आमचे वाचन-श्रवण
(घरातील गमती जमती)
एखाद्या खुप आवडत्या पदार्थाची आठवण झाली किंवा कुठे पहिला की कसे आपल्या तोंडाला पाणी सुटते, आणि आपण हर प्रकारे प्रयत्न करतो, तो पदार्थ मिळवायचा किंवा बनवायचा. आणि खातोच खातो! तसेच माझे पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा आहे. एखाद्या पुस्तकाबद्दल वाचले किंवा ऐकले आणि ते आवडले, तर कधी एकदा ते पुस्तक मला मिळते आणि कधी एकदा मी ते वाचते असे होऊन जाते मला. मग मी हरप्रकारे प्रयत्न करते, ते पुस्तक खरेदी करण्यासाठी. काही ठराविक प्रकाशनांची माणसं जोडुन ठेवली आहेत मी. त्यांना सांगितली, की ती बरोब्बर शोधुन काढतात ती पुस्तकं आणि पाठवतात मला! तसेच काही मित्र आहेत, ते सुद्धा लगेच पाठवतात मला हवी ती पुस्तकं. हे ऑनलाईन वगैरे पुर्वी नव्हते. पण मी मॅजेस्टिक, ठाणे ला अगदी नियमित भेट देत असे. त्यामुळे त्यांच्याशी बऱ्यापैकी ओळख झाली होती, त्यांना फोन करून सांगितले तरी, ते मला हवी ती सगळी पुस्तकं लगेचच पोस्टाने पाठवत! (world is full of good people !)
फार पुर्वी, म्हणजे आमच्या बालपणी असे नव्हते. खुप पुस्तकं उपलब्ध नसतं, ती खरेदी करण्याकरीता भरपुर पैसाही नसे. शिवाय खुप शिस्तीची आणि काटकसरीची जीवन पद्धती. म्हणजे अगदी शाळेची पाठ्य पुस्तकं सुद्धा मोठ्या भावंडाला नवीन मिळतं आणि बाकी सगळी लहान भावंडं तीच पुस्तकं वापरतं असतं. आमचेही असेच होते. बरेच नियम असतं घरात आणि सगळेजण ते नियम पळत असतं, अगदी शिस्तबद्ध जीवन असे. आम्हाला सुद्धा काही नियम होते आणि आम्हीही ते पाळले, कधीही मोडले नाहीत. त्यापैकी एक म्हणजे शाळा सुरु असतांना गोष्टीची पुस्तकं वाचायची नाहीत. फक्त "चांदोबा" लावलेला होता, तो दर महिन्याला पोस्टाने येत असे. आणि तो सुद्धा फक्त रविवारीच वाचायची मुभा होती.
दोन मोठ्ठ्या सुट्ट्या असतं, एक दिवाळीची आणि एक उन्हाळ्याची. दिवाळीची साधारण तीन आठवडे आणि उन्हाळ्याची दीड ते पावणे दोन महीने. दिवाळीच्या सुट्टीत "किशोर" दिवाळी अंक येत असे. तो हमखास मिळत असे आम्हाला. सोबत चंपक आणि अजुन बरीचशी गोष्टीची पुस्तकं. अगदी चंगळ असे गोष्टीच्या पुस्तकांची सुट्टीत. यापैकी चांदोबा, चंपक, किशोर अजुनही मिळतात. जवळ जवळ सगळ्या भाषांमध्ये. बाकी म्हणजे राजकन्या-राजपुत्रच्या, राजा-राणीच्या, पऱ्यांच्या, चेटकीणीच्या, राक्षसांच्या गोष्टींची पुस्तकं. काही जादुच्या गोष्टींची पुस्तकं, जसे जादुचा पोपट, जादुचा अंगरखा, जादुची बासरी वगैरे वगैरे. तसेच स्नो व्हाईट आणि सात बुटके सिंड्रेला, सिंदाबादच्या सफरी, फास्टर फेणे, तेनाली रामन, अकबर आणि बिरबल वगैरे वगैरे. त्यातही आम्ही जास्त पुस्तकं वाचायला मिळावी म्हणुन शेजारच्या मैत्रिणींना सांगत असू, आम्ही ही पुस्तकं आणलीत, तुम्ही ही सोडुन दुसरी आणा. मग आम्ही आमची वाचुन झाली, की पुस्तकांची अदलाबदल करत असु आपसात. मग आमची पुस्तकं त्यांना वाचता येत असतं आणि आम्हाला त्यांची.
ही बरीचशी पुस्तक वाचतांना मला जाम भीती वाटे, बापरे आता ही चेटकीण किंवा राक्षस येईल का? त्या राजपुत्राला किंवा राजकन्येला त्रास देईन का? किंवा जंगलात एखादा वाघ किंवा सिंह येईल का? सगळ्या गम्मत तर चांदोबा मधील विक्रम वेताळाच्या गोष्टीला येत असे. सुरुवात करतांना वाटे आज तरी विक्रम बोलता कामा नये, पण तो प्रत्येक वेळेला बोले आणि वेताळ परत उडुन, त्या झाडाला उलटा लोंबकळे. तेव्हा वाटे काय हा विक्रम, इतक्यावेळा कशी तीच चुक करतो, याच्या काहीच कसे लक्षात राहत नाही? पण हे काही बालमनाला समजेना की, विक्रम शांत राहिला की ही गोष्टींची मालिका संपुन जाईल. बऱ्याचदा तर मी आधी शेवट वाचे, या वेळी तरी विक्रम शांत राहिला की नाही ते पाहायला!
या सगळ्या पुस्तकांसोबत आमच्याकडे काही अभ्यासाशी निगडीत पुस्तकही होती. जसे मराठी-मराठी-इंग्रजी डिक्शनरी. तारखडकरांचे इंग्रजी बाराखडी आणि व्याकरणाचे पुस्तक. हे पुस्तक आणि यातील इंग्रजी बाराखडी मी बऱ्याचदा वाचत असे , पाचवीत असल्यापासुन. त्यामुळे उच्चाराप्रमाणे स्पेलिंग असणाऱ्या शब्दांचे स्पेलिंग तयार करायला मला खुप मदत झाली, अगदी माहिती नसलेल्या शब्दांचे सुद्धा. अजुन एक छान संच होता आमच्याकडे "ज्ञान सागरातील शिंपले". याचे पाच की सहा भाग होते.
