Skip to main content

गोष्ट गरम पाण्याची (घरातील गमती जमती)

गोष्ट गरम पाण्याची 
(घरातील गमती जमती)

                                        हे गरम पाणी म्हणजे अर्थातच अंघोळीचे गरम पाणी. हल्ली एक बटन दाबले की काही मिनिटात गरम पाणी तयार असते आणि नळ सोडला की लगेच बादलीत किंवा फवाऱ्यातून(शॉवर) अंगावर. आमच्या लहानपणी म्हणजे चौंधरी सदनात आणि त्यानंतरही खूप वर्ष अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी 'बंब' होता. तर आज या बंबाची गोष्ट, अगदी अथ पासून इती पर्यंत! म्हणजे बंब पेटविण्याची आधी पासून ते गरम पाणी बादलीत पडेपर्यंत आणि त्यानंतरच्या सगळ्या गमती जमातींची गोष्ट. 
                                        तर त्याकाळी लग्नात मुलीचे वडील, तिला तिच्या आंदणात सगळ्या भांड्या-कुंड्यासोबत हा बंब सुद्धा देत असत. आमच्या कडेही हा बंब, मम्मीच्या आंदणातील होता, तिच्या वडिलांनी दिलेला. अजूनही असेल तो बंब, पण वापरात मात्र नाही. तेव्हा आमच्याघरात सकाळी पावणेपाच-पाचलाच दिवस उगवत असे. मम्मी, आई, बाबा पहाटे सगळ्यात लवकर उठणारी मंडळी. सकाळी प्रचंड धांदल असे घरात. कारण सकाळची  सगळी काम आटोपून, सकाळी आठ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक सुद्धा तयार असावा लागत असे. पहाटे उठल्यावर काही काळ, आमचे बाबा(आजोबा) बंब पेटवत, काही काळानंतर मम्मीच करत असे हे काम सुद्धा. पण बंबाचे म्हणजे एकदा पेटवला आणि झाले असे होते नसे, सगळ्यांच्या अंघोळी होईपर्यंत सतत त्याकडे लक्ष द्यावे लागे. एक म्हणजे त्यात सतत आग नीट पेटलेली हवी आणि दुसरे म्हणजे बंब कायम पाण्याने पूर्ण भरलेला हवा. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे काम आमचे बाबाच करत कायम. 
                                   हा बंब म्हणजे एक तांब्याचे दंडगोल भांडे असते, साधारण दोन-अडीच फूट उंचीचे आणि दीड-दोन फूट व्यासाचे . याला एक झाकण असते, त्याला मध्यभागी एक गोल भोक असते , या झाकणाला अजून एक छोटे अंडाकृती भोक असते.  पण ह्या भोकाला एक अंडाकृती झाकण असते आणि या झाकणाला एक मूठ असते , हे झाकण उघडण्यासाठी. या मोठ्या झाकणाला आणि या भांड्याला प्रत्येकी दोन दोन मुठी असतात. बंब उचलायला आणि झाकण उघडायला आणि उचलायला. शिवाय या तांब्याच्या भांड्याला  बरोब्बर मधोमध अजून एक दंडगोल बसविलेला असतो. उंचीला बंबापेक्षा थोडा जास्त असतो. हा आरपार दोन्ही बाजूनी मोकळा असतो. याच्या खालच्या बाजूला तीन हुक असतात, ज्यात एक पितळेचा किंवा लोखंडी, जाडजूड झारा अडकविता येतो. हा बंब एका लोखंडी तिवईवर ठेवलेला असतो. यामुळे बंबाच्या नळाखाली बादली ठेवून पाणी घेणे सोयीचे होते आणि त्यांतील जाळाला, खालच्या बाजूनेही चांगली हवा मिळते, सतत पेटते राहण्यासाठी. 
