दळण
(घरातील गमती जमती)
या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.
तर हा दळण सोहळा! हो सोहळाच म्हटला पाहिजे, फक्त खूप खूप कष्टाचा आणि मेहनतीचा. यातील काही भाग मला फारच आवडत असे. त्याचा उल्लेख येईलच त्या त्या वेळी. तर सगळ्या प्रकारचे वर्षभर लागणारे धान्य साफ करून कोठ्यांमधून साठवून ठेवलेले असे. मग ते सगळे गरजेप्रमाणे हवे तेव्हढे, घमेल्यात काढून घ्यावे लागे. हल्ली पिठाची चक्की ही संकल्पनाच नामशेष होत चालली आहे. आणि जिथे कुठे असते तिथे किलो प्रमाणे दर असतो दळण्याचा. तेव्हा मात्र तसे नव्हते, सगळेच लोक चक्कीवर जाऊनच धान्य दळून आणत असत आणि दळण्याचे दार शेराने असत. मग सगळे धान्य शेराने मोजून काढले जात असे घमेल्यांमध्ये. धान्य साठवतांना सगळी काळजी घेतलेली असे, त्याला कीड लागू नये म्हणून. पण जर तरीही कीड दिसले तर ते सगळे साफ करून घ्यावे लागे. आमच्याकडे तेव्हा जवळ जवळ दहा शेर गहू, आठ शेर ज्वारी, चार शेर कळणा, एक शेर मेथ्या, एक शेर मूग, दोन शेर हरबरा डाळ आणि चार शेर इडली पीठ, एव्हढे साधारण ८-१० दिवसांसाठी लागत असे. एक शेर म्हणजे साधारण एक किलो थोड्याफार फरकाने. आता एव्हढे एकदम लागण्याचे कारण म्हणजे एकत्र कुटुंब हे होतेच, पण एक महत्वाचा भाग म्हणजे साधारणपणे तेव्हा तरी खान्देशात दररोज भात खाण्याची पद्धत नव्हती. आमच्याकडे तर तेव्हा आठवड्यातून फक्त सोमवारी भात होत असे आणि आठ दहा दिवसांतून एकदा मुगाची खिचडी. त्याबद्दल सविस्तर सांगेनच पण नंतर कधीतरी. पण बाकी सगळे दिवस पोळ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी केल्या जात असत त्यामुळे पीठच भरपूर लागत असे.
ही सगळी धान्य मोजून घमेलीत काढून झाली की त्या घमेल्या एकवर एक ठेवून त्याची चळत केली जात असे. म्हणजे सगळ्यात मोठ्ठी गव्हाची घमेली सगळ्यात खाली आणि सगळ्यात लहान घमेली सगळ्यात वर. त्यानंतर एका जरा मऊ लांबट कापडाची किंवा मोठ्या रुमालाची चुंभळ केली जात असे. तर चुंभळ म्हणजे हे लांब कापड किंवा मोठा रुमाल उजव्या हातात धरायचा, डाव्या हाताची करंगळी आणि अंगठा ताणून धरायचा बाकी बोट दुमडून ठेवायची, आणि त्याभोवती हा रुमाल गुंडाळायचा. त्याची दोन्ही टोकं नीट खोचली गेली पाहिजेत जेणे करून ही रचना सुटता काम नये. मग बोटातून काढून घ्यायची. ही झाली चुंभळ तयार. ही चुंभळ डोक्यावर ठेवायची आणि मग त्यावर ही घमेल्यांची चळत ठेवायची. पण हे स्वतःचे स्वतः करता येत नाही, इतक्या घमेल्यांची चळत असली तर. एक-दोनच घमेली असेल तर जमू शकते. मग दुसरी व्यक्ती सुद्धा घमेल्यांना हाताने धरून, डोक्यावर घमेल्या ठेवायला मदत करत असे. काही वेळा एव्हढ्या घमेल्या ठेवतांना डोक्यावरची चुंभळ हलून जाते. मग घमेल्या डोक्यावरच थोड्या उचलून ती चुंभळ नीट करावी लागते. ही चुंभळ डोक्यावर ठेवून त्यावर या घमेल्या ठेवल्यामुळे त्या घमेल्या आणि त्यातील धान्याचे वजन थेट टाळूवर येत नाही आणि बराच आराम मिळतो. थेट डोक्यावरच धान्याने भरलेल्या घमेल्या ठेवल्या तर सगळे वजन थेट टाळूवर येते आणि काही क्षणातच तिथे जोरात वेदना सुरु होतील. मग हे सगळे डोक्यावर घेऊन दोन मजले खाली उतरावे लागे. पुढे चक्कीपर्यंत चालत जावे लागे. ती साधारण शंभर मीटर अंतरावर होती घरापासून. तिथे पोहोचल्यावर पुन्हा त्या घमेल्या उतरवून ठेवण्याकरिता कुणाची तरी मदत घ्यावी लागे. दुसरे कुणी नसेल तर ते चक्कीवाले काकाच मदत करत.