घरातील मोठ्या मंडळींना सुद्धा वाचनाची भरपुर आवड. मोठ मोठी, जाड जाड पुस्तकं वाचत असतं, मराठी हिंदी दोन्ही, दादांची तर बरीच इंग्रजी पुस्तकं सुद्धा होती. पण जी पुस्तकं घरात नव्हती आणि त्यांना वाचायची असत , ती कुणाकुणा कडुन मागुन आणली जात वाचण्यासाठी. या दुसऱ्यांकडून आणलेल्या पुस्तकांची खुप जास्त काळजी घेतली जात असे . त्याला वर्तमान पत्राचे वेष्टन घातले जात असे. लहान मुलांच्या हाताला लागणार नाही याची पण काळजी घेतली जात असे. असेच एक पुस्तक म्हणजे "रामायण", जे आमच्याकडे नव्हते . पण माझ्या आजोळच्या आजोबांकडे होते. मग त्यांच्याकडुन ते आणले होते, वाचायला. त्यांच्याकडे पण खुप पुस्तकं होती मराठी आणि संस्कृत. ते मात्र त्यांच्या सगळ्या पुस्तकांना खाकी वेष्टन घालुन ठेवत नेहमीच. तसेच या रामायणाला सुद्धा होते. तर रात्री सगळी आवरा आवर झाली की कुणीही एक मम्मी वाचत असे रामायणातील काही श्लोक आणि सोप्या मराठीत सुद्धा समजावून सांगत असे प्रत्येक श्लोक. तिघी मम्मी, आई(आजी) आणि आम्ही मुली असे सगळे बसत असू हे ऐकायला. फार छान वाटे हे सगळे. कधी कधी ऐकता ऐकता जी कोणी मोठी व्यक्ती आमच्या बाजुला बसलेली असे, आम्ही तिच्या मांडीवर डोकं ठेवुन आडवं होण्याचा प्रयत्न करत असु, झोप यायला लागली की. पण लगेच आम्हाला उठुन नीट बसायला सांगितले जात असे. पडुन किंवा लोळुन रामायण ऐकण्याची मुभा नव्हती. ठरलेले श्लोक वाचुन झाले की देवाची आरती केली जात असे, गणपती, महादेव, पांडुरंग आणि देवीची आरती म्हणुन, शेवटी घालीन लोटांगण आणि कर्पुर गौरम म्हटले जात असे. हे सगळे आमचे अगदी आजही नीट पाठ आहे, आता दररोज म्हणत नसलो तरीही! एरवी आमची भांडणं होत, निरंजन देवाला ओवाळण्यावरून आणि घंटा वाजवण्यावरून. पण रात्री हे होत नसे कारण आम्ही चांगल्याच पेंगुळलेल्या असु, त्यावेळेपर्यंत. सगळं संपुन झोपायची घाई असे आम्हाला. ही वेळ म्हणजे रात्रीचे जेमतेम साडे आठ -नऊ वाजलेले, पण आम्हाला वाटे फार उशीर झालाय. दुरदर्शन संच नव्हता तेव्हा घरात! परत सकाळी शाळा असे, त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई असे.
श्रावण महीना सुरु झाला की, बरेच उपास-तापास आणि व्रत-वैकल्ल सुरु होतात. आमच्याकडे वर्षभर सगळेच सोमवारचा उपास करत तेव्हा, याची सविस्तर गोष्ट एका खास लेखात सांगीनच केव्हातरी. त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपास सुद्धा असेच सगळ्यांचा. तर या श्रावण महीन्यात वाचण्याच्या बऱ्याच कथा होत्या, सगळ्या वारांच्या. त्या त्या व्रताची आणि ते केल्यामुळे काय फळ मिळते हे सांगणाऱ्या. आमच्याकडे याचे एक पुस्तक होते. मग श्रावण महीन्याच्या पहिल्या दिवसापासुन, जो वार असे त्या वारापासुन या कथा वाचल्या जात . त्यात सोमवारच्या कथा जास्त जास्त होत्या. पण या सगळ्याच कथा छान वाटतं तेव्हा ऐकायला आणि विश्वासही बसे त्यावर! प्रत्येक कथेत एखाद्याने ते व्रत अर्धवट सोडल्याने त्या व्यक्तीला कसा खुप त्रास भोगावा लागला, मग परत ते व्रत केल्यावर सगळे कसे छान झाले, असा साधारण प्रत्येक कथेचा सारांश असे. प्रत्येक कथेची सुरुवात "एक आटपाट नगर होते, तेथे एक ब्राह्मण राहत होता" अशी असे . तर शेवट "उतु नको, मातु नको, घेतला वसा टाकू नको. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपुर्ण." असा असे.
अशीच हरतालिकेची सुद्धा कथा होती. ही कथा गुरुजीच वाचत त्या दिवशी सगळी पुजा पूर्ण झाल्यावर, आम्हीपण तेव्हाच ऐकत असु. तसेच मला वाटते अधिक महीन्याची सुद्धा होत्या. अशा अजुन बऱ्याच कथा होत्या त्या पुस्तकात, मला आता सगळ्या आठवतं नाहीत. त्या त्या दिवशी त्याच्याशी निगडीत कथा वाचली जात असे. घरात कुणीतरी एक मम्मी वाचे आणि बाकी सगळे ऐकत असु. वाचून झाले की ते पुस्तक जागच्या जागी ठेवले जात असे, नक्की जागा नीट आठवत नाही त्याची मला आता. पण आम्हाला फारच आवडत या कथा वाचायला. मग सुट्टीत आम्ही हे पुस्तक मागून घेत असु आणि बाकी गोष्टीच्या पुस्तकांबरोबर हे सुद्धा पुस्तक वाचत असु.