                                    तर सगळ्यात आधी बंब पेटविण्याची गोष्ट. साधारणपणे आदल्या दिवशी सगळ्यांच्या अंघोळी आटोपल्या की बंब परत पाण्याने पूर्ण भरून ठेवला जात असे. प्रत्येकाने गरम पाणी घेतांना वेळोवेळी तेव्हढेच पाणी परत बंबात टाकले, तर हे काम अजून वेगळे करण्याची गरज भासत नसे. अलीकडेच मला अजून एक दुसऱ्या प्रकारच्या बंबाची माहिती झालीय. या बंबात जोपर्यंत पाणी टाकले जात नाही तो पर्यंत गरम पाणी यातून बाहेर पडतच नाही नळातून. याचे पण एक चित्र देत आहे तुम्हा वाचकांसाठी सुद्धा. तर बंब आदल्याच दिवशी पाण्याने भरून ठेवल्याची खात्री केलेली असली की, दुसऱ्या दिवशी पहाटे जास्त गडबड होत नाही. 
                                     बंब पेटवायचा म्हणजे सगळ्यात आधी, तो झारा अडकवलेला हवा, त्याशिवाय बंब पेटविणे शक्यच नसते. तसेच हा झारा नीट समतल अडकवलेला हवा. तो जर तिरका-तारका बसविला, तर परत नंतर गडबड होते. त्यात तसेच पेटते निखारे टाकलेले असले, तर तो फिरविता येत नाही आणि त्यातील राख खाली पाडणे पण अवघड होऊन बसते . मग तो काढून टाकावा लागतो आणि परत बसवावा लागतो. अशा वेळी खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा एखादा निखारा हातापायावर पडून जोरात चटका लागू शकतो, शिवाय झारा भयंकर तापलेला असतो ते वेगळेच. 
                                      झारा नीट बसवाल्याची खात्री झाली की मग एक शेणाची गौरी घेऊन त्यावर रॉकेल टाकावे लागते. गौरीचा आकार साधारण त्या आतल्या दंडगोलात जाऊ शकेल इतकाच मोठा असावा. कारण ही गौरी त्यातच टाकायची असते. मग ही गौरी चांगली पेटल्याची खात्री करून त्या आतल्या दंडगोलात टाकायची. अन्यथा ती आता टाकताच विझुन जाते, मग परत झारा काढून, ती बाहेर काढून परत पेटवावी लागते. वरून टाकलेली ही गौरी त्या झाऱ्यावर पडते. मग त्यावर आधी थोडे छोटे छोटे लाकडाचे तुकडे टाकायचे. हळूहळू तेही पेटतात आणि चांगला जाळ होतो. मग थोडा दगडी कोळसा आणि थोडे मोठे लाकडाचे तुकडे टाकायचे. मग ती आग बराच वेळ राहते. 
                                       मग हळूहळू बंबातील पाणी गरम व्हायला सुरुवात होते. बंबाच्या झाकणाला, जे छोटे झाकण असते त्यातून हात घालून, पाणी गरम झालेय का हे बघता येते. पण बऱ्याचदा फसवणूक होऊ शकते. वरून हात घालून पहिले की पाणी गरम लागते, पण नळ सोडला की थंडच पाणी येते.(याचे कारण मी इथे सांगायची काही गरज वाटत नाही मला)  तेव्हा खात्रीशीर मार्ग म्हणजे नळ चालू करायचा आणि बघायचे पाणी गरम झालेय की नाही. मग नळाखाली बादली ठेवून अंघोळीसाठी हवे तितके बाकी घायचे. पण जीतके पाणी घेतले असेल, तितकेच थंड पाणी दुसऱ्या बादलीने आणून परत बंबात घालायचे. तुम्हाला चांगली सवय असेल तर छोट्या झाकणातूनच घालता येते. पण थोडा वेळ जास्त लागतो. नाही तर सरळ मोठे झाकण उघडून खाली ठेवायचे किंवा बंबातच एका बाजूने उभे करायचे आणि पाणी टाकायचे. परत जसेच्या तसे झाकण लावून ठेवायचे. आम्ही लहान त्यामुळे कोणीतरी करून देत असे हे काम आम्हाला. कधी कधी अंघोळीच्या छोट्या तांब्याने हळूहळू, त्या छोट्या झाकणातून आम्ही पाणी टाकत असू, पण ही फारच वेळ खाऊ पद्धत. त्यातच पाणी बाहेर पडले म्हणजे बंबाच्या उभ्या बाजुवरून ओघळत खाली जाऊन बंबातील विस्तव विझण्याची शक्यता. ही शक्यता सगळ्यात बाबतीत खरी आहे . त्यामुळे पाणी कसेही टाकले तरी काळजी घ्यावी लागे. काही वेळा अंगावरच सांडले जात असे हे पाणी. हिवाळ्यात तर जास्त त्रास वाटे, आधीच थंडी त्यात अंगावर हे थंड पाणी सांडले गेले की अजूनच जास्त थंडी वाजे. वरून ओरडा खावा लागे तो वेगळाच. 
