लद्दू सावकाराच्या वाड्यात आनंदी परी! (अभ्यासातून रंजन...) गेला काही काळ सातवाहनांचा अभ्यास चालू होता, त्यामुळे माझा कायमचा मुक्काम "प्रतिष्ठान" मध्येच होता. अगदी नागघाटापासून ते सातवाहनांच्या राजवाड्यापर्यंत सर्वत्र वावर चालू होता माझा. नृपती हालच्या 'गाहासत्तसई' मधून तर सातवाहनांच्या राज्यात कान्याकोपऱ्यात बागडायला मिळाले. भरूच पासून मच्छलीपट्टनम् पर्यंत तत्कालीन प्रवास झाला. सर्व प्रकारच्या कलेचा उच्चांक याची देही याची डोळा अनुभवता आला! सम्राज्ञी नागनिकेसोबत हितगुज करता आले. महाराष्ट्राचे सुवर्णयुगच अनुभवता आले! अर्थातच याचे सगळे श्रेय सातवाहनांचे आद्य संशोधक आदरणीय डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनाच जाते! हा सगळा अनुभव आभासी पातळीवर असला तरी तो इतका चैतन्यमयी होता की, तो अनुभव एका क्षणाकरीताही आभासी असल्याचे भासलेच नाही! त्यामुळे प्रतिष्ठान सोडून, तिथून बाहेर पडावेसेच वाटेना... विरोधाभास असा की तरीही मला आजच्या पैठणला भेट देऊन नृपती सातवाहन, नृपती हाल, सम्राज्ञी नागनिका, तसेच इतर नृप तथा सम्राज्ञी यांची गाठ घेऊन, तिथे प्रतिष्ठ...