अजून एक मजेशीर प्रकार! आता मी मजेशीर म्हणतेय पण तेव्हा फारच भीती वाटे या प्रकारची, पण ऐकावीशी सुद्धा वाटे. साधारण वर्ष संपत यायच्या थोडे आधी, कालनिर्णय आणले जात असे . आजच्या सारखीच प्रत्येक महीन्याच्या पानाच्या मागच्या बाजुला, त्या त्या महिन्याचे राशी भविष्य, त्या महिन्यात येणाऱ्या सगळ्या सणांची आणि व्रत-वैकल्यांची माहीती, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त जागा असल्यास एखादी पाककृती अशी सगळी माहिती छापलेली असे. वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मग जानेवारी महिन्याच्या पानाच्या मागच्या बाजुला मकर संक्रांतीबद्दल माहीती दिलेली असे. थोडक्यात अशी-ती कुठल्या दिशेने येतेय, कुठल्या दिशेला जातेय, कुठल्या दिशेला बघतेय, कुठल्या वाहनावर बसलीय, काय परिधान केलंय, कुठल्या रंगाचे वस्त्र आहे, काय खातेय वगैरे वगैरे . या सगळ्या गोष्टींवर अरिष्ट येणार असे समजायचे. थोडक्यात या सगळ्या गोष्टींवर संक्रांत येणार! मला कुतूहल तर असेच हे सगळे जाणुन घेण्याची. पण खुप भीती सुद्धा वाटे, ती आपल्याच दिशेने तर येत नाही ना?, आपल्याकडेच तर बघत नाहीये ना? हे आणि असेच भीतीदायक प्रश्न पडत मला. आता समजले ना संक्रांत येणे म्हणजे नक्की काय सगळ्यांना!?!?
चौधरी सदनाच्या जवळच एक मोठ्ठे मोकळे मैदान होते. जी एस ग्राउंड त्याचे नाव. पुर्वी खुप मोठ्ठे होते, पण आता त्या अजून काही इमारती आल्या आहेत, एक शिवाजी महाराजांचा पुतळा आलाय आणि त्याच्या भोवती छोटीशी बाग सुद्धा केलीय. या मुळे ते मैदान आता बरेच छोटे झालेय. तर या मैदानात तेव्हापासुनच वेगवेगळी प्रदर्शनं भरत असतं, अजुनही भरतात. तर तेव्हा एकदा पुस्तकांचे प्रदर्शन भरले होते. अर्थातच मम्मी गेली होती तिथे. त्या प्रदर्शनात "सोव्हिएत नारी" नावाचे एक मासिक होते, एका दुकानात. तिथे तिने त्या मासिकाची वर्गणी भरली होती. मग हे मासिक दर महिन्याला पोस्टाने घरी येत असे, अर्थातच हिंदी होते हे. तेव्हा आम्हाला सगळे विषय मराठी होते
चौथीपर्यंत. पाचवीत गेल्यावर हिंदी आणि इंग्रजी विषय सुरु झाले. त्यामुळे हिंदी सुद्धा अगदी नीट कळत नव्हते, वाचता येत असले तरी. पण आम्ही तरीही खुप आनंदाने चाळत असु हे मासीक. कित्येक वेळा तर पोस्टमन काकांनी ते मासीक आणून दिले की आमची भांडणं होत कोण आधी बघणार यावरुन . यात एक खास सदर असे, वेगवेगळ्या फॅशनचे महिलांचे/मुलींचे कपड्यांचे फोटोचे. या सदरासाठी ही सगळी मासिकं नीट जपुन ठेवली जात असतं. का? ते नंतर एका खास लेखात कळेलच. आमच्या बाबांना सुद्धा आवडे हे मासिक. बाकी खूप वाचन करत ते, पण हे मासिक सुद्धा हमखास चाळत. त्यातील कर्तृत्ववान महिलांसारखे त्यांच्या नातींनी सुद्धा कर्तृत्ववान व्हावे असे त्यांना वाटे आणि तसेच छान छान कपडे घालावे असेही वाटे!
अजुन आमचा बहिणींचा एक आवडता वाचन प्रकार सुट्टीतला. तिघी असल्याने घरात एका वेळेला तीन मराठीची म्हणजे वयाप्रमाणे बालभारती, कुमार भारती आणि युवभारती पुस्तकं असतं. नंतर हिंदी आणि इंग्रजीची सुद्धा. तर या पुस्तकांमध्ये काही खुप छान छान धडे आणि कविता असत. जे आम्हाला खुप आवडत असतं, ते सुद्धा आम्ही सुट्टीत, इतर गोष्टीच्या पुस्तकांसोबत वाचत असु. खुपच छान वाटायचे हे वाचतांना. एक कारण म्हणजे ते वाचुन कुठलीही परीक्षा द्यावी लागत नसे. दुसरे म्हणजे पाहिजे तसे लहान मोठे होता येत असे, म्हणजे आपल्या मागच्या किंवा पुढच्या इयत्तेचे पुस्तक वाचुन, लहान किंवा मोठं झाल्याचा आनंद मिळतं असे . तिसरे म्हणजे एक तर ते धडे आधीच शिकुन झालेले असत, त्यामुळे त्याच्या आठवणी ताज्या होत आणि पुढे शिकणार असु, तर ते धडे वर्गात शिकत असतांना, या सुट्टीच्या आठवणी सोबत असतं!