                                 बर, हे झाले गार पाणी बंबात टाकण्याबद्दल. आता जसे गार पाणी बंबात वेळोवेळी टाकावे लागे, तसेच बंब कायम पेटलेला राहावा यासाठी पण सतत लक्ष ठेवावे लागे . यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जात . एक म्हणजे शेणाच्या गौऱ्या, हासुद्धा वर्षभराच्या एकदम खरेदी करुन ठेवल्या जात, पोत्याने. या शेगडी साठी तर लागताच, पण वर्षातून साधारण तीन वेळा श्राद्ध घातले जाते अजूनही, त्यासाठी पण लागत. हल्ली अमेझॉन वर काऊडंग केक म्हणून ऑन लाईन उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे लाकडाचे छोटे छोटे तुकडे. हे सुद्धा वर्षभरासाठी घेऊन ठेवलेले असतं. लाकडाच्या वखारीतील कामाचे लाकूड कापून झाल्यावर शिल्लक राहिलेले छोटे छोटे तुकडे असत, हे तुकडे "बंबफोड" म्हणून विकले जात. या व्यतिरिक्त दगडी कोळसा लागे. घराजवळच म्हणजे "त्या" महादेवाच्या मंदिराच्या मागे एक कोळश्याची वखार होती, या वखारीतूनच आणला जात असे. सोबत लाकडी कोळसा सुद्धा, शेगडी साठी लागणारा. तिथे जाऊन हवा तितका मोजून घेतला की त्यांच्याकडाचा माणूस घरी आणून देत असे. 
                                ह्या बंबफोड मध्ये काही वेळा थोडे मोठे तुकडे सुद्धा असत. मग कुऱ्हाडीने फोडून त्याचे थोडे छोटे तुकडे केले जात. कोळश्याचे सुद्धा तसेच. हा जो कोळसा आणला जात असे, त्याच्या साठवणुकीच्या काही गमती आहेत. न्हाणीघराच्या वरचा भाग पाण्याची टाकी होती, पण शौचालयाच्या वरच्या भागाचा मात्र एक माळा होता. होता म्हणजे खरंतर आजच्या तारखेला हे सगळं आहे जसेच्या तसे.  या माळ्यावर हा दगडी कोळसा ठेवला जात असे. आता हा माळा साधारण सात फुटाच्या वर. इतक्या उंच हात पोहोचणे कठीणच. पण काढावा तर दररोजच लागे. मग मम्मीने यावर एक युक्ती शोधून काढली. थोडा कोळसा अगदी पुढच्या काठापर्यंत सरकवून ठेवायचा. मग दररोज लागणारा कोळसा एक लाकडी काठीने थोडा थोडा खाली पडायचा. तो संपला की परत स्टूल वर चढून अजून थोडा कोळसा पुढे सरकवून ठेवायचा. आता गम्मत अशी होती की बऱ्याच वेळा या कोळश्यावर कबुतरं घरटी बांधून अंडी देत. हे खालून काही दिसत नसे. त्यामुळे काही वेळा धक्क्याने ती खाली पडून फुटून जात. वाईट पण वाटे आणि वैतागही येत असे. काही वेळा मम्मी वर चढे तेव्हा सांगे परत घरटं केलय आणि अंडी पण आहेत त्यात. आम्हाला फार उत्सुकता वाटे त्याबद्दल, बघावेसे वाटे ते घरटे आणि त्यातील अंडी. पण खूप उंचावर असल्याने आम्हाला कधीच बघता येत नसे. पण हे सगळे किती तापदायक होत असेल मम्मीला हे आत्ता जाणवते आहे. एकूणच कबुतरांचा त्रास फार पूर्वीपासून आहे हे आता जाणवले. कारण आता मला सुद्धा कबुतरांचा त्रास सहन करावा लागतो खूप. 
