साय आणि पुढील प्रवास-१ (घरातील गमती जमती) साय, लोणी, तुप, बेरी माझे अगदी लहानपणापासुन खुप जिव्हाळ्याचे आणि मनाच्या अगदी जवळचे विषय! सकाळी ताजं दुध आले की अगदी बारीक आचेवर गरम करायचे. बारीक आचेवर गरम करण्याचे दोन फायदे, एक सगळ्यांच्या माहितीचा, तो म्हणजे बारीक आचेवर दुध गरम केले, की ते उतू जात नाही आणि दुसरा फारसा कुणाला माहितीचा नसतो. तो म्हणजे बारीक आचेवर दुध गरम केले म्हणजे त्या दुधावर छान भाकरी सारखी जाड साय येते. मग हे गरम झालेले दुध थंड झाले की शीतकपाटात ठेवायचे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुधाचे भांडं शीतकपाटातुन बाहेर काढायचे, त्यावर मस्त जाड साय आलेली असते, ती बघुनच मन हरखुन जाते माझे. मग एक चमचा घेऊन, भांड्याला चिकटलेली सगळी साय खरडून काढुन, साठवणुकीच्या बरणीत काढायची. रोज हळुहळु करत साधारण आठ-दहा दिवसात बरणी सायीने पुर्ण भरून जाते आणि ते पाहुन माझे मनही अगदी तुडुंब भरून जाते! ...