अजुन एक खुप आवडती गोष्ट! आमचे बाबा (आजोबा) त्यांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी, आम्हा मुलींना गोष्टी सांगत. खुपच छान वाटे त्यांच्या बरोबर बसुन त्यांच्याकडून गोष्ट ऐकायला. त्यापैकी दोन गोष्टी मला अगदी ठळकपणे आठवतात अजुनही. एक म्हणजे "कोल्हा आणि करकोचा" ची गोष्ट . ही सगळ्यांची माहीतीची आहे . दुसरी म्हणजे "लुळी पांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टीची गरीबी." ही गोष्ट मात्र मी इतर कुठेही कधीही वाचल्याची किंवा ऐकल्याची आठवत नाही. यात एक शेतकरी, त्याच्या शेतात भर उन्हात काम करत असतो. घामाने अगदी ओला चिंब झालेला असतो आणि खुप थकलेला असतो . तेव्हढ्यात त्याला घुंगरांचा आवाज ऐकु येतो. तो त्या दिशेने बघतो, तर त्याला दिसते, एक छकडा येतोय. त्या छकड्याला छान पडदे लावलेय, बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधलेत. त्याला वाटते काय नशीबवान आहे हा माणुस, छान पडदे लावलेल्या छकड्यात बसलाय आणि मी इथे उन्हात खपतोय. पण तो छकडा नेमका त्याच्या शेताजवळ येऊन एका झाडाच्या सावलीत थांबतो. पण त्यात बसलेल्या माणसाला, गाडी हाकणारा माणुस उचलुन बाहेर आणतो आणि झाडाच्या सावलीत बसवतो. हे बघुन मात्र शेतकरी म्हणतो, नको रे बाबा असली लुळी पांगळी श्रीमंती, त्यापेक्षा माझी धट्टीकट्टी गरिबीच छान आहे. ही गोष्ट खास माझ्यासाठी असे. अगदी लहानपणीच कसल्याश्या आजाराने माझी तब्बेत खराब झाली होती आणि बरेच वर्ष मी तशीच बारीक होते, त्यामुळे मी त्यापासून बोध घ्यावा असे वाटे त्यांना!
चौधरी सदनाच्या गल्लीच्या पश्चिमेच्या टोकाला एक हनुमानाचे मंदीर होते, अजुनही आहे. त्यात आत शिरले की हनुमानाची मुर्ती दिसे. तिथे नमस्कार करायचा त्याला एक प्रदक्षिणा घालायची. डावीकडे वळुन थोडं पुढे गेले की तिथे दत्ताची छोटीशी गोड मुर्ती होती, मला फार आवडे ती. कधी एकदा तिकडे जाते असे होई मला, त्या मंदीरात गेल्यावर. मग तिकडे जाऊन परत तसेच, नमस्कार करायचा आणि एक प्रदक्षिणा घालायची. तिथून आले की दाराजवळ एक छोटासा आयताकृती काळ्या रंगाचा डबा ठेवलेला असे. त्यात मंदिरातील विभूती/रक्षा ठेवलेली असे. आम्ही ती घेऊन कपाळाला आणि गळ्याला लावत असु आणि चिमुटभर जीभेवर सुद्धा ठेवत असु. या मंदीरात बऱ्याचदा कीर्तनं, प्रवचनं होत असतं. आमची आई(आजी) जात असे, ते ऐकायला. कधी कधी आम्हीपण जायचो तिच्या बरोबर, पण थोड्याच वेळात चुळबुळ चालू होत असे आमची. थोडा वेळाने तीच कंटाळुन सांगत असे, घरी जा तुम्ही. मग आम्ही उठुन, बाहेर पडत असू आणि घरी निघून जात असु. त्यामुळे तिथे काय काय ऐकत असु , हे तेव्हा सुद्धा कळत नसे. त्यामुळे आता ते आठवणे आणि त्याबद्दल इथे काही लिहिणे केवळ अशक्य. पण तिथला हनुमान जयंतीचा सुंठवडा आणि गोकुळाष्टमीचा गोपाळकाला अजून आठवतो आणि अजुनही ती चव लगेच जिभेवर येते. घरी कितीही प्रयत्न केला, तरी काही ती चव येत नाही गोपाळ काल्याची!
सरते शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे वर्तमानपत्र! तेव्हा आमच्याकडे एक स्थानिक वर्तमानपत्र "जनशक्ति" येत असे, अर्थातच मराठी. हे दररोज सकाळीच येत असे . सकाळी सगळेजण हे वर्तमानपत्र वाचतं . पण आमच्या बाबांनी "मुंबई सकाळ" सुद्धा लावलेला होता. हे वर्तमानपत्र कुठल्याश्या आगगाडीने सकाळी मुंबईहून निघुन दुपारी तीन-चार वाजेच्या दरम्यान पोहोचत असे आणि त्यापुढे आमच्या घरी. हे वर्तमानपत्र मग सगळे संध्याकाळी वाचत. आम्ही मुली तशा, बऱ्यापैकी लहान वर्तमानपत्र वाचण्यासाठी. पण रविवार म्हटला की आम्ही मुली या वर्तमानपत्राची खुप आतुरतेने वाट बघत असु, अगदी चातकासारखी! बऱ्याचदा तर गॅलरीत जाऊन खाली रस्त्याने पेपरवाले काका दिसतात का म्हणुन बघत असु. कारण "मुंबई रविवार सकाळ" च्या पुरवणीत एक खास कोपरा असे लहान मुलांकरिता! त्यात "रामू-शामू" हे कॉमिक्स असे. हे रामू-शामू म्हणजे आम्हाला आमचे अगदी जवळचे मित्रच वाटतं. मजा वाटायची त्याचे उद्योग वाचायला! सोबतच एखादी गोष्ट, एखादं कोडं, टिंब जोडुन चित्र तयार करा, उंदराला त्याच्या बीळाचा रास्ता दाखवा अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी असतं . त्यामुळे हा "रविवार मुंबई रविवार सकाळ" आमचा अगदी लाडका आणि जीवश्च कंठश्च मित्र होता तेव्हा. कारण आता अगदी प्रत्येक घरात या सगळ्या गोष्टींची अगदी ढीगाने पुस्तकं असतात, फोन, आय पॅड, लॅपटॉप मध्ये सुद्धा असतात या गोष्टी मुबलक प्रमाणात. पण तेव्हा तसे नव्हते, अशा काही वर्तमानपत्रातच या गोष्टी असतं, त्यामुळे त्याचे फारच अप्रूप असे!
