कौशल्य - सुताचे गोळे आणि वाती (वारसा स्पर्धा २) हे कौशल्य माझ्या आजीचे , वडिलांच्या आईचे . आता ती नाही या जगात , पण या सुताच्या गोळ्यांच्या आणि वरातीच्या रूपात मात्र कायमची आहे माझ्यासोबत . शेतातुन मुळ स्थितीत असेल , तसा कापूस येत असे तिच्याकडे , घराचा किंवा कोणी ओळखीच्या लोकांकडून . ज्यांना वाती हव्या आहेत ते किंवा ज्यांच्याकडे कापूस आहे ते , असे सगळे लोक तिला कापूस आणून देत , पुण्य्याचे काम वाटे लोकांना . मग ती आधी हाताने वेचून वेचून त्या कापसावरील सगळा अगदी बारीक बारीक कचरा सुद्धा काढून टाके . नंतर त्यातील एक एक करून सगळी सरकी(कापसाचे बी) काढून घेत असे . कधी कधी आम्हा मुलींना पण म्हणे , बघा बर , यात एखादी सरकी राहिली आहे का? मग आम्ही सुद्धा बघत असू . काय छान वाटे त्या मऊ-मुलायम कापसातून हात फिरवायला ! एकदा का सगळ्या सरकी क...