मेथीची भाजी - २(पोपटी भाजी) (घरातील गमती जमती) आज मेथीची भाजी भाग दोन मध्ये मेथीच्या पाले भाजीच्या खास खान्देशी पाककृती. त्यापैकी सगळ्यात खास आणि सगळ्यांची लाडकी पोपटी/हिरवी भाजी किंवा दाणे लावून भाजी असा सुद्धा उल्लेख केला जातो या भाजीचा. आम्ही लहान असतांना जवळ जवळ प्रत्येक घरात दिवसातून एक वेळेला पोपटी भाजी होतच असे. त्यामुळे आम्हा मुलांना कधी कधी नको सुद्धा वाटे थोडं मोठं झाल्यावर. पण आणखी थोडं मोठं झाल्यावर शिक्षणासाठी वसतीगृहात जाऊन राहावे लागले. मग मात्र फार आठवण येत असे, आमच्या या लाडक्या पोपटी भाजीची! मग सुट्टीचे घरी गेले की आम्ही चक्क फर्माईश करत असू पोपटी भाजीची आणि खूप आवडीने आणि मनापासून खात असू. ताट अगदी चाटून पुसून साफ. हे करण्याची सुद्धा एक खास पद्धत होती आमची, पुढे ती पद्धत अगदी सविस्तर दिली आहे. नक्की करून बघा. आणि सांगा आवडली की नाही? किंवा किती आवडली आणि किती आवडली नाही. ही भाजी म्हणजे सगळ्यांची लाडकी तर होतीच, पण अतिशय स्वादिष्ट, चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा! चला तर मग आज मेथीची पोपटी भाजी करू या. ...