थोडं मोठं झाल्यावर मराठी वर्तमानपत्र वाचण्याची आवड निर्माण झाली. पण नंतर महाराष्ट्र सुटला आणि मराठी वर्तमानपत्र मिळण्याची खुपच मारामार झाली. पण घराजवळच एक दुकानात महाराष्ट्र टाइम्स मिळत होता. पण याचेही तसेच "मुंबई सकाळ" सारखे! सकाळी मुंबईहून कुठल्यातरी विमानाने निघत असे आणि दुपारी दोन वाजेपर्यंत या दुकानात पोहोचे आणि मग मी तिथुन आणत असे. त्यामुळे परत रोज या "मुंबई सकाळ" ची आठवण होत असे! छान वाटे एकदम, त्या आठवणींमुळे आणि मराठी वर्तमानपत्र मिळे म्हणुन. त्यातही एक माझ्या खूप आवडीची गोष्ट असे, शब्दकोडं! पण काही काळाने परत हे वर्तमानपत्र मिळणे बंद झाले. मग फक्त इंग्रजी वर्तमानपत्र. फारसे आवडत नसे पण त्यात पुन्हा एक माझ्या आवडता कोपरा असल्याने आवडत असे. मग या कोपऱ्याचे व्यसनच लागले मला. तो कोपरा सोडवल्याशिवाय चैनच पडत नसे. त्यात सुडोकू, लूप द लूप, काकुरू असे सगळे असे. पण दिवसागणिक वर्तमानपत्रातील नकारात्मकता खुपच वाढत चाललीय, त्यामुळे आता मी चक्क बंदच करून टाकलेय वर्तमानपत्र. "तो" फोन मध्ये सॉफ्ट कॉपी वाचतो बातम्यांची आणि मी थोडेफार सोशल मीडियावर. फोन मध्ये सुडोकू डाउनलोड करून घेतलेय आणि स्वतःला नियम घालून घेतलाय, रोज एकच सोडवायचे! बाकी वाचन मात्र अगदी अखंडपणे आणि दिवसागणिक वाढत्या आनंदाने चालुच आहे...!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
९ जुलै २०२०
महाराष्ट्र सोडल्यानंतर लगेचच एका
मित्राने ही भेट पाठवली होती
ही एका मैत्रिणीने दिलेली भेट .
यात प्रत्येक पुस्तकावर संदेश
लिहिलेला आहे तिने माझ्यासाठी .
या पैकी एक संदेश इथे देते , तुम्हा सगळ्यांसाठी ,
"मैत्रीच्या झाडाखाली
निवांत .....
थंडगार सावलीत ....
आयुष्य मजेत जाइल
याचा विश्वास आहेच ..... "
ही पुस्तकं तर आत्ताच ह्या टाळेबंदीच्या
काळात एका मित्रांनी पाठविलीत!
किशोर दिवाळी अंक
सुंदर मुखपृष्ठासाठी मी
विकत घेऊन आले होते
मुंबईला गेले तेव्हा .
चंद्रमोहन सरांचे आहे हे चित्र !
विक्रम आणि वेताळ गोष्टीचे
चांदोबातील चित्र
स्नो व्हाईट आणि सात बुटके
कालनिर्णय चे मागील पान
माझी एक खुप आवडती कविता
आमच्याकडे समोरच्या खोलीत
एक मोठे निळ्या डायल चे
घड्याळ भिंतीवर लावलेले
होते , त्याच्याकडे बघुन मी
ही कविता म्हणत असे .
अजुन बऱ्यापैकी पाठ आहे !
आजही पाऊस पडला की
ही कविता आपोआप गुणगुणायला
सुरुवात होते माझी
आमचे तेव्हाचे स्थानिक वर्तमान पत्र
रामू शामू , मराठीत असे आणि
चित्र कृष्ण-धवल
ठिपके जोडा
मराठी शब्द कोडं
माझे आवडतं पान
सुडोकु
लूप द लूप
काकुरो
:) so many memories .. relive केल्यासारखे वाटले .. खूप छान
ReplyDeleteखरंय या लेखात प्रत्येक जण अगदी छान रमून गेला असेल.... सगळ्यांच्या मनातील अगदी आवडता कोपरा आहे हा! सप्रेम धन्यवाद 😍
Deleteकेशव....
ReplyDeleteवा ..तपशीलवार.. नेहमीप्रमाणे छानच....
मित्राने पाठवलेली पुस्तकं तर खुपच छान...
प्रश्नच नाही, मित्र छान अणि मित्रांनी पाठवलेली पुस्तकही फारच छान ...
DeleteIn a way m blessed 😇 soul! !
केशव, सुद्धा एक छान मित्र... आभार नाही मानत.... ते सगळे ऋण तसेच राहु देते... .
खरेच ग.....सोवियेत नारी वाचुन.....त्यातील चित्रं बघून झपाटल्यगत व्हायचे तेव्हा.....त्या मासिकतील कात्रणे अजुनही आहेत माझ्या जवळ.....फ्रॉक चे वेगवेगळी पण लक्षवेधी patterns....,embroidery patterns....&बरेच काही....इंदिरा गांधी यांचे त्या देशातील भेटीची छायाचित्रे बघून .....त्यांचा अभिमान वाटायचा...तुझी लेखनातील दिवसेंदिवस वाढणारी प्रगल्भता वाखाणण्याजोगी....😍😍
ReplyDeleteOh my god! ही आठवण कशी विसरले मी!! मलाही आता नीट आठवते आहे ते छायाचित्र, किती छान वाटले होते ते छायाचित्र बघुन.... अजुन असतील तर दे ती कात्रण, ईथे सगळ्यांना बघायला उपलब्ध करून देवु या! आभाळभर प्रेम तुला!!! 😍❤️😇
DeleteBalpanicha chan athvani ya lekhacha nimittane jaga zhala ti sarv schitra pustake athavaun vegalach aanand bhetala ekandarit khoop surekh varnan..