कधी कधी तिथे गेल्याबरोबर लगेच नंबर लागत असे, तर कधी थोडावेळ थांबून दळून मिळण्याची शक्यता असे, अशावेळी तिथेच थोडावेळ थांबून दळून घेऊन येता येत असे. तर कधी खूपच गर्दी असल्यास, खूप दळणं असतील तर मात्र थोडावेळ थांबून उपयोग नसे. अशावेळी दळण तिथेच ठेवून परत यावे लागे घरी आणि मग काही वेळाने परत जाऊन, दळण घेऊन यावे लागे. आम्ही या ज्या चक्कीत जात होतो, त्या चक्कीत दोन मशीन होत्या पीठ दळण्याच्या. दोन्ही मशीनच्या बाजूला एक एक लांबलचक आणि साधारण अडीच फूट उंचीचे लाकडाचे टेबल वजा प्लॅटफ़ॉर्म होते. धान्याच्या भरलेल्या घमेल्या आणि डबे ठेवण्यासाठी. एका मशीनवर ते काका स्वतः उभे राहत असत आणि दुसऱ्या मशीनवर त्यांनी कामासाठी ठेवलेले एक काका असत. या दोघांचे काम म्हणजे एक एक घमेली किंवा डबा उचलून त्यातील धान्य मशीन मध्ये टाकणे. हे धान्य मशीन मध्ये टाकण्याआधी ज्याचे असेल त्याला विचाराने जाड-बारीक किती हवे आहे ते. त्याप्रमाणे मशीनच्या चलन प्रणालीत बदल करायचा आणि रिकामी झालेली घमेली किंवा डबा लगेच खाली ठेवायचा कारण लगेच धान्याचे पीठ होऊन मशीन मधून बाहेर पडायला सुरुवात होत असे. घमेली किंवा डबा खाली ठेवण्यास थोडा उशीर झाला, तर पीठ खाली जमिनीवर पडण्याची शक्यता. मग मशीन मधून बाहेर पडणारे पीठ हातात घेऊन बघायचे, हवे तितके जाड-बारीक आहे का, नसेल तर लगेच त्या काकांना तसे सांगायचे म्हणजे परत ते हवा तो बदल करत आणि मग पाहिजे तसे पीठ मिळत असे. त्यानंतर आपली घमेली असेल तर ती थोडा थोडा वेळाने थोडी थोडी गोल गोल फिरवावी लागते. दळून पडणाऱ्या पिठाचे छोटे छोटे डोंगर होतात. गोल गोल नाही फिरवले तर एकाच मोठ्ठा डोंगर होऊन पीठ खाली सांडण्याची शक्यता असते. घमेली जर धान्याने काठोकाठ भरलेली असेल तर मात्र नुसती गोल गोल फिरवून भागात नसे. थोड्या वेळाने हाताच्या पंज्याने पीठ दाबत राहावे लागते. म्हणजे मग ते पीठ नीट मावते त्या घमेलीत, नाहीतर सांडले जाणार. डबा असेल तर त्यातही तसेच पीठ दाबत राहावे लागते थोडा वेळाने. असे करत आपले धान्य किंवा आपल्या दळणातील एक धान्य संपले की ती घमेली तिथून काढून, लगेच दुसरी ठेवावी लागे नाहीतर दोन पीठं एकत्र होण्याची शक्यता किंवा दुसऱ्याचे पीठ आपल्या घमेलीत पडण्याची शक्यता.
