना नवीन उजाळा:-)

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय ! धन्यवाद !🙏😊

      Delete
  7. छान विस्तृत वर्णन....

    लहानपणी हे असे सोहळे सर्वांसाठी कामासोबतच मनोरंजन व‌ विरंगुळा असे...

    धन्यवाद

    संजय वसंत कोल्हे
    चेंबूर मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. हो अगदी खरंय ! काम चे काम होत असे आणि सोबत छान विरंगुळा , घरातील सगळ्यांसाठीच ! मनःपुर्वक धन्यवाद !🙏😊

      Delete
  8. Agadi samor sarv kam suru aahe kapus pinjanyache ase vatate likhan far sunder v chan aathavani pan mast����������

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या या सुंदर अभिप्रायासाठी , तसेच सुंदर सुंदर धन्यवाद !😍🤩🥰

      Delete
  9. अमोल चाफळकरJanuary 12, 2021 11:31 am

    छान ! तुझे लेख म्हणजे ललितअंगानं केलेलं दस्तरेवजिकरणच आहे. वाचणाऱ्या प्रत्येकाला त्यांचं बालपण, तो काळ, ती घरं, ती छोटी गावं, आठवायला लागतात. पण तू दिलेले बारिकसारिक तपशील खरंच कौतुकास्पद आहेत. स्मरणशक्ती जबरदस्त आहे तुझी.

    ReplyDelete
    Replies
    1. it means a lot ! खुप सारे धन्यवाद!!🙏😇

      Delete
  10. Khup chan aahet Donhi lekh
    kitti chan aathvani astat na... Wachun khup bare watale

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...