ReplyDeleteTu ekun ek pustakacha ulekh ethe kelas dolasamor ti sarv aali 👍
मस्त वाटले... अगदी या शब्दात तुझा आनंद दिसला मला!!! 😊😍
Deleteव्वा... खूपच सुंदर. मला माझे बालपणीचे वाचन, त्यासाठीची धडपड सारे आठवले. सगळे साधारण तुझ्यासारखे च पण संदर्भ फक्त वेगळा...
ReplyDeleteबालपणीच्या वाचनासाठी धडपड, फार महत्वाचा, खुप छान वाटते ते सगळे आठवुन. ... 😍
DeleteKhup ch chan...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteवाचन संक्रुति ईतकि जुनि आहे हे आताच कळते आहे कारण त्या काळि घरात लक्षच नव्हते सगळि मम्मि लोकांचि मेहेरबानि कळून आलि
ReplyDeleteब्रम्हांडभर प्रेम तुम्हा सगळ्यांना .. .... V all siblings are really blessed soul 😇 😇 😇 😇
DeleteWa wa mast apratim lekhnehami pramane .. Ani Shravan mahinyat lihilas lekh te chan zale
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺
DeleteSagle lekh far Sundar ahe..
ReplyDeleteKhupch chan
खुप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😍
Deleteवा.. खूप छान..माझ्या लहानपणी अन तरूणपणी यात वाचनालयाच्या वार्या अन शाळेतली पुस्तक पेटी पण होती..
ReplyDeleteसगळं आठवलं.. तुलाच त्याचे श्रेय.
सगळ्या पुस्तकांवरचे संदेश वाचायला आवडेल.
आमच्या पण शाळेत होती पुस्तक पेटी! रिकाम्या तासाला वर्गात आणली जात असे..
Deleteसंदेश देते वाचायला लवकरच..... Tons of love 😍 ❤
Waaa
ReplyDeleteLahan pan atahaval
Chamapk t atishay awadaych mala n ajun hi awdat
Pustaka n sarkha mirta dusara koni nahi , maan ramvnyach uttam sadhan, ektepan ghalvnyach sadhan, athavni , aanad, dukha , saglyach goshti milatat
Apratim lekh lihitat tai tumhi
अगदी शब्द अणि शब्द खरा आहे तुझा!!
Delete😍 😍 😍 छान वाटले तुला असे छान आनंदी झालेले पाहुन, सप्रेम धन्यवाद 😍!!!
Very nice article.....with the box of all childhood memories....
ReplyDeleteTons of love n thnks 😍!!!
Delete😍❤
ReplyDeleteखुप सारे प्रेम 😍 😇 ❤️ 💕!!!
Deleteवा पुस्तक म्हटलं की खुपच प्रेम आमच्या लहानपणी टी व्ही नाही त्यामुळे पुस्तकावर जास्त च जोर मिळेत ते पुस्तक वाचायच अजुन ही लायब्रेरी जान सरुच हेे खुपच छान लेख पुस्तका विषयी मस्त वा व
ReplyDeleteखरंय दूरदर्शनच काय पण रेडियो सुद्धा नसे तेव्हा दिवसभर..... त्यामुळे पुस्तक वाचणे आणि मैदानी खेळ हे दोनच पर्याय ऊपलब्ध होते मुलांसाठी.....
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Agg kiti kiti thanx dear Tula..te tarkhadkar..tar agadich vismarnat gele hote..aani chandoba kishor, Champak..kiti kiti aathawan aalya ..wachtanna far far..Maja aali..
ReplyDeleteतुझा आनंद मला दिसतोय प्रत्येक शब्दातून!
Deleteत्यामुळे मला पण खुप आनंद झाला, या आनंदासाठी तर चाललेय हे सगळे, सप्रेम धन्यवाद 😍
Khupach chhan lekh ahe. Khup maja aali vachtanna. Ata kalale tumche vachan ani likhan prem. Tasa amchyakade vachan ha prakar khupach kami hota ani tyacha dushparinaam bhasato ata. Mhanun mulanna Kindle gheun dile ahe. Mahi loves reading . Thanks for sharing your wonderful journey and memories
ReplyDeleteखरच एक सुंदर प्रवास आहे हा.... अणि अजुनही चालुच आहे..... अणि त्यातुन मिळणार आनंद तर अपरिमित आहे.... 😍 😇
DeleteVachanachi aavad v lahanpanichya pustakanchya aathavani vachun aanad vatala khupch sarv pustakachi chan mahiti dili aahes tu
ReplyDeleteMala v aashula pan khul aawdata navin navin vachayla
Sarv mahiti mast
वाचना सारखा मित्र नाही या जगात....
Deleteसप्रेम धन्यवाद 😍 😇
वाचनाच्या भुकेमुळे मी लवकरच थोडा मोठा झालो मला वाचण्याचा भसम्या रोग झाला होता म्हण की कॉलेजमध्ये मी माझी व इतर 3 मित्रांच्या नावावरील पुस्तके वाचायचो शाळेत चौधरी मॅडम वाचनाला खत पाणी घालत होतो हे झपाटलेपण एवढे होते की मी पहिल्या बॅच चा computer science चा विद्यार्थी असून लायब्ररीयन झालो not at all repainting it. वाचनाने जगणे समृद्ध केले
ReplyDeleteवावा फारच छान! असा माणुस फारच विरळा....
Deleteखरंय पुस्तका सारखा मित्र नाही या जगात.
वाचन,जगणे समृद्ध करून टाकते....
मनःपूर्वक धन्यवाद तुझ्या आठवणी सांगितल्या बद्दल! 😊
So beautifully inked! Loved it.. I actually visualized u as a kid.. how would u all be looking n all fun that u had..enjoying story time.. going to temple.. n all.. amazing..!
ReplyDeleteThnk u so much!!