यात एक फारच गमतीचा भाग होता. मला फारच मजेशीर वाटे ते सगळे बघायला. आत हे दोन्ही काका दिवसभर चक्कीतच असत. आणि चक्कीत दिवसभरात कितीतरी किलो पीठ दळुन होत असे. बर हे सगळे चालू असतांना कितीतरी पीठ सारखे उडत असे. हे काका डोक्याला छाटी किंवा रुमाल बांधत. त्यामुळे त्यांचे डोक्यावरील केस नीट राहत असतील. पण भुवई, पापणी, मिशी आणि हातावरील केसांवर ह्या उडणाऱ्या पिठाचे कण सतत बसत असत. ते पूर्ण पांढरे होऊन जात आणि फारच मजेशीर दिसत असे. मज्जा वाटायची हे सगळे बघतांना. पण तिथे त्यांच्या समोर उभे राहून हसण्याची सोय नव्हती. असं वाटे त्यांना कळलं आपण त्यांना हसतोय तर ते चिडतील, रागावतील. दुसरा भाग म्हणजे अगदी या चक्की समोरील रस्त्यावरून जरी चालत गेले तरी पिठाचा एक विशिष्ट वास येत असे, मला फार आवडे हा पिठाचा वास.
या दोन्ही मशीन विजेवर चालणाऱ्या होत्या. पण त्यात धान्य दळण्यासाठी प्रत्येकी दोन दगड होते. धान्य दळून दळून काही काळाने ते गुळगुळीत होत. मग ते बाहेर काढून त्यांना 'टाकावुन' घ्यावे लागत असे(टाकवण्याबद्दल ची माहिती दुसऱ्या एका सविस्तर लेखात येईल, तेव्हा ते वाचता येईल). अशा वेळी ते दगड बाहेर काढून ठेवलेले दिसत आणि तितक्या वेळ धान्य दळून मिळत नसे. हे दृश्य त्या दिवशी त्या रस्त्यावरून आले गेले तर बघायला मिळत असे. आता हे सगळे किती दिवसांनी होत असे, किती वेळ लागत असे हे मला अजिबातच माहिती नाही.
मग हे दळलेले पीठ डोक्यावर ठेवून चालत येऊन, घराचे दोन मजले चढून यावे लागे. लगेच दळलेले पीठ आणले तर ते पीठ खूप गरम असे आणि त्यामुळे त्या घमेल्या सुद्धा तापून जात त्या गरम पिठामुळे. अक्षरशः चटका लागत असे पिठाचा आणि घमेल्यांचा सुद्धा. घरी आल्यावर परत कुणाच्या तरी मदतीने या घमेल्या उतरवून जमिनीवर ठेवल्या जात. हे करतांना डोक्यावरील चुंभळ जवळ जवळ खाली पडूनच जात असे. मग एक एक घमेली, त्या चळतीवरून उतरवून खाली ठेवली जात असे आणि प्रत्येक घमेलीतील पीठ मध्यभागी, अगदी तळापर्यंत उकरून ठेवले जात असे. परत तो पिठाचा छान वास घरभर पसरत असे. पीठ असे उकरून ठेवल्याने पीठ लवकर गार होण्यास मदत होत असे. चक्कीत दळण्यासाठी जी कोणी व्यक्ती जात असे, त्या व्यक्तीच्या अंगावर सुद्धा खूप पीठ असे, चक्कीत असतांना उडालेले. घरी आल्यावर कपडे बदलणे आणि हात, पाय, तोंड धुतल्याशिवाय पर्यायच नसे.