                                अजून एक म्हणजे खान्देशात एकूणच शेंगदाणे खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी रोजच्या दोन्ही जेवणात शेंगदाण्याचा वापर असतोच. त्यामुळे वर्षभराचा भरपूर शेंगदाणा लागत असे. पण आमच्याकडे थेट शेंगदाणा विकत घेतला जात नसे. भुईमुगाच्या शेंगा वर्षभरासाठी खरेदी करून ठेवल्या जात असतं. आणि गरजेप्रमाणे महिन्या-दोन महिन्यातून त्या शेंगा फोडल्या जात असत. या फोडलेल्या शेंगा पाखडून त्यातील सालं आणि शेंगदाणे वेगळे केले जात. ही सालं सुद्धा फेकली जात नसतं. "झिरो वेस्टेज", "रियुज" ह्या सगळ्या संकल्पना जगण्याचा एक भाग होत्या. अगदी वारंवार जाणीव होतेय हा ब्लॉग लिहायला घेतल्यापासून. ही सालं, एका लोखंडी ड्रम मध्ये साठवून ठेवली जात असतं. याचा सुद्धा उपयोग बंबात जाळण्यासाठी केला जात असे . मला तर फार आवडत ही सालं . बंब विझतोय असे वाटले की खालून थोडी राख पडून टाकायची झारा हलवून आणि चिमटा घालून, मग वरून ही सालं टाकायची, की एकदम खूप धूर बाहेर येत असे आणि जादू झाल्यासारखी पुढच्या क्षणात एकदम जाळ होत असे. भरपूर टाकली की जाळ अगदी वरपर्यंत येत असे. मी तर बऱ्याच खेळत बसे हा खेळ, जादूचा!
                              आंब्याच्या लेखात मी सांगितले होते, आंब्याच्या कोयी गच्चीवर वाळण्यासाठी ठेवल्या जात. तर या वाळलेल्या कोयींचा वापर सुद्धा बंबासाठी इंधन म्हणून केला जात असे. तसेच घरात सुतारकाम झाले की, लाकडाला रंधा मारतांना बराच भुसा पडतो लाकडाचा . या भुस्याचा सुद्धा बंबात इंधन म्हणून वापर केला जात असे. हा भुसा सुद्धा पटकन पेट घेतो आणि लगेच जाळ होतो त्याचा. परत झिरो वेस्टेज!
                          आता एव्हढे सगळे रोज बंबात टाकून जाळल्यावर त्याची भरपूर राख तयार होत असे. त्या झाऱ्यातून  खाली पडत असे. ती जमिनीवर पडून वाया जाऊ नये म्हणून, या झाऱ्याखाली कायमची एक घमेली ठेवलेली असे. कधी तो झारा फिरवून, तर कधी त्यात लोखंडी चिमटा घालून ती राख खाली पाडली जात असे. हा लोखंडी चिमटा कायमचा या बंबाच्या एका मुठीत अडकवून ठेवलेला असे. सरते शेवटी सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की लगेच झारा काढून टाकला जात असे. जे काही निखारे शिल्लक असत त्यावर थोडे पाणी शिंपडून विझवले जात असतं आणि वाळले की परत वापरले जात असतं. रोजची राख, रोजच्या रोज एका डब्यात भरून ठेवली जात असे. मग हीच राख रोज भांडे घासायला वापरली जात असे. झारा नीट घासून स्वच्छ करून परत जागच्या जागी अडकवून ठेवला जात असे. बंब पाण्याने पूर्ण भरलेला आहे याची सुद्धा खात्री करून घेतली जात असे. बंब सुद्धा आठवड्यातून एकदा छान घासून चकचकीत केला जात असे. 
                                हिवाळ्यात मात्र सारखं या पेटलेल्या बंबाभोवती घुटमळत राहावसं वाटे. कारण या बंबातील जाळाची छान उब मिळत असे. वर येणाऱ्या जाळावर किंवा बंबाच्या झाकणावर हात शेकून छान गरम करायचे आणि तेच हात मस्त गालावर, डोळ्यावर आणि अख्ख्या चेहऱ्यावर फिरवायचे. मस्त उबदार वाटे सगळ्या चेहऱ्यावर सुद्धा!!