DeleteNice to meet u here regularly!! 😊😍😇
खुप छान. लहान पणी घ्या आठवणी जाग्या झाल्या. खरं वाचनाची आवड आणि वाचनाचे संस्कार खूप छान झाले आपल्यावर. त्यामुळे आपणही वाचनाने समृद्ध झालो.
ReplyDeleteखरंय, वाचन अणि पुस्तकं या सारखा सोबती नाही आयुष्यात!!
Deleteकधीच आपली साथ न सोडणारा उलट पक्षी कायमच सगळ्याच परिस्थितीत मोलाची साथ देणारा!!! ❤
खूप छान. मलाही वाचनाची खूप आवड आहे. आताही वेळ काढून वाचते. बर्यापैकी धार्मिक पुस्तके ही वाचली आहेत. लहानपणी कीर्तन ऐकला याही जायचे मी. खूप छान वाटायचं
ReplyDeleteवावा छानच!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद
खुप भारी..लहानपणीची वाचन संपत्ति जपलीय अजुन. Richest..मालाही लहानपणीची आठवण झाली.Almost similar books read by me.
ReplyDeleteIts too Nostalgia..आणी "fresh n up".
सोलापूरला अजुनही आठवत गोरे वाडयाच्या पलिकडे पुस्तकाचं दुकान आहे..We used to purchase the books n read it in the childhood.
गोरे वाड्याजवळील मारुती मंदीराचीही आठवण झाली.
"Tonic"by विजया वाड लहानपणी वाचलय..आता ते पुस्तक दुर्मिळ आहे.
Whole blog madhil one of the favorite lekh.
बापरे ! किती साऱ्या या आठवणी ! पुस्तकांच्या आणि दुकानाच्या सुद्धा . खरंतरं मला सुद्धा आमचे ते गोष्टींच्या पुस्तकांचे दुकान आठवले होते हे लिखाण करतांना , पण आता ते खचितच नसावे , कारण ते एक पत्र्याची टपरी वजा दुकान होते . असो
Deleteखूप खूप धन्यवाद अगदी मनापासून !😇😇🙌
अप्रतिम लेख लिहिलाय, माझ्या गोष्टी च्या पुस्तकाची आठवण झाली, मी आज शोधून काढीन माझी पुस्तकं ��
ReplyDeleteअरे वावा छानच ! पुस्तकांसारखा मित्र नाही या जगात ! मनःपूर्वक धन्यवाद !😇🙏
Deleteखरे आहे.वाचनासारखी दुसरी गोष्ट नाही.लहानपणी वाढदिवसाला भेट म्हणून मिळणारया पुस्तकाचे तर अप्रुप काही वेगळेच होते.
ReplyDeleteअगदी काही पैसे असे किम्मत एका पुस्तकाची, पण आपल्या साठी अगदी मौल्यवान असे एक एक पुस्तक!!
Delete😍 धन्यवाद 🙏 ☺
खुप छान लेख होता.👌👌
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteमीपण खूप पुर्वी वाचायचो हि मासिक. आताची मे दिवाळीची सुट्टी व आमच्या वेळीची सुट्टीत खूप फरक आहे. आम्ही मुल डोंगरावर करवंद कैर्या काढायला जायचो. किंवा कोकणात मामाच्या गावी आंबा फणस व ईतर रानमेवा खायचो. आतासारखे ईंटरनेट नव्हते आम्ही मैदानात खेळायला जायचो काळ बदलला पण आढवण आलीकी आनंद वाटतो .
ReplyDeleteचांगली पुस्तके वाचता वाचता चांगली माणसेही वाचता येतात .
ReplyDeleteवर्षा अप्रतिम आहे.अगदी बालपणीचे सवंगडी आपली पुस्तक ,ही कधीच विसरू शकणार नाही.यातील माझे आवाडते चांदोबा हे पुस्तक आहे.Tu si great ho.
ReplyDeleteवाचन संस्कृती तुन तुमचा जीवनपट, तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडन कशी झाली याचे दर्शन होते ते प्रेरणादायी आहे 👍🌹
ReplyDelete"आनंदी पाऊस" मधील वाचन आणि श्रवण यांचा तुला छंद कसा निर्माण झाला याचे सविस्तर वर्णन वाचून आनंद झाला आणि बराचसा हेवाही वाटला. तुला लहानपणापासून घरी वाचन संस्कृतीचे वातावरण लाभले, ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. पुढे हाच वाचनाचा छंद तुझ्या लिखाणात परिवर्तित झाला असावा असे वाटते.
ReplyDeleteयाउलट आमचे लहानपण सातपुड्याच्या कुशीतील
'हिंगोणे' या छोट्याशा गावात गेले. तिथे मराठी शाळेपासून तर हायस्कूल पर्यंत मोजक्या टेक्स्ट पुस्तकांशिवाय आमच्या काहीही वाचण्यात आले नाही. नाही म्हणायला आमच्या आईला गीता, रामरक्षा वगैरे वाचायला खूप आवडे. घरी "रसतरंगिणी" नावाचे एक धार्मिक पुस्तक होते, हीच आमच्या घरातील एकमेव ग्रंथसंपदा! त्यातील तुकोबांचे अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, आणखी बरेच काही आई वाचत बसे, तसे तिचे पाठांतरही जबरदस्त होते. त्यामुळे टेक्स्ट पुस्तकातील का होईना, कविता वगैरे वाचण्यात मला गोडी वाटे. आमच्या हायस्कूलमध्ये एक "सन्मित्र" नावाचा वार्षिक अंक निघायचा. त्यात काही शिक्षकांनी, काही विद्यार्थ्यांनी लिहिलेले छोटे छोटे लेख वाचून मला त्यांविषयी फार कुतूहल वाटायचं. आपल्यालाही असं काही लिहिता आलं पाहिजे, अशी खूप इच्छा होई. पण आपण काही लिहून सरांकडे दिलं आणि ते वाचून सरांनी त्याला केराची टोपली दाखवली, तर आपलं हसं होईल, या भीतीने मी "सन्मित्र" मध्ये लिखाण देणं टाळत होतो. परंतु मनातील उर्मी काही मला चैन पडू देईना. शेवटी दहावीला असताना मोठी हिम्मत करून आणि देवाचे नाव घेऊन तब्बल दोन कविता आणि दोन छोटे छोटे लेख दिले पाठवून सरांकडे आणि आश्चर्य म्हणजे ते सर्व "वाड.मय"(?)