तासा दोन तासात ही सगळी पीठं गार होऊन जात पूर्णपणे. मग प्रत्येक पीठ चाळणीने चाळुन घेतले जात असे. हे करतांना परत स्वयंपाक घरात आणि गाळणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पीठ उडत असे आणि परत एकदा घरात, या पीठाचा छान वास दरवळत असे. मग त्या त्या पीठाचे डबे काढून ते ते पीठ भरले जात असे. पीठ डब्यात टाकले की मावत नसे, मग ते तळव्याने दाबून दाबून भरावे लागे, सगळे पीठ मावावे म्हणून. फारच मस्त वाटते असे पीठ दाबतांना, तळवा आणि बोटांखालचे पीठ दाबले जात असे आणि बोटांच्या फटींमधून पीठ वर येत असे. तळव्याला एक प्रकारचा छान मऊ मऊ स्पर्श होत असे त्या पिठाचा, त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारच्या गुदगुल्या झाल्यासारखे वाटे. एक प्रकारचा छान खेळच!
कधी कधी घाईने एखादेच पीठ दळून आणायचे असे. अशा वेळी आम्ही मुली जात असू. घमेली एकच आणि छोटीशीच असली तरी आम्हालापण चुंभळ हवीच असे. सगळं मम्मी करते तसेच आम्हालाही करायचे असे. मग मम्मी त्यातल्या त्यात थोडा छोटा रुमाल काढून त्याची चुंभळ करून देत असे आम्हाला. काही वेळा आमचा लाडका काका सुद्धा असे आमच्या बरोबर. ह्याला एक खोड होती. कुठलेही धान्य असो आपला नंबर लागेपर्यंत याचे अखंडपणे दोन-चार, दोन-चार, धान्याचे दाणे तोंडात टाकून खाणे चालू असे.
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
२० एप्रिल २०२०
दळण
(गरजे प्रमाणे धान्य घमेल्यात काढून ठेवणे म्हणजे दळण )
पितळी शेर धान्य मोजण्यासाठी
लोखंडी शेर
चुंभळ
दळलेले पीठ घमेलीत पडतांना
डोंगर तयार होतात ते असे
पिठाची सार्वजनिक चक्की
पिठाची सार्वजनिक चक्की
पिठाची सार्वजनिक चक्की
विषय खुप छोटासा असतो पण तू छान मांडणी करते 👍
ReplyDeleteअगदी मनापासून खूप खूप धन्यवाद 😍!!
Deleteविषयाचि पकड आणि त्याचे ओघवते निवेदन एकदम भारि त्याच बरोबर स्पटिकरणासाठि जमवलेलि फोटोग्राफ मुळे सचित्र निवेदन मनात ठसते
ReplyDeleteखरंय , फोटो मुळे अजूनच जास्त मज्जा येते . ते फोटो जमा करायला मलाही खूप लागते आणि मी इतर खूप लोकांना पण मी खूप नाचवत असते ! त्यात तुम्ही सुद्धा आहात !😉😍😄
DeleteKharay Agadi..yat dalanyat ghas ha prakar pn asaycha..aata sarv aathwale tuza lekh wachun..thanx dear Tu aamhala flashback madhe ghewun jates tyabaddal..
