एक ठळक चित्र (गॅलरीतील गमती जमती) तेव्हा दररोजचे दूध काचेच्या बाटल्यांतून मिळत असे . या बाटल्या ने-आण करण्याकरिता एक धातूचे शिंक मिळत असे , दोन बाटल्यांचे , चार बाटल्यांचे , सहा बाटल्यांचं . आमच्या कडे चार बाटल्यांचे होते . सकाळी चार बाटल्या आणल्या जात . एक बाटली अर्धा लिटरची असे . पहाटेच जावे लागे . तेव्हा आम्ही उठलेल्या नसू अजून आणि एव्हढ्या चार दुधाने भरलेल्या बाटल्या आम्हाला उचलून आणणे शक्यही नसे . पण संध्याकाळी एक किंवा दोन बाटली गरजेप्रमाणे आणली जात असे . हे मात्र आम्हाला नक्कीच शक्य असे . त्या चार बाटल्यांच्याच शिंक्यात गरजेप्रमाणे एक किंवा दोन रिकाम्या बाटल्या ठेवून ते घेऊन जायचे आणि एक किंवा दोन भरलेल्या बाटल्या घेऊन यायच्या . या बाटल्यांची एक गम्मत असे ! या बाटल्यांचे तोंड...