सन्मित्र मध्ये छापून आले, तेव्हा मला कोण आनंद झाला असेल माझे मलाच माहित. आपण अगदीच काही 'हे' नाही याची मला प्रथम जाणीव झाली ती याच प्रसंगामुळे.
पुढे कॉलेजला गेल्यावर होस्टेलवर आमच्या मेस मध्ये दोन-तीन वर्तमानपत्र पडलेले असायचे त्याचे वाचन व्हायचे. तरीही ज्याला 'वाचन' म्हणायचे ते काही आमच्या पदरी पडले नाही. तरीही, बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती यांच्या भरवशावर न राहता सतत टेक्स्ट बुकांचा अभ्यास करून कण्हत, कुढत प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास काढायचा
एवढं आम्हाला जमायचं.
असो, खरे वाचन सुरू झाले ते मी कॉलेजमध्ये नोकरीला लागल्यापासून. भव्य असे ग्रंथालय, विपुल अशी ग्रंथसंपदा आणि पिरेड वगैरे घेऊन वेळही मुबलक असायचा, त्यामुळे ग्रंथालयात जाऊन थोडं थोडं वाचन होऊ लागलं. त्यावेळेला आमच्या कॉलेजला मराठीचे प्रा. म.ना.अदवंत, हिंदीचे व्यंगकार प्रा. शंकर पुणतांबेकर अशा प्रथितयश लेखकांचे प्रत्यक्ष दर्शन व्हायचे. त्यांची काही पुस्तके वाचून काढली. व्यंगकार शंकर पुणतांबेकरांच्या पुस्तकांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. माणसांचे विचित्र स्वभाव, त्यांच्या वागण्यातील विसंगती आणि विकृती, मोठमोठ्या पुढाऱ्यांचे स्वभाव, त्यांची गमतीदार भाषणे, यांच्यावर अगदी मार्मिक शैलीत ह्या व्यंगकारांनी लिखाण करुन त्यांचे जे हसे केले आहे, ते वाचून इतर गोष्टी वाचण्यात मला रस वाटेनासा झाला.
त्यामुळे ग्रंथालयातील हिंदी व्यंगकार शंकर पुणतांबेकर, शरद जोशी, हरिशंकर परसाई, नरेंद्र कोहली तसेच मराठीतील आचार्य अत्रे इत्यादी लेखकांची बरीचशी पुस्तके मी वाचलेली आहेत. आता निवृत्तीनंतर मोबाईल हाच आमचा मित्र बनलेला आहे. लहान मुलांना मोबाईलचे जेवढे आकर्षण असते, तेवढे आकर्षण आता अस्मादिकांना उरले आहे. साऱ्या जगातील ज्ञानाचे भांडार मोबाईलने आमच्या घरी आणून सोडले आहे, परंतु वाचनाचा जो खरा आनंद आहे तो एवढ्याशा डबीने हिरावून घेतला आहे, याची वेळोवेळी खंतही वाटते.
तू पाठवलेल्या आनंदयात्रेतील तुझे "वाचन आणि श्रवण" वाचून त्यानिमित्ताने आमच्याही वाचन यात्रेचा "प्रवास" मला लिहावासा वाटला. तुझ्या वाचन आणि पुढील लेखनाकरता खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच मला काही लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🏼
😊varshali lekh khoop aawdla balpaniche aathwanina ujala milala
ReplyDeletePustake Wachne ha maza dekhil aawdicha Chand te kali chandoba kishor aawdti pustke paperwala kadhi yeto chandoba gheun aani too aaplelach pahila wachyla milto aase hoie
Srawnatil shukrawarche vrat aai kaki karat aasat aani vratachi Katha mala wachayla sangat mihi bhakti bhavane wachat aase
DiwAlichi sutti mhanje sagle pharalacha aaswad ghet diwali aank Maher menka sugandh dhanany aawaj kiti tari aank aai sathi magawli pustke aawdine wachat aasu
Pustkanche jagat ramnesarkha dusra aanand nahi
Navin kore pustkacha Kora karkart smell hi mala aawde
Tuze lekhne maze balpan jage zale tnx aani tula khoop shubhecha lihit raha aamhi wachu aanande👍
मला हे नाही समजत (!) , इतके सगळे तपशीलवार कसे काय लक्षात आहे तुझ्या??🤔
ReplyDeleteपण फक्त थोडेफार स्थल काल व्यक्ति संदर्भ जर बदलले तर हुबेहुब माझे पुस्तकी बालपण अगदी असेच होते...(सोविएत संघ मासिक पण होतं सोबतीला)
भले एका छोट्या खेड्यात रहायचो पण वाचनासाठी पुस्तके, वृत्तपत्रे, आणि इतरही बरेच काही उपलब्ध व्हायच घरी... तसेच माझ्या शाळेचे ग्रंथालय पण सुसज्ज होते म्हणूनच...
🙏🏻👍❤️
वाह, अशीच हळूच पुस्तक हातात येत असत. सुट्टीत कधी फिरते वाचनालय(एक बाई भरपूर पुस्तके घेऊन येत असत आणि बदलून देत असत) पूर्वीच्या बार्टर पद्धती प्रमाणे एकमेकांकडून पुस्तके आणून वाचत होतो)
ReplyDeleteतुम्ही लिहिले आहे अगदी तशीच पुस्तके मिळविली आहेत आणि वाचन सपाटा सुरु ठेवला आहे) दहा वर्षे समव्यसनी मैत्रिणींसह पुस्तक भिशीने वाचन वाटता आले.