ReplyDeleteअग , यातील घास या प्रकाराबद्दल नीट डोक्यात होते , पण फायनल ड्राफ्ट करतांना नेमके सुटले , बार झालं तू तरी उल्लेख केलास त्याचा , खूप धन्यवाद !🙏🤩
DeleteDalun zale ki pith Baher yenyachya thikani metal ne marnyachi pan pratha hoti
ReplyDeleteअरेच्च्या , हे तर मी पारच विसरून गेले होते ! मनःपूर्वक धन्यवाद , आठवण करून दिल्याबद्दल !🙏😊
DeleteAmhi pn chana dal uchlun
ReplyDeleteKhat asu , agti konachyahi
Dabyatli
वावा , छानच ! एका पिढीतील लोकांच्या बऱ्याच आठवणी आणि सवयी सारख्याच असतात , छान वाटते हे समजल्यावर !🤩😇
DeleteEkhada chotasha vishaivar Tu kiti lihu shakate kharach 👌wawa
ReplyDeleteTya kali to motha vishai hota hehi titkech khare
Chan mandalas sarvch goshti
खरंतर अशा छोट्या छोट्या विषयावरील असेच सविस्तर आणि मनोरंजक लिखाण मी बरेच वाचले आहे . त्या वाचनाचा बराच प्रभाव आहे त्यामुळे , हे सगळे शक्य होतेय ! धन्यवाद !!🤩😇
Deleteदळण दळून मस्त झाले आहे पूर्वी तर जाते होते पर्वा करोना मुले आमच्या इथे दळण दळून मिळत नव्हते तेव्हा डोक्यात आले आज जात असत तर निदान प्रयत्न करून बघता आले असते आज काल छोट्या घरघंटी मिळतात ती तरी हवी होती आमच्या घरा जवळ अजून गिरणी आहे आता 8 रुपये किलो असे दळून मिळते चुंबळ नवीन शब्द कळला लहान पणी म्हणजे साधारण 6वी7वीत असेन तेव्हा मी मार खाल्लेला आठवला कारण नागपूर कडे घरकाम करणाऱ्या बायकांनीच दळून आणायचे मुलीनी गिरणीत जायचे नाही का माहीत नाही पण मी कुतूहल म्हणून चोरून गेले होते लेख मस्त झाला आहे कळणा म्हणजे (हुलगे )का?
ReplyDeleteह , जात्यावर दळलेल्या पिठाच्या पोळ्या, भाकरी आणिच चविष्ट लागत असणार , काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या नावाखाली आपण या सगळ्या केव्हाच मागे सोडून आलो आहोत . हो चुंभळ हा शब्द खास खान्देशी ! नको करू सांगितली गोष्ट की ती हमखास चोरून एकदा तरी जाते ! रम्य ते बालपण !
Deleteकळणा ची सविस्तर माहिती, 'जेवणाची संध्याकाळ' या लेखात मिळेल.
Deleteलिखाण ओघवती व लहान लहान गोष्टी ची आठवण करून देत मस्तच
DeleteYe tu kharach khoop chhan lihite agdi savistar varnan tymule mazya pan zunya athavani ekdam tazya zhyalya.tighe lekh ekdam mast����
ReplyDeleteमस्तच , तुला माझे लिखाण आवडते आहे आणि तू ते आवडीने वाचते आहे सगळे आले ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🤩😇
Deleteलेख छान. कऴना म्हणजे उडद आणि ज्वारी च ना .
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteहो कळणा म्हणजे ज्वारी अणि उडीद, सविस्तर माहिती साठी "जेवणाची संध्याकाळ" (गच्चीवरील गमती जमती) या लेखात मिळेल.
Dalan mhanyala sope pan tyala pan tu kiti sarv savistar lihile aahe agdi sarv barik sarik aathaun ����khup chan����
ReplyDeleteअसेच कायम तुम्हा सगळ्यांकडून प्रेम मिळत राहील अशी आशा आहे , त्या प्रेमामुळे आणि कौतुकामुळेच हे सगळे शक्य होतेय मामी !😍😇🙏