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
२९ मे २०२०





गरम पाणी बंबातून बादलीत पडतांना 



बंबाच्या झाकणाच्या छोटे 
झाकण उघडलेले 



बंबाचे झाकण तिथल्या तिथे 
असे उभे करता येते 
बंबात पाणी टाकण्यासाठी 



बंबाचे झाकण उघडून खाली 
ठेवून बंबात पाणी टाकता येते 




झारा असा अडकविला जातो 



झारा लोखंडी 
(पितळी झारा चोरीला गेला की मग हा 
लोखंडी झारा त्याची जागा घेतो )



 लोखंडी चिमटा 



शेणाच्या गौऱ्या 



बंबफोड किंवा सरपण 
(लाकडाचे छोटे छोटे तुकडे 
बंबात जाळण्यासाठी )


दगडी कोळसा 


कुर्‍हाड 


भुईमुगाच्या शेंगांची सालं 



लाकडाचा भुसा 



आंब्याच्या वाळलेल्या कोयी 



राख 


डावीकडे आहे तो आमच्याकडे होता तो बंब 
उजवीकडे जो आहे त्या बंबात वरून पाणी 
टाकल्याशिवाय नळातून पाणी बादलीत पडत नाही . 



ह्या पैकी पाहिलं दार आहे न्हाणीघराचं आणि 
दुसरे शौचालयाचे , त्या दारासमोरच्या जागेत 
बंब ठेवलेला असे आणि त्याच दाराच्यावर 
माळा दिसतोय त्याच माळ्यावर कोळसा 
ठेवलेला असे 













 











                     

Comments

  1. जुने दिवस आठवले आजोबा आजी बंब सर्व डोळ्यासमोर आले पण त्या डोळ्यात आलेल्या आसवांनी आजोबा आजी आई बाबा कोणीच स्पष्टपणे नाही दिसले

    ReplyDelete
    Replies
    1. आठवणींचे असेच असते...
      त्यातल्या त्यात भावनिक असले की असेच होते. पण तीच खर माणूस असल्याची खूण आहे. छान जपले आहे तू तुझ्या मधील माणूसपण!!!

      Delete
  2. स्वाती andJune 05, 2020 11:23 am

    नेहमी प्रमाणे मस्त झाला आहे आमच्या कडे अजूनही आहे बंब पण खेळण्यातला खूप मस्त आहे पाणी तापते मला आठवले नागपूर ला पूर्वी गरम पाणी म्हणजे बंब हे समीकरण होते माझी काकू तर मंगळागौरी ला त्यात भुईमुगाच्या शेंगा उकडवत असे मस्त लागत कारण खूप शेंगा लागत रात्रभर जागरण करताना मजा असे राखेने भांडी पण मस्त निघत आजकाल स्टील ची असतात पूर्वी पितळी किंवा तांब्याची असत आमचे कडे तांब्याचा बंब होता मस्त लेख��

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच की! छान आहे तुमचा खेळण्यातील बंब! मंगळागौर अणि भुईमुगाच्या शेंगा हे समीकरण माझ्यासाठी नवीन आहे.
      छान आठवणी! खूप धन्यवाद तुमच्या आठवणी सांगितल्या बद्दल! 😊😇

      Delete
  3. खूप छान वर्णन..माझ्या डोळ्यासमोर माझी आई आली,पहाटे लवकर उठून सगळ्यांसाठी बंबात पाणी गरम करणारी आणि नंतरही दिवसभर इतरांसाठी कष्टणारी..खरंच तेव्हा किती गृहीत धरतो ना आपण आईला.

    ReplyDelete
    Replies
    1. भारतात आई म्हणजे गृहीत धरण्यासाठीच असते. मुलींना तरी थोड मोठ झाल की याची जाणीव होते, मुलांना नाहीच होत सहसा..
      धन्यवाद 🙏

      Delete
  4. Ath pasun eti paraiyt chan👌 varnan
    Babfhod sarkhe shabhanchi knowledge madhe bhar👍

    ReplyDelete
    Replies
    1. खर सांगायचे तर मला पण हा शब्द अलीकडेच कळला...
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  5. Replies
    1. खूप जणांची मदत असते ह्या सगळ्या फोटो साठी!

      Delete
  6. जितेंद्र महाजनJune 05, 2020 4:13 pm

    खूप छान ताई बंबा बर इतके सविस्तर पणे लिहणे अप्रतिम

    ReplyDelete
  7. Manish ChaudhariJune 05, 2020 4:15 pm

    Chchan
    Ekhdya thikani construction suru asle ki tithla bhusa pan aanayche
    N bambat shenga pan ukalat hote

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी अचूक निरीक्षण अणि स्मृती!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
    2. खुप छान आहे लेख.लहानपणीचे दिवस आठवले. बंबात जाळ चालू राहण्यासाठी धडपडणारे बाबा आठवले.

      Delete
  8. नेहमी प्रमाणे लेख आठवणी ना उजाळा देणारा आहे.
    लेख खुप छान लिहिलेला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय मला सुद्धा लिहितांना असाच एक एक आठवणींना उजाळा मिळतो.
      धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  9. Bambavarcha lekh pan farch chan sarv varanan v mahiti vachun samor sarv chitra disate chanse

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद 😍! आता हा लेख वाचून बंब खरेदीला निघणार की काय?
      गम्मत केली हो.... 😍 😉😝

      Delete
  10. Sanjita ShrikantJune 06, 2020 2:48 pm

    लहानपणीच्या आठवणी ना उजाळा मिळाला आजी बंब पेटवून गरम पाणी देत असे. nicely described and illustrated. We used to roast on this fired coal by using grill some time.

    ReplyDelete
  11. वावा छान आठवण! मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

    ReplyDelete
  12. एल झेड कोल्हेJune 06, 2020 8:58 pm

    बंबाबद्ल माहिती देतांना अगदी अगदी लहानसहान गोष्टीचा ही विसर पडलेला नाही. छान!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  13. Khup Chan lihila aahes lekh. Mi kadhi pahila nahiye bamb pan tu kelelya savistar varnanatun nit kalala.

    ReplyDelete
    Replies
    1. खरय यातील तू काहीच पाहिलेले किवा अनुभवलेले नाही. तुझ्या साठी खरतर हा ब्लॉग म्हणजे एक पर्वणीच आहे 😊
      😍😇

      Delete
  14. कडकडीत उन्हाळ्यात घामाच्या धारा येत असताना बंबाचा हा उबदार लेख वाचायला मिळाला त्या मुळे हिवाळ्यातील थंडीची आठवण पण जागी झाली . असो, नेहेमीच्या वाचकांच्या अपेक्षा बरहुकूम तुझा हा लेख वैशिष्टय़पूर्ण उतरला आहे. हल्लीच्या पिढीने बंब हा प्रकार कधीही बघितलेला नसल्यामुळे त्यांना हा लेख म्हणजे एक पर्वणीच मिळाल्यासारखी आहे. माझ्या लहानपणी मी आणी आमचे सगळे फॅमिली मेंबर्स हे सगळे वर्णन केलेले अनुभव जगलो आहोत. मी तर तुझ्या वर्णनावर इतका connect झालो की बारीक बारीक details मी स्वानुभवाचा आनंद घेत घेत वाचत गेलो. मला वाटलं की एखादा तरी पॉईंट तू मिस केला असशील जो मी तुला दाखवून देईन. पण नेहमीप्रमाणे तुझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर तू एकही पॉईंट मिस केलेला नाहीस. अगदी बारीक सारीक गोष्टी पण विस्ताराने उल्लेख केल्या आहेत. बंबासाठी कोळसा व लाकडाचे ढलपे आणायला वडिलांबरोबर बर्‍याच वेळा मी गेलो आहे. शेणाच्या गवर्या मात्रा आम्ही कधी वापरल्याचे आठवत नाही. आपली बादली भरली की पुन्हा गार पाणी टाकायला नेहमीच मी आळस करायचो(😎😎) . तू mention केलेला दुसरा बंब मी एका नातेवाईकांच्या घरी बघितला होता अणि त्या काळी त्या बद्दल खूप अप्रूप पण वाटलं होतं. एकंदरीत हा लेख ही नव्या पिढीसाठी collectors item ठरावा. Good luck... 👍👍

    ReplyDelete
  15. हल्लीच्या पिढीतील कोणी वाचेन की नाही शंकाच आहे.
    एक विसरले होते, तुमचा अभिप्राय वाचून लक्षात आले, कुर्‍हाड चा फोटो विसरले होते तो टाकते आता लगेचच, धन्यवाद त्याबद्दल🙏. गरम पाणी घेतल्यानंतर गार पाणी टाकण्याचा आळस ही मुलांची खासियत होती 😜. गौरी शिवाय बंब कसा पेटणार हा एक मोठ्ठा प्रश्न मला पडलेला आहे आता. गौरी आणत असणार तुमचे लक्ष नसेल कदाचित 😝.
    सप्रेम धन्यवाद 😊😁

    ReplyDelete
  16. Superb article.. as expected.. Maushi u are amazing.. me upayogat aslela Banmba ter nahi pahila.. but just bajula The sun dilele baghitlay.. aani khup m
    Goshti aiklyat.. khup Chan lihites..continue the good work! It's a souvenir for young generation..

    ReplyDelete
    Replies
    1. Nice to hear from you!!
      Was waiting....
      Yess m trying to document each small thing thro this blog!
      Thnks a tons!!! ❤

      Delete
  17. Dipali WaghuldeJune 18, 2021 9:56 am

    Waa व्वा मस्तच. माझ्या माहेरी सुद्धा होता असा पाण्याचा बंब. हिवाळ्यात खूप कामाला यायचा हा बंब. त्यात लाकडाचे छोटे छोटे तुकडे टाकायचे नाहीतर शेणाच्या govarya टाकायच्या हा पन एक उद्योग होता लहानपणी.

    ReplyDelete
    Replies
    1. मला शेंगाचे साल टाकायला आवडत असे!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete
  18. मला ही माझ्या आईकडचा आणि सासरचा बंब आठवतो. त्यातले पाणी काढल्यावर परत कोणी पाणी भरले नाही की आईचे रागावणेही आठवले. नंतर शेगडीवर पाणी तापवायला सुरवात केली आणि मग थंडीमधे शेगडीच्या बाजूला मी सकाळी अभ्यास करायला बसायची म्हणजे छान ऊब मिळायची. लहानपणच्या आठवणी खरच किती रम्य असतात न… म्हणूनच संतांनापण ‘लहानपण दे गा ‘देवा वाटले.

    प्रा. सौ. वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  19. Khupach Chan varnan kele aahe .pictures pan khup chan aahet.Dhanyavad

    ReplyDelete
  20. ग्रीक संस्कृती व सिंधू संस्कृती मध्ये बरच bathing system बद्दल वाचलय...असे innovative पहिल्यांदा च वाचलय.
    चालू असलेल्या थंडीत हा लेख अधिक ऊबदार देऊन जातो. किती विस्तृतरित्या सारे रेखाटन आणी अप्रुप प्र.चि.१नंबर. माला तुमचाही तांब्याचा बंब खूप आवडला.
    बरका, बंबातून तापलेल्या पाण्याला चारकोलमय" असा सुवास. असतो तो भयंकर आवडतो.......अगदी तुमच्या ह्या लेखामूळे माला‌ लहानपणीच्या बंबाची आठवण झालीय.

    ReplyDelete
  21. Lahaanpanachya exactly hya sagalya athawani aalya except cow dung cakes 😜Punyala asayacha ha bambaji buwa 😀 Maza kaka khoop vaparayacha nantar nantar pan.
    Malatar bhatukalichya khelatala pan athawatoy.

    ReplyDelete
  22. उषा पाटीलJanuary 20, 2024 10:36 am

    आम्ही तर शेंगांचे फुलपट आणि शेण याचे लाडू करून ठेवायचं आणि आधी पेटवायला ते लाडू वापरायचं मग वरती इतर सामान लाकडं कोळसे इत्यादी काय छान पाणी असायचं ते मजा होते आता फ्लॅट सिस्टीम मध्ये हे बंब नाहीसे झाले ठेवायला जागा नाही इतर वस्तूच ठेवायला जागा नाही तर त्या बंबाची काय गोष्ट मस्त दिवस होते ते👍👍👍😍

    ReplyDelete
  23. चारू पाटीलNovember 07, 2024 8:29 am

    Lahan pani chya aathvani mast ahet saglya👌👌
    Sagla visar padla hota ata chya hya kamat

    ReplyDelete
  24. उषा पाटीलNovember 07, 2024 9:41 am

    वा! वर्षा तू बंबाचं वर्णन काय ऍक्युरेट केलं आहेस, डोळ्यासमोर बंब उभा राहिला असेल, आणि वरचे झाकण उघडलं तर पाणी गरम लागतं आणि नळातून थंडच येतं हे सायन्स पण खूप आवडलं, अर्थात तुझ्यासारख्या मुलीला ते काही कठीण नाही, तू लिहिलं आहेस की आम्ही शेंगांचे सालं त्यात पेटवण्यासाठी टाकायचो, आम्ही तर शेणामध्ये ते कालवून लाडू करून ठेवायचो, लाडू बंद टाकायला खूप मजा यायची, असा तो बंब होता, याचे सर आताच्या गिझरला नाही, पूर्वीचा सगळंच मजेशीर आणि मस्त होतं, तुझं लेखन तर अप्रतिम मला बंब फारच आवडला, तू कशाबद्दल काय काय लिहू शकशील हे सांगता येत नाही, चालू ठेव आम्ही वाचायला उत्सुक आहोत, मस्त!! मस्तच!

    ReplyDelete
  25. उदय बोरगावेNovember 07, 2024 12:15 pm

    बारकाव्या सहित आणि विस्तृत माहिती....👍
    आणि ज्यानी बंब पाहिला नसेल त्याला चित्र दर्शनाने सखोल माहिती मिळणार...
    छान 😊

    ReplyDelete
  26. नीता कुलकर्णीNovember 08, 2024 5:11 pm

    वर्षा सस्नेह नमस्कार 🙏🌹🌹

    माहिती आणि फोटोसकट सुंदर लेख लिहिलेला आहे. ज्यांना बंब ही संकल्पना माहीत नाही त्यांनाही हा लेख वाचून बंब म्हणजे काय ते समजेल.
    लहानपणची आठवण छान वाटली.
    अशा गोष्टी आपण कधी विसरत नाही .
    त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेत राहतो.....
    🌹🌹🌹🙏

    ReplyDelete
  27. डॉ सुनील पुरीNovember 09, 2024 7:26 pm

    आठवणीना उजाळा मिळाला माझ्या आईकडील आज्जी कडे असा बंब होता वडिलांकडे ottal असायचे.नेहमी प्रमाणे तुम्ही आठवणीना उजाळा दिला 🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...