Deleteतुझ्या ह्या सगळ्या लेखनामुळे माझं लहानपण मी पुन्हा अनुभवतो आहे.. आम्हाला बहीण नसल्यामुळे दळण करून आणणे हा आम्हा दोन्ही भावांचा रेग्युलर अनुभव होता. विशेष म्हणजे आमचे अनुभव तुझ्याशी अगदी तंतोतंत मॅच होताहेत. तुझं अचूक वर्णन अणि बरोबर जोडलेले photoes त्यामुळे हा सोहळा मूर्तिमंत अनुभवता आला. Gharat मी लहान असल्यामुळे normally मलाच हे काम करावे लागायचे. आपलं दळण चालू असताना एका लाकडी दांडीने सगळे दणादण त्या outlet spout वर मारायचे अणि काही पीठ वाया जाऊ नये ह्याचा प्रयत्न करायचे ते मला स्पष्ट आठवतaआहे. मला पण आमचा गिरणीवाला पिठात नखशिखांत पांढरा झालेला आठवतो आहे. चुंबळ हा शब्द मला वाटायचं की आमचा मराठवाड्याच्या आहे. खानदेशात पण तोच शब्द वापरतात हे ऐकून gammat वाटली. एकंदरीत छान दळण दळलं आहेस, त्याबद्दल तू निश्चितच कौतुकास पात्र आहेस... 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteसगळ्यांना आपापले बालपण परत काही क्षण का होईना जगता यावे आणि त्यातील आनंद परत उपभोगता यावा त्याच साठी हा सगळा प्रपंच ! कुणी हे सांगितले की मला फारच आनंद होतो . काहीही वाया न जाऊ देणे हा एक वसाच होता खरं म्हणजे . आता अगदी उलट झालेय . वापरण्यापेक्षा जास्त वाया जाते ..... अरे वा , चुंभळ हा शब्द तुमच्याकडेही वापरला जात होता हे वाचून मजाच वाटली , मला वाटत होते हा शब्द खास खान्देशी . बाकी खास प्रकारचे दळण काही मला दळता येत नाही , पण हे दळण छान दळले हे वाचून आनंद झाला ! मनःपूर्वक धन्यवाद ! 🤩😇🙏
Deleteआग,किती छान लिहितेस ग,तु!खरच तुला असे बारीकसारीक विषय सुचतातच कसे .अगदी क्षणभर वाटवां आपण गावालाच आहोत डोक्यावर चुंबळ घेऊन एकावर ३/४घेमेल्या रचून गिरणीत चालले आहे .दळण दळे पर्ययंत दोघी तिघी बायका सम्स गप्पांमधे रंगात तो मधेच गिरणीवाले काका म्हणतात तुमचं दळण टाकलं आहे आता .मग ती घेमेली अशी दोन्ही हातांनी हलवायची तेव्हा पीठ थोडं खाली बसायच .नाहीतर हाताने दाबायचं तेव्हा बरोबर घेमेली भरायची हाताला चटके पण लागायचे गरम पीठाचे .असं खेड्यातील जीवन होतं हुबेहुब प्रसंग रंववून सांगितलं .वा!छान!मला तुझेच लेख आवडतात मी आवडीने वाचते नेहमी कधी कधी उशीरा वाचते .काही वेळेस राहूनच जातात वाचायचे पण बहुधा आवर्सजून वाचते छान खूपच र्व खूपच
DeleteMast Chan varnan kele aahes lahanpani divas athwale .me pan jateywar dalele aahe metkut ,dal,,,,
ReplyDeleteह्म्म्म, जात्यावर च्या पिठाची चव जास्तच छान असणार
Deleteखुप आनंद झाला तुम्हाला ईथे बघून!
खूप सारे धन्यवाद 😍!!!
Khup chan lihilay
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteवर्षाली आमच्या कडे पिठाची गिरणी होती.मी स्वतः दुसऱ्या ची दळणे दळून देत असे जेव्हा बाबा घरी नसतील तेव्हा.हा लेख वाचतांना माझे अनुभव आठवले.तुझे लेख छान असतात.व माझ्या च मनातले लिहीलेस अस वाटतें.
ReplyDeleteखुप छान.
रत्ना भोरे
वावा काकू सलाम तुम्हाला! आणि छान वाटले तुमच्या आठवणी वाचायला, सप्रेम धन्यावाद 🙏 😍
Deleteखूप कौतुक.आणी कमालच....व तुमच्या मेहनतीच्या "शक्तिपीठा"ला सलामच! सारे प्रचि अप्रुपच जमवलेले.लिखाणाची गुंफण अगदी डोळ्यासमोर उभी राहते.मी गिरणी visit केलीय.पीठ कोठूनपडत तिथ लाकडी दांडीपण घेऊन आपटलय... पण' दळण' वळण नाही केलय...आता" सामानच 'हाती मिळतय.
Deleteहो लाकडी दांडा, सगळ्यांच्या आठवणी चा, मी मात्र लिहिताना विसरले.
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
फोटो मधील चक्की लहान आहे गावात मोठी चक्की होती 99% घरातील स्त्रिया दळायला जात मी मात्र exception होतो मी second year ला असे पर्यंत दळण घेऊन जात असे 4 चौथे गहू 2 चौथे ज्वारी 1 चौथे कळणा शेरभर हरभरा डाळ मी कॉलेज चे कपडे घालून गेलो तर चक्की मध्ये असलेल्या मामी मावशी किंवा काही बहिणी सांगायच्या तू थांब बाहेर मी बघते what unconditional love I experienced then.
ReplyDeleteवावा! माणुसकी अणि प्रेम! U r too lucky to experience it!! आता चक्की लहानच नाही तर जवळ जवळ नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.....
Deleteअसो मनःपूर्वक धन्यवाद, तुझे अनुभव सांगितल्या बद्दल! 😊 😇
मस्त.. माझेही दळणाचे अनुभव तंतोतंत असे आहेत. हायस्कूलला गेल्यावर अगदी बारावीपर्यंत सायकलला मागे डबा लावून गिरणीत गेल्याचे आठवतंय. घर चौघांचे असल्याने पंधरा दिवसातून एकदा जावे लागायचे अन गहू, ज्वारी अन हरभरा डाळ इतकंच दळण लागायचं.
ReplyDeleteलेख मस्त..पिठाने माखलेले गिरणी काका अजून डोळ्यासमोर आहेत..
वावा मस्तच! तंतोतंत सारखे अनुभव!
Deleteमला दिसलीच लगेच सायकल वर दळण घेवून जाणारी सीमा!
खानदेशात भात खाण्याचे प्रमाण फार कमी,
Ani वेगवेगळ्या भाकरी खाण्याची सवय जास्त, त्यामुळे दळण सुद्धा भरपूर!
खुप सारे प्रेम 😍😇❤️
खुप छन लिहिले आहे. खुप आधि, माला पान आठवते डोंबिवलीला सुधा मम्मी अस डोक्या वर घेवुन जायची, नंतर नंतर राजमल च्य पिश्विंतुन दलन न्याची.
ReplyDeleteहो, नंतर बरीच मंडळी पिशवीतून दळण घेऊन जात असत!
Deleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
काल परत गिरणीत राजमल लखीचंद ची पिशवी परत दिसली
Deleteखूप छान आठवण. माझ्या माहेरी घरासमोरच पिठाची गिरणी आहे त्यामुळे ही सगळी majja मी अनुभवली आहे. त्यात लग्नाचे गहु dalayche मग tr दिवसभर गिरणी चालू असायची. खूप सारे लोक असायचे तेव्हा dalyala. आम्ही गिरणीला चक्की अस mhant होतो तेव्हा. मस्तच vatl वाचून
ReplyDeleteहो, चक्की!
Deleteछान प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी!!
सप्रेम आनंदी धन्यवाद 😇🤩😍
लहानपण आठवले , आम्हीपण असेच घमेल्यांवर घमेल्या घेऊन जात, दिवाळीच्या आधी तर शेवांचे पीठ, चकल्यांचे पीठ , सोजी दळतांनाची वेगळीच कसरत असायची कारण प्रत्येकासाठी चक्कीवाला वेगवेगळी वेळ सांगायचा पण त्यातही एक वेगळीच गंमत असायची.
ReplyDeleteहो दिवाळी दळण हा एक वेगळा अणि महत्वाचा भाग!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Dylan gharatle gamiti khoopch sunder lekh lihilas mazi aajji pan dokiyawar cumbal tewar ghameli eeivaji butti gheun pith dalun aathwde bajar aanaychi
ReplyDeleteSaglech lekh wachun mind prassan hote maheri che lahanpan aathwtw
Aasech limit raha
वावा छान अनुभव! खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
DeleteKhup chan
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteपरफेक्ट... अगदी हल्ली हल्ली पर्यंत असेच करत होतो आम्ही. जवळपास नव्वदच्या उत्तरार्धापर्यंत माझी आई व तिच्या मदतनीस बाई ज्यांना आम्ही आक्का म्हणायचो, त्या दगडाचे 'जाते' म्हणजे चक्की मधे पीठं व साखर दळत. ते मला बघायला भारी आवडायचे. 'भातुकली'मधले लाकडी खेळण्यातले 'दळणाचे जाते' माझे सगळ्यात आवडते होते.
ReplyDeleteमी ज्या कॉलेजमधे जायचे तिथे वाटेत एक चक्की होती, मला हे सर्व डोळ्यापुढे उभे राहिले.
आमच्याकडे कोकणात घमेलीऐवजी अल्यूमीनियमचा डबा किंवा पितळी डबा (अर्धा किलो, एक किलो, दोन किलो, पाच किलो) एक कंबरेवर एका हाताने, एक डोक्यावर असा धरून दळण करायला ये-जा केले जाते. 'चुंबळ'सुद्धा केली जाते. आम्ही 'चुंभळ' नाही म्हणत.
करोना महामारीमधे आमचे चक्कीवाले जे गावी गेले ते काही परत आलेच नाहीत. मग घराजवळ चक्की नसल्याने रेडीमेड पॅकिंगचे पीठसुद्धा आणले. पण इकडे कोकणात अजूनही सगळीकडे सगळ्या प्रकारची पीठं काही रेडीमेड मिळत नाहीत, दरवेळी शहरात जाणे शक्य नाही आणि दरवेळी पॅकिंगचे पीठ परवडत नाही महिन्याच्या खर्चाचा अंदाज चुकतो. म्हणून आणि इकडे 'आगोट' केली जाते त्यामुळे, धान्य, कडधान्ये, डाळी शिल्लक होते, मग रेडीमेड पीठ कशाला, म्हणून घरघंटी घेतली. 'आगोट' म्हणजे शिल्लक किती काय काय आहे हे पाहून, वर्षभरात पुरेल इतके सर्व प्रकारची त्यातली नवी धान्य, कडधान्ये, डाळी एप्रिल-मे दरम्यान आणून, जुनी व नवी साफ करून, निवडून, पाखडून, उन्हात रोज तीन ते चार दिवस वाळवून ते लवंग / कडुलिंबाची पाने घालून घट्ट झाकणाच्या अल्यूमीनियमचा डबा किंवा पितळी डब्यात ठेवली जातात किंवा अल्यूमीनियमच्या मोठ्या पिंपात (टाकीत) प्लास्टिक पिशवी लावून घट्ट पॅक करून साठवून ठेवली जातात. मग दळण करायची वेळ आली की हे साठवणीतले 'आधी जुने शिल्लक संपवायचे, मगच नवीन वापरायचे' या तत्वावर जितके हवे तितके काढून घेऊन दळून घ्यायचे.
खुप छान लेख
ReplyDeleteवा वा किती सुरेख लेख लिहिला आहे... यथार्थ वर्णन केलेले आहे..
ReplyDeleteवाचताना चित्र समोर उभे राहिले..
👌👌👌👌👍🌹
आता फक्त आठवणी .मी गेली 15 वर्षे गिरणीत गेले नाही ,सर्व रेडिमेड .
ReplyDeleteखूप सारे प्रेम aplya दळण process+
ReplyDeleteवर्णनासाठी आणि प्रचि.,लागणारी antique भांडी, चुंबळ आवडले... सार्वजनिक गिरणी लहानपणी पहिली.. observations केलेत..
सद्यस्थिती प्रमाणे दळण वळण
शक्तीपीठासाठी " लिफ्ट ने करत आहे... घरगुती वरील मजल्यावर राहणारे त्यांच्याकडे atachakkiतून..( आणि बर त्यांचे ही अडनाव Choudhary aahe.)..Sanjita
खूप छान लेख आहे.आपल्या नेहमीच्या वापरातील विषय पण छान रीतीने मांडला आहे. चुंभळ, कळणा हे शब्द मला नवीन आहेत.अप्रतिम लेख आहे.
